तृष्णा भाग १,मराठी कथा - [Trushna Part 1,Marathi Katha]कधी न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा.
कधीही न भेटणारे दोन विरुद्ध टोकाचे दोन जीव भेटले! मग सुरू झाला प्रवास एका संघर्षाचा आणि तृष्णेचा!
Every Action has a reaction!
तो श्रीमंत बापाचा एकुलता एक वारस“And they happily live ever after...!” वैदेहीने परीकथांच्या पुस्तकातली सिंड्रेलाची गोष्ट संपवली आणि पेंगुळलेल्या अबोलीच्या गालांची हळुच पापी घेऊन तीने पांघरुण सारखे केले. अबोली, तिची गोड पोरगी आठ वर्षांची झाली तरी अजून झोपताना आईकडून गोष्टी ऐकल्याशिवाय झोपत नव्हती. प्रेमळ हसत वैदेही बेडरुममधे डोकावली. अनिरुद्ध अजूनही लॅपटॉपवर काम करत बसला होता. एका मल्टीनॅशनल कंपनीत अतिशय चांगल्या पोस्टवर असलेल्या अनिरुद्धला उत्तम पगार होता पण त्या बरोबर आलेला ताण आणि work pressure होतंचं. त्याला डीस्टर्ब न करता वैदेही सासुबाईंच्या बेडरुममधे डोकावली. आई, जप पूर्ण करुन आता झोपायच्या तयारीतच होत्या. गरम पाण्याचा फ्लास्क त्यांच्या उशाशी ठेऊन वैदेही आपल्या बेडरुमकडे परत फीरली. येवढ्यात बाहेर काचा फुटल्याचा जोरदार आवाज, नंतर पोरांच्या अर्वाच्य शिव्या आणि नंतर कोणाच्या तरी घाणेरड्या जोकवर मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला आणि वैदेहीच्या डोक्यात तिडीक गेली. हे आता रोजचंच व्हायला लागलं होतं. वैदेही लग्न होउन कॉलनीत राहायला आली तेव्हा तिला खरोखर कॉलनी आवडायची. तिथली शांतता, झाडांचा गारवा, बाग, ग्राउंड आणि वातावरण... सगळचं. पण गेल्या काही वर्षांत सगळचं चित्र बदललं होतं. जसं गावाचं, शहरीकरण व्हायला लागलं, कॉलेजेस आली, मॉल आले, हॉटेल्स वाढली, बाहेरुन येणाऱ्या आणि एकटं राहणाऱ्या तरुण मुलांची संख्या वाढली. हॉस्टेलमधे राहणाऱ्या मुलांना बंधन नसे.
ती कष्टकरी वडीलांची सुविद्य मुलगी
तो स्वतःचा हट्ट पुरा करणारा
ती दिलेला शब्द खरी करणारी
तो बेशिस्त, बेछूट, बेपर्वा
ती शिस्तबद्ध, जबाबदार, कणखर...
त्यात कोणी बडे बाप का बेटा असला की मग विचारायलाच नको! जेवढी गुंडगिरी जास्त तेवढा या तथाकथित भाई मंडळीना मान जास्त. मग त्यांच्या जिवावर दारुपार्टी, बिर्याणी पार्टी, लेट नाईट बड्डे सेलिब्रेशन आणि वेगवेगळे डे साजरे व्हायचे. बियरच्या बाटल्यांची रेलचेल असायची, पोरं झिंगली की हाणामारी, मस्ती, धिंगाणा एकमेकांना शिव्या... हे चित्र आता दररोजचे झाले होते. दोन तीन वेळा जवळच्या पोलीस चौकीत तक्रार केली होती. पोलिसांनी सुध्दा गस्त घालताना, एका दोघांना हटकले होते. पण तेवढेच! याचा पुरता बंदोबस्त लागत नव्हता.
रात्रीचे अकरा वाजायला आले होते. मुलांचा दंगा सुरुच होता. वैतागून वैदेहीने पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला फोन लावला. दहाव्या मिनीटांत पोलीसांनी जीप ग्राउंड जवळ आली. वैदेहीला आज या कटकटीचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. ती पण पटकन खाली उतरली.
दोन मोठ्या महागड्या गाड्यांमधली म्युझिक सिस्टीम लाऊन पोरं धतिंग करत होती. पोलीसांची गाडी जवळ आली तशी त्यातली काही पोरं चपापून गप्प बसली बाकी अजून उधळलेलीच होती.
एऽऽऽ!!! चल, काय रे! काय गोंधळ चाललाय इकडे?! घरदार नाय का रे?! तुझ्या... xxxxx!! हवालदार आणि सब इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांचा ठेवणीतला आवाज काढून, समोर दिसलेल्या दोन चार पोरांचं बखोट धरलं!
“एऽऽऽ, हीरो!! चल लायसन काढ! कुठल्या कॉलेजची रे तुम्ही?!
