तृष्णा भाग ५,मराठी कथा - [Trushna Part 5,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!
निर्णय
२००३ - पुणे
रात्री, आपल्या स्टडीमधे विचारमग्न बसलेल्या वैदेही समोर अनिरुद्ध बसला होता. वैदेहीच्या डोक्यात युध्द सुरु आहे हे त्याला न बोलता सुध्दा कळत होतं. अशा वेळी अनिरुद्ध कायम शांत रहात असे आणि डोकं शांत झाल्यावरच बोलत असे.
“मला समजत नाहीए अनिरुद्ध, मी काय करु?! वैदेहीने शेवटी तिच्या मनातल्या युध्दाला तोंड फोडलं.
दादासाहेबांचं आणि तिचं सर्व बोलणं तीने अनिरुद्धला सांगितलं होतं. दादासाहेबांनी मागितलेली माफी आणि नंतर तिला देऊ केलेली ऑफर कुठल्याही सर्व सामान्य माणसांच्या दृष्टीने अतिशय प्रलोभनीय होती. पण तिला विश्वजीतच्या वागण्यावर भरोसा नव्हता. त्याने तिचं आयुष्य गेल्या काही दिवसांपासून त्रासदायक करुन ठेवलेलं होतं. हा सर्व प्रकार त्याला बिलकुल मान्य नसणार ह्याची तिला पूर्ण खात्री होती. अशा परिस्थितीत विश्वजीत कसा वागेल, सहकार्य करेल का, अजून त्रास देईल का?! हे ती काहिच प्रेडीक्ट करु शकत नव्हती.
“Why don’t you just speak with him?” त्याच्याशी एकदा मोकळेपणाने बोलं! अनिरुद्धने तिला समजावले.
Don’t fight on the previous issues. त्याला काय वाटतंय विचार. तो तुला संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे का? हे बघ वैदेही, everyone needs second chance. तरुण रक्त आहे. तो चुकलाय याबद्दल काही शंकाच नाही. But you will never know unless you take this golden chance given to you! एका मुलाचं करिअर घडवण्याची संधी तुला मिळाली आहे. ह्याला तु आव्हान म्हणून स्विकारतेस आणि या संधीच सोनं कसं करतेस ते शेवटी तुझ्याच हातात आहे.
I agree, there is a risk involved. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू यशस्वी होशील हे माझं मन मला सांगत आहे. आणि I am sure, की दादासाहेबांना देखील हा विश्वास तुझ्याबद्दल असल्याशिवाय त्यांनी हि ऑफर तुला दिलेली नाही आणि उद्या तुला वाटलं की हे शक्यच नाही तर you can always say no to him!!
वैदेहीने सकारात्मक मान हलवली. अनिरुद्धच्या समजावणीच्या शब्दांनी तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. उद्या खरं काय होणार ते कळणार होतं! पण उद्याच्या आव्हानाची चिंता आता ती करणार नव्हती.
इकडे विश्वजीतच्या मनातही तुफान सुरू होतं. त्यात वैदेही बद्दलचा द्वेष होता, मित्रांचा राग होता, दादासाहेबांना त्रास झाला याचं दुःखं होतं. मुख्य म्हणजे तो हे कोणालाच सांगु शकत नव्हता. दादासाहेबांचा निर्णय आणि शब्द हा शेवटचा असतो हे त्याला इतक्या वर्षात समजले होते. मित्रांना तो हे शेअर करु शकत नव्हता आणि दादासाहेबांना तो दुखवू शकत नव्हता. शेवटी त्यानं ठरवलं की सरळं वैदेहीला सांगु की हे सगळं जमणार नाही म्हणून. तिच आपणहुन नाही म्हणेल असं काहीतरी करावं लागेल. रात्री खुप उशीरापर्यंत तो गादीवर तळमळत पडला होता.
सकाळी दहा वाजता वैदेहीच्या घरासमोर विश्वजीतनी गाडी उभी केली. अत्यंत विमनस्क अवस्थेत तो वैदेहीच्या घरात गेला.
