प्रवासी भारतभूमीचाा - [Pravasi Bharatbhumicha] भारत म्हणजे ब्रह्मांडाच्या रहस्याची मानवास झालेली जाणीव. विश्वाच्या हिताची एक प्रार्थना.
भारत म्हणजे ब्रह्मांडाच्या रहस्याची मानवास झालेली जाणीव
ओळखनमस्कार प्रवासी मित्रहो. जन्म ते मृत्यू या दरम्यान आपण कायम वेगवेगळ्या आवर्तनात फिरत असतो. कधी वैचारिक तर कधी शारीरिक पण प्रवास हा आयुष्यातील नित्याचाच भाग आहे. कोणी तो आनंदासाठी तर कोणी पोटासाठी करतो. यातील फक्त आनंदासाठी फिरून त्याद्वारे चरितार्थ चालविणाऱ्या वर्गातील मी तुमचा एक मित्र; योगेश कर्डिले. व्यवसायाने प्रकाश चित्रकार, लेखक आणि शिक्षक. यातील प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक आनंदासाठी करणारा.
गेल्या वर्षांपासून कोरोना संक्रमणाचा काळ सुरु झाल्यामुळे माझा देशभरातील संचार कमी आणि आंतरिक प्रवास मात्र वाढला. इतके वर्ष काढलेले प्रकाशचित्रे (फोटोग्राफ्स) पाहण्याची संधी मिळाली. विचार आणि वाचन करण्यास भरपूर वेळ मिळाला. स्वतःच्या आत झाकून पाहताना असे वाटले कि या अंधकारात हरवून तर जाणार नाही ना? परंतु विचारांचा प्रकाश देखील सोबत होताच. त्यातून एक गोष्ट लक्षात आली कि देशभर केलेली भटकंती वरवर विखुरलेली वाटत असली तरीही आत खोलवर कुठेतरी एका ठिकाणी जोडलेली होती.
इयत्ता चौथीतील सह्याद्रीच्या कुशीतील भीमाशंकराचे आणि शिवनेरीचे दर्शन ते पुढे हिमालय हेच माझे अंगण बनले. जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासहित इतर तीन देशही भटकून झाले. पण भारत भ्रमंतीची ओढ प्रत्येक सफरी बरोबर वाढतच गेली. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे गारुड जे महाविद्यालयीन वयात झाले ते पुढे मग गंगामैयाच्या काठावरील हिवाळ्यातील पहाट, हिमालयातील हिमवादळात गुहेत काढलेली रात्र, तर राजस्थानात संपूर्ण रात्री वाळवंटात केली ड्रायव्हिंग, काश्मीर सीमेवरील गुरेझ सेक्टर मध्ये भटकंती, कर्नाटकातील घनदाट जंगलातील रात्रीचा प्रवास आणि असे अनेक चित्तथरारक क्षण साठवून ठेवलेत. जीवनाची क्षणभंगुरता ते चिरंतन सौंदर्य यांचा एकाच क्षणात साक्षात्कार होणाऱ्या जागा अनुभवल्या. अनोळखी लोकांचे आदरातिथ्य आणि मदत तर वेळोवेळी झाली. नशिबाने मला आयुष्य आवडीच्या गोष्टीत व्यतीत करता येते. तरीपण मनात एक प्रश्न होता कि अजूनही ही तृष्णा कमी होत नाहीए? आई, वडील, मित्र इतकेच काय तर ऑफिसमधले सहकारी देखील विचारायचे की सगळी कमाई फिरण्यावर का उधळतोस? नवीन जागा, नवीन लोक, निसर्ग सौंदर्य, शुद्ध हवा, संगीत, कला, प्रकाशचित्रे काढण्याची हौस किती गोष्टी आहेत! उत्तर देऊन तेव्हा तरी काही फायदा नव्हता आणि आता उत्तर देण्याची गरज नाही.
भारत जगात प्रसिद्ध का आहे?
