रुबाब, मराठी कथा - [Rubab, Marathi Katha] अनावश्यक खर्चापाई गेलेला रुबाब परत मिळविण्याची सरळ साधी कथा.
अनावश्यक खर्चापाई गेलेला रुबाब परत मिळविण्याची सरळ साधी कथा
विवेकचे लग्न पाचच दिवसांवर आले होते. मुलगी त्याला अगदी मन पसंद, जशी प्रतिमा मनात रंगवली होती अगदी तशीच मिळाली होती. तिच्या सौंदर्यापुढे सुंदर हा शब्दही फिका वाटत होता. नाकीडोळी रेखीव,ओठ जणु गुलाबाच्या पाकळ्या, पाणीदार डोळे, कोरीव भुवया, गौर वर्ण, काळेभोर लांबसडक केस आणि एखाद्या साच्यातून मुर्ती साकारावी तसा शरीराचा आकृतीबंध अशा अप्रतिम सौंदयाची राणी पत्नी म्हणून लाभणार आहे यामुळे तो मनोमन खूष होता.
पंधरा दिवसांपुर्वीच त्याचा अत्यंत जवळचा मित्र, बालपाणापासूनचा लंगोटीयार व व्यावसायिक पार्टनर जितुचं लग्न झालं होतं. जितुच्या लग्नाची चर्चा पूर्ण शहरभर आणि सर्व मित्र परिवारात होत होती. लग्न होवून पंधरा दिवस होवून गेले तरी त्या लग्नाची चर्चा अद्याप चालू होती. त्या लग्नाच्या रुबाबाची जादू अद्याप ओसरली नव्हती. जो-तो लग्नाचे तोंडभरून कौतुक करत होता.
आपले लग्न जितुच्या लग्नापेक्षा मोठे करायचे. लोकांनी आपल्या लग्नाचे जितुच्या लग्नापेक्षा जास्त कौतुक केले पाहिजे असे विवेकने मनोमन ठरवले होते. रात्री झोप येईना म्हणून विवेक घराच्या स्लॅबला लावलेल्या पंख्याकडे पाहत भुतकाळात हरवून गेला. अत्यंत गरीब परिस्थतीतून त्याने जितुच्या साथीने व्यावसाय चालू केला होता. विवेकने लहाणपणापासून काम करत स्वत:चे शिक्षणही पूर्ण केले होते. त्याने हॉटेलमध्ये, कपडयाच्या दुकानावरही काम केले होते, कपडयाचे दुकान, बांधकाम मजूर अशी विविध कामे करून त्याने पैसा जमवला होता आणि बालपणापासूनच मित्र असलेल्या जितु बरोबर भागीदारीमध्ये फर्निचरचा व्यावसाय सुरु केला होता. त्या व्यावसायामध्ये त्यांना यशही मिळाले होते. तो असाच भुतकाळात रमला असताना त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोचा म्हणजेच मायाचा फोन आला.
उद्या लग्नासाठी बस्ता बांधायचा होता. भरपूर खरेदी करायची होती. त्यामुळे प्रेमळ चर्चा होवून दोघेही झोपी गेले.सकाळी लवकर उठून विवेक तयार झाला. विवेकने दुसऱ्या खोलीत असलेल्या आईला हाक मारली, “आई! लवकर आवर. उशीर होत आहे. पाहुणे निघाले आहेत. ते यायचे आणि आपल्यामुळे उगाच त्यांना वाट पहावी लागेल.”
“हो झालंच. तोवर तुझ्या पप्पांना फोन लाव. ते दर्शनासाठी गेले आहेत.ते आले की आपण लगेच निघू.” आई वेणी घालता-घालता बोलली.
विवेक फोन लावणार तेवढयात त्याचे वडील आले. त्यांनी घरात येतानाच विचारलं, “आवरलं का?”
