एकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा भाग १, मराठी प्रेम कथा - [Ektarphi Premachi Karanmimansa Part 1, Marathi Prem Katha] मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा.
मोहीत, वैष्णवी व अमित या तीन कॉलेज तरूणांच्या आयुष्याची प्रेम या अडीज अक्षरासोबत सांगड घालणारी एक अपूर्ण प्रेमकथा
गुड मॉर्निंग, नमस्कार फ्रेंड्स मी वैष्णवी.“मुंबई मसाला” या शो मध्ये आपले स्वागत करते. तेवढयात माझा फोन वाजला. नीलम फोनवर होती. “हा बोल नीलम.” “अगं नऊ वाजता इंग्रजीचे नोट्स देणार आहेत. मी आणि कविता तुझी केव्हाची वाट पाहात आहोत.” मी घड्याळाकडे पाहिले, ८:२० झाले होते. “अगं मी पोहोचते लगेच. ओके बाय” म्हणून फोन कट झाला. इतक्यात आईचा आवाज आला. “वैष्णवी, अगं लवकर ये बाळा.” मी माझी बॕग घेतली. पटकन खाली आले, बाबा नाष्ता करत होते. शेजारच्या साठेकाकू सकाळीच आमच्या घरी आल्या होत्या. नेहमीप्रमाणे मी सर्वांना ‘गुड मॉर्निंग’ विश केलं. “खरंच, खूप गोड आवाज आहे तुमच्या मुलीचा.” मी त्यांना हलकसं स्माईल केलं. आईने समोर नाष्टा ठेवला. मी आपली पटपट नाष्टा करत होते. “अगं सावकाश खा! इतकी घाई का करतेस.” आई मला म्हणाली. “आई, आधीच फार उशीर झाला आहे. मला कॉलेजला जाऊन नोट्स कलेक्ट करायच्या आहेत.” मी आईला उत्तर दिलं. साठेकाकू मला म्हणाल्या, “वैष्णवी, अगं मी हे सांगायला आले होते आज आमचा अमित कॉलेजला येऊ शकणार नाही.” “का? काय झालं. तब्येत ठिक आहे ना त्याची?” मी साठेकाकूंना कारण विचारलं. “नाही ना. पहाटेपासून त्याला खूप ताप भरलाय.” अमित माझा क्लासमेट. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये सायन्स सेकंड इयरमध्ये शिकत आहोत. काकू मला म्हणाल्या, “तू येताना त्याच्या नोट्स आणशील का?” मी त्यांना ‘हो’ म्हणाले. “आई, बाबा मी येते.” असे म्हणून मी तडक माझ्या स्कूटीजवळ गेले. घड्याळ पाहिलं, ८:३० झाले होते. तेव्हा अचानक माझ्यापाशी तेजस, निकिता व श्री ही बच्चेकंपनी आली त्यांना माझ्याकडून त्यांनी लिहून आणलेली कविता ऐकायची होती. मी त्यांना ‘सायंकाळी कविता ऐकून दाखविन’, याचं प्रॉमिस दिलं. पटकन स्कूटी गेटच्या बाहेर काढली व कॉलेजच्या दिशेने निघाले. खूप उशीर होत होता.एव्हाना माझ्या मैत्रीणींचे दोन तीन मिसकॉल्स येऊन गेले होते. मी स्कूटीचा वेग वाढविला. कशीबशी कॉलेजवर पोहोचले. गाडी पार्क करीत होते तेवढयात नीलम आणि कविता तिथे आल्या. “घ्या. आत्ता आल्या आहेत मॅडम. अगं किती उशिर केलीस यायला चितळे सरांचं लेक्चर सूरू देखील झालयं.” नीलमचं बोलणे ऐकून मी थोडी घाबरले कारण चितळे सरांचे बिहेविअर मला चांगलेच ठाऊक होतं. आम्ही धावत क्लासरूमपाशी आलो. दार आतून बंद होते. मी दार ठोठावले. सरांनी दार उघडलं व दारातच आमचा पाहूणचार घेऊ लागले. “या! आपलीच वाट पाहत होतो. फार लवकर आलात.” घड्याळ बघत ते आम्हाला म्हणू लागले. आम्ही क्लासमध्ये शिरलो त्यांनी प्रथम कविताला उशिरा येण्याचे कारण विचारलं. ती म्हणाली, “नाही सर मी तर वेळेत आले होते. नीलममुळे उशिर झाला.” सरांनी आपला मोर्चा नीलमकडे वळवला. नीलम आपला चष्मा काढत सरांना म्हणाली, “सर मी देखील वेळेत आले होते पण हिची वाट पाहण्यात वेळ गेला.” अशाप्रकारे दोघींनीही आपआपले हात वर केले. सर माझ्याकडे बघू लागले व त्या दोघींना जागेवर बसायला सांगितलं. माझ्याकडे बघत त्या दोघी जागेवर जाऊन बसल्या. मी खुणेने त्या दोघींना ‘बघून घेईन’ म्हणाले. सरांसोबत सारा वर्ग माझ्याकडे बघत होता. “सहाजिकच तुलाही याच प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.” सर मला म्हणाले. मी आपली सॅक सावरत सरांना म्हणाले. “घरातून बाहेर पडायला उशीर झाला. सॉरी सर!” “ह्या सॉरीवर माफी नाही मिळणार. पनिशमेंट घ्यावी लागेल.” सरांनी हातात छडी धरली. मला हात पुढे करायला सांगितले. सगळे विद्यार्थी आमच्याकडे बघत होते. सरांनी अलगदपणे छडी माझ्या हाताला स्पर्श केली व मला म्हणाले कि तुझ्यासारख्या गोड आवाज असणाऱ्या मुलीवर मी कशी छडी उगारणार. फक्त तुला शिक्षा ही असेल की येणाऱ्या स्नेहसंमेलनात तुला एखादं गाणं म्हणावं लागेल. सरांच्या बोलण्यावर वर्गात एकच हशा पिकला. मी सुटकेचा निःश्वास सोडला व सरांना ‘हो’ म्हणाले. सरांनी स्मितहास्य केलं. मी जागेवर जाऊन बसले. नोट्स वाटून झाल्या. लेक्चरही संपले.
[next] दुसरे लेक्चर सुरू असताना शिपाई काका वर्गात आले. ‘वैष्णवी कुंभार?‘ मी उभी राहिले. “तुला भंडारे मॅडमनी बोलावलं आहे.” मी मॅडमची परवानगी घेऊन बाहेर पडले. भंडारे मॅडम आमच्या कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत. मी टिचर केबीनकडे जात असताना गेटजवळ एक मुलगा आमच्या कॉलेजच्या काळे गेटकिपरकाकांशी हुज्जत घालत होता. त्या दोघांचे बोलणे मला ऐकू येतं होतं.“ओ काका, मला भंडारे काकींनी भेटायला बोलावलं आहे.” तो मुलगा काळेकाकांना म्हणाला. “काकू?” काळेकाकांनी त्याला प्रश्नार्थक पध्दतीने विचारलं. “म्हणजे मला भंडारे मॅडमनी बोलावलंय.” तो मुलगा काकांना म्हणाला. “अरे पण तुझं नाव काय? आणि तू गाडी कशी लावली आहेस बघ. इतर शिक्षकांनी गाडी आत कशी आणायची?” तो दिसतानाच थोडा उद्धट आणि खूप महत्वकांक्षी दिसत होता. तो काळेकाकांना उद्धट उत्तरे देऊ लागला. इतक्यात लाईट गेली म्हणून काका जनरेटर रूमकडे धावले.
मी पुढे जात असताना मला पाठीमागून ‘Excuse me’ असा आवाज ऐकू आला. मी बरोबर टिचर केबीनच्या दारात उभी होते. “भंडारे मॅडम मला कुठे भेटतील?” तो मुलगा मला म्हणाला. मी काही न बोलता केबीनमध्ये शिरले. मला पाहून भंडारे मॅडम म्हणाल्या “कुंभार, चितळे सरांनी गाण्यासाठी तुझं नाव सुचविले आहे. कोणते गाणं तू म्हणणार आहेस?” मी काही बोलणार इतक्यात तो मुलगा आत आला. भंडारे मॅडम त्याला म्हणाल्या “ये. तुझीच वाट पाहत होतो.” तो मुलगा माझ्या साईडला येऊन उभा राहिला. “हा कुंभार?” मॅडमनी मला पुन्हा प्रश्न विचारला. “मॅडम, अजून मी फिक्स गाणं निवडले नाही. दोन दिवसात तुम्हाला सांगते.” दबक्या आवाजात मॅडमना मी म्हणाले. यावर भंडारे मॅडम मला म्हणाल्या “लवकर कळवं. अठरा तारखेला फनीगेम्स सुरू होतं आहेत व वीस तारखेला आपले स्नेहसंमेलन आहे.” मॅडमच्या बोलण्यावर मला पायात साप सोडल्याची अनुभूती झाली. मी त्याच अवस्थेत मॅडमना ‘हो’ म्हणून बाहेर पडले. बाहेर पडत असताना एक छान परफ्युमचा सुवास माझ्या नाकात गेला तो सुवास त्या मुलाकडून येत होता. मला थोड्या वेळासाठी खूप फ्रेश वाटले.
