वारसा भाग ५,इतिहास काय सांगतो?,मराठी कथा - [Varsa Part 5 Itihas Kay Sangto?] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा
स्थळ: पुणे
अनिरुद्ध, पुण्यात प्रभात रोडवर रहाणाऱ्या शंकरराव सरनोबतांच्या दीवाणखान्यात बसले होते. तात्यांच्या डायऱ्या चाळतांना एका ठीकाणी “सरनोबत कुलव्रृतांता करता वर्गणी” असा उल्लेख करुन शंकररावांचे नाव व पत्ता लिहून ठेवला होता. अर्थात आता ते वेगळ्या पत्यावर रहात होते. त्यांच्याकडून सरनोबतांची मुळं आणि शाखा दोन्हीची माहिती मिळायला उपयोग होणार होता.
आत्तापर्यंत अनिरुद्ध आणि भार्गवीने त्यांच्या ओळखीतल्या सरनोबतांना फोन करुन मिळालेली माहिती निराशाजनक आणि डीप्रेसिंग होती. प्रत्येक घरामधे काहीतरी ट्रॅजेडी होती. कोणी अविवाहित, कोणी विधूर, काही अल्पजीवी, अपंग, कोणाचा मृत्यू अपघाती, कोणी परागंदा झालेले. अर्थात तात्यांसारखे काही वंशज होते पण त्यांच्या वाटणीला अत्यंत खडतर आयुष्य आलं होतं. या सगळ्यात सरनोबतांच्या मुली वाचल्या होत्या. लग्न होऊन बऱ्यापैकी आपापल्या संसारात सुखी होत्या.
शंकरराव स्वतः एक ब्रम्हचारी असून आपल्या भावाच्या कुटुंबात रहात होते. आता त्यांचं ही वय ८५ च्या पुढे पोहोचले होते. शंकरराव बुध्दिमान होते. चाळीशीमधे चांगल्या नोकरीतून निवृत्ती घेउन ते कुलव्रृतांत लिखाण व इतर सामाजिक कार्यामधे गुंतले होते.
शंकररावांनी अनिरुद्धची चौकशी करुन कुलव्रृतांताची जाडजूड प्रत उघडली. “हे बघ! तुला हे माहीत आहे का? की आपलं मूळ घराणं देशावरचं. खंडोबा हे आपलं कुलदैवत. खरं म्हणजे सरनोबत हे काही आपले आडनाव नाही. सरनोबत हा हुद्दा आहे. सरनोबत म्हणजे सर सेनापती. मला वाटतं पेशव्यांच्या राजवटीत आपल्या घराण्यातील पुरुषाला हा हुद्दा मिळाला असावा, जो की नंतर देखील आपण तसाच ठेवला. आता आपले पूर्वज ‘आगाशी’ (उत्तर कोकण, पालघर तालुका) ला कसे स्थाईक झाले असावे या मागे इतिहास आहे. सन १७३७ मधे चिमाजी अप्पांनी वसईच्या कील्याचं महत्त्व ओळखून चढाई केली. त्यावेळी अरबी समुद्रात व इतर बेटांवर कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वसई कील्ला फार महत्वाचे ठीकाण होते. माझ्यामते आपले पूर्वज वसईला गेले ते तिकडेच स्थाईक झाले. याचे कारणं, या नंतरच्या सर्व पिढ्यांचा संदर्भ “आगाशी ला मिळतो...!”
“तु आगाशीला गेला आहेस का? नसशील तर जरुर जा. तिकडे आपला वाडा आहे. आहे म्हणजे होता. पूर्वी आपला बाळू (सदाशिव) सरनोबत, म्हणजे तुझ्या वडीलांचा चुलत काका, रहात असे तिकडे, आता तिकडे कोणी राहतं की नाही मला माहीत नाही कारण मीच तिकडे वीस एक वर्षांपासून गेलेलो नाही! आता वयामुळे आणि तब्बेतीमुळे फिरणं होत नाही रे!”
“आगाशीचा वाडा?” अनिरुद्धच्या विचारांची चक्र सुरु झाली. तात्यांना कधी आगाशीचा उल्लेख करताना ऐकलं नव्हतं. कींवा ते कधी आगाशीला गेलेले देखील ऐकीवात नव्हतं पण तरीही आगाशीला नक्कीच काहीतरी मिळेल हे नकळत अनिरुद्धला जाणवलं. शंकररावांकडून ईतर सरनोबतांचे पत्ते आणि आगाशीच्या वाड्याचा पत्ता घेऊन अनिरुद्ध परत निघाले.
