जातबळी भाग २, मराठी कथा - [Jaatbali Part 2, Marathi Katha] - आकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी.
पुर्वार्ध: आकाश साळवी नावाचा एक तरुण कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतो पण अभ्यासात मन न लागल्यामुळे त्याला सतत एटीकेटी लागत असते. त्यातच तो रश्मी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याच्याच वर्गातील राकेश आणि पूजा मिळून रश्मीच्या मनात आकाश बद्दल गैरसमज निर्माण करतात. त्यामुळे त्यांचे प्रेम जुळण्या आधीच तुटते. आकाश स्वतःला अभ्यासात गुंतवतो. पुढे कॉलेज डेजमध्ये रश्मीला आकाशचा खरेपणा आणि राकेशचा खोटेपणा समजतो. ती आकाशची माफी मागते. आकाश कॉलेज किंग बनतो. रश्मी आकाशचे अभिनंदन करताना त्याला मिठी मारते. ते पाहून राकेश अपमानाने धुमसत तिथून निघून जातो. पुढे आकाश फायनल ईयरच्या परीक्षा देतो. रिझल्ट लागण्यास अवकाश असल्यामुळे तो एका शैक्षणिक संस्थेत नोकरी पत्करतो. तिथे त्याची ओळख नभाशी होते. पुढे चालू...
नभा, आपण बरे आणि आपले काम बरे अशा स्वभावाची होती. जास्त हसणे, गप्पा मारणे, टाईमपास करणे वगैरे तिला मुळीच आवडत नव्हते. ती कोणाशी जास्त पर्सनल व्हायची नाही. इतर जण फावल्या वेळात एकत्र जमून भंकस करत असताना ती मात्र तिचे काम करत असायची. त्यामुळे सर्वच जण तिच्याशी जेवढ्यास तेवढे वागायचे. ऑफिसमध्ये सर्वच जण तिला मान देत असत. ती शिष्ट नव्हती पण लहान वयात पडलेल्या जवाबदाऱ्यांमुळे तिच्या वागण्यात एक प्रकारचे गांभीर्य आले होते. इतर मुलींप्रमाणे तिला नटण्या मुरडण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. पण ती टापटीप राहायची. दिसायला चार चौघींसारखी असली तरी तिचे व्यक्तिमत्व खुप वेगळे होते.
सतत हसतमुख असणारा, इतरांना मदत करणारा, कामात सिन्सियर असणारा, हुशार, देखणा आणि स्मार्ट आकाश तिला मनोमन आवडू लागला होता. त्याच्या नकळत ती त्याला न्याहाळायची. हळू हळू ती सर्वांमध्ये मिक्सअप होऊ लागली. मोकळेपणाने हसू लागली, थट्टा मस्करी करू लागली. आकाशच्या विनोदांना, पंचेसना भरभरून दाद देऊ लागली. आकाशसह इतरांनाही तिच्यातील तो बदल जाणवू लागला होता आणि आवडलाही होता.
ऑफिसमध्ये रसिका नावाची एक मुलगी होती ती खुप मोकळ्या स्वभावाची होती. त्यामुळे तिचे मुलांसोबतही छान जमायचे. आकाशशी ती खुप मोकळेपणाने बोलायची. एकदा सर्वजण अशीच मजा मस्ती करत असताना आकाश आणि रसिका बोलत बसले होते. नभा ऑफिसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकडून टेस्टपेपर सोडवून घेत होती. बऱ्याच वेळा तिची आणि आकाशची नजरानजर झाली. ते पाहून आकाश रसिकाला म्हणाला, “रसिका, नभा मॅडमच्या मनात माझ्याबद्दल काही आहे का? त्यांना मी आवडतो असे मला वाटतेय. आजकाल बऱ्याचदा माझ्याकडे पाहताना दिसतात. माझी नजर त्यांच्या नजरेला भिडली की नजर चोरतात किंवा गोड हसतात.”
यावर रसिका त्याला म्हणाली. तिच्यातील हा बदल मला सुद्धा जाणवला आहे. पण मला ठाऊक आहे, काही झाले तरी ती पुढाकार घेणार नाही. तिच्या फॅमिलीवर तिच्या चार मामांचा खुप जास्त प्रभाव आहे. तिला त्यांच्या मर्जीनेच लग्न करावे लागणार आहे, त्यामुळे तिच्या मनात असले तरी ती हो म्हणणार नाही. त्यामुळे तू तिचा विचार मनातून काढून टाक. उगाच तुला आणि तिलाही त्रास होईल. आकाश थोडासा सिरीयस झाला पण काही क्षणच.
अचानक त्याला नभाची मस्करी करायची लहर आली आणि त्याने टोमणा मारला, “आमच्याकडे बघण्यापेक्षा जरा कामात लक्ष द्या; नाही तर मुलांना अभ्यास सोडून भलतेच शिकवाल आणि बिचारी मुले नापास व्हायची.” त्यावर नभाने पण त्याला प्रत्युत्तर दिले की, “तुम्हाला त्याची काळजी नको आणि मी जिकडे वाटेल तिकडे बघेन.” लगेच आकाश म्हणाला, “हो, पण माझ्या परवानगीशिवाय माझ्याकडे पाहायला मनाई आहे.” “मग तसा बोर्ड लावा ना! मला आवडते बघायला तुमच्याकडे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” नभाच्या या वाक्यावर ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरली.
रसिकाच्या मागून सर्वचजण खो खो करून हसू लागले. आपण उत्साहाच्या भरात काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर नभा एकदम गोरी मोरी झाली आणि चेहरा लपवत वॉश रूमकडे पळाली. नभाला आकाश आवडतो हे तर आता स्पष्टच झाले होते. तरीही आकाशने थोडे सबुरीने घ्यायचे ठरवले. त्याला घाई करून काम बिघडवायचे नव्हते. विध्यार्थ्यांच्या ऍडमिशन्स मिळवण्यासाठी त्यांच्या घरी व्हिजिट झाल्यानंतर आकाश फावल्या वेळात नभाला तिच्या कामात मदत करू लागला.
तो नभाला समजण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्याला जाणवू लागले की वेळेआधीच पोक्तपणा आलेली नभा खुप समजुतदार होती. कोणतीही जवाबदारी ती समर्थपणे पेलू शकत होती. तिचे वागणे शालीन, नम्र आणि सभ्यतेच्या मर्यादेत राहणारे होते. तिचा साधा-भोळा आणि निष्कपट स्वभाव आकाशला आवडू लागला. जसजसे दिवस जात होते तसतसे आकाश आणि नभा एकमेकात गुंतत जात होते. शब्दातून जरी व्यक्त केले नसले तरी त्यांच्या वागण्यातून आणि नजरेतून एकमेकांबद्दलचे प्रेम लपत नव्हते.
एके दिवशी ऑफिसची पिकनिक न्यायचे ठरले. रविवारी सकाळी बारा मुलं मुली, सहा गाड्यांवरून निघाली. नभा स्वतःहून आकाशच्यामागे गाडीवर बसली. रस्त्यातील खड्ड्यांमुळे अधुन मधुन गाडीला हादरे बसत होते. त्या हादऱ्यांमुळे नभाचा नकळत होणारा स्पर्श आकाशला सुखावत होता, तर नभाच्याही अंगावर शहारे येत होते. ती प्रथमच कोणा परपुरुषाच्या मागे बसली होती. पण आता आकाश परका उरलाच कुठे होता? तिच्या मनात सुखद तरंग उमटत होते. सुरवातीला व्यवस्थित अंतर ठेऊन बसलेली नभा आता बरीच मोकळी झाली होती.
