डाळींबी भाग २, मराठी कथा - [Dalimbi Part 2, Marathi Katha] डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा.
डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा
शारदा एका मुलीस जन्म देऊन देवाघरी गेली आहे. ही बातमी शारदाच्या मावशीला समजते. तेव्हा मावशी व तिचे पती हे तडक हॉस्पीटलमध्ये येतात. तेव्हा सदानंद हॉस्पीटलच्या बाकावर हाताश आणि दुःखी होऊन बसलेले असतात. मावशी व मामा तडक सदानंदांजवळ जातात. मामा सदानंदांच्या खांद्यावर हात ठेवतात. मावशीला व मामाला पाहून सदानंदांना रडू कोसळते. मावशी व मामा त्यांना समजावून सांगू लागतात. मावशी सदानंदांना बाळाबद्दल विचारते. सदानंद त्या दोघांसोबत डॉक्टरांजवळ जातात.डॉक्टर मावशी व मामांना सर्व परिस्थिती समजावून सांगतात. शारदाचे शव शवागृहाता ठेवलेले असते. मामा व मावशी तिचे शव पाहतात. त्यांना फार वाईट वाटते. डॉक्टर पोलिसांना फोन करून कळवतात. शारदाचे पोस्टमार्टम होते. नंतर विधीवत तिचे अग्नीसंस्कार होतात.
सदानंद आणि त्याचे नवजात बाळ हे आता एकटे पडलेले असते. थोड्या दिवसांनी त्या बाळाचा घरच्या घरी नामकरन सोहळा पार पडतो. ‘ज्योती’ असे त्या बाळाचे नाव ठेवले जाते. सुरुवातीला मामा व मावशी ज्योतीचे संगोपन करू लागतात. काळ असाच पुढे जात असतो सदानंदांच्या आयुष्यातील आनंद हरपलेला असतो एकेदिवशी मामा व मावशी सदानंदांच्या घरी येतात. तेव्हा ज्योती दोन वर्षांची झालेली असते. सदानंद शारदाच्या फोटोकडे पाहात बसलेले असतात. मामा सदानंदांना हाक देतात एक दोन हाकेनंतर सदानंद भानावर येतात. सदानंद खुर्चीवरून उठून उभे राहतात. ज्योती सदानंदंना धावत जाऊन मिठी मारते. सदानंद ज्योतीच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवितात. मामा व मावशी खुर्चीवर बसतात. मावशी सदानंदांची ख्याली खुशाली विचारते. सदानंद बोलत एक असतात आणि मनात काही वेगळेच चाललेले असते त्याच्या आयुष्यातील शारदाची पोकळी अजून भरून निघालेली नसते.
मामा व मावशीला हे प्रकर्षाने जाणवते. ते दोघे एकमेकांकडे बघतात. अचानक ज्योतीची नजर शारदाच्या फोटोकडे जाते. ज्योती आपल्या बालीश बोबड्या आवाजात मावशीला विचारते. “आई हा फोटो कुणाचा आहे”. कारण ज्योतीच्या डोळे उघडण्याच्या आतच शारदाने प्राण सोडलेला असतो आणि तिचे संगोपन शारदाच्या मावशीने केलेले असते. म्हणून ज्योती मावशीलाच आई अशी हाक मारत असते. ज्योतीच्या तोंडातील उद्गार ऐकून सदानंदांचा ऊर भरून येतो. तो आणखी रडायला लागतो. ज्योती सदानंदांकडे बघते. मावशी ज्योतीला आतल्या खोलीत घेऊन जाते. मामा सदानंदांना धीर देऊ लागतात. “सदानंद अरे दोन वर्षे झाली तू अजून त्याच दुःखात बुडालेला आहेस. तु आता तुझ्या आयुष्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा?”. मामा सदानंदांच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला म्हणतात की तू आता दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा? सदानंद मामाकडे प्रश्नांकित नजरेने पाहतात. तेवढ्यात ज्योती बाहेरून धावत येते तिची नजर शारदाच्या फोटोकडे जाते. ती सदानंदला आपल्या बोबड्या बोलीत फोटोकडे बोट दाखवून विचारते की. “बाबा हा फोटो कुणाचा?” तिच्या प्रश्नाने तर सदानंदला आणखी भरून येते. तो खाली बसून ज्योतीला मिठीत घेतो व ढसाढसा रडू लागतो.