“हो! आईचं झालं की निघू लगेच.” विवेक व्हॉट्सअॅपवर आलेला मायाचा मेसेज वाचत बोलला. निघतोच आहे पाच मिनिटात असा रिप्लाय पण त्याने तिला दिला.
विवेकची आई बाहेर आली. तशी विवेकने घाई केली. त्यावर विवेकचे वडील म्हणाले, “बेटा! तुला एक बोलायचे आहे.”
विवेक, “बोला ना पप्पा.”
“बेटा! आपण खूप गरीबीमध्ये दिवस काढले आहेत. आता कुठे आपले चांगले दिवस आले आहेत. घर बांधकामासाठी पण आताच खर्च झालेला आहे. त्यामुळे लग्न साधेपणात करुयात. जास्त खर्च नको करायला. मी ऐकलयं की, तु लग्नासाठी बँकेचे लोन पण काढले आहेस.”
विवेकने आईकडे रागाने पाहिले. त्याच्या लक्षात आले, आईनेच पप्पांना खर्चाविषयी सांगीतले आहे.
विवेकचे वडील त्याच्याकडे पाहत म्हणाले, “विवेक! तिच्याकडे रागाने पाहू नकोस. आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो आहोत.”
“जितुचं लग्न किती रुबाबात झाले. लोक अजून त्या लग्नाविषयी चर्चा करतात.” विवेक नाराजीच्या सुरात म्हणाला.
“अरे हो, पण तो मुळचाच श्रीमंत आहे. त्याने कर्ज काढून लग्नात खर्च केला नाही. त्याच्याकडे अमाप पैसा आहे. त्याची बरोबरी आपण का करावी?” विवेकची आई त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली.
“तु कर्ज व्यावसायासाठी न घेता लग्नासाठी घेत आहेस. हा सगळा बुडीत खर्च आहे. कर्ज घेणे सोपे आहे. पण फेडणे अवघड आहे.” विवेकचे वडील त्याला काहीशा रागातच बोलले.
“हो. पण कर्ज मीच फेडणार आहे ना?” विवेकही रागातच बोलला.
विवेकची आई काकुळतीला येवून म्हणाली, “बेटा ऐक; थोडया खर्चात पण लग्न छान होतं. फक्त अनावश्यक खर्च टाळुयात.”
त्यावर विवेक रागातच बोलला, “मग करा तुम्हीच लग्न. मला नाही करायचं.”
अर्धा तास झाला तरी विवेक समजून घ्यायला तयार नव्हता. त्याला मायाचा फोनवर फोन येत होता. तो रागातच फोन कट करत होता.
शेवटी आपल्या मुलापुढे देवापेक्षा श्रेष्ठ जन्मदात्यांना हार मानावीच लागली.
शहरातल्या नामांकीत कपडयांच्या दुकानापुढे माया व तिची आई येवून थांबलेलेच होते.आम्ही फक्त मुलगी देवू खर्च करण्याची आमची ऐपत नाही. त्यामुळे तुमच्या परीने तुम्ही खर्च करा. असे नवरीकडच्यांनी आधीच सांगीतले होते. त्यामुळे सर्व खर्च नवरदेवाकडच्यांनाच करायचा होता. दुकानामध्ये खरेदी झाली. फक्त नवरीचे कपडे सत्तर हजारांचे झाले. सर्व कपडे मिळून तीन लाखांचा बस्ता झाला. नवरीचे दागिने चार लाखांचे झाले. कधी हजाराच्या वर ड्रेस न घेणाऱ्या विवेकच्या वडीलांना विवेकने दहा हजारांचा ड्रेस घेतला. एवढया महागाचा ड्रेस घेतल्यामुळे त्यांना खूप वाईट वाटले. पण मुलाच्या हट्टापूढे त्यांना काही बोलता येत नव्हते.