एका हाताने तिने मागचे कॅरियर पकडले होते आणि तिचा दुसरा हात कधी आकाशच्या रुंद खांद्यावर विसावला हे तिचे तिलाही कळले नाही. ती खुप खुश होती. चक्क गाणी गुणगुणत होती. समुद्रातील लाटांवरील नावेसारखे तिचे मन हेलकावे खात होते. आकशच्याही ओठांवर मंद स्मित फुलले होते. दोघानांही असे वाटत होते की तो रस्ता कधी संपूच नये. एरव्ही सुसाट गाडी चालवत सगळ्यांच्या पुढे असणारा आकाश आज चक्क सर्वांच्या मागे रेंगाळला होता. भाट्याचा समुद्र, सुरुबन, समुद्राकाठचे झरीविनायकाचे देऊळ असे फिरून झाल्यावर सर्वजण रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीच्या देवळात आले.
सकाळपासून मजा मस्ती करून दमलेल्या सर्वांना सडकून भूक लागली होती. नभा आणि रसिकाने सोबत आणलेल्या प्लेट्समध्ये सर्वाना वाढले. अक्षरशः सर्व जण त्यावर तुटून पडले. नंतर सर्वांच्या आग्रहास्तव आकाशने “दिल क्या करे जब किसीसे, किसीको प्यार हो जाये” हे रोमँटिक गाणे गायले. आकाश गात असताना रसिका सतत नभाला चिडवत होती. नंतर तर सगळेच तिला सामील झाले. नभा लाजेने अगदी गोरीमोरी झाली होती. ती रसिकाला दटावत असली तरी मनातून सुखावली होती.
किल्ल्यावरील बुरुजांवरून खाली दिसणारा अथांग समुद्र, भरतीमुळे उसळणाऱ्या अजस्त्र लाटा, फेसाळलेले पाणी, जोडीला उनाड मुलासारखा सैरावैरा पळणारा वारा यामुळे सर्वजण रोमांचित झाले होते. सर्वजण ते सुंदर दृश्य पाहण्यात मग्न असल्याचे पाहून आकाशने अलगद नभाचा हात धरला. आपल्या ओठांवर बोट ठेऊन तिला न बोलण्याची खुण करून तो तिला थोडा आडोश्याला नेऊ लागला. तिही भारल्यासारखी त्याच्यासोबत जाऊ लागली.
आकाशने नभाचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला तसे लाजेने तिचे डोळे मिटले. “आय लव्ह यु, नभा!” आकाशचे प्रेमाने ओसंडून वाहणारे शब्द नभाच्या कानात शिरले. ती नखशिखांत शहारली. तिच्या ओठांवर स्मिताचे टपोरे फुल उमलले पण क्षणभरच. तिने आकाशचे हात अलगद बाजूला केले आणि त्याच्याकडे पाठ करून दूर जाऊन उभी राहिली. आकाशने तिचे खांदे धरून तिला आपल्याकडे वळवले. तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. तसे दीर्घ श्वास घेत तिने डोळे उघडले आणि अश्रुंचे टपोरे थेंब पापण्यांचा बंधारा ओलांडून तिच्या गालांवरून ओघळू लागले.
“काय झाले? तुला मी आवडत नाही का?” या आकाशच्या प्रश्नावर तिने ओढणीने आपले डोळे टिपले. चेहरा जमेल तेवढा कोरा ठेवत तिने चक्क त्याला 'नाही' असे उत्तर दिले. "खोटं! साफ खोटं! तुझे ओठ जरी खोटं बोलले तरी तुझे डोळे ओरडून ओरडून सांगत आहेत, की तू माझ्यावर खुप प्रेम करतेस." आकाश दुखावला होता. तिने आकाशचे हात आपल्या खांद्यावरून अलगद दूर केले.
