गोरेगाव मुंबई येथे मराठीप्रेमी पालक महासंमेलन - मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलन [Marathi Premi Palak Mahasammelan - 2018].
मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलन ८ आणि ९ डिसेंबरला गोरेगावमधे
गोरेगाव मुंबई येथे मराठीप्रेमी पालक महासंमेलन
मराठी शाळांसाठी पश्चिम उपनगरातले पालक एकवटले.
मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी पालकांचा पुढाकार.
मराठीप्रेमी पालक महासंमेलन ८ आणि ९ डिसेंबरला गोरेगावमधे.
मराठी भाषेशी निगडीत विविध प्रश्नांवर कृतिगटांच्या माध्यमातून काम करणारे मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. ‘मराठी शाळा हा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा कणा आहे’ या धारणेतून गेली पंधरा वर्षे मराठी अभ्यास केंद्र मराठी शाळांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. मराठी शाळांच्या बाजूने समाज उभा राहावा आणि मातृभाषेतील शिक्षणावरचा समाजाचा विश्वास वाढावा या उद्देशाने गेल्या वर्षापासून ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या उपक्रमाची सुरुवात झाली. विविध सहयोगी संस्थांच्या सहकार्याने मुंबईतील मध्य उपनगरात गतवर्षी शालेय शिक्षणाच्या इतिहासात प्रथमच भव्य ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ झाले. यावर्षी ८ व ९ डिसेंबर रोजी गोरेगाव (पश्चिम) येथील महाराष्ट्र विद्यालयात हे दोन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. अ. भि. गोरेगावकर शाळा ते महाराष्ट्र विद्यालय अशी ‘मराठी शाळा जागर फेरी’ आयोजित केली आहे. या फेरीचे उद्घाटन मुंबईचे महापौर मा. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते होणार असून वांद्रे ते बोरीवली या परिसरातील मराठी शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी या जागर फेरीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्रास महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास असणाऱ्या ‘मराठी शाळांच्या सदिच्छादूत’ अभिनेत्री ‘चिन्मयी सुमीत’ या सत्राला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा सातत्याने शिक्षणाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. आज या प्रयोगशील शाळांचे अनुकरण अनेक इंग्रजी शाळादेखील करत आहेत. मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळांचे योगदान समाजासमोर यावे आणि शिक्षणातील त्यांच्या प्रयोगांचे आदानप्रदान व्हावे या हेतूने प्रयोगशील शाळांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक आणि शालाबाह्य विषयावरील पुस्तके एकाच ठिकाणी भरघोस सवलतीत मिळणारे ग्रंथप्रदर्शनही या संमनेलनात असणार आहे. ८ डिसेंबर रोजीच पालक व शिक्षकांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. ‘अशी असावी माझ्या पाल्याची शाळा’ हा विषय पालकांसाठी तर ‘माझे नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग’ हा विषय शिक्षकांसाठी आहे. त्यानंतर सायंकाळच्या वेळी ‘मराठीचे अभिमान गीत’ जगभर सर्वदूर पोहचवणारे गायक - संगीतकार ‘कौशल इनामदार’ तसेच अस्मिता पांडे यांचा मराठीचा गौरव करणारा कार्यक्रम सादर होणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ९ डिसेंबर रोजी विविध सत्रांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
मराठी माध्यमात शिकून यशवंत होणारे अधिवक्ता ‘मीनल शृंगारपुरे’, ‘डॉ. प्रेरणा महाजन’, ‘वृत्तनिवेदक मिलिंद भागवत’, अभिनेते - दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’, अभियंता ‘ओमकार गिरकर’ या सत्रात सहभागी होतील. ‘आर.जे. रश्मी वारंग’ या यशवंतांशी संवाद साधतील.
पुढील सत्र मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे असेल. या सत्रात अभिनेत्री - दिग्दर्शिका ‘संपदा जोगळेकर’, ‘अंनिस’ कार्यकर्त्या ‘मुक्ता दाभोळकर’, आयुर्वेदतज्ज्ञ ‘डॉ. चंदा बिराजदार’ आणि ‘सई तांबे - देशमुख’ या ‘आई पालक’ म्हणून स्वतःच्या पाल्यांसंदर्भातील शिक्षणविषयक भूमिका मांडणार आहेत. पत्रकार ‘नामदेव अंजना’ त्यांच्याशी संवाद साधतील.