असो माझ्यापेक्षाही स्क्रू ढिल्ला असलेली लाखो लोक पूर्वीही होती आत्ताही आहेत आणि पुढे देखील असतील. हि सर्व लोक जसे एखाद्या चुंबकाकडे लोखंड खेचले जाते तसे भारताकडे खेचले जातात. मग त्यात कलाकार, फिरस्ते, मोठ्या कंपन्यांचे मालक अनेक लोक आहेत. बहुतांश जण अनेक वर्ष पैसे साठवून येतात ते संपूर्ण भारत अनुभवण्यासाठी. अनेकांसाठी आपला देश हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर आणि कोरीव मंदिरे, हिमालय, सह्याद्री, योग, आयुर्वेद, उत्सव, साधू, हत्ती, वाघ, जंगले, संगीत, महाल, किल्ले, समुद्र किनारे एक ना अनेक कारणे आपण देऊ शकतो. काही भारतीयांना / परदेशींना तो वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध वाटतो झोपडपट्टी, गरिबी, अस्वच्छता, रोगराई, जातीवाद ईत्यादी. तर काहींना तो जगातील सर्वात मोठे खुला बाजार वाटतो जेथे आपल्या वस्तू लोकांना विकून व्यसनी बनवता येईल. कोणी व्हिडीओ गेम, फास्ट फूड, चित्रपट, संगीत एक ना अनेक वस्तूंचा बाजार येथे मांडतो. प्रत्येकासाठी आपला देश हा वेगळ्या प्रकारे उपयोगी आहे. ज्याला जसे हवे ते हा देश त्याला ते देतो. परंतु त्याही पलीकडे जे चुंबकीय आकर्षण या देशात आहे ते नेहमीच गूढरम्य राहिले आहे.
भारतात सर्वात जुनी विद्यालये होती म्हणून कि जीवनाच्या सर्व क्षेत्रात येथील ऋषी मुनींनी खुला संचार केला! जेथे स्त्री, पुरुष, मुले, जंगली जनावरे, झाडे आणि विश्वातील सर्व तत्वांचा आदर राखला! चौदा विद्या, चौसष्ट कला, कुठल्याही मार्गाने भगवंताची पूजा करण्याचे स्वातंत्र्य, गुरुकुलाची प्रदीर्घ परंपरा, भौतिक आणि अध्यात्मिक ज्ञानाचा फक्त विश्व कल्याणासाठीचा वापर अशा एक ना अनेक गोष्टींना या भारत देशानेच जन्म दिला.
विश्वामध्ये जेव्हा अज्ञानाचा अंधकार होता तेव्हा संपूर्ण विश्वाप्रती एक कुटुंब म्हणून पाहण्याची वृत्ती भारतीय समाजाने जोपासली. त्यामुळेच अनेक देशांवर स्वारी करून जिंकण्यावर भारतीय राजांनी कधीच भर दिला नाही. व्यापार आणि धर्म या शांतता प्रिय मार्गातून जगभर आपले विचार बिंबविले. चीन, जपान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्केस्तान, मंगोलिया, सिल्क रोड वरील देश, तिबेट, दक्षिण-पूर्व आशिया, कंबोडिया, बाली येथील बुद्ध आणि हिंदू मंदिरे, आपल्याला काय सांगतात? जगाला गणितातील, धातु शास्त्रातील आणि विज्ञानाच्या अनेक उपयुक्त अंगांची दिलेली देणं देखील हेच सांगते. आपल्याजवळील असलेले ज्ञान योग्य व्यक्तीस द्या. जेणेकरून त्याचा कुठल्याही प्रकारे समाज विघातक वापर करू नये. परंतु हे सर्व शक्य झाले ते प्रवासी, ऋषी मुनी, व्यापारी लोकांमुळे. ज्यांनी विचार, ज्ञान आणि विज्ञानाची देवाणघेवाण केली.
भारत जर समजून घ्यावयाचा असेल तर जगाचा इतिहास आणि भूगोल समजावून घ्यावा लागेल. आणि त्यावर वाचन करण्याचा व फिरण्याचा योग गेल्या दोन तीन वर्षात आला. त्यामुळे मला एक नवीन दिशा मिळाली. आज जे काही जगात सुरू आहे त्याच्याकडे सांसारिक विवंचनेतून पाहण्यास आपणास फुरसत नसते. त्यामुळेच जाणीवपूर्वक भविष्य घडविण्यास आपण अपुरे पडतो. इतरांच्या प्रचारास सत्य समजून बळी पडतो. त्याग, शिस्त आणि सत्याची कास सोडून आता काय मिळेल त्याकडे पाहतो. परंतु प्रवास, वाचन आणि चिंतन हे आपणांस वरवरच्या प्रवाहाखाली काय दडले आहे ते दाखविते.