त्यातल्या एकाकडे लायसन्स नव्हतचं!
“एऽऽऽ, उद्या चौकीत यायचं! चल निघ... नाहीतर बापाला फोन लाव तुझ्या, बोलतो मी!
टोयोटा फॉर्च्यूनरमधे बसलेलं पोरगं बहुतेक त्यांचा म्होरक्या आणि बडे बापका बेटा असावा, कारण त्याचं लायसन्स बघितल्यावर हवालदाराने तोंडातून एकही शब्द काढला नाही!
“इन्स्पेक्टर साहेब! हि रोजची कटकट आहे आम्हाला; प्लीज यांचा बंदोबस्त करा, नाहीतर मला लेखी कंप्लेंट करायला लागेल! वैदेही वैतागून म्हणाली.
“ताई, सोडून द्या! तरुण वय आहे. त्यांच्या नादाला नका लागु तुम्ही, आम्ही बघतो त्यांना... असं बोलून इंस्पेक्टरने वैदेहीची समजूत घालून तीला परत पाठवली खरी, पण याचा काय उपयोग होईल की नाही याची मनात तिला शंकाच होती.
स्वताःशिच पुटपुटत वैदेही बेडरुममधे गेली तेव्हा अनिरुद्ध स्मितहास्य करत आपल्या angry young बायकोकडे कौतुकाने पहात म्हणाला “पुन्हा भांडलीस?! तु दुर्लक्ष का नाही करत त्या पोरांकडे?! अगं, लहान आहेत. या वयात मस्ती करतातच पोरं! सोडून दे.”
“अनिरुद्ध!? तुम्हाला कधीच कशाचं काही वाटत नाही. पण मी तुमच्या सारखी संत महंत नाही आणि दुसऱ्याला त्रास देणारी मस्ती मला अजिबात मान्य नाही!!”
“ओके, आता गेली ना मुलं?! मग शांत हो पाहु. तीला जवळ घेत थोपटत अनिरुद्ध म्हणाला आणि त्याने दिवा मालवला.
दुसरा दिवस नेहमी सारखाच सुरू झाला. सकाळचा चहा, ऑफीसची तयारी, अबोलीच्या शाळेकरता आवरा आवरी, घरातली साफसफाई... अनिरुद्ध आणि वैदेहीची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या दिशांना होती म्हणून दोघांच्या दोन वेगळ्या गाड्या होत्या. वैदेहीची गाडी रस्त्यावर पार्क असे. वैदेही खाली उतरली आणि समोरचं दृष्य बघुन थिजलीच!
दोन्ही गाड्यांचे सगळे टायर पंक्चर होऊन बसलेले होते आणि दोन्ही गाड्यांवर ऑईल पेंटचे भरलेले कॅन ओतले होते!!
“Oh! My God?!” अनिरुद्ध, प्लीज पटकन खाली या. हे सर्व काय आहे, मला समजत नाहीए...
एवढ्यात रस्त्यावर समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमधून तीला जोरजोरात हसण्याचा आवाज आला.
“साला... xxxxx!! आपल्यावर पोलीस घातले! आता जा ना चौकीत. मग बघतो!! कोणीतरी पोरगं बोललं आणि दुसर्याने त्याला टाळी दिली.
वैदेहीच्या डोक्यात आता मात्र सणक गेली!
तिरीमिरीत चालत ती समोरच्या गाडी जवळ गेली. खसकन ड्रायव्हरच्या साईडचं दार उघडलं. ती असं काही करेल याची कल्पना नसल्याने बेसावध ड्रायव्हिंग साईट्सवर बसलेल्या पोराला काही कळायच्या आतच, काचेतुन हात घालून चावी खेचून घेतली... आणि तो तिला काही बोलणार ईतक्यात, त्याच्या सणसणीत कानफटात वाजवली...! हे सगळं एवढं क्षणात घडलं की काही क्षण मुलांना कळलचं नाही की नक्की काय झालं. कानावर हात ठेऊन जळजळीत डोळ्यांनी तिच्याकडे पहाणाऱ्या पोराच्या नजरेला आपली तिखट नजर देत ती कडाडली...! “चल, फुट! निघ इकडनं! कवडीची औकात नाही स्वतःची.” जाऽऽऽ! ज्या बापाच्या जिवावर तु माज करतोयस ना, त्याला बोलावून घे चावी मागवायला! नाहीतर जा चौकीत तक्रार करायला. चल फुट! आणि मागे एकदाही न बघता अबोलीचा हात धरुन ती रिक्शा स्टॅंडवर गेली सुध्दा.
आज तिनं पहिला दणका दिला होता! आणि आज ना उद्या त्याचे पडसाद उमटणार होते. प्रत्युत्तर मिळणारच होतं. फक्त ते कसं ते मात्र आज कोणालाच माहीत नव्हतं!
क्रमशः
अभिप्राय