आगाशी म्हणजे विरारच्या पश्चिमेच्या बाजूला असणारे गाव. एका बाजूला अर्नाळा किल्ला, एका बाजूला टेंभी, दुसरीकडे विरार, जवळच जिवदानीचे मंदीर. वेस्टर्न रेल्वेनी विरारला उतरले की लोकल बस पकडुन जायचे. पूर्वी तिकडे शेतकरी आणि आदिवासी पाडे, त्यामुळे मुख्य धंदा शेती आणि मच्छीमारी.
एका रविवारी सहा वाजताच अनिरुद्धनी विरार ट्रेन पकडली आणि ते सकाळी आगाशीला पोहोचले. गतवैभवाच्या खुणांपैकी आता फक्त सागवानी वासे आणि दगडी भिंती, मोठे दरवाजे येवढीच ओळख सांगणारा तो वाडा आतून जराजीर्ण झालेला होता. काही भाग खचला होता. काही ठीकाणी पडझड होऊन केवळ चौथरा राहीलेला, तिकडे स्थानिक लोकांनी चहाची टपरी, लॉटरीचे स्टॉल, असे फुटकळ उद्योग सुरु केलेले. सदाशिव सरनोबत कुठे राहतात असे विचारल्यावर बाहेरच्या स्टॉल मधल्या पोराने संशयाने अनिरुद्धकडे पाहिले आणि “तुम्हाला आजोबांना भेटायचं आहे का? असं विचारत तो अनिरुद्धला आत घेऊन गेला... आणि वाड्याच्या एका काळोखी कोपऱ्यात बसलेल्या दाढी वाढलेल्या, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं, अंगावर झिजून विरलेला खादीचा कुडता आणि कंबरेला मळकट धोतर... अशा अवतारात असणाऱ्या, वाड्या इतक्याच जराजीर्ण झालेल्या एका वृद्धासमोर अनिरुद्धला नेऊन उभे केले.
बाळुअण्णा सरनोबत, म्हणजे तात्यांचे चुलत काका. अर्थात ते सर्वात धाकटे असल्याने पूर्वीच्या नियमानुसार तात्यांपेक्षा फार मोठे नसावेत असा कयास अनिरुद्धने बांधला. तरी वयाची नव्वदी गाठली असेल माणसाने. अनिरुद्धने नमस्कार केला आणि स्वतःची ओळख करुन दिली. बाळुकाका सुध्दा ब्रम्हचारीच. स्वतःच कुटुंब नाही. गावात शिक्षकाची जेमतेम नोकरी, भावंडं कधीच चरितार्थासाठी आगाशी बाहेर पडलेली. वाड्याकडे बघायची ड्युटी त्यांचीच. पण गेल्या चाळीस एक वर्षांपासून कोणी त्यांना कधी भेटले नाही की वाड्यात चौकशीला आले नाही. शिक्षकाच्या नोकरीत पगार तो कीती असणार! वाड्याची मशागत कशी होणार? गेले काही वर्षे तर ते फारच थकले. हातपाय चालत नाहिसे झाले होते. आता चहावाला पोरगा त्यांना खायला प्यायला आणुन देई. कोणीतरी शेजारची आई-बाई घरात केलेल्या गोडा धोडातला एखादा घास त्यांच्या करता देत असे. डोळ्यांनी अंधूक दिसे, कानाला ऐकू कमी येई, दिवसभर जपमाळ घेउन एका कोपऱ्यात बसतं.
बाळुअण्णांची आणि वाड्याची अवस्था बघुन अनिरुद्धच्या घशात आवंढा आला. एके काळी किती वैभव बघितले असेल या वाड्याने! किती माणसांचा राबता असेल. पंचपक्वान्ने शिजत असतील. पंगती झडत असतील. आणि आज या वाड्याला अशी उतरती कळा यावी?! त्यात राहणाऱ्या मालकाने आज दोन घासांना मौताज व्हावं?! ज्या वास्तूने सरनोबतांच्या काही पिढ्यांचा उत्कर्ष पाहिला, त्या वास्तूवर आज अशी जराजर्जर वेळ यावी? वास्तू सजीव असती तर तिनेसुध्दा शाप दिला असता अशी वाईट अवस्था आज तिची झालेली होती. याला जबाबदार कोण? नकळत अनिरुद्धला guilty वाटलं. अनिरुद्धना एवढंच लक्षात आलं की एका दिवसात काही माहिती मिळणं शक्य नाही. बाळुअण्णांचा त्याच्यावर विश्वास बसायला काही दिवस नियमाने तिकडे गेलेच पाहिजे. त्याप्रमाणे ते आता दर पंधरवड्यात आगाशीला फेरी मारायला लागले.