विचारधन
मानवी विचारांची शक्ती हि अपरिमित आहे आणि तिच्यावर सर्व बाजूने या देशातील ऋषी मुनींनी, साधू, संत, समाज सुधारक, संशोधकांनी मंथन केले. ज्ञान हे जरी सर्वोच्च असले तरी त्याचा वापर हा माणसाच्या पिळवणुकी करीत व्हावयाला नको. आज विज्ञानाचे पाईक आपण स्वतःला समजत असलो तरी प्रत्यक्षात आपण तंत्रज्ञानाचे गुलाम आहोत. जगात सर्वात जास्त गरिबी, युद्धे, नरसंहार, धार्मिक तेढ, लोकांवर इंटरनेटच्या माध्यमातून नजर ठेवणे हे सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच वर्तमान काळात होत आहे. विज्ञान आपणास उत्सुकता देते पण ज्ञान हे स्थिरता देते. स्थिर आणि दयाळू व्यक्तीच समाजाचा साकल्याने विचार करू शकते. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गुरु नानक, कबीर, गुरु गोरक्षनाथ यांच्यासारखे युगपुरुष वारंवार या धरणीवर प्रकट झाले. विश्वामित्र, शाक्यमुनी गौतम, महावीर, राजा जनक, गुरु गोविंद सिंग, बंदा बैरागी यापैकी काहींनी स्थिर वृत्तीने राज्य कारभार केला तर काहींनी राज्य सोडून विश्वालाच आपले मानून ज्ञानदान दिले. भ्रमंती करताना यांच्या कार्याच्या पाऊलखुणा जागोजागी निसर्गात, माणसात आणि वस्तूंमध्ये आढळतात. आजही जगाला जेव्हा मनाच्या कोपऱ्यात शांतता हवी असते तेव्हा या थोर व्यक्तींचे विचार कामी येतात.
ट्रेकिंग, पर्वतारोहण हे आजचे कुल शब्द असले तरीही चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग यात्रा, नर्मदा परिक्रमा, कैलास परिक्रमा, शबरीमाला यात्रा या जगाच्या पाठीवरील असतीशय सुंदर आणि दुर्गम परिसरातून जाणारे ट्रेकिंग रूट्स हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी शोधले होते. संपत्ती, पुस्तके, विज्ञान हे कधीतरी कालचक्रात गडप होतात, मंदिरे तुटतात किंवा जंगलात झाकोळून जातात. पण विचार हे गोष्टीरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. युवान श्वांग, फा-हि-आन, अल-बेरूणी हे भारतात का आले? रोमन, अरब, तुर्क, मंगोल, पोर्तुगीज, ब्रिटिश, इराणी, आफ्रिकन, ग्रीक यांनी आक्रमणे का केली? संपत्ती सोबतच त्यांनी येथील कोणत्या गोष्टी लुटल्या तर काय नष्ट केली? आणि पर्यायांनी त्यांच्या देशाच्या विकासात त्याचा हातभार कसा लागला?
आपली विश्वविद्यालये का जाळली गेली? पूर्वी जेथे वाचनालये होती, विश्वविद्यालये होती, मोहेंजोदडो, हडप्पा होते आज तेथे गरिबी आणि गुन्हेगारी का आहे? संस्कृती आणि विद्यालये किंवा वाचनालये यांचे काय नाते आहे? त्यामुळे संस्कृती रक्षण करायचे असेल तर विचारांचे संवर्धन पहिले व्हायला हवे आणि ते सर्वदूर पसरायला हवे. कारण या ज्ञानावर जगाचा हक्क आहे. जसे आज योग आणि आयुर्वेद हा थकलेल्या मन आणि शरीराला जगभर दिलासा देतोय. तसेच वेदांत, बुद्ध वाणी, महावीर, नानक, कबीर आणि कृष्ण यांचे शब्द धन काळाच्या कसोटीवर अजूनही तेवढेच तजेलदार आहेत. विश्वाचा अभ्यास ध्यानातून प्रकट झालेल्या ज्ञानात प्रत्येक शब्दात दिसतो.
विश्व आणि भारत
जगातील सर्वात प्रगत राष्ट्रे हि आर्थिक दृष्ट्या मागास राष्ट्रांची पिळवणूक करीत आहेत. नैतिक मूल्ये पायदळी तुडवून झालेला विकास हा संपत्तीचा असतो माणसांचा नसतो. त्यामुळे भारताबद्दल अभिमान का असावा तर आपल्या पूर्वजांनी दिलेल्या मूल्यांचा, शिकवणुकीचा. भारत हा विश्वगुरु आहे तो त्याच्या विचारधनामुळे. मंदिरे, उत्सव, महाल आणि अनेक गोष्टी येतील आणि जातील. परंतु विचारसरणी ही अशी गोष्ट आहे जी या भारत भूमीवर हजारो वर्षांपासून विकसित होत गेलेली आहे. जरी आपल्याकडे लिखित स्वरूपात जास्त इतिहास नसला तरी अभंग, ओव्या, दोहे, ऋचा, श्लोक, चौपायी, गाणी, गोष्टी या सर्व ठिकाणी इतिहासच जिवंत आहे.