आवाजात शक्य तितका ठामपणा आणत म्हणाली, “मला प्रेम करण्याचा अधिकार नाही, आकाश! तू हे सर्व तुझ्या मनातून काढून टाक. आपण चांगले मित्र म्हणुन राहू. यापेक्षा माझ्याकडून तू जास्त अपेक्षा करू नकोस. मी तुझी साथ नाही देऊ शकणार. माझ्या भविष्याचा निर्णय माझे मामा घेणार आहेत आणि मी त्यांच्या विरोधात जाऊ शकणार नाही. आपली जातही वेगळी आहे. माझ्या घरून हे कधीच मान्य होणार नाही. मोहाच्या काही क्षणांना मी भुलले होते, पण आता मी सावरले आहे आणि तू पण सावर.” एवढे बोलून ती झपझप पावले उचलत तिथून निघून गेली.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आकाश भरलेल्या डोळ्यांनी पाहत होता. ती एकदातरी वळून पाहिल, ही त्याची वेडी आशा पार धुळीला मिळवत नभा इतर मुलींमध्ये जाऊन बसली. शून्यात हरवलेला आकाश मग बराच वेळ समुद्राकडे पाहात तसाच उभा होता. त्याच्या पाठीवर कोणाचा तरी हात पडला तसा तो भानावर आला. अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने वळून पाहिले. ती रसिका होती.
तिने एखाद्या लहान मुलाचे डोळे पुसावे तसे त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, “मी म्हणाले होते ना तुला! ती हो नाही म्हणणार म्हणुन? अजुनही वेळ गेलेली नाही, सावर स्वतःला. मला ठाऊक आहे की तिचेही तुझ्यावर खुप प्रेम आहे, पण ती तिचे प्रेम कधीच व्यक्त करणार नाही. ती खुप खंबीर आहे. कितीही दुःख झाले तरी ती चेहऱ्यावर आणू देणार नाही.”
खरंतर आपल्या आईवडीलांचा संसार तिच चालवते आहे. तिने नोकरी करून स्वतःचे शिक्षण घेतले आहे आणि आता भावंडांच्या शिक्षणाचा खर्चही तिच करत आहे. खुप कष्ट उपसले आहेत तिने! आई वडील लवकर वारल्यामुळे फार कमी वयात तिच्या वडीलांच्या खांद्यावर त्यांच्या लहान भावंडांची जवाबदारी पडली. स्वतःच्या लग्नाचा विचार करायला त्यांना वेळच मिळाला नाही.
जेव्हा लग्न करायचे ठरले तेव्हा ते चाळिशीला पोहोचले होते. सर्व इस्टेट आधीच भावंडांच्या नावावर करून बसले होते. स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचारच केला नाही. ज्या भावंडांसाठी आयुष्य वेचले, गरजेच्या वेळेला ते सर्व पाठ फिरवून गेले. भावंडांवरील अति विश्वास त्यांना नडला, दुसरे काय? त्यांची स्वतःची मुले शिकत असतानाच त्यांची रिटायर्डमेंट जवळ आली. गात्र थकलेली, गाठीला पैसा नाही, आणि कोणाची साथही नाही. मग तुटपुंज्या पेन्शनमध्ये घर कसे चालवायचे?
साहजिकच मोठी असल्यामुळे वडीलांच्या वाट्याला जे आले होते तेच नभाच्याही वाट्याला आले. सर्व जवाबदारी नभाच्या एकटीच्या खांद्यावर पडली. सुदैवाने नभाच्या आईच्या घरची परिस्थिती चांगली होती. तिचे भाऊ आपल्या बहिणीच्या मदतीला धावून आले. पण त्यांनाही त्यांची कुटुंबे होतीच. ते त्यांच्या परीने जमेल तशी मदत करत होते. वेळोवेळी तिच्या मामांनी मदत केल्यामुळे त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली बिचारी नभा दबली गेली.
चांगले शिकलेले असले तरी तिच्या वडीलांखेरीज इतर सर्व जुन्या विचारांचे आहेत. त्यांच्यात जात-पात वगैरे खुप मानतात. त्यामुळे इच्छा असुनही ती त्यांच्या विरोधात जाऊ नाही शकणार. तू प्लिज तिचा विचार मनातून काढून टाक. तिची आणि तुझीही एक चांगली मैत्रीण म्हणुन सांगतेय. हे सर्व तिच्यासाठी आणखी मुश्किल करू नकोस. विसरून जा तिला." आकाशच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून चक्रावलेली रसिका म्हणाली, “तू ऐकतोयस का मी काय म्हणतेय ते? लक्ष कुठे आहे तुझे?”