वैदेही आणि विश्वजीत स्टडीमधे बसले. दोघांमधे एक प्रचंड तणाव आणि संकोच भरलेला होता. शेवटी वैदेहीने बोलायला सुरवात केली.
“विश्वजीत! मला माहीत आहे, दादासाहेबांचा हा निर्णय आपल्या दोघांकरताही क्लेशकारक आहे. आमचं दोघांची काय चर्चा झाली आणि दादासाहेबांनी मला हि ऑफर का दिली हे सर्व मला आत्ता बोलायचं नाही. मला एवढंच समजतं की त्यांना तुमच्याबद्दल खुप मोठ्या अपेक्षा आहेत. तुमची शैक्षणिक पात्रता तुम्ही सिद्ध केलेली नसली तरी दादासाहेबांना तुमच्या अंगभूत बुध्दीमत्ता, तुमची हुशारी आणि तुमची जिद्द याबद्दल पूर्ण भरवसा आहे. एक पिता म्हणून आणि एक राजकारणी म्हणून ते तुमच्यावर हा विश्वास दाखवायला तयार आहेत. तुम्ही अटकेपार झेंडा फडकवाल हे त्यांचे स्वप्न आहे.
पण प्रश्न असा आहे की तुमचा, तुमच्या क्षमतेवर विश्वास आहे का?? तुमचं आयुष्यात लक्ष्य काय आहे? तुमची स्वप्न काय आहेत? राजकारण करावं, जनतेकरता सत्तेचा विनीयोग करावा हे तुमचं स्वप्न आहे का? त्या करता लागणारे कष्ट करायची तुमची तयारी आहे का?? हाती घेऊ ते तडीस नेऊ ही जिद्द तुमच्या मनगटात आहे का??? आपली स्वप्नं पूर्ण होण्याकरता आकाश पाताळ एक करायची तुमची तयारी आहे का?? लाथ मारेन तिकडे पाणी काढेन, हा आत्मविश्वास तुमच्या मनात आहे का??
तसं असेल तरच मी तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे! पण मनातून खच्ची झालेल्या आणि हरलेल्या माणसांबरोबर मला काम करण्यात जराही इंटरेस्ट नाही. या प्रवासात तुम्ही जितके कष्ट घ्याल त्या पेक्षाही जास्त कष्ट मी घेईन पण तुमच्या संपूर्ण सहकार्याशिवाय ते शक्य नाही!”
स्वप्ने बघायची तर ती उच्च बघायला आवडतात मला. गाणारे असाल तर लता मंगेशकर बनायचं स्वप्न ठेवा. क्रीकेटर असाल तर सचिन तेंडुलकरच्या पातळीचे खेळाडू व्हा आणि उद्योजक व्हायचे असेल तर टाटांचा आदर्श ठेवा. राजकारण आणि समाजकारण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं वागा. Its not failure but low aim is crime!
तुम्हाला माहितेय, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे सर्वगुणसंपन्न, दुसरे राजे आपल्या देशात का झाले नाहीत??? कारण इतर राजांनी महाराजांसारखी स्वराज्याची भव्य स्वप्न बघितली नाहीत. ती साध्य होण्यासाठी प्राणांची बाजी लावली नाही. त्यांच्या सारखी पारख करुन चांगली माणसं जोडली नाहीत. इतरांनी महाराजांसारखी दूरद्रुष्टी ठेवली नाही. शिवाजी महाराज सत्ता, पैसा आणि मान मरातब असून सुध्दा एक योगी होते. त्यांनी स्वतःचा स्वार्थ नबघता समाजाचं हित पाहीलं. त्याकरता ते आजन्म लढले. त्यांच्या गुणांमुळे, कर्तुत्वामुळे ते पूजनीय आणि वंदनीय झाले! लोकांना फक्त सत्ता दिसते, मान मरातब दिसतो, खुर्ची दिसते पण त्या खालचे काटे समजत नाहीत. हा काटेरी मुकुट आहे हे लक्षात ठेवा.