लग्नाचा शुभ दिवस उगवला. विवेकचे मित्र, नातेवाईक धावपळ करत होते. लग्न विवेकच्या घराजवळच्याच मंगल कार्यालयामध्ये होते. मंगल कार्यालयाची सुपारी पन्नास हजार रु. होती. विवेकने गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरीक, राजकीय पुढारी, सर्व मित्र परिवार यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. गाद्या, तक्के, लोड, भारीतील सोपे, खुर्च्यांनी सभामंडप भरून गेला होता. लोकांच्या गर्दीने मंडप फुलून गेला होता. पुढे गाणे व संगीताचा कार्यक्रम चालू होता. बाहेर येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी नऊवारी साडी नेसून मुली आणी ऐतिहासिक पोषाखात मुले उभा होती. दोघेजण पाहुण्यांना फेटे बांधत होते.
परण्या निघाला डी.जे.च्या तालावर पोरांनी ठेका धरला. नवरदेव रुबाबात रथामध्ये बसला होता. तो रथ पण खास पुण्याहून मागवला होता. ज्याची सुपारी एक लक्ष रु.होती. नवरदेवाच्या रथाच्या पुढे दोन पिपाणीवादक पिपाणी वाजवत होते. रथाच्या पुढे फुलांच्या पाकळया उधळणाऱ्या चार मुली होत्या. रथाच्या बाजूने दोन्ही बाजूने चार-चार याप्रमाणे एकूण आठ बाऊंसर चालत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोक पाहत होते. नवरदेवांचे मित्र तर तोऱ्यात होते. डी. जे. च्या तालावर बेभान होवून नाचत होते.नवरदेव मांडवात आला.प्रतिष्ठीत व्यक्तींचे सत्कार झाले. मंगलअष्टका संपल्या लग्न लागले.फटाक्यांची आताषबाजी सुरु झाली. जवळ-जवळ पाच मिनिटे फटाक्यांचा आवाज येत होता. लोक जेवायला बसले. केटरींगची मुले सर्वांना जेवायला वाढू लागली. जेवणामध्ये दहा प्रकारचे पदार्थ करण्यात आले होते.एकदाचे लग्न झाले. सगळया गावात लग्न फार रुबाबात पार पडल्याबाबत चर्चा झाली. विवेकचे काही मित्र विवेकला म्हणाले, “जितुपेक्षा तुझे लग्न छान झाले.”
विवेक लग्नाची स्तुती ऐकून खुष झाला. लग्नानंतरचे सर्व देवकार्य पार पडले.नव्याचे नऊ दिवस गेले. ऐपती पेक्षा जास्तीचा खर्च झाला होता. सगळा खर्च जवळपास वीस लाखाकडे झाला होता. काही लोकांचे पैसे द्यायचे राहिले होते. ते पैशासाठी विवेककडे तगादा लावु लागले. विवेकने मग मित्रांच्या बचत गटाचेही कर्ज उचलले व पैसे देवून टाकले.
काही दिवसांत विवेक दुकानामध्ये जावू लागला.लगनसराई संपली त्यामुळे मार्केटमध्ये मंदी आली. जितु विवेकवर मनातून नाराज होता. आपल्यापेक्षा त्याचे लग्न चांगले झाले होते. तसेच आपण विवेकपेक्षाही श्रीमंत असताना विवेकला आपल्यापेक्षा बायकोपेक्षा सुंदर बायको मिळाल्याचा राग जितुच्या मनात होता. तो विवेकला मोकळेपणाने बोलत नव्हता.ही गोष्ट विवेकच्याही लक्षात आली होती. जितुला दारुचे व्यसन लागले होते आणि तो व्यावसायातील पैसे दारूसाठी उडवत होता. व्यावसायामध्ये जितुची ७० टक्के भागीदारी होती. त्यामुळे विवेक त्याला काही बोलत नव्हता. कधी-कधी समजावून सांगायचा पण जितु त्याचे ऐकत नव्हता. एके दिवशी विवेक त्याला समजावून सांगत असताना जितुचा राग अनावर झाला. त्याने मी व्यावसायातील माझी भागीदारी काढून घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे विवेकलाही राग आला भांडण वाढतच गेले. चांगल्या मित्रांनी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही ऐकायला तयार नव्हते. काही वाईट मित्रांनी दोघांमध्ये मुद्दाम भांडणे लावून दिली. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दोघांचे कायमचे बिनसले. जितुने व्यावसायातील त्याची भागीदारी काढली. त्यामुळे विवेक मोठया आर्थिक संकटात सापडला.व्यावसाय ढासळला. व्यापाऱ्यांचे पैसे देणे वेळेवर देता येईना.घरखर्च वाढला. बँकेचे हप्ते थकू लागले आणि त्यामुळे त्याला राहिलेले दुकानातील साहित्य विकावे लागले. तरीही आणखी बँकेचे सात लक्ष रुपये देणे बाकी राहिले.
