साथिया भाग ३,मराठी कथा - [Sathitya Part 3,Marathi Katha] कृष्ण युध्दात अर्जुनाचा सारथी होता तर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती.
कृष्णाने युध्दात अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, कुरुक्षेत्रावर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती
आषाढस्य प्रथम दिवसे!
जुलै २०२० - मुंबई
पावसाची एक हलकी सर येऊन गेली असावी. मुंबईच्या हवेत गारवा नसतोच कधी. फक्त पहाटेची वेळ असल्याने हवेत नेहमीचा उष्मा नव्हता एवढेच. अंगात विंडचिटर आणि पायात स्पोर्ट्स शुज घालून विश्वजीत धावायला बाहेर पडला होता. नरिमन पॉइंट जवळ, सरकारने दिलेल्या अलिशान क्वार्टरमधे विश्वजीत एकटाच रहात होता. त्याची बायको, देवयानी कोल्हापूरला वाड्यातच असे. एखादा महत्वाचा इव्हेंट असेल तरच ती मुंबईत येई कींवा महिन्या दोन महिन्यात एखादी चक्कर विश्वजीत, कोल्हापूरात मारत असे. तेवढंच नातं उरलं होतं. मुळात ते नातं कधी कधी फुललचं नव्हतं. देवयानी दिसायला चांगली होती. श्रीमंत बापाची लाडकी लेक होती. फॅशन, शॉपिंग, फील्मस, टिव्ही सिरीअल, हॉटेलिंग, डीस्को, पत्ते, International traveling असे महागडे छंद होते. कोल्हापूरच्या मातीशी नातं निर्माण व्हायला ती काही शेतकऱ्याची मुलगी नव्हती.
विश्वजीतच्या कामाचं स्वरूप काय, त्याचा मतदारसंघ, त्याचे प्रोजेक्ट, कारखाने कशातही तीला काडीमात्र इंटरेस्ट नव्हता, जाणून घ्यायची ईच्छा देखील नव्हती. लग्ना नंतर काहीच दिवसात विश्वजीतला हे लक्षात आलं होतं. ती ग्रॅज्युएट असली तरी सुशिक्षित नव्हती, सुसंस्कारित तर नव्हतीच, बहुश्रुत नव्हती. वाचन, पुस्तकं, चर्चा, राजकारण वैगरे फालतू आणि रटाळ गोष्टींमधे तीला बिलकुल रस नव्हता. तिचं जग लहान होतं, महत्त्वाकांक्षा जवळपास नव्हतीच आणि विश्वजीत कडून माफकच अपेक्षा होत्या. एक तर तिच्या हातात आणि अकाउंट मधे भरपूर पैसा असावा आणि गरजे पूरता कींवा नवरा बायकोचा संबंध टिकवण्यापूरता शरिरसंबंध असावा. पहिली अपेक्षा विश्वजीत पूर्ण करत होता. शरिर संबंधांच्या बाबतीत मात्र त्याचं मन कधीच विरक्त झालेलं होतं. एक उपचार म्हणून तो आठवणीने आठवड्याला एखादा फोन करे.
त्यांच्या मधला एकच दुवा होता त्यांची मुलगी पण तिला देखील देवयानीने एका प्रतिथयश, हायक्लास, उच्चभ्रूंच्या बोर्डिंग स्कुल मधे ठेवले होते. विश्वजीतला हे फारसे पटत नसले तरी तो बोलु शकत नव्हता. त्याला कामातल्या व्यस्ततेमुळे, घरी आपल्या मुलीबरोबर घालवायला अजिबात वेळ मिळत नव्हता. घरचा कारभार देवयानीच्या हातात होता. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुलीला कोल्हापूरला बोर्डींगमधून घरी पाठवले होते. निदान त्यामुळे तरी त्याचा रोजचा एक फोन घरी जात होता.
विश्वजीतला आठवलं, पूर्वी त्याचा दिवस फोनकॉलवर सुरू व्हायचा. उन्हं पूर्ण वर आल्यावर आरामात उठायची सवय असलेल्या विश्वजीतला पहाटे उठायचा प्रचंड कंटाळा येई, पण ठिक साडेपाचला वैदेहीचा वेक अप कॉल येई. त्यात खंड नसे. ज्या दिवशी ट्रेनर येणार नसेल त्यादिवशी वैदेही स्वतः त्याच्या बरोबर जॉगिंगला कींवा चालायला येई. मग कधी ARAI ची टेकडी तर कधी NDA चा रस्ता. चालताना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होत. दिवसाचं प्लॅनिंग होई. दोघे कोल्हापूरला असतील तर त्यावेळी रंकाळ्याचा फेरफटका होई. नाहीतर शेतावर एक चक्कर व्हायचीच.