९ डिसेंबर रोजी संमेलनाच्या उत्तरार्धात ‘मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपाय’ या सत्रात कराड नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक ‘अर्जुन कोळी’, बेळगावचे जिल्हा परिषदेच्या शाळेतील केंद्रप्रमुख ‘गोविंद पाटील’ आणि नांदेडच्या कमळेवाडीचे ‘शिवाजी आंबुलगेकर’ हे प्रयोगशील शिक्षक मराठी शाळांसमोर आज असलेल्या आव्हानांना कसे भिडता येईल यावर आपल्यासोबत मनमोकळा संवाद साधणार आहेत. लोकसत्ता दैनिकाच्या पत्रकार ‘रसिका मुळ्ये’ या सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत. मराठी शाळांसाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार आहेत, हा प्रश्न ‘मराठी अभ्यास केंद्र’ वेगवेळ्या माध्यमांतून - कार्यक्रमांतून राजकीय नेत्यांसमोर ठेवत आले आहे. याही संमेलनात ‘मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार आहोत?’ हे राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींच्या सत्रातून हा मुद्दा चर्चेला घेतला आहे.
शिवसेनेचे खासदार ‘अरविंद सावंत’, भरतीय जनता पार्टीचे आमदार ‘अतुल भातखळकर’, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार ‘विद्या चव्हाण’, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘अनिल शिदोरे’ यांच्याशी महाराष्ट्र टाईम्स दैनिकाचे पत्रकार ‘नितीन चव्हाण’ संवाद साधणार आहेत. मराठी शाळांसमोरील प्रश्नांच्या सोडवणुकीला जिथे जिथे त्या त्या शाळांचे माजी विद्यार्थी उभे राहिले तिथे तिथे त्या शाळांचा कायापालट झाला. स्नेहसंमेलने, माजी विद्यार्थी मेळावे अशा उपक्रमांपलीकडे जाऊन माजी विद्यार्थ्यांनी मराठी शाळांच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीनेच मुंबईतील ‘आर. एम. भट’ शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी ‘स्वप्नील पिंगुळकर’ त्यांची भूमिका मांडणार आहेत. संमेलनाच्या अखेरच्या सत्रात उद्योजक आणि लेखक ‘मंदार भारदे’ आपले मनोगत व्यक्त करतील. तर ज्येष्ठ पत्रकार ‘युवराज मोहिते’ समारोप सत्राची अध्यक्षपदावरून मांडणी करतील.
या संमेलनादरम्यान गोव्यातील ‘भाऊसाहेब बांदोडकर’ पाठ्यवृत्तीच्या आधारे भारतातील राज्यांची भाषाविषयक स्थिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारताचा प्रवास करणारे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते तुषार पवार यांचे ‘भाषा परिक्रमा’ हे पुस्तक आणि गतवर्षाच्या संमेलनातील विविध सत्रांवर आधारित ‘मराठी शिक्षणाच्या नव्या वाटा’ हे ‘डॉ. प्रकाश परब’ यांनी संपादित केलेले अशी दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. तसेच मराठी शाळेत शिकून आपापल्या क्षेत्रातील उच्च पदावर पोचलेल्या सन २००० नंतरच्या मुंबईतील माजी विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या शाळेच्या नावासह या संमेलनात प्रकाशित होणार आहे.
पालक, शिक्षक यांच्याकरता केवळ ‘५० रू’ अशी नोंदणी फी या संमेलनासाठी असून विद्यार्थ्यांकरता कुठलीही फी घेतली जाणार नाही. मराठी अभ्यास केंद्राबरोबरच नूतन विद्यामंदिर आणि समविचारी संस्थांच्या सहयोगातून हे संमेलन आकार घेणार आहे. सुजाण आणि सजग पालकत्वासाठी अधिकाधिक पालकांनी आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षकांनी या महासंमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
संमेलनात सहभाग नोंदणीसाठी संपर्क:
- पल्लवी: ८३५६९६९९०२
- नयन: ८३५६०४३१५२
- साधना: ९९८७७७३८०२
मराठीप्रेमी पालक महासंमेलन संबंधी महत्त्वाचे दुवे:
- मराठीप्रेमी पालक महासंमेलन
- मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०१९ - वेळापत्रक
- मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०१८ - वेळापत्रक
अभिप्राय