[next] बेल वाजली. दुसरे लेक्चर संपले. नीलम आणि कविता माझ्याजवळ आल्या “काय ग, काय म्हणत होत्या मॅडम?” नीलमने मला विचारलं. मी सॕड आवाजात तिला म्हणाले, “काही नाही. कोणते गाणं च्यूझ केलं ते विचारत होत्या. हे चितळे सर पण ना!” नीलमही मला त्याच सुरात हा प्रश्न विचारत असताना “तुमच्या आवाजाला शोभेल असे गाणं निवडा." मला पाठीमागून हे वाक्य मोठ्या आवाजात ऐकू आले. आम्ही तिघींनी मागे वळून पाहिले. तो आवाज त्या मुलाचा होता. तो एका विलक्षण पध्दतीत आमच्या दिशेने चालत येत होता. “हाय! मी मोहित. मोहित गोडबोले.” त्याने माझ्यासमोर हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. क्षणभर आम्ही संदिग्ध अवस्थेमध्ये होतो. मला फेस रिडींग येत असल्याने मी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपू लागले. तो बोलत एक होता आणि त्याच्या डोळ्यात काही वेगळेच दिसत होते. तो बोलताना एकदम फ्री आणि रिलॅक्स वाटत होता. नंतर मी भानावर आले व त्याला माझी ओळख सांगितली. त्याने आपला हात मागे घेतला आणि मला म्हणाला, “मला भंडारे काकू आयमिन भंडारे मॅडमनीच सांगितले कि तुमचा आवाज फार गोड आहे व गेल्यावर्षी तुम्हाला ‘Best voice of the year’ चा अॕवॉर्ड देखील मिळाला होता.” मी होकारार्थी पध्दतीने मान हलवून त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. यावर तो ‘ग्रेट’ असे म्हणाला व त्याने आपले घड्याळ पाहिले. “ओह! खूप उशिर झाला. ओके बाय.” म्हणून तो तिथून निघाला. आम्ही नीलमकडे पाहिलं तर ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती. कविताने तिच्यासमोर चुटकी वाजवली मग ती भानावर आली आणि म्हणाली “हाय! किती हॅंडसम होता ना?” यावर मी तिथून लगेच काढता पाय घेतला. “हं, बायोलॉजी मध्ये लक्ष दे. म्हणे हॅंडसम. चल इथून.” असे म्हणत कविता नीलमला ओढत नेऊ लागली.
सर्व लेक्चर संपवून मी ठीक १२:३० वाजता घरी निघाले. अजून माझ्या नाकात तोच परफ्युमचा सुवास घुमत होता. मी चाळीत आले. तडक अमितच्या घरी गेले. मला पाहून अमित त्याच्या बेडवरून उठत होता. “अरे अमित, तू विश्रांती घे. उठू नकोस.” असे म्हणत मी त्याच्याजवळ गेले. “कशी आहे तब्येत?” “आता थोडे ठीक वाटत आहे.” अमित मला म्हणाला. मी माझ्या बॅगेतून त्याच्या नोट्स काढल्या व त्याच्या हातात दिल्या आणि त्याला म्हणाले, “वीस तारखेपासून आपल्या कॉलेजचे स्नेहसंमेलन सुरू होत आहे. तुला नेहमीप्रमाणे स्वयंसेवकाचे काम देणार आहेत.” यावर अमितने डोक्याला हात लावला. मला हसू आले. “आणि तुझं?” त्याने मला प्रश्न विचारला. मी हसू आवरत त्याला म्हणाले, “अरे तुला सांगायचं राहूनच गेलं. आज कॉलेजमध्ये... आणि वैष्णवीने त्याला कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिने तिचे घड्याळ पाहिले व त्याला म्हणाली “उप्स, अमित मी येते. आता गाणं निवडण्याचे एक्स्ट्रा काम मला लागले आहे.” असे म्हणून ती त्याच्या घरातून बाहेर पडते. दारात सॅंडेल घालत असताना अमित तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. ती त्याच्या घरातून बाहेर पडते. अमितला ते दिवस आठवतात जेव्हा वैष्णवीला त्याने पहिल्यांदा पाहिले होते.
