तृष्णा भाग २,मराठी कथा - [Trushna Part 2,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!
गोखले आणि भोसले!
१९९४ - सांगली
गोखले सरांच्या घराच्या पडवीत, सरांचा माजी विद्यार्थी प्रकाश आणि त्याचा ऑफीस मधला कलिग अनिरुद्ध सरांची वाट बसले होते. गोखले सर शाळेतून येताना लायब्ररीत असतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. इतक्यात गोखले सर आणि वैदेहीने घरात प्रवेश केला.
“अरे! प्रकाश?! आयुष्यमान भव! यशस्वी भव! आज असा अचानक कसा रे?!” त्यांना वाकून नमस्कार करणाऱ्या प्रकाशला आशीर्वाद देताना त्याच्या पाठीवर थोपटत गोखले सर आनंदाने म्हणाले. माजी विद्यार्थी भेटले की गोखले सरांना कायमच आनंद होई.
गोखले सरांना सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर या पंचक्रोशीत प्रचंड मान आणि आदर होता. त्याना आधुनिक द्रोणाचार्य म्हंटले असते तरी वावगे ठरले नसते. स्वातंत्र्यपूर्व काहीच वर्ष आधी जन्म घेतलेल्या गोखले सरांनी तरुण वयातच राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले होते. विनोबांच्या “खेड्यात चला, आधुनिक भारत घडवा”, या विचारांच्या प्रभावाने गोखले सरांनी MA केल्यावर खेड्यात जाणे आणि शिक्षक होणे पसंत केले होते. नवीन पिढीला सक्षम करा म्हणजे आपोआपच समाज सुधारेल या विचारांवर ते ठाम होते.
अत्यंत साधी रहाणी, कडक शिस्त, अफाट वाचन, शिकवण्याची उत्कृष्ट हातोटी, अभ्यासु वृत्ती आणि मुलांना सुशिक्षित करायची जबरदस्त इच्छाशक्ती या मुळे गोखले सरांकडे मुलं आकर्षित होत. कुठल्याही मुलावर ते कधीच हात उगारत नसतं. दंगा मस्ती करणारी, अत्यंत व्रात्य समजली गेलेली पोरं सुध्दा सरांसमोर सुतासारखी सरळ होत असत. आई बापाला पण गोखले सरांकडे आपलं पोर शिकतय म्हंटलं की चिंता नसे. काही अगदी खेड्यातली गरीब परंतु हुशार व होतकरू मुलं सरांकडे राहुन शिकत. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बदल्या होत असतं. पण ज्या शाळेत गोखले सर हेडमास्तर, तिकडला मुलगा मॅट्रिकला मेरीटमधे येणारच हे मुळी समिकरणचं झालं होतं.
पूर्वी सांगली, सातारा, कोल्हापूर, कागल, वालचंदनगर अशी फीरस्ती करत शेवट मिरज मधेच खाजगी शाळेचे हेडमास्तर होउन गोखले सर कायमचे स्थाईक झालेले होते. पहाटे साडेचारला उठुन सर ५ मैल पायी रपेट मारत. घरी येऊन आन्हिके उरकत. एकीकडे मुलांची आणि वैदेहीची शिकवणी व अभ्यास सुरु होई. माई (सरांची बायको) सर्वांना खारीक, नाहीतर वडी, घरचा लाडू, हातावर ठेवी. दुध प्यायला देई.
अकरा वाजता सर शाळेत जायला निघत. दररोज लायब्ररीत चक्कर असे. येतायेता एखाद्या मुलाच्या पालकांना भेटत. अनेक वेळा सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घेणाऱ्या गोखले सरांची निवृत्ती झाली तरी शिकवणे संपले नव्हते. अजूनही मुले घरी शिकायला येत. माजी विद्यार्थी गावात आले की आवर्जून सरांना नमस्कार करायला येत, आपला प्रगतीचा आलेख सरांना अभिमानाने सांगत.
प्रकाश देखील सरांकडे काही वर्ष घरी राहुनच शिकलेला होता. आता मुंबईत एका मल्टीनॅशनल कंपनीत उत्तम पोस्टवर काम करत होता. थोड्याच महिन्यात कंपनी एका प्रोजेक्टवर त्याला परदेशात पाठवणार होती. जायच्या अगोदर, आईवडीलांना आणि सरांना भेटायला तो आवर्जून आला होता.