यावर आकाश हसत म्हणाला, “अच्छा, असं आहे तर सगळं! मग तर हे वाटते तेवढे कठीण नाही. कारण सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तिचे माझ्यावर प्रेम आहे. तू आता बाकी सगळे प्रॉब्लेम्स विसर. तिच्या घरच्यांना कसे तयार करायचे ते मी बघतो. नभाचे मन जिंकुन अर्धी लढाई तर जिंकलो आहेच, आता उरलेलीही जिंकेन. लवकरच आमच्या लग्नाचे लाडू तुला देतो की नाही ते बघच तू.” असे म्हणुन आकाश रसिकाचा हात धरून तिला ओढतच ग्रुपमध्ये घेऊन गेला.
मजा मस्ती करून थकल्यावर मावळतीसोबत सगळ्यांना घराचे वेध लागले. परतताना सुद्धा नभा आकाशच्याच पाठीमागे बसली पण अंतर राखुन. दोघांपैकी कोणीच काहीही बोलत नव्हते. ऑफिसपाशी पोहोचल्यावर एकमेकांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा रसिका आकाशला म्हणाली, “आकाश, मॅडमनी सांगितले आहे की नभाची गाडी पूनम घेऊन गेली आहे, तू तिला तिच्या घरी सोडशील का प्लिज?”
तसे नभा पटकन म्हणाली, “नाही. नको, मी जाईन बसने, त्याला उगाच त्रास नको.” त्यावर आकाश म्हणाला, “त्यात कसला आलाय त्रास? गाडीवरून तर सोडायचे आहे. तसेही मी घरी सांगुन आलोय की उशीर होईल, वाट पाहू नका म्हणुन. तुला सोडून मग मी निवांत घरी जाईन.” रसिका समोर वाद नको म्हणुन नभा निमूटपणे आकाशच्या मागे बसली आणि आकाशची बाईक तिच्या घरच्या रस्त्याला लागली.
कारवांचीवाडीला वळणाऱ्या रस्त्याला आकाशची गाडी वळली आणि थोडे पुढे जाऊन थांबली. तो का थांबला म्हणुन नभाने मान वर करून पाहिले. समोरून तिचे वडील येत होते. त्यांना पाहताच ती पटकन गाडीवरून उतरली. ती काही बोलणार एवढ्यात तिचे वडील आकाशला म्हणाले, “बरं झाले तू हिला घेऊन आलास ते! नाहीतर मी आता ऑफिसला येणारच होतो. हिच्या आईला, जवळच्या नातेवाईकांकडे जायचे असल्यामुळे आमची पूनम डुप्लिकेट चावी घेऊन बसने तुमच्या ऑफिसला गेली आणि गाडी घेऊन आली.”
“ऑफिसच्या मॅडमना सांगितले होते, पण आता काळोख झाला म्हणुन मीच आपला आलो स्टॉप पर्यंत. त्याचे काय आहे? काळजी वाटते ना, एकटी पोरगी यायची म्हटल्यावर! पण तू सोबत आहेस म्हटल्यावर काळजीचे काही कारणच उरले नाही.” यावर आकाश म्हणाला, “ठीक आहे काका, मी निघतो मग.” तेव्हा त्याला थांबवत नभाचे वडील म्हणाले, “अरे निघतोस कुठे? हिला घरी नेऊन सोड, चहा नाश्ता करून मग जा. मी जरा महालक्ष्मीच्या देवळात जाऊन येतो. आज देवळात भजन कीर्तन आहे ना!”
