साथिया भाग ७,मराठी कथा - [Sathitya Part 7,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.
सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा
All is well, when ends well!चहाचा कप हातात घेउन, वैदेही टेबलावरची वर्तमानपत्र वाचत, विचारमग्न झालेली होती. कालच्या आणि आजच्या सर्व पेपर्स मधे, विश्वजीतला आरोग्यमंत्री केल्याचे मथळे छापून आलेले होते. आता तो काय बदल करणार, कोणती भुमिका घेणार, त्यामुळे कोरोना कंट्रोलमधे येईल का वैगरे चर्चा झडल्या होत्या. विरोधी पक्षाने, हि एक बचावाची खेळी आहे अशी भूमिका घेतली होती. तर काही राजकारण तज्ञांनी, विश्वजीतच्या कारकीर्दीची अखेर... असेही अंदाज वर्तविले होते.
“They are making him scapegoat!” वैदेही उद्विग्न होऊन स्वतःशीच म्हणाली.
गेले काही महिने, २२ मार्च च्या लॉकडाऊन पासूनच, वैदेही मनातून बैचेन झाली होती. कितीही प्रयत्न केला तरी, राजकीय आणि आजूबाजूला चाललेल्या घडामोडीतून स्वतःला अलिप्त ठेऊ शकत नव्हती. मार्च महिन्यातच, शाळेने निर्णय घेऊन मुलांना घरी परत पाठवले होते आणि अजून सहा आठ महिने तरी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवायचा निर्णय झालेला होता.
वैदेहीच्या हातात त्यामुळे भरपूर वेळ मिळाला होता.
मनाला, रोजच्या उद्योगात कीतीही व्यस्त ठेवलं तरी भूतकाळाचा विचार तीची पाठ सोडत नव्हता. छोट्या वैदेहीची, विश्वजीतच्या मुलीची भेट झाल्यापासून ती मनातून अस्वस्थ झालेली होती. सात वर्षांच्या एकांतवासात, आपण केलं तेच योग्य होतं हाच तीचा ग्रह होता. पण जसं डोकं शांत व्हायला लागलं तसं तिच्या मनाने बंड करायला सुरुवात केली होती. सात वर्षांपूर्वी आपण वागलो ते योग्य केलं का? असा विचार तीला वारंवार सतावे. जे झालं त्यात विश्वजीतची काय चूक होती? एखाद्याच्या मनातली भावना, चांगली की वाईट, योग्य की अयोग्य... हे ठरवायचा अधिकार मला कोणी दिला होता?? त्याची भावना उदात्त होती. त्याला हीन म्हणण्याचा, खोटी ठरवण्याचा ह्क्क मला नव्हता. मग अशा वेळी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर, तू त्याला एकटी सोडून का आलीस? ...असं तीचं एक मन म्हणे!
कुठल्याही प्रश्नाकडे पाठ फीरवून, पळ काढून प्रश्न खरचं सुटतो का? कदाचित तात्पुरता सुटत असेल पण जी नाती जोडलेली असतात, ऋणानुबंध असतात त्यांच काय? एकमेकांना दिलेल्या वचनांच काय? मारतांना, दादासाहेबांना दिलेल्या प्रॉमीसचं काय? एक शिक्षक म्हणून, मी माझ्या विद्यार्थ्यांला एकटं ठेऊन पळ काढला हे कीतपत योग्य केलयं??? डोकं शांत ठेऊन, विश्वजीतला समजावता नसतं आलं का?? सावकाशपणे, त्याच्या कारभारातून अंग काढणं शक्य नसतं झालं का? हे सगळे विचार आले की मनाला वेदना होई... मन सैरभैर होई.
दारावरची कडी वाजली आणि विचारांच्या या तंद्रीतून वैदेही भानावर आली... कोण बरं आलं आत्ता, असा विचार करतं वैदेही ने दार उघडलं... ज्या व्यक्तीच्या भोवती तिच्या भूतकाळातले... अभ्यासाचे, वादावादीचे, संघर्षाचे, आनंदाचे, यशाचे, आव्हानाचे आणि जवळीकीचे अनेक क्षण गुंफले गेले होते, ज्याला घडवताना वैदेहीचे ज्ञान, कष्ट, हुशारी पणाला लागली होती, तो विश्वजीत साक्षात तिच्या दारात, तिच्या समोर उभा होता! सात वर्षांच्या दुराव्याची वेदना, झालेल्या घटनांवरचा राग, अनुत्तरीत प्रश्नांची व्यथा, जगाकडे पाठ फीरवून स्विकारलेला एकांतवास, भूतकाळातल्या आठवणी आणि एकमेकांना सापडलेल्याचा आनंद या सर्वांनी मिळून झालेली एक अनोखी भावना उचंबळून वैदेहीच्या मुखातून हुंदक्यांच्या रुपात बाहेर पडली... “विश्वजीत?!” असं म्हणत वैदेही रडत विश्वजीतच्या मिठीत शीरली!