आपला देश हा वैश्विक आणि मानवी मूल्यांच्या तुलनेत तपासून पाहावा. पण परदेशी लोकांच्या नजरेतून नक्कीच नाही. कारण बाहेरच्यांची नजर हि नेहमीच फक्त बक्षिसावरच असते. त्यांना कुठल्याही प्रकारे समाजसेवा करायचे नसून गुलामांची पिढी तयार करावयाची असते. तसे नसते तर आज माया, ऍझटेक, सेंट्रल एशियन (निसर्गपूजक), ईजिप्शियन, रेड इंडियन, ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, पर्शियन इत्यादी संस्कृती संपल्या नसत्या. जादूटोणा करणाऱ्या चेटकिणी असा आरोप लावून लाखो स्त्रियांची यूरोप अमेरिका आणि इतरत्र हत्याकांडे घडली नसती. याचा अर्थ असा नाही कि आपल्याकडे सर्वच आलबेल होते. जातीवाद आणि अनेक वाईट प्रथा यांचा वापर प्रस्थापितांनी केलाच. स्वार्थी लोक सर्व देशात, शहरांत, गावात इतकेच काय तर प्रत्येक घरात असतात. त्यामुळे देश वाईट होत नसतो. देश चांगला असतो तो तेथील समाजाच्या सलग चालत आलेल्या विचारसरणी, जीवन पद्धतीमुळे आणि पडत्या काळात निष्ठा ढळू न देणाऱ्या लोकांमुळे. सध्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. परंतु अशा अवस्थेतच आपल्याला माणुसकीचे आणि खऱ्या योध्यांचे दर्शन होते.
प्रवास
प्रवासी वर्गात अनेक लोक येतात. मग तो एखादा भटका, पर्यटक, साधू, सुफी, मिशनरी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, गुप्तहेर, सरकारी अधिकारी, समाजसेवक, पर्यटक किंवा आणखी कोणी देखील असेल. हे सर्व प्रवास करतात तो कधी स्वतःहून तर कधी कामाच्या निमित्ताने. भटकंती जरी असली तरी हेतू मात्र वेगवेगळे असतात आणि तो हेतू त्यांच्या दृष्टीवर चष्म्यावरील रंगासारखा चढलेला असतो. क्वचितच त्यापलीकडे लोक पाहतात. परंतु जगाची प्रगती आणि अधोगती होण्याचे कारण प्रवासी आणि स्थलांतरित लोक आहेत. वाचन आणि श्रावण आपल्याला एक दृष्टिकोन देते तर प्रवास हा प्रत्यक्ष अनुभव.
आजही परदेशी लोक जगभरात फिरून वनस्पती, इतिहास, भूगोल, संगीत, साहित्य याचा अभ्यास करावयास का येतात? हा प्रश्न कधी आपल्याला विचारावासा नाही का वाटत? का आजही इंग्लंड मध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांतील पुस्तके, मुर्त्या, आयुधे, शिल्पे अजूनही संग्रहालयात आहेत? ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वर्ड या विद्यालयांमधे भारत, चीन, आफ्रिका येथील देशांची संस्कृती, भाषा, कला आणि इतर अंगांचा अभ्यास चालतो आणि त्यावर करोडो डॉलर्स खर्च केले जातात? चीनमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यटक देशोदेशी फिरून नेमके काय करतात? प्रवास करणे आणि सजगपणे जग अनुभवाने ही आपल्याकडे गरज समजली का जात नाही? त्याकडे वायफळ खर्च व मजा म्हणून का पहिले जाते?
सांगता
मी इतिहासकार नाही किंवा संशोधक देखील नाही. परंतु मी एक प्रवासी मात्र नक्कीच आहे जो आसपासच्या घटना, लोक, संस्कृती, स्थापत्य इत्यादीचे निरीक्षण करतो. पुस्तक वाचन आणि थोडे स्वतःचे चिंतन त्या माध्यमातून गोष्टीतून मधला दुवा साधण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही घटनेकडे, व्यक्तीकडे पाहण्याचे अनेक मार्ग असू शकतात. एकच मार्ग हा आपले मत दूषित करू शकतो. स्थळ आणि काळानुसार संस्कृतीची व्याख्या हि नेहमी बदलत असते आणि हेच खरे तिचे सौंदर्य होय. परंतु सत्य हे स्थळ काल यांच्या पलीकडे असते. गौतमाने सांगितलेली वचने, श्रीकृष्णाने रणभूमीवर सांगितलेली गीता तर रामाने आयुष्यात दिलेल्या परीक्षा ते सर्व काळात प्रकाशमान आणि मार्गदर्शक राहील.