“तुझ्या काकीनी पोह्याचा मस्त चिवडा आणि नारळाची बर्फी केली आहे. एक नंबर झालीय. मला यायला थोडा उशीर होईल म्हणुन सांग. जा आता तुम्ही, उगाच उशीर नका करू, नभाची आई काळजी करत असेल.” असे म्हणुन ते निघाले देखील. मग नभाला घेऊन आकाश तिच्या घरी निघाला. नभाच्या घरी अधून मधून जाणे होत असल्यामुळे नभाच्या घरचे आकाशला चांगले ओळखत होते. ती त्याच्या सोबत आल्याचे कोणालाच काही खटकले नाही उलट नभाला आणण्यासाठी पूनमला परत गाडी घेऊन जावे लागले नाही याचा सर्वांना आनंदच वाटला.
आकाशच्या मोकळ्या स्वभावामुळे तो नभाच्या घरात अगदी किचनमध्ये बिनधास्त जाऊन तिच्या आईशी गप्पा मारत असे. चहा नाश्ता झाल्यावर गप्पा मारताना नभाची आई आकाशला म्हणाली, “आम्ही या भाड्याच्या घरात राहायला आल्यापासून नभाची तब्येत सारखी बिघडते. तिला कसले कसले भास होतात. रात्री अचानक ओरडत उठते. उगाच घाबरते आणि मग दरदरून घाम सुटतो. ताप भरतो. सकाळी मात्र काहीच न झाल्यासारखी नॉर्मल असते. आमच्या घरमालकाची आई याच खोलीत गेली होती. तिचाच त्रास तर होत नसेल ना नभाला?”
“आपण चेक करून बघू. मला रेकी येते, जर का या घरात काही असेल तर ते मला रेकीचे पवित्र सिम्बॉल्स घेताना काही ना काही अडथळा होईल. तसे झाले तर हे कन्फर्म होईल की तुमच्या घरात काही तरी आहे. रेकी ही पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तिला विरोध हा करणारच.” असे म्हणुन आकाशने पद्मासनात बसून ‘होन शा झे शो नेन, होन शा झे शो नेन, होन शा झे शो नेन, से हे की, से हे की, से हे की, चो कु रे, चो कु रे, चो कु रे’ असे म्हणत नाकाच्या अग्राने हवेत रेकीचे सिम्बॉल्स बनवायला सुरवात केली.
अचानक स्वभावाने तापट असलेल्या पूनमने “घरात एक वस्तू जागेवर मिळेल तर शप्पथ!” असे म्हणत किचनमध्ये आदळ आपट सुरु केली. ती भांडी फेकू लागली. त्यातले एक भांडे आकाशच्या पायावर आपटता आपटता राहीले. त्यामुळे साहजिकच त्याचे रेकीचे सिम्बॉल्स पूर्ण होऊ शकले नाहीत. आकाशच्या लक्षात आले की घरात असलेली निगेटिव्ह एनर्जी त्याला रेकीचे सिम्बॉल्स बनवायला विरोध करते आहे. म्हणजे नभाच्या जीवाला धोका आहे हे त्याच्या ध्यानात आले.
परिस्थिती लक्षात घेऊन नभा तिच्या आईला म्हणाली, “आई, आम्ही महालक्ष्मीला जाऊन येतो. आज भजन कीर्तन आहे ना? येताना बाबांना पण सोबत घेऊन येतो.” “हेमंत आणि सचिनला सोबत घेऊन जा!” नभाच्या आईने त्याही परिस्थितीत आईची भूमिका चोख बजावलीच. तेवढे तर तेवढे, नभा सोबत थोडा वेळ तरी घालवता येईल या विचाराने आकाश मनोमन खुश झाला. लगेचच ते बाहेर पडले आणि इकडे पूनम शांत झाली.
हेमंत आणि सचिन पुढे चालत होते तर नभा आणि आकाश त्यांच्या पासून थोडे अंतर राखुन चालत होते. चालताना एकमेकांच्या खांद्यांचा होणार स्पर्श दोघांनाही सुखावत होता. आकाशच्या बोटांचा स्पर्श नभाच्या बोटांना होत होता. त्याचाच फायदा उचलत त्याने तिचा हात अलगद हातात पकडला. तिनेही काही विरोध दर्शवला नाही. दोघे एकमेकांना खेटूनच चालत होते. दिवसभर एकत्र असूनही त्यांचे समाधान झाले नव्हते. दोघांनाही एकमेकांचा सहवास हवा हवासा वाटत होता.