ये प्रकाश!! अगदी उत्तम मुहूर्तावर आलास बघं!! अरे आज वैदेहीचा डीग्रीचा रीझल्ट लागला. पहिली आलेय ती.
“हे घे, प्रकाश दादा! पेढा. वैदेहीने प्रकाश आणि अनिरुद्धच्या हातावर पेढा ठेवला. वैदेही BA च्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आली होती. पूर्वी दहावी आणि बारावीच्या परिक्षेत देखील ती पूर्ण जिल्ह्यात पहिल्या पाचात होती. लिटरेचर आणि इतिहास यांची प्रचंड आवड असल्याने तिने आर्ट्स घेणे पसंत केले होते. तीने Phd करुन मोठे प्रोफेसर व्हावे अशी सरांची इच्छा होती तर पत्रकार व्हावं अशी वैदेहीची. दहावी नंतर वैदेहीची आई, माई निमोनिया नी गेल्या तेव्हा पासून घरातली सगळी जबाबदारी सांभाळून वैदेही अभ्यास करत होती.
गोखले सर प्रकाशशी बोलत असताना, अनिरुद्धचं सगळं लक्ष वैदेही कडेच लागलं होतं. ती होतीच तशी. कोकणस्थी लख्ख गोरेपणा, सडपातळ अंगलट, एक लांबसडक शेपटा, काळे आणि बोलके डोळे, तरतरीत नाक आणि बोलकी जिवणी. अंगात सळसळता उत्साह. चेहऱ्यावर हुशारीचं आणि बुध्दीमत्तेचं तेज.
अनिरुद्ध देखील बुध्दीमान होता. आयआयटी मधे एम टेक करुन सॉफ्टवेअर कंपनीत उत्तम पगारावर लागला होता. मितभाषी आणि अंमळ शांत असलेला अनिरुद्ध २८ वर्षांचा होऊन अजूनही अविवाहित राहीला होता. प्रकाश बरोबर तो देखील काही महीन्यात अमेरिकेत जाणार होता.
आपल्या मीत्राचं लक्ष वैदेहीकडे लागलं आहे हे प्रकाशाच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नव्हतं.
पुढच्या दहाच दिवसात प्रकाशचा गोखले सरांना फोन आला. अनिरुद्धला वैदेही अतिशय आवडली होती. आपल्या एकुलत्या एक मुलाचे अमेरिकेत जायच्या अगोदर लग्न झाले तर अनिरुद्धच्या आईबाबांना हवेच होते. नाकारण्यासारखे काहीच नव्हते.
“सर!” मी तुम्हाला अनिरुद्धची खात्री देतो. प्रकाश फोनवर सांगत होता. अतिशय चांगला मुलगा आहे. घरचे देखील चांगले आणि समंजस आहेत. आपल्या वैदेहीला सुखात ठेवतील.
अरे?! पण वैदेही ला पुढे शिकवतील का? सरांना मुलीच्या शिक्षणाची चिंता होती. त्यांची साठी उलटली होती, तब्बेतीच्या कुरबुरी सुरु झाल्या होत्या आणि वैदेहीची आई जाऊनही बरीच वर्षे झाली होती. वैदेहीला इतके उत्तम स्थळ मिळेल का? हा विचार करुन सरांनी आपला होकार कळवला होता.
नंतरची चक्रे पटापट फिरली. अगदी साध्या पध्दतीने, नारळ आणि मुलगी येवढेच देऊन गोखले सरांनी वैदेहीचे लग्न लावले.