त्यावेळी ते गुरु शिष्य नव्हते, एकमेकांकरता झुरणारे प्रियकर प्रेयसी नव्हते, जन्मांतरीची वचनं देणारे नवरा बायको नव्हते, एकत्र काम करणारे सहकारी नव्हते. ते एकमेकांचे कोणीही नव्हते कींवा सर्वकाही होते. वेदना, आनंद, एकटेपणा, विरह, अपमान, राग,काळजी... अशा संमिश्र भावनांनी भरलेल्या त्या मीठीत वासनेचा लवलेश नव्हता की भूतकाळातील घटनांचे पडसाद नव्हते. भविष्याचा विचार नव्हता. इतक्या वर्षांची व्यथा आणि दुखः डोळ्यातून वाहून गेलं होतं. एकमेकांच्या आश्वासक स्पर्शात, वर्षांच्या एकाकीपणाची बोचं गळून गेली होती. काही न बोलता, बरीच उत्तरे मिळाली होती. आता वैदेही लहान झाली होती. विश्वजीत तीच्या पाठीवर हात फीरवून तीचं सांत्वन करत होता. कीती काळ असा गेला ह्याची गिनती दोघांनीही केली नाही शेवटी वैदेहीला भान आलं. ती पटकन बाजुला झाली.
सॉरी! विश्वजीत. माझ्यामुळे तुमचा चांगला शर्ट ओला झाला!
बसा विश्वजीत, मी पाणी आणते... म्हणतं ती आत जायला वळणार तेवढ्यात विश्वजीत ने तीचा हात धरुन तीला अडवलं.
थांब, वैदेही! बस माझ्या जवळ, आत्ता कुठेही जाऊ नकोस आणि मला पाणी नकोय! मगाशी तुझ्या डोळ्यातून जेवढं पाणी काढलयस ना त्यानी तहान भागलेय माझी..., प्लीज बस, बोल माझ्याशी. वैदेही, सोफ्यावर बसून, जवळ बसलेल्या विश्वजीतकडे बघत होती. किती प्रौढ दिसत होता विश्वजीत. फक्त चाळीशीला आला होता पण केसांना चंदेरी झालर दिसायला लागली होती, डोळ्यांवर चष्मा आला होता, रंग उन्हाने रापला होता. गेली सतरा वर्षे तो अविरत काम करत होता. आधी दादासाहेबांसाठी आणि नंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. डोळ्यात आणि चेहर्यावर बुध्दीची, कर्तुत्वाची लकाकी होती, पण अथांग एकटेपण होतं. वैदेहीला गलबलून आलं.
“विश्वजीत! I want to say Sorry!” शक्यं असलं तर मला माफ करा. कोल्हापूरला जे झालं त्यात तुमची काहीही चूक नव्हती. तुम्ही तुमच्या कृतीशी, भावनेशी प्रामाणिक होतात. मी मात्र झालेल्या घटनेला स्विकारायला तयार नव्हते, निसर्गाने घडवून आणलेल्या त्या काही क्षणांना झेलायला आणि स्विकारायला कमकुवत होते. एका शिक्षकाच्या भूमिकेतून, अनिरुद्धच्या बायकोच्या भूमिकेतून स्वतःला सतत गिल्टी ठरवत होते. त्यावेळी, तिथून निघून जाण्याशिवाय मला दुसरा मार्ग सुचला नाही विश्वजीत! काय करावं ते समजलं नाही. भारतात आल्यावर सुध्दा, तुमचं सुरळीत चाललेलं आयुष्य डीस्टर्ब करावं असं वाटलं नाही. मी मुद्दामहून सगळ्यापासून लांब राहीले!
मला माफ करा! तुमच्या गुरुकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नव्हती हो, आजही नाहीत!