आकाशने हळूच तिच्या कमरेला आपल्या हाताचा विळखा घातला, आधी नभा संकोचली पण हेमंत आणि सचिन आपल्याच तंद्रीत पुढे जात असल्याचे पाहिल्यावर ती थोडी रिलॅक्स झाली. नभा चेहऱ्यावर कसलेच भाव दाखवत नव्हती पण आकाशला विरोधही करत नव्हती. बिचारा गोंधळाला होता की नभाच्या मनात नक्की काय आहे? एकीकडे केवळ मित्र बनून राहू म्हणणारी नभा, आपल्या कमरेतील त्याचा हात हटवायची तसदी पण घेत नव्हती. आकाशला तिला घट्ट मिठीत घ्यावे असे वाटत होते पण त्याने स्वतःच्या भावना आवरल्या.
देऊळ जसे जवळ येऊ लागले तसे ती आकाश पासून थोडे अंतर राखून चालू लागली. त्याने ही स्वतःच्या मनाची समजूत घातली. चौघेही आता देवळाजवळ पोहोचले. नभाचे बाबा भजन मंडळींमध्ये बसून बुवांना साथ देत होते. अर्धा तास झाल्यावर हेमंत आणि सचिन कंटाळले आणि नभाकडे घरी चलण्याची भुणभुण करू लागले. तसे नभाने त्यांना “मी बाबांना सोबत घेऊन येते तुम्ही पुढे व्हा" असे सांगून कटवले. ते दोघे तिथून निघून गेल्यावर आकाश आणि नभा देवळापासून थोड्या अंतरावर काळोखात उभे राहून बोलू लागले.”
आकाश नभाला समजावू लागला, “अगं असं काय करतेस? मला थोडं समजून घे ना! मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझ्या घरून काहीच प्रॉब्लेम येणार नाही याची मला खात्री आहे. राहता राहिली तुझ्या घरच्यांची गोष्ट, तर मला नाही वाटत ते विरोध करतील म्हणुन. तुझे आई बाबा माझ्याशी किती आपुलकीने वागतात! आता रात्र असून पण तुला माझ्यासोबत पाठवलेच की तुझ्या आईने! मला ते जुन्या विचारांचे नाही वाटत. जेव्हा शक्य होईल तेव्हा तुझ्या मामांशी माझी ओळख करून दे मग बघ, त्यांना पण मी आवडू लागेन. मग सर्व काही आपल्या मनासारखे होईल.”
आकाशचे बोलणे संपताच नभा वेड्यासारखी हसत सुटली आणि हसता हसता अचानक तिचे डोळे भरले. तिची अवस्था पाहून आकाशला समजेना की काय करावे. अचानक ती रडायची थांबली. आपले डोळे पुसले आणि आकाशला म्हणाली, “तू किती साधा आहेस आकाश! पण जग एवढे साधे नाही. माझ्या घरचे तुझ्याशी चांगले वागतात ते तू माझा ऑफिस मधला एक सहकारी आहेस म्हणुन. त्यांना आपल्या नात्याबद्दल जरासा संशय जरी आला ना, तरी ते मला सरळ बेळगावीला मामाकडे पाठवतील.”
आईने आपल्याला देवळात जायची परवानगी दिली पण सोबतीला हेमू आणि सचिनला पाठवले हे तुझ्या लक्षात नाही आले? माझे बाबा खुप साधे आणि सरळ आहेत. त्यांचा आपल्या नात्याला काहीच विरोध नसेल, कारण त्यांना माझ्या सुखा पलीकडे काहीच महत्वाचे नाही. पण मामा आणि आईसमोर त्यांचे काहीच चालणार नाही. तू माझ्या मामांना ओळखत नाहीस अजून, म्हणुन असे बोलतोयस. त्यांना कळल्यावर ते काय करतील या विचारानेच मला कापरे भरते.