नरीमन पॉईंटचा रस्ता क्रॉस करून विश्वजीतने सीफेसचा फुटपाथ पकडला. समुद्राला उधाण आलं होतं... धावायचा स्पीड वाढवला... तस त्याचं मन पण तेवढ्याच वेगाने भूतकाळात परत गेलं...
अनिरुद्ध गेल्यावर मात्र विश्वजीत न चूकता दररोज सकाळी वैदेहीला फोन करत असे. अनिरुद्धचं असं एकाएकी जाणं वैदेहीला प्रचंड मानसिक धक्का देऊन गेलं होतं. ती नैराश्येत गेली होती. जेवणखाणाची शुध्द राहिली नव्हती. दागिने, रंगीत कपडे यांचा त्याग केला होता. सफेद कपड्यात ती एखाद्या योगिनी सारखी रहात होती. तिला असं बघताना विश्वजीतला अतिशय वाईट वाटे. ती जीवाचं काही बरं वाईट करुन घेईल याची विश्वजीतला भयंकर धास्ती होती. तिच्यावर लक्ष ठेवायला त्याने अतिशय विश्वासाचा ड्रायव्हर - बॉडीगार्ड ठेवला होता. यशवंत दररोजची खबर विश्वजीतला पुरवत असे. विश्वजीतच्या कोल्हापूर - पुणे - मुंबई सतत फेऱ्या होत. वैदेहीचं लक्ष कामात जास्तीत जास्त गुंतेल याची तो काळजी घेई. तीन वर्षांपूर्वी अबोली देखील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत, शिकायला गेली होती. गोखले सरांचा लाडका शिष्य प्रकाशच्या घरी राहून शिकत होती. त्यानंतर वैदेहीने स्वतःला कामाला जुंपून घेतलं होतं. २००९ च्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती २०१४ च्या इलेक्शनमधे घडवायची होती.
जॉगिंग करताना, गाणी थांबून हेडफोनवर बातम्या सुरू झाल्या... आज वादळाची शक्यता वर्तविली होती. आभाळ भरुन आलं होतं. कुठच्याही क्षणी पाऊस सुरु होणार होता. विश्वजीतने धावता धावता परतीचा रस्ता घेतला...
वादळाशी त्याचं जुनं नातं होतं. मनाशी कायमच्या साठवून ठेवाव्यात अशा आठवणी या पावसाने आणि वादळाने त्याला बहाल केल्या होत्या...! त्याचं ओढाळ मन पुन्हा एकदा त्या वादळी रात्रीशी सलगी करु लागलं...
आषाढातले दिवस... साल २०१३, इलेक्शन सहा महिन्यांवर आलेलं होतं. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पहिल्या वचनांची परिपूर्ती झाली होती, विजयी झाल्यानंतर राबविण्यात येणाऱ्या पंचवार्षिक योजनांचा आराखडा मांडणं सुरु झालं होतं. वैदेही आणि विश्वजीत दिवसरात्र कामात गुंतले होते. प्रचारसभा आणि पुस्तिकेचे रुपरेषा यांचं काम झपाट्याने सुरू होतं. ते आटपून कोल्हापूरला परतायला उशीर झाला होता. वादळाची शक्यता वर्तविली होती. आभाळ भरुन आलं होतं. कार्यकर्त्यांना विश्वजीतने कधीच माघारी पाठवून दिलं होतं. ड्रायव्हिंगला विश्वजीत बसला होता. वावटळ उठली, समोरचं दिसेनासं झालं, ताडताड... गाडीच्या काचेवर पावसाचे टपोरे थेंब वाजायला सुरवात झाली. विश्वजीतने गाडी सरळ शेतावर घेतली. शंभर एकरावर पसरलेल्या त्याच्या विस्तीर्ण शेतातलं कॉटेज ईथून जास्त जवळ होत. थोडावेळ तिकडे थांबता आलं असतं.
पण एखादे किलोमिटर गेल्यावर रस्त्यावर झाड पडलं होतं. तो छोटासा रस्ता बंद झाला होता. चलं! म्हणत विश्वजीतने वैदेहीचा हात धरला आणि गाडीतून उडी मारुन शेतावरच्या बांधावरून कॉटेजच्या दिशेने धावायला सुरवात केली. त्यांच बालपण परत आलं होतं. ढोपरापर्यंत चिखल उडत होता. अंग नखशिखांत भिजलं होतं. अंगातले कपडे चिकटून मातीने लाल गुलाबी झाले होते. कॉटेजच्या बाहेर पाऊलभर तळं झालं होतं. धावता धावता पाय सटकला आणि विश्वजीत सपशेल आडवा झाला होता... आणि त्याला तशा अवस्थेत बघुन वैदेहीला हसणं कंट्रोल करता येत नव्हतं...!! अनिरुद्ध गेल्यानंतर चार वर्षांत आज पहिल्यांदाच विश्वजीत तिला एवढं मोकळं, एवढं आनंदी, एवढं हसताना बघत होता. तिचं तारुण्य, बाल्य परत आलं होतं. किती लोभस दिसत होती ती. धावताना घट्ट बांधलेला अंबाडा सुटून तिचे लांबसडक केस मोकळे झाले होते, नेसलेल्या पांढऱ्या साडीत, पाण्याने चिकटलेलं तिचं अंगप्रत्यंग झाकण्याएवजी उठून दिसत होतं..., केसांतून, चेहऱ्यावरून, मानेवर पावसाचे थेंब ओघळत होते...
वीज चमकली... “Oh! I love this women, I love her so much!” तिच्याकडे अनिमिष नजरेने बघणाऱ्या विश्वजीतला, वीजे इतक्याच लखलखणाऱ्या प्रेमाच्या अनुभूतीने अंतर्बाह्य ढवळुन टाकलं. तीला असं कायमचं हसतं खेळतं ठेवण्यासाठी तो वाट्टेल ते करु शकतो, तिच्यासाठी कुठल्याही संकटाचा सामना करु शकतो, तिच्याकरता समाजाने घातलेली कुठलही बंधनं तोडू शकतो हे त्याला एका क्षणात जाणवलं. गेल्या दहा वर्षांत, I hate her so much पासून I love her so much पर्यंतच्या जाणिवेचा प्रवास कधी आणि कसा झाला ते त्याला समजलंच नाही इतका तो सहज झाला होता. त्याच्या आयुष्यात तिचं स्थान, एक शिक्षक, गुरु, सहकारी, सचिव, मैत्रिण, म्हणून होतचं पण ती त्याचं सर्वस्व आहे हे त्याला त्या क्षणी समजून चुकलं.
आपल्याला कधीच कोणत्याही दुसऱ्या स्त्री बद्दल, अगदी देवयानीबद्दल सुद्धा आकर्षण का वाटलं नाही हे त्याला पूरतं समजलं. अगदी कॉलेजच्या दिवसांपासून ते अगदी मंत्री झाल्यावर सुध्दा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर भाळणाऱ्या मुली होत्या पण ते व्यक्तिमत सुध्दा त्याला घडवणाऱ्याची देन होती. एखाद्या निष्णात कलाकाराने छीन्नी हातोड्याने कोरुन दगडातून एखादी सर्वांगसुंदर मूर्ती साकार करावी तद्वत वैदेहीने त्याला घडवला होता. त्यावरचा प्रत्येक घाव, प्रत्येक पैलू तिच्या हातनं पडला होता.
लोकं या परिपूर्ण झालेल्या मूर्तीकडे, कलाकृतीकडे आकर्षित होत होते... पण आज ती कलाकृतीच त्याला घडवणाऱ्या कलावंताच्या आकंठ प्रेमात बुडाली होती. या नव्याकोऱ्या भावनेने उचंबळून तो आत पडवीत जाऊन उभा राहिला. वैदेही अजूनही पाण्यातच खेळत होती. पाऊस वाढला होता. अंधार पडला होता. जवळच्या झुडपात सर्रऽऽऽकन काहीतरी गेलं आणि वैदेही घाबरून धावत पडवीत विश्वजीत जवळ येऊन उभी राहिली. कौलांवर पाऊस वाजत होता. इतक्यात त्यांच्या जवळच्या शेतात काड्कन वीज पडली... भयानक मोठा आवाज आला, त्याचक्षणी दिवे गेले, काळामीच्च अंधार झाला. वैदेही घाबरून विश्वजीतच्या हाताला बिलगली.
वारा-वादळाच्या आघाताने एखादी वेलीने झाडाचा आधार घ्यावा तशी वैदेही त्याला चिकटली. तिचं असं घाबरुन त्याच्या आधाराला येणं, त्याच्या हाताला धरून, बिलगून जवळ उभं राहणं त्याला सुखावून गेलं. वैदेही थरथरत होती. तिच्या अंगाच्या ओल्या स्पर्शाने विश्वजीतच्या शरीरातला कण नी कण पेटून उठला होता. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि तिच्या कंबरेला आपल्या बळकट हातांची गवसणी घालत विश्वजीत तिला उचलून आत घेऊन गेला.
बाहेरचं वादळ त्या बंद खोलीत घोंघावत होतं. भर आषाढातल्या पावसानं वैषाखवणवा निवत होता. तप्त झालेली, आसुसलेली धरीत्री, त्या बेधुंद बेछूट वर्षावात भिजत, शांत होत होती... काजळभरल्या रात्रीने मनात आणि शरीरात असंख्य दीप प्रज्वलीत केले होते!
क्रमशः
अभिप्राय