आडवी खोरी भाग २, मराठी भयकथा - [Aadavi Khori Part 2, Marathi Bhaykatha] कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणाऱ्या आडवी खोरी या कथेचा दुसरा भाग.
कोकणातील आडव्या खोरीचे रहस्य उलगडणारी भयकथा म्हणजे आडवी खोरी भाग २
शशिकांत मोहिते संध्यानंद स्वामींना घडलेली सगळी घटना सांगतात. यावर संध्यानंद स्वामी त्यांना आत्मा मोक्षीसाठी एक अनुष्ठान करण्याचा सल्ला देतात. दोन दिवसांवर अमावस्या असते. शशिकांत मोहिते आपल्या चार - पाच माणसांसोबत आडव्या खोरीकडे जातात. तेथून थोड्याच अंतरावर ते होमकुंड पेटवतात. संध्यानंद स्वामी व त्यांचा एक शिष्य घटनास्थळी येतात. विष्णू मंत्राने अनुष्ठान करायला सुरूवात होते.
होमकुंडातील पवित्र धूर आडव्या खोरीकडे जाऊ लागतो. तसा चित्राच्या आत्म्याला त्रास सुरू होतो. तिचा आत्मा मोठमोठ्याने आक्रोश करू लागतो. ह्या भयाण काळोखातून येणारा भयानक आवाज ऐकून शशिकांत मोहिते व त्यांच्या साथीदारांची पाचावर धारण बसते. अनुष्ठान पूर्ण होऊन चित्राच्या आत्म्याला मोक्ष मिळणारच असतो तोच त्या पवित्र होमकुंडात एक जिवंत कोंबडी पडते. त्या कोंबडीच्या तोंडून वेदनादायी आवाज बाहेर पडू लागतो. अनुष्ठान अपवित्र होते तशी त्या चेटकीणीची ताकद वाढते. ती कोंबडी फेकणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून चित्राचा पती नारायणराव असतो. आपल्या बायकोचा असा खून झाला ही गोष्ट त्यांना सहन होत नाही व ते आपली पुरोहित बुद्धी, चेतना विसरून गेलेले असतात. त्यांची मती भ्रष्ट झालेली असते. “माझ्या बायकोला मारलं या कुत्र्यांनी, मला वेड केलं. मी नाही सोडणार कोणाला” असे म्हणत नारायण तेथील होमकुंडाच्या वस्तू इतरत्र फेकू लागतात. शशिकांत मोहिते व बाकीचे लोक त्याला धरायला जातात. पण नारायणराव कोणालाच ऐकत नाही. शेवटी त्याला मारून तिथून घालवले जाते. पण अनुष्ठान अपवित्र होते. संध्यानंद स्वामी आपल्या शिष्यासोबत तिथून निघून जातात. त्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीमधील ही अशी पहिल्यांदाच अपवित्र घटना घडलेली असते. याचा त्यांना जबर मानसिक धक्का बसतो व संध्यानंद स्वामी हृदयविकाराच्या धक्याने मरण पावतात.
त्या घटनेनंतर तर गावकरी खूप घाबरून जातात. आडव्या खोरीच्या एका मोठ्या झाडावर ‘संध्याकाळी सात नंतर कोणीही येथे येऊ नये’ अशी पाटी लावली जाते. पण जोपर्यंत पर्यायी मार्ग उपलब्ध होत नाही तोपर्यंत नाईलाजास्तव गावकऱ्यांना तोच मार्ग वापरावा लागत असतो. बाहेरगावचे काही काम असेल तर संध्याकाळी सातच्या आत गावकरी ते पूर्ण करत असत. वेळ असाच निघून जात असतो. गावकरी भीतीच्या छायेखाली राहत असतात. कधी अमावस्येच्या रात्री नीरव शांततेत चित्रारूपी चेटकीणीची हृदय चिरणारी एक विचित्र किंचाळी त्या आडव्या खोरीतून ऐकायला येत असे. कधी कधी लांबून गावकऱ्यांना एका मोठ्या झाडामागे चित्राचं भूत दिसत असे.
असेच दिवस पुढे जात असताना एकदा गोव्याहून रायगडला जाण्यासाठी एक प्रवासी वाहन तळकोकणात दाखल होते. गाडीत जेमतेम पाच सदस्य असतात. गाडीचा ड्रायव्हर एका वाटसरूला हा रस्ता कुठे जातो? असा प्रश्न विचारतो. तो वाटसरू कोसूंबे गावातील असतो. तो वाटसरू हातातील तंबाखू चोळत हा मार्ग संगमेश्वर व रत्नागिरी मार्गे रायगडला जातो हे सांगतो. पण तुम्ही आडव्या खोरीमार्गे जाऊ नका, हे देखील सांगतो. गाडीचा ड्रायव्हर त्या वाटसरूचे बोलणे असंच फेटाळून लावतो व गाडी स्टार्ट करून पुढे जातो.
हळूहळू दिवसाच्या प्रकाशाची जागा रात्रीचा अंधार घेऊ लागतो. त्यांची गाडी आडव्या खोरीमध्ये प्रवेश करू लागते. गाडीत गाडीचा ड्रायव्हर व त्या परिवारातील एक सदस्य पुढच्या सीटवर बसलेले असतात. घड्याळात रात्रीचे १०:३० वाजलेले असतात. ते दोघेही आपल्या प्रवासाबद्दल बोलत असतात. बाकीचे सदस्य झोपी गेलेले असतात. गाडीच्या डेक्सवरून पाण्याची बॉटल खाली पडते. ती बॉटल उचलण्यासाठी तो सदस्य खाली वाकतो व अचानक ड्रायव्हरला आपल्या समोरून एक काळी सावली गेल्याचा भास होतो. सुरूवातीला ड्रायव्हर भास झाला असेल असे म्हणून तो दुर्लक्ष करतो. रात्रीचे ११:३० वाजलेले असतात. त्यांची गाडी बरोबर आडव्या खोरीच्या मधोमध येते. अचानक ड्रायव्हरचे लक्ष गाडीच्या आरशाकडे जाते. तर त्याला गाडीच्या मागील शिडीवर एक लांब केस सोडलेली कपाळाच्या मधोमध लाल कुंकवाचा टिळा लावलेली एक बाई त्याच्याकडे डोळे वटारून बघत असलेली दिसते. ती बाई सतत त्याला बघून स्वतःची मान खालीवर करत असते. ड्रायव्हर खूप घाबरतो. तो तसाच त्या परिवारातील सदस्याकडे पाहतो. ड्रायव्हरला दरदरून घाम फुटलेला असतो. तो सदस्य देखील त्याला त्याच अवस्थेत पाहत असतो. तो सदस्य त्याला खुणेने ड्रायव्हरने जे काही पाहिले आहे ते मी ही पाहिलं आहे हे सांगतो.
ड्रायव्हर पुन्हा एकदा आरशात पाहतो तर त्या स्त्रीची मान अजून थोडी पुढे आलेली असते व डोळे आणखी मोठे झालेले असतात. यावर ड्रायव्हरची पाचावर धारण बसते. तो त्या सदस्याला हळूच सांगतो की बाकीच्या झोपी गेलेल्या सदस्यांना जागे कर, आपण खूप भयानक परिस्थितीत आहोत. तो सदस्य ताबडतोब जाऊन बाकीच्या झोपी गेलेल्या सदस्यांना जागे करतो व त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगतो. ते सदस्य देखील खूप घाबरतात. गाडीचा स्पीड, स्पीड मीटरमध्ये तर ८० दिसत असतो पण गाडी एकदम हळू जात असते. असे वाटत असते की गाडीच्या मागील बाजूस एक भली मोठी वस्तू ठेवली आहे व गाडी खूप मोठा लोड घेऊन पुढे सरकत आहे. ड्रायव्हर घशात एक मोठा आवंडा गिळून पुन्हा एकदा आरशात पाहतो तर आता त्या स्त्रीचे डोळे लहान झालेले असतात व तिची मान आणखी पुढे आलेली असते. आणि ती खूप वेगाने स्वतः ची मान खाली - वर करत असते. गाडीतील सर्व सदस्य बाहेर जाण्याच्या दरवाजाजवळ येतात. ड्रायव्हर गाडी थांबवतो व गाडीतील सर्व सदस्य आपला जीव मुठीत धरून जिवाच्या आकांताने पळत सुटतात. एक अदृश्य शक्ती आपला पाठलाग करत आहे असे त्या सर्वांना वाटत असते. सर्वजण खूपच घाबरलेले असतात. आता आपला मृत्यू जवळ आला आहे असे सर्वांना वाटत असते. तोच त्या सर्वांना समोर एक छोटेखानी मंदिर दिसते. त्या मंदिरात स्वामी समर्थ, गजानन महाराज व साईबाबा यांचा एकत्रित फोटो असतो. सर्वांना थोडे हायसे वाटते. सर्वजण ताबडतोब त्या मंदिरात जाऊन बेशुद्ध होऊन खाली पडतात.
सूर्योदय होतो. त्या पाच जणांच्या आजूबाजूला इंडियन ऑईल, पेट्रोल ऑईलचे दोन - तीन कर्मचारी उभे असलेले दिसतात. त्यांना जाग आलेली पाहून त्यातील एक कर्मचारी तेथील मॅनेजरला आवाज देऊन बोलावतो. तो मॅनेजर ताबडतोब त्या जागेवर येतो व त्यांना म्हणतो की “अहो, तुम्ही अचानक काल आमच्या पंपावर आला काय आणि खाली येऊन झोपला काय आम्हाला काहीच कळाले नाही! आम्ही तुमच्यापाशी आलो. तुम्हाला बऱ्याचदा हालवून जागे केलं. अंगावर पाणी मारलं पण तुम्ही काही उठला नाहीत. शेवटी आम्ही पोलिसांना फोन करणार होतो पण सोबत लेडीज होत्या म्हणून आम्ही काही अॅक्शन घेतली नाही.” त्या लोकांना काहीच समजत नव्हते. पण मॅनेजर जे काही बोलत होता ते सर्व काही खरं होतं. कारण पाणी मारल्यामुळे त्यांचे अंग ओले झालेले असते. त्यांची गाडी पेट्रोलपंपावर उभी असते. पण घडलेली भयानक गोष्ट ते त्या मॅनेजरला कशी समजावणार असतात; कारण त्यांनाच काही समजत नसते. शेवटी ते सर्वजण तेथील मॅनेजर व कर्मचाऱ्यांचे आभार मानून तिथून निघून जातात. ते तशाच संदिग्ध अवस्थेत गाडीजवळ येतात. गाडी सुस्थितीत आहे कि नाही हे पाहतात. ड्रायव्हर पुन्हा एकदा त्या आरशात पाहतो. तर त्याला मागील बाजूस असलेले घनदाट जंगल दिसते. ना तिथे ते मंदिर असते, ना ती सातच्या नंतर प्रवेश बंदी असलेली पाटी असते. तो तशाच अवस्थेत गाडी रायगडच्या दिशेने घेतो. पण हा भयप्रवास त्या सर्वांच्या कायम लक्षात राहणारा ठरतो.
(त्यांच्या गाडीच्या मागील बाजूस असलेली अतृप्त शक्ती म्हणजे चित्रारूपी चेटकीण असते. परमेश्वराच्या दर्शनाने त्या अतृप्त आत्म्याला शेवटी मोक्ष प्राप्ती होते.)
समाप्त!
कथा आवडली, पण खूप घाई घाई संपली असे वाटले.
उत्तर द्याहटवा