त्या दिवशी मामा व मावशी हे सदानंदांच्या घरीच थांबतात. सदानंद संपूर्ण रात्र मामांनी सांगितलेल्या सल्ल्यावर विचार करतात. दुसऱ्या दिवशी मामा व मावशी सदानंदांचा निरोप घेऊन तिथून जात असतात. सदानंद त्या दोघांनाही थांबायला सांगतो व मला मामांचा सल्ला पटला आहे. हे कबूल करतो. मामा व मावशीला खूप आनंद होतो. मावशी स्वतः सदानंदांसाठी नवीन वधू शोधू लागते. आता सदानंदांचे वय ३० असते. तसा तो संपत्तीने बऱ्यापैकी श्रीमंत असतो. त्याला कायमस्वरूपी लातूर MIDC मध्ये नोकरी लागलेली असते. पगार ही जेमतेम चांगला असतो. आता तो विदूर असल्याने त्यालाही तशाच वधूची अपेक्षा असते. मावशी काहीतरी खटपट करून एक स्थळ काढते आणि मुलगी पाहायचा कार्यक्रम ठरवते.
सदानंद मामा मावशी व आपल्या एका मित्रासोबत मावशीने काढलेले स्थळ पाहायला जातो. ती मुलगी मुळात बीड जिल्ह्यातील असते. कांचन तिचे नाव तिचा ही तिच्या पहिल्या पतीशी घटस्फोट झालेला असतो. त्यामुळे दोन्ही घरचे सदस्य दोघांच्या भूतकाळाची फारशी चिकित्सा न करता दोघांचे लग्न लावून देतात. लग्न थोडक्यात आटपते. सदानंदच्या पहिल्या लग्नावेळी त्याचे वय २८ असते आणि कांचनच्या पहिल्या लग्नावेळी तिचे वय २५ असते. संसारसुखाच्या पहिल्या रात्री कांचन पलंगावर बसून होती. तेवढयात तिला दरवाजावर थाप ऐकू येते. कांचन दार उघडते. सदानंद दारात उभा असतो. “घाबरू नका मी फक्त पांघरूण घेण्यासाठी आलोय” सदानंद खोलीत येतो. तेवढयात ज्योती सदानंदकडे धावत येते. “बाबा आपण कुठे झोपायचे? बाळा तु तुझ्या आईसोबत इथे झोप मी बाहेर झोपतो. कांचन ने यावर काहीच मतं व्यक्त केले नाही. यावर सदानंद ने स्वतःचीच समजूत काढली की कदाचित अजून जुन्या आठवणी मध्ये असेल तो ज्योतीच्या चेहऱ्यावर हात फिरवून काही न बोलता खोलीबाहेर गेला. थोड्या वेळानंतर सगळे झोपी गेले.
ज्योती तशी ३ वर्षाची मुलगी तरी चुणचुनीत व तिची झोपही जागसावध असते. अचानक ज्योतीला एका ग्लासमध्ये कुठला तरी द्रव पदार्थ टाकल्याचा भास झाला बुडबुड्याचा आवाज आला. तशी ज्योती ताडकन् उठली. पाहते तर काय कांचन कोणता तरी द्रव पदार्थ पित बसली होती. ज्योती पलंगावरून उठून कांचनजवळ गेली. कांचनने तिला पाहून आपल्या जवळचा ग्लास बाजूला ठेवला व तिला मोठमोठ्याने ओरडू लागली की तू इथे का आलीस? जा जाऊन झोप. पण तू नाही झोपलीस अजून आई? ज्योतीच्या या प्रश्नावर कांचनचा आणखी त्रागा होतो. ती ज्योतीच्या तोंडाजवळ आपले तोंड नेऊन तिला म्हणते की ए मी तुझी आई नाही? उगाच मला आई नको म्हणू.
हे बोलत असताना कांचनच्या तोंडातून एक खूप स्ट्रॉंग असा आंबट वास ज्योतीच्या नाकात जातो. तशी ज्योती नाकावर आपला हात ठेवून कांचन पासून लांब जाते. तशी कांचन जोरजोरात हसू लागते. व तशीच पलंगावर जाऊन पडते. त्या रात्री ज्योतीला फारशी चांगली झोप लागत नाही सकाळ होते.
सूर्याची किरणे ज्योतीच्या चेहऱ्यावर पडतात ज्योती झोपेतून उठते. सदानंद कामावर जायची तयारी करत असतो. ज्योती सदानंदला जाऊन मिठी मारते. “अरे काय झालं बेटा?” सदानंद ज्योतीला विचारतो. ज्योती रडत रडत सदानंदला काल रात्रीची गोष्ट सांगणार इतक्यात मागून कांचनच्या आवाज तिला ऐकू येतो की “गुड मॉर्निंग ज्योती; हे घे बाळ हा टूथब्रश घे आणि ब्रश करून ये”.
क्रमशः
अभिप्राय