दादासाहेबांच्या वारस म्हणून तुम्हाला पैसा आणि मान मरातब मिळेलही पण त्यावर तुमच्या कर्तृत्वाची मोहर नसेल. बाकी सर्व आयतं मिळवता येतं पण कर्तृत्व नाही. ते सिद्ध करायला लागतं.
ते स्वकष्टार्जित असतं. पण ते पूर्णपणे तुमचं असतं. पूर्वजांच्या पुण्याईमुळे तुम्हाला कदाचित सत्ता मिळेलही. पण अंगात कर्तुत्वच नसेल तर लोकंच तुम्हाला एक दिवस हाकलवतील...!
तुम्हाला काय हवयं हे तुम्हीच ठरवायचं आहे. मी आजचा दिवस तुम्हाला विचार करायला वेळ देते. संध्याकाळी मला तुमचं उत्तर सांगा.पण जे सांगाल ते १००% फॉलो करायची तुमची तयारी असेल तरच सांगा नाही तर आपले रस्ते वेगळे आहेत. या तुम्ही!!
विश्वजीतला आजवर येवढं स्पष्ट, एवढं सडेतोड, एवढं मुद्देसूद आणि तरीही मनाला भिडणारं असं कोणीही बोललं नव्हतं. आज वैदेही जे बोलत होती त्यातला शब्द नी शब्द त्याच्या अंतरंगात भिडला होता, खळबळ करत होता. कुठेतरी आतं त्याच्या स्वत्वाला, अस्मितेला धक्का बसला होता.
खरचं काय करायचं आहे आपल्याला? काय स्वप्न आहेत आपली? दादा साहेबांसारखं राजकारण करायचं आहे का? काय आवड आहे आपली? या कशाचीही विचार त्याने आत्ता पर्यंत कधिही केला नव्हता. तशी गरजच पडली नव्हती.
त्याला फक्त एवढच माहिती होतं की त्याला आपल्या वडीलांना दुखवायचं नव्हतं. मनात आणलं तर आपण हे करु शकु का? हा विश्वास त्याच्या मनात नव्हता कारण स्वतःला त्याने कधीच सिद्ध केलेलं नव्हतं. एकदा वाटतं होतं, सरळ नाही म्हणून टाकावं. एकदा वाटे, प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? पण आपल्याला नाही जमलं तर? संध्याकाळ होत आली तरी विश्वजीत दोलायमान अवस्थेत होता. त्याच स्थितीत तो वैदेहीच्या घरी पोहोचला. अनिरुद्धने त्याला आत घेऊन हॉलमधे बसायला सांगितलं. आतल्या खोलीत देवघरासमोर वैदेही देवाला दिवा लावत होती. शुभंकरोती संपवून वैदेहीने रामरक्षा म्हणायला सुरवात केली होती.
अथ ध्यानम्:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचंद्रम ।
तिचा स्पष्ट आणि सुवाच्य शब्दोच्चार त्यातल्या अर्थाची गोडी वाढवत होता. समईच्या उजेडात, अबोलीला जवळ घेऊन रामरक्षा म्हणणाऱ्या वैदेहीकडे बघून विश्वजीतला त्याच्या लहानपणची आठवण झाली. त्याची आई, तिन्ही सांजेला देवघरात, छोट्या विश्वजीतला मांडीवर बसवून स्तोत्र म्हणत असे; ते आठवलं. देवासमोर बसलेली आईची शांत, सोज्वळ मुर्ती आठवली. घशात आवंढा आला आणि नकळत हात नमस्कारा करता जोडले गेले!
विश्वजीतच्या अंतर्मनाने, काय करायचे, याचा निर्णय घेऊन टाकला होता!
क्रमशः
पाचवा भाग लवकर प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाआपल्या प्रकाशनाच्या अपडेट्स आम्हाला WhatsApp वर मिळतील का? आणि असल्यास कसे? कृपया कळवावे.
उत्तर द्याहटवा