भूतकाळातून चिरंतन असणारे ज्ञान घेण्यास आमची पिढी कदाचित कमी पडली. शहरात जाऊन देखील ना मी तिकडचा ना मी माझ्या गावाकडील. अशा मला त्रिशंकू म्हणणेच योग्य राहील आणि माझ्यासारखे असे अनेकजण आजघडीला अधांतरी आहेत. देशाचा इतिहास हा अभ्यासक्रमाचा भाग समजून आम्ही चूकच केली म्हणायची तर. मग तसे म्हणावे तर!
भारत म्हणजे काय? डोंगर, दर्या, समुद्र, वाळवंट...? भारत म्हणजे ब्रह्मांडाच्या रहस्याची मानवास झालेली जाणीव. विश्वाच्या हिताची एक प्रार्थना. शतकानुशतके चाललेला ज्ञानचा यज्ञ. वरवरच्या विविधते पलीकडील अंतस्थ स्थिर वाहणाऱ्या सरस्वतीचा प्रवाह.
माझा फक्त एवढाच प्रयत्न आहे कि या जीवनाच्या प्रवासात कोणाच्याही विचारधारेचे ओझे न वाहता स्वतःच्या अनुभव, चिंतनावर तोलून पाहायचे. मग त्याकरिता जगातील वेगवेगळे ग्रंथ, विचारवंत, कलाकार, संस्कृती आणि आक्रमकांचा अभ्यास करावा लागला तरी तो नक्कीच एक रोमांचकारी प्रवास असेल. आणि यासोबतच आजपर्यंतच्या या प्रवासात गवसलेले तुमच्या पर्यंत पोहोचवायचे. कारण आपणास जेव्हा संधी मिळते, साधन उपलब्ध असते ते सगळ्यांनाच असते असे नाही. त्यामुळे हे माझे माझ्या समाजबांधवांप्रतीचे कर्तव्य मी समजतो.
आक्रमक नेहमीच संपन्न भूमीच्या शोधात असतात. त्यांच्या आक्रमणाच्या लाटा ह्या न थांबणाऱ्या असतात. काही पराभूत होतात तर काही जिकून राज्यकर्ते बनतात. या देशात अनेक आले आणि येथेच सामावून गेले. पण काही मात्र ठरवून आपल्याला गुलाम बनविण्यास आले. पूर्वीपासून समाज फोडण्यासाठी आणि हा देश आतून तोडण्याचे प्रयत्न विदेशी लोकांनी केले. अजूनही ते चालू आहेत. आता ते खूप सोपे झाले आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण हा या देशाचा नागरिक आहे. आणि जसे मतदान हा आपला हक्क आहे तसेच देश घडविणे हे आपले कर्तव्य आहे. आणि त्याकरिता तो पाहणे, समजावून घेणे हेही तितकेच गरजेचे. आपली प्रत्येक कृती हि स्वतःला, कुटुंबाला, देशांना आणि पर्यायाने धरणीमातेवर परिणाम करीत असते. कारण विचारांतून कृती, कृतीतून सवय आणि सवयीतून चारित्र्य निर्मिती होते.
या विचार पुष्पांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे भारतभूमीत केलेल्या आमच्या अनुभवांचे कथन. कला, संगीत, शृंगार, साहित्य, स्थापत्य, विज्ञान, समाज, संस्कृती, निसर्ग, वन्य जीवन, धर्म आणि परंपरा या विषयांचे विविधांगांनी केलेले चिंतन. कारण देश हा आपल्या सगळ्यांनी बनलेला आहे. आणि जर आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकलो तर आपण पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकतो. म्हणून या मालिकेचा उद्देश आहे कि आपल्या देशातील सौंदर्य तुम्ही अनुभवावे आणि त्याचा लाभ घ्यावा.
शेवटी मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आठवतात. “शिका, संगठीत व्हा आणि संघर्ष करा.” त्यासोबतच जागृतपणे या भारतभूमीचे प्रवासी व्हा.
अभिप्राय