महीन्या दोन महीन्यांत अनिरुद्ध - वैदेही अमेरिकेला निघाले सुध्दा. अनिरुद्धने दिलेला शब्द पाळला होता. प्रयत्न करुन त्याने वैदेहीला तिकडच्या युनिव्हर्सिटीमधे प्रवेश मिळवून दिला होता. मास कम्युनिकेशनमधे पोस्ट ग्रॅज्युएशन करुन वैदेही ने MBA ला देखील प्रवेश घेतला होता. या सर्व गडबडीत, गोखले सर कॅन्सरनी आजारी पडले आणि गेले तेव्हा अबोलीच्या वेळेस ती गरोदर होती. नववा महिना होता. तिची आणि सरांची शेवटची भेट होऊ शकली नव्हती. अमेरिकेतली ६ वर्षे झपाट्याने कशी गेली ते वैदेहीला कळले देखील नाही. आदल्या वर्षी अनिरुद्धचे बाबा गेले आणि आई एकटी राहिली, मग मात्र या दोघांनाही अमेरीका गोड लागेना. नोकरी सोडून, पुण्यात नवीन नोकरी घेऊन आणि त्यांच्या आयडीअल कॉलनीतल्या मोठ्या घरी ते कायमचे शिफ्ट झाले.
अबोली आता आठ वर्षांची झाली होती. आई थकली होती. वैदेही जुनियर कॉलेजला लेक्चररची नोकरी करत होती. सर्व काही छान चालले होते. पण पूर्वीचा शांत परिसर आता कॉलेजच्या आणि हॉस्टेलच्या पोरांनी गजबजून गेला होता. या मुलांच्या त्रासदायक कटकटींनी वैदेहीचा पारा चढत होता. आज तर तीच्या पेशन्सचा अंतच झाला होता. या बडे बापाच्या मुजोर पोरांना ती चांगलाच धडा शिकवणार होती. कॉलेजला पोहोचून तीने RTO मधे फोन लावला!
हॅलो! सर, प्रेस मधून बोलतेय. मला एका व्हेइकलचं रजिस्ट्रेशन कुठल्या नावानं आणि कुठे केलय ते सांगता जरा??? पलिकडून आलेले डीटेल्स ती शांतपणे उतरवून घ्यायला लागली.
विजया दशमी
१९८० - कोल्हापूर
आपल्या अलिशान वाड्यात दादासाहेब भोसले येरझारा घालत होते. हॉस्पिटलमधून फोन यायची वाट बघत होते. मनाला चैन नव्हती. त्यांच्या बायकोला सुवासिनीला कळा सुरु झाल्या होत्या. लग्नाला बारा वर्षे होऊन गेली होती. घराण्याला वारस नव्हता. तीन वेळा दिवस राहिले पण गर्भपात झाला होता. त्यांनी दुसरं लग्न करावं अशी त्यांच्या आईची ईच्छा होती. पण दादासाहेबांना ते बिलकुल मान्य नव्हतं. सुवासिनी शिवाय दुसऱ्या कुठल्या स्त्री चा ते विचार सुध्दा करु शकत नव्हते. काहीशे एकर शेती होती. साखर कारखाने, बंगला गाड्या, स्थावर जंगम मालमत्ता अफाट होती पण घरात मुल नव्हतं. या वर्षी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत दादासाहेब उभे होते. दसऱ्याचं सिमोल्लंघन करुन प्रचाराचा नारळ फोडायचा होता. पार्टीचे लोकं दिवाणखान्यात आतुरतेने दादासाहेबांची वाट बघत होते.
शेवटी एकदाचा फोन वाजला! “मुलगा झाला हो!!!” दादासाहेब फोनवरची बातमी ऐकून अत्यानंदाने ओरडले; आणि प्रचाराचा नारळ वाढवला गेला, दादांच्या वाड्याचा परिसर फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमला!! विश्वजीत भोसले, सोन्याचं बोंडलं घेऊन जन्माला आला आणि अत्यंत लडाकोडात वाढला. भोसल्यांचा वारस, नवसा सायासाने झालेला म्हणून आजी आजोबांचा तर तो लाडका होताच. सुवासिनी तर त्याला प्राणपणाने जपत होती. तो जन्मला आणि त्या वर्षीदादासाहेब निवडणूक जिंकले. आमदारकी मिळाली. दादासाहेब त्याला लाडाने राजे म्हणून हाक मारत.