“वैदेही! तुझ्याबद्दलचं माझं प्रेम, माझी भावना तात्पुरती नव्हती. कदाचित तुला हे पटणार नाही But I still have same feelings for you. I still love you! कदाचित कायम करत राहीन. मला असं वाटलं होतं की तुझ्या बद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार मला तुला विसरायला भाग पाडेल. पण तसं झालं नाही. वैदेही प्लीज परत ये?! I need you! I need you with me. तुझी जागा माझ्या बरोबर आहे, इथे या शाळेत नाही. We are a team! Don't you know that?
वैदेही कसनुसे हसली. विश्वजीतचा हात हातात घेऊन ती समजावत म्हणाली... विश्वजीत, कष्टाने, हक्काने, संघर्षाने सत्ता, पैसा, पॉवर, प्रसिध्दी मिळवता येते पण प्रेम, माया, काळजी, त्याग हे मात्र मागून उसनं मिळत नाही आणि कोणी मागितलं म्हणून करता येत नाही. “तु माझ्यावर प्रेम करं, असं सांगता येत नाही, सांगुन दुसरा तुमच्यावर करत नाही. ते मनात उमलावं लागतं. एखाद्याची काळजी वाटणं, त्या करता त्याग करावासा वाटणं ह्या भावना जबरदस्तीने आणता येत नाहीत. मला तुम्ही आवडता, तुमच्या बद्दल मला काळजी आहे, प्रेम आहे, आपले एकत्र घालवलेले क्षण अतिशय सुंदर होते, पण अनिरुद्धबद्दल जे प्रेम, जी भावना, जी उत्कटता होती, ती दुसऱ्या कोणाबद्दलही वाटणं मला शक्य नाही. स्वतःशी आणि तुमच्याशी खोट बोलून मी फसवणूक करणार नाही.
असं उत्कट प्रेम कदाचित आयुष्यात एकदाच होतं. माझं अनिरुद्धवर होतं. तुमच्या दादासाहेबांचं, तुमच्या आईवरती होतं. त्यांनी कधीही दुसऱ्या स्त्रीचा विचार का केला नाही हे तुम्हाला समजलं नाही का?? तुम्हाला माझ्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा आहे, इच्छा आहे ती मी पूर्ण करु शकणार नाही विश्वजीत. केवळ गरजेपोटी केलेली शारिरीक जवळीक म्हणजे तुमच्या भावनेशी खेळण्यासारखे होईल विश्वजीत आणि मी ते करु शकणार नाही. मला माफ करा...! आपण मीत्र होऊ शकतो, सखा- सुहृद होऊ शकतो...! ते आपण कायमच राहु... पण एकत्र येऊन पुन्हा एकदा गुंतागुंत वाढेल... असं वाटतं मला.
एक उसासा सोडत विश्वजीतने डोळे मिटून घेतले. वैदेहीच्या डोळ्यात तीचा ठाम पणा आणि भावना स्पष्ट दिसत होत्या. बोललेलं समजत होतं पण मनाला अजूनही कळत नव्हतं. ज्या गोष्टींची कामना केली त्या गोष्टी त्याने परीश्रमाने मिळवल्या होत्या. पण प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नसतात हे कटू सत्य त्याला आता समजलं होतं. मनात आणि डोळ्यात आलेला कढ आवरत, परिस्थितीचं भान येउन विश्वजीत सावरला.
उरलेले काही तास, वैदेहीच्या हातचं जेवण, गप्पा यात कसे गेले त्याला समजले नाहीत. नेहमी प्रमाणेच वैदेहीने कोरोना आणि त्यांनी निर्माण झालेल्या प्रश्नांचा पूर्ण अभ्यास केलेला होता. प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाय योजना, लॉकडाऊन, विलगीकरणाचे उपाय व अंमलबजावणी अशा अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली. विश्वजीतला पुन्हा एकदा जूने दिवस आठवले. आव्हानांना टक्कर देण्याची, जिंकायची जिद्द ठेवणारी वैदेही बदललेली नव्हती.