आतापर्यंत कमावलेले पैसे लग्नामध्ये खर्च झाले होते.उलट देणे झाले होते. त्यामुळे विवेकची चिडचिड वाढली. तो थोडया-थोडया गोष्टींवरून भांडणं करु लागला. मायासोबतही मोकळेपणाने बोलत नव्हता. त्याला त्याची चूक लक्षात आली होती.त्याला आठवत होतं. तो मायाला म्हणाला होता, मी तुला राणी सारखं ठेवीन.तुला काहीच कमी पडू देणार नाही.जगातले सगळे सुख तुझ्या पायाशी ठेवीन. पण आता तो तिच्या छोटया-छोटया गरजाही पूर्ण करु शकत नव्हता. तो मनातून पूर्णपणे उदध्वस्त झाला होता. एवढा व्यावसाय टाकला. मालक झालो. आणि आता परत रस्त्यावर आलो याचे त्याला वाईट वाटत होते. तो घरातही कोणाशी जास्त बोलत नव्हता. तो बाहेर असाच भटकत राहायचा आणी संध्याकाळी घरी यायचा. त्याने मित्रांनाही मदतीसाठी याचना केली होती. लग्नात सुखाच्या प्रसंगी सोबत असलेले मित्र आता या वाईट प्रसंगी त्याला टाळू लागले होते. लग्नाची चर्चा फक्त पंधरा दिवस चालली नंतर कोणी लग्नाचे नावही काढले नाही. लग्नासाठी कर्ज काढून उगाच जास्तीचा खर्च केला म्हणून लोक पाठीमागे त्याला नाव ठेवू लागली. जे मित्र चांगले होते. त्यांनी काही पैसे उसने दिले. पण तेवढया पैशांनी काहीच होणार नव्हते.आणि उसने घेतलेले पैसेही आज ना उद्या परत द्यावेच लागणार होते.
मायाला या बाबतीत काहीच माहित नव्हते. लग्नापुर्वीचा विवेक आणि लग्नानंतरचा विवेक यात तिला स्पष्ट फरक जाणवत होता. ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करायची. पण तो तिला प्रतिसाद देत नव्हता. म्हणून तीही मनातून दु:खी असायची.एके रात्री माया घाबऱ्या आवाजात विवेकच्या आई-वडीलांना हाका मारु लागली. त्यांनी गडबडीने दरवाजा उघडला. माया थरथर कापत होती. ती खूप घाबरलेली होती. तिच्या हातात कसली तरी चिठ्ठी होती. विवेकच्या वडीलांनी तिच्या हातातून चिठ्ठी घेतली, वाचली आणि त्यांना पण धक्का बसला. विवेकच्या आईनेही चिठ्ठी वाचली आणि रडायला सुरुवात केली.
चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं...
'आई-पप्पा आणि माया मला माफ करा. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. पण मीच तुमच्याशी नाते ठेवण्याच्या लायकीचा नाही. आई-पप्पाचं न ऐकून मी खूप मोठी चूक केली. लग्नासाठी खूप खर्च केला. पण मी देणे फेडु शकलो नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. मी आपला अपराधी आहे. मला माफ करा. आपलाच विवेक.'