सर्व प्रथम त्यांनी बाळु अण्णांकरता एक कॉट आणि आराम खुर्ची आणली. चार चांगले कुडते आणि धोतरजोड आणले. चहावाल्या पोराला पैसे देऊन दररोज त्यांना चहा नाश्ता व जेवण मिळेल अशी सोय केली. गावच्या डॉक्टरशी बोलुन अण्णांच्या प्राथमिक तपासण्या करुन घेतल्या. त्यांची औषधे आणून दिली आणि जवळच्या केमिस्टकडे डीपॉझीट देऊन त्यांच्या औषधपाण्याची पुढची सोय केली. भार्गवीने घरी केलेले लाडू चिवडा त्यांच्या करता आणुन ठेवले. कोणीतरी आपलं प्रेमाने करतयं या भावनेनेच अण्णा जरा सुधारले. ते आता अनिरुद्धची आतूरतेने वाट बघत. प्रत्येक फेरीत दोघांच्या गप्पा होत. बाळुअण्णा जून्या गोष्टी सांगत. त्यात दोन चार वेळा हनुमान जयंतीनिमित्त केलेल्या उत्सवाचे उल्लेख केला. अनिरुद्धच्या आठवणीत तर असा कुठलाच उत्सव त्याच्या वडीलांनी केलेला आठवत नव्हता. चौकशी नंतर समजलं की चाळीस एक वर्षांत तो उत्सव झालेला नाही. “अरे कसा होइल उत्सव?! कुळकायद्यात जमिनी गेल्या. आपली सगळी शेती गेली. त्या अगोदर पासून एकेक भावंड मुंबईला चाकरमानी म्हणून बाहेर पडलेलं. वाड्यात खपणारं कोणी नाही. आपलं देऊळ सुद्धा लोकार्पण करून टाकलं! घरातली बाईच जर नाही तर हे सगळे सण समारंभ करणार कोण रे? बाळुअण्णा सांगत होते.
“म्हणजे? आपलं देऊळ होतं? कुठे आगाशीमधे? अनिरुद्धला हे सर्व नवीन होतं.
“अरेऽऽऽ, आपला वाडा आगाशीत आणि आपलं शेत होतं कांद्रेभुरे मधे! म्हणजे बघ. वैतरणेच्या अलिकडे आपला वाडा आणि आपली कुळं, शेती आणि आपलं देऊळ सगळी वैतरणेच्या पल्याड... सफाळ्या जवळ... बाळुअण्णा आता मनाने कांद्रेभुरेला पोहोचले होते!
हि माहिती अनिरुद्धला अतिशय महत्त्वाची वाटली. म्हणजे आता पुढचा शोध कांद्रेभुरे मधे करायला लागणार हे निश्चित झालं.
शेवटी एक दिवस बाळुअण्णांनी अनिरुद्धला जवळ बोलावलं. त्यांना एक जुनी चावी देऊन ते माजघराजवळच्या एका अडगळीच्या खोलीत घेऊन गेले. तिकडे बाकीच्या पसाऱ्यात एक शिसवी लाकडाचा मोठा पेटारा ठेवलेला होता.
हे बघ! माझ्याकडे माझं स्वतःचं असं काहीच नाही. पण वाड्यात मी एकटा आणि शेवटचा ना म्हणून आपले सगळे कागदपत्र, जूने नकाशे, शेतीची कुळांचे हिशोब सगळे काही यात जपून ठेवले आहे मी. कधी काळी सात पिढ्यांनी ठेवलेले कागद आहेत हे. काय आहे मला सुद्धा माहिती नाही रे! आता तु आलायस तर आपण ते काढुया... म्हणजे तुला तरी समजेल. नकोत ते कागद फाडून टाकू चल!
अनिरुद्धला हातात खजिना पडल्यासारखचं वाटलं. ते लगेच तयार झाले. एकेक पेपर काढायचा, वाचायचा मग त्यावर बाळुअण्णा भाष्य करायचे. काय नव्हतं त्यात. कुळांना दिलेल्या कर्जाचे हिशेब, शेतसाऱ्याचे हिशेब, चोपड्या. जुन्या पोथ्या, मुलांच्या जन्म कुंडल्या, सोनाराकडून डाग बनवले त्याचा जमाखर्च. बियाणे, विहिरी बांधल्या त्यांचा हिशोब. काही कागदपत्रे तर अगदी जीर्ण झालेल्या अवस्थेत होती आणि मोडीत होती. अगदी जूने खलिते सुध्दा होते. त्यावर सरनोबतांनी उमटलेली मोहर व शिक्का होता.
ह्यातच काहीतरी मिळेल असं वाटून अनिरुद्धनी अतिशय जूने दस्तावेज काळजीपूर्वक पाकीटात भरले आणि बाळुअण्णांच्या परवानगीने पुरातत्व खात्यातल्या त्यांच्या मित्राला अभ्यासायला दिले.
अनिरुद्धचा अंदाज खरा निघाला. त्यात काही महत्वपूर्ण तपशील हातास आले. १८५७ च्या सुमारास केलेली मोहिम व त्यात कामी आलेली माणसे. १८७५ च्या आसपास शेतीची कसण्याकरता केलेली वाटणी व १८८० च्या सुमारास गणोजीच्या नावाने जमिनीचा तुकडा वेगळा काढून त्यावर हनुमान मंदीराची प्रतिष्ठापना व नंतर सुरू झालेला उत्सव... जो की नंतर बंद पडला होता.
बाळुअण्णांचा जन्म १९०० चा. “हे बघ! माझ्या लहानपणा पासून मी उत्सव होताना बघतो आहे. पण तो का सुरू झाला ते मला नक्की नाही सांगता येत. पण एक आठवतंय बरका, लहानपणी आमची आज्जी (विधवा होती ती, लाल आलवण नेसायची) आम्हाला झोपताना गोष्टी सांगे. तीच्या बोलण्यात पुष्कळदा गणोजी आणि भागीचा उल्लेख असे. कधीकधी आम्ही फार व्रात्यपणा केला ना की” भागी येईल हा! अशी धमकी देत असे. एकदा मला आठवतय..., आम्ही शेतावरच्या घरात रहायला गेलो होतो. तीन्हीसांजे नंतर बराच वेळ आम्ही लपंडाव खेळत होतो. हाका मारल्या तरी आमचा पत्ता नाही. शेवटी हातात फोक घेउन आज्जी शेतात आली आणि तिने आम्हाला चांगलं फोडून काढलं. अमावास्या, पौर्णिमेस गणोजी येत असतो तिकडे असं कायतरी बडबडत होती. त्या रात्री आज्जीने सांगितलेल्या गोष्टीतले थोडेथोडे आठवत आहे.
गणोजी म्हणजे आपल्या कुळांमधलाच एक. महादेवराव सरनोबत मोहिमेवर जाताना बरोबर पंचक्रोशीतील बऱ्याच तरुण सैनिकांना - तरुण कुळांना घेऊन बाहेर पडले होते. पण वाटेत जहाजावर महामारी कींवा प्लेग सारखे भयंकर दुखणे आले. परत येताना खुप माणसे मेली. त्यात गणोजी पण मेला. कोणीही परत दिसलं नाही. त्यांचे देह सुध्दा नाही. पण त्या नंतर भागीला, त्याच्या विधवेला वेड लागलं, मळवट भरुन ती शेतात, रानावनात फिरत असे. एका अमावास्येला तीने घरासमोर येऊन थयथयाट केला, शिव्याशाप दिले आणि त्याच मध्यरात्री तीने स्वतःला जाळून घेतले! त्यादिवशी नंतर त्याची आई पण निघून गेली. या घटनेची पूर्ण माहिती मला पण नाही पण तेव्हा पासून ती अमावस्या पौर्णिमेला दिसते, असं आज्जी सांगायची!
आता अनिरुद्धला दुखण्याचा उगम सापडल्यासारखे वाटत होते. पण खात्री करण्यासाठी अजून माहिती शोधणं आवश्यक होतं. पुन्हा एकदा जूना पेटारा मदतीला आला. या वेळेस मिळालेल्या कागदांमधे महादेवरावांनी आपल्या कारभाऱ्यांना लिहिलेले पत्र होते. त्यात मोहिमेवर निघालेल्या लोकांचा उल्लेख होता, महामारीचा उल्लेख होता. आलेल्या खर्चाचा उल्लेख होता. पण सगळ्यात मोठी आणि महत्वाची तळटीप होती... गणोजी मेला त्याची. बाकीचे आजारी पडले आणि मेले तसा तो देखील आजारी पडला होता. मरायला टेकला होता. जहाजावर महामारी पसरु नये म्हणून खलाशांनी इतर प्रेतांना समुद्रात जलसमाधी दिली, तसा त्यालाही वैतरणेत फेकला... फरक एवढाच की त्यावेळी गणोजी जिवंत होता!
क्रमशः
अभिप्राय