“वैदेही! काळ खुप अवघड आलाय. पुढचे काही महिने आपली भेट होईल की नाही सांगता येत नाही. संसर्गाची पर्वा न करता, मी फील्डवर जाऊन काम करणार आहे. कोरोनामधे जिवाचं काही बरंवाईट झालं तरी मला पर्वा नाही. ही निकराची लढाई आहे. मला आता मागं फीरायचं नाही. परत आलो तर विजयी होऊन नाहीतर ही आपली कदाचित शेवटची भेट. माझ्या करता एक करशील?? माझ्या वैदेहीची काळजी घे. तीला तुझ्या संस्कारात मोठं करं. येतो मी!
विश्वजीत दृढ निश्चयाने आणि भरल्या मनानं परत निघाला. प्रेमातली सफलता नसली तरी आता दुरावा संपला होता. वैदेही शरिराने त्याच्या सानिध्यात नसली तरी त्याच्या विश्वात परत आली होती. तिच्याशी त्याला पाहिजे तेव्हा बोलता येणार होतं. तेवढ त्याला आत्तापूरतं पुरेसं होतं. आता त्याला कोरोनाच्या महायुध्दात सर्व तयारीनिशी पडायचं होत. त्याच्या गुरुंनी त्याला कर्तव्यकठोर बनवलं होतं आणि तो तेच करणार होता.
निरोप घेऊन निघालेल्या विश्वजीतच्या नाहीश्या होणाऱ्या गाडीकडे आणि मोकळ्या रस्त्याकडे वैदेही एकटक बघत होती.
“वैदेही! हे तु काय केलस? सात वर्षांपूर्वी, विश्वजीतला एकटं सोडण्याची एक चुक केली होतीस आज देखील तु हेच करणार आहेस का?? त्याला गरज आहे तुझी. त्याच्या कारकीर्दीतली सगळ्यात मोठी लढाई आहे आत्ता अशा वेळी तु अलिप्त रहाणार आहेस?? दादासाहेबांना दिलेल्या वाचनाचं काय? एक नागरिक म्हणून तुझ्या कर्तव्याचं काय? बाकी काही नसलं तरी, तुझा विद्यार्थी, मित्र, सहकारी एकटा लढतो आहे. कोरोनाचं हे भयानक संकट कधी जाईल, कीती नुकसान करेल माहित नाही. वैदेही तुझी जागा तिथे आहे... त्याच्या जवळ कुरुक्षेत्रावर कृष्णाने अखेर पर्यंत अर्जुनाचं सारथ्य केलन हे विसरलीस तू??? वैदेहीच्या मनात विचारांच काहूर उठलं. डोळे शांत मिटून तीने तीच्या बाबांच स्मरण केलं. काही मिनीटातच, डोळे उघडून ती भानावर आली. तिचं कर्तव्य तीला समजलं होतं. निर्णय झाला होता.
उपसंहार
विश्वजीत रविवारी रात्री उशिरा कोल्हापूरहून मुंबईत पोहोचला. उद्या पासून दिवसरात्र काम करायच होतं. टिमचा मेसेज आलेला होता. सकाळी ७:३० वाजता strategy meeting होती.
विश्वजीत सकाळी दादासाहेबांच्या फोटोला नमस्कार करुन ऑफीसला सव्वासातलाच पोहोचला. टिमच्या अगोदर पोहोचून दहा मिनीटे, एजेंडावर नजर फीरवायची, करेक्शन करायची, नवीन सुचलेले पॉईंट लिहून काढायची त्याला सवय होती.
तो पोहोचला तेव्हा मिटींगरुमचे लाईट्स लागलेले होते. प्रोजेक्टर ऑन केलेला होता. टेबलावर प्रत्येक मोकळ्या खुर्ची समोर एजेंडाच्या कॉपी होत्या. पाच पानांची लिस्ट आणि Action plans ची कॉपी शिस्तबद्ध मांडलेल्या होत्या. लॅपटॉप वर प्रेझेंटेशन तयार होतं. त्याचे टीममेंबर एकेक आत येत होते. वातावरण पूर्णपणे चार्ज्ड होतं. लॅपटॉप मधल्या प्रेझेंटेशनवर नजर फीरताना, मान वर नकरताही केवळ तिची चाहूल लागून त्याचं मन कृतज्ञतेनं, आदराने भरुन आलं... तिचा परिचित आवाज मिटींगरुम मधे घुमला.
Good morning team!!
Welcome you all in this meeting.
We are in this war against Corona!
Gear up!! Everyone, let's give our best!
चला कामाला लागुया, युध्द जिंकुया!
कथा समाप्त!
अभिप्राय