चिठ्ठी वाचून तिघांच्याही हातापायातील अवसन गळाले. विवेकच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला. रिंग जात होती. पण तो फोन उचलत नव्हता. त्याच्या मित्रांना फोन लावून पाहिला पण कोणालाच विवेक कोठे गेला असावा याबाबत काहीच कल्पना नव्हती.
विवेकचे वडील घराच्या बाहेर आले. तेवढयात त्यांना घरावर कोणीतरी व्यक्ती आहे. आणि खांबावरील बल्बच्या प्रकाशात त्या व्यक्तीची सावली रस्त्यावर पडल्याचे दिसले. ते पळत जिन्यावरून घराच्या गच्चीवर आले. त्यांच्या पाठीमागे आई आणि माया पण आल्या. ती व्यक्ती स्लॅबवरील संरक्षक भिंतीवरून उडी मारण्याच्याच प्रयत्नात होती. तो विवेकच होता. त्याच्या वडिलांनी पळत जावून त्याला पकडले.
विवेक मोठयाने रडु लागला. त्याच्या वडीलांनी त्याला आपल्या कवेत घेतले. आईने त्याचे डोळे पुसले. मायाही रडु लागली. विवेकच्या आईने तिलाही समजावून शांत केले.
विवेक रडतच म्हणाला, "मी सर्वस्व गमावले. मला माफ करा.मला जगण्याचा अधिकार नाही."
विवेकचे वडील म्हणाले, "तु शुन्यातून सर्व कमावले होते. आणि तुच घालवलेस. जो माणूस शुन्यातून मोठा होतो. त्याला परत शुन्यातून सुरुवात करायला काहीच अवघड नसते.आणि हो हे कर्ज आपण दोघे मिळून फेडू. तु एकटा नाहीस अजून तुझा बाप जिवंत आहे."
वडीलांचे धीर देणारे शब्द ऐकून विवेकला गहिवरून आले. तो आणखी हमसून रडू लागला.
विवेकची आई म्हणाली, "आमच्यासाठी तुच खरी संपत्ती आहे.तूच नसल्यावर आम्ही कसे जगायचं?
माया म्हणाली, "मी तुमच्यासाठीच माझे आई-वडील,माझे घर सोडून तुम्हालाच सर्वस्व मानून या घरात आले, आणि तुम्ही मला असंच एकटीला सोडून चालला होता. मी अशा दु:खाच्या प्रसंगी तुमची साथ कशी सोडेल? सुख दु:खात एकमेकांची साथ द्यायचे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकताना वचन घेतले आहे आपण. हे ही विसरलात. "
तिघांचे बोलणे ऐकून विवेकला पश्चाताप झाला. त्याने हात जोडून आई-वडीलांची माफी मागीतली.
विवेकचे वडील म्हणाले, "रुबाब टापटीप राहण्यात नाही, तर रुबाब वागण्यात असला पाहिजे.दुसऱ्याचे पाहून आपणही खर्च करायचा यात कुठला शहाणपणा आहे.पण तु भिऊ नकोस.मी आहे तोपर्यंत तुला एकटे पडु देणार नाही. हे कर्ज फक्त तुझे एकटयाचे नाही.आपण दोघ मिळून आपले गेलेले वैभव परत मिळवू."
विवेकला आपल्या वडीलांचे म्हणणे पटले. कोणत्याही गोष्टीवर आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केल्यास जीवन उद्ध्वस्त होवू शकते. याचा प्रत्यय त्याला आला.
आता कधीही अनावश्यक खर्च करणार नाही या शपथेवर तो कुटुंबियांच्या साथीने गेलेला 'रुबाब' परत मिळावायला सज्ज झाला.
- संदिप खुरुद
उत्तम..!
उत्तर द्याहटवा