त्यांचे माझ्यावर खुप प्रेम आहे, पण जातीसाठी जिथे ते मलाही मारायला कमी करणार नाहीत तिथे तुझ्या सोबत काय करतील याचा विचार पण मला करवत नाही. मी एकवेळ तुझ्यापासून दूर राहून जगू शकते रे पण तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. तू सुखरूप राहणार असशील तर मी कसलीही तडजोड करायला तयार आहे. अगदी ते म्हणतील त्याच्या गळ्यात माळ घालायला पण तयार आहे. मला तू हवा आहेस पण ते या जन्मी शक्य होईल असे मला वाटत नाही.
“मी तुझ्यासाठी माझ्या घरच्यांना वाऱ्यावर तर सोडू शकत नाही ना? आणि जर मी तसे केले तर मामा माझ्याशी आणि घरच्यांशी संबंध तोडतील. माझी भावंडे उघड्यावर पडतील. अजून त्यांचे करियर मार्गी लागायचे आहे. मुख्य म्हणजे माझी आई, माझ्या बाबांचे जगणे मुश्किल करून टाकेल. या सगळ्यात मला जगात सर्वात जास्त प्रिय असलेले माझे बाबा हकनाक बळी जातील. एक नाते जोडताना मला माझ्या आजवरच्या सर्व नात्यांना तिलांजली द्यावी लागत असेल तर मी कसे तुझ्याशी नाते जोडू? तूच सांग. आता तू मला समजून घे आणि हे सर्व इथेच थांबव”. आकाश काही बोलणार एवढ्यात नभा देवळाच्या दिशेने चालू लागली.
नभाचे सर्व मुद्दे बरोबर होते पण प्रयत्न करण्याआधीच हार मानणे आकाशला पटत नव्हते. कशावरून सर्व काही नभा म्हणते तसेच होईल? कदाचीत प्रकरण एवढ्या थराला जाणारही नाही. तो मनाशी काही तरी पक्के करून देवळाच्या दिशेने चालू लागला. त्याची नजर नभाला शोधू लागली. तेवढ्यात ती त्याला त्याच्याच दिशेने येताना दिसली. “बाबांना यायला उशीर आहे, आणि शेजारचे काका त्यांना गाडीवरून घरी सोडतील. त्यामुळे आपण आता निघूया.” असे म्हणुन नभा घराच्या दिशेने चालू लागली.
जवळच्या रस्त्यावर पूर्ण अंधार असल्यामुळे त्यांनी उजेड असलेला पण थोडा लांबचा रस्ता धरला. स्ट्रीट लाईटच्या उजेडात ते चालत चालत, पावसाचे पाणी रस्त्याखालून निघून जाण्यासाठी पाईप टाकून बांधलेल्या एका मोरीपासून १५ फुटांवर पोहोचले. आणि त्या मोरीवरील ट्यूब लाईट खळकन फुटली. त्या आवाजाने नभा चांगलीच दचकली आणि आकाशला बिलगली. “अचानक ट्यूब कशी काय फुटली?” या नभाच्या प्रश्नावर आकाशकडे उत्तर नव्हते. ट्यूब कोणी तरी दगड मारावा तशी फुटली होती. मोरीवर क्षणात काळोख पसरला.
मोरीच्या अलीकडे आणि पलीकडे काही अंतरावर असलेल्या ट्यूबच्या अंधुक प्रकाशात चालत ते त्या मोरीपाशी पोहोचले. जसे आकाशचे पाऊल त्या मोरीवर पडले तो तिथेच थबकला. तो का थांबला म्हणुन नभाने वळून पाहिले तर आकाश एका पुतळ्यासारखा निश्चल उभा असलेला तिला दिसला. “चल ना, थांबलास का?” असे म्हणत