विश्वजीत सात आठ वर्षांचा झाला आणि सुवासिनी ताई निवर्तल्या. त्या मुळात नाजुक, त्यात विश्वजीत झाल्या पासून त्यांची तब्येत ढासळलीच होती. फार काही नाही, ताप आल्याच निमीत्त झालं. आधी व्हायरल वाटला, मग मलेरियावर औषध झालं शेवटी डेंग्यूचं निदान झालं. ताप हटेना. अशक्तपणा वारेमाप आला. दादासाहेबांनी प्रयत्नांची शर्थ केली पण यश आलं नाही.
त्यांनी परत लग्न करावं अशी सगळ्यांची ईच्छा असून दादासाहेब कायम एकटेच राहिले. राजकारण आणि सत्ता कारण वाईट. तुमच्याकडे पैसा आणि सत्तेची ताकद असली की चांगल्या बरोबर बाजरबुणगे पण जमा होतात हे ते पक्के ओळखुन होते. भल्या भल्यांना व्यसनं लागतात. नको ती आकर्षणं निर्माण होतात. दादासाहेबांनी सत्तेची राजकारण केली पण दोन गोष्टींपासून ते कटाक्षाने लांब राहिले. बाई आणि बाटली! आपल्या बायकोला सोडून त्यांनी परस्त्रीकडे बघितले पण नाही. सुवासिनी गेल्यावर त्यांनी मांसाहार सोडला. गळ्यात माळ घेतली. दारुच्या थेंबाला स्पर्श केला नाही.
विश्वजीतचं बालपण मात्र अतिशय लडाकोडात आणि छानछोकीत गेलं. आई विना पोर म्हणून आजी आजोबा त्याला कधीच बोलले नाहीत. त्याच्या मस्तीचं पण कोडकौतुक केलं.
दादासाहेब स्वतः फक्त दहावी झालेले. त्यांची फार इच्छा की मुलानं शिकावं. घराण्याच नाव काढावं. पण विश्वजीतचं लक्ष अभ्यासापेक्षा खेळं, कुस्ती, दंगा, इथच जास्त. घरात ओरडणारं, अभ्यास घेणारं कोणी नाही! याचा परीणाम एकच झाला. प्रगती पुस्तकांत लाल रेघा!
दादासाहेबांनी समजावलं, धमकावलं म्हणून दहावी होऊन गंगेत घोडं न्हायलं. खरतर विश्वजीत हुशार होता. बुध्दी देखील कमी नव्हती पण अभ्यासू वृत्ती नाही आणि कशा करता करायचं? महत्त्वाकांक्षा नाही की जिद्द नाही. बारावी नंतर दादासाहेबांनी शब्द टाकून पुण्यात चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवून दिला. दादांची इच्छा की पोरानं ग्रॅज्युएट व्हावं.
विश्वजीत पुण्यात आला, मोठ्या कॉलेजला जायला लागला आणि दादासाहेबांचे संस्कार साफ विसरला.
विश्वजीत राजे फालतू पोरांच्या नादाला लागले. पैसा हातात खेळतोय, चालवायला महागडी गाडी, दिमतीला नोकर, ते कमी पडले तर लाळघोटी पोरं पोरी होतेच उदोउदो करायला आणि त्याच्या तालावर नाचायला! तरुण वय, अंगात रग, सळसळतं रक्त... मग काय, पार्ट्या, टाईमपास, पिक्चर, मौजमजा यांना ऊत आला. पण ह्या सगळ्याचा दुसऱ्या कुणाला त्रास होऊ शकेल ही जाणीव विसरला. भान गेलं की ठोकर बसल्याशिवाय ते जाग्यावर येत नाही. पोरांच्या नादाने उगाच तो वैदेहीच्या वाटेला गेला. बघता बघता मस्करीची कुस्करी झाली आणि आयुष्यात पहिल्यांदाच विश्वजीतने थोबाडीत खाल्ली! ती सुध्दा एका बाईच्या हातून!
विश्वजीतच्या डोक्यात रक्त चढलं होतं! सर्वांसमोर त्याचा अपमान त्याला जिव्हारी लागला होता. आता या बाईला अद्दल घडवल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नव्हता.
क्रमशः
खूप छान खूप मस्त आहे 👌👌
उत्तर द्याहटवाकथा अतिषय रंजक आहे.
उत्तर द्याहटवा