[next] सकाळी मी जिममधून घरी आलो. माझ्या रूमची खिडकी उघडून थंड वारा व कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेत असताना माझी नजर समोरच्या खिडकीत गेली. तर त्या रूममध्ये एक सुंदर लंबगोल चेहऱ्याची तरूणी आपले ओले केस पुसत होती. मी खिडकीचा आडोसा घेतला व त्या सुंदर चेहऱ्यास न्याहाळू लागलो. तिच्या गालावर गोड खळी सतत येत होती. तिचा सुंदर चेहरा ‘खट्टामिठा’ प्रकारचा होता. तिचे सौंदर्य सूर्याच्या प्रकाशात पाचूसारखे चमकत होते. अचानक तिची नजर माझ्या खिडकीवर आली. तिने मला पाहिले असेल म्हणून मी घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले व खिडकीच्या आडोशाला लपून राहिलो. पण आता अमितला असे डोळे मिटून बसलेला पाहून त्याची आई त्याला विचारते, “काय रे, काय झालं?” अमित लगेच आपले डोळे उघडतो. समोरील दृश्य पाहून त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते “अं, काही नाही आई. वैष्णवी येऊन नोट्स देऊन गेली.” त्याची आई किचनमध्ये जाते व अमित आपल्या डोक्यावर अलगद मारून घेतो.
वैष्णवी घरी येते तेव्हा तिला तिचा लहान भाऊ सौरभ डोक्याला हात लावून बसलेला दिसतो व आई त्याला कसले तरी लेक्चर देत होती हे दिसते. सौरभ मला पाहून माझ्याकडे आला व मला म्हणाला कि “ए ताई, सांग ना आईला मला फक्त दोन दिवस “आऊट ऑफ मुंबई” जायचं आहे. तेही मित्रांसोबत जाणार आहे. पण बघ ना आई मला परवानगी देत नाहीये.” एकंदरीत सौरभला दोन दिवस आऊट ऑफ मुंबई जायचं होतं. पण आई त्याला परमिशन देत नव्हती असा प्रसंग होता. मी सोफ्यावर सॅक ठेवून आईकडे गेले पण तिला काही सांगायच्या आतच ती मला म्हणाली, “हे बघ. तू त्याची बाजू घेऊन मला काही सांगू नकोस. मी काही त्याला मुंबई बाहेर पाठविणार नाही.” तिचं हे बोलणे ऐकून सौरभ “पण आई?” असे म्हणताच आई त्याला डोळे मोठे करू लागली. तसा तो मला म्हणाला “पण ताई, कितीवेळा सतत ते 'एस्सेल वर्ल्ड व जुहू बीचवर’ जायचं आणि मी कोकणातच चाललो आहे.” सौरभची अशी अवस्था मला पाहावली नाही. मी आईला म्हणाले “आई. जाऊदे ना त्याला. किती दिवसानंतर तो बाहेर फिरायला जातो आहे.” मी सौरभला खूणवून म्हणाले ‘बघ रडत आहे तो’. तसे सौरभने आपल्या डोळ्यात खोटेनाटे पाणी आणले. आईचा स्वभाव लगेच मावळला. ती सौरभला म्हणाली “ए पिल्लू, रडू नको. बरं मी तुला काही अटींवर परवानगी देते.” तसा सौरभ खूश झाला व मला टाळी देऊन आपल्या रूममध्ये गेला. मीही आपल्या रूममध्ये गेले. १ वाजता बाबा घरी जेवायला आले. बाबांनी देखील त्याला लगेच परवानगी दिली.
या कथेचा भाग दोन कुठे मिळेल...?
उत्तर द्याहटवाएकतर्फी प्रेमाची कारणमीमांसा या मराठी प्रेम कथेचा भाग दोन प्रकाशित करण्यात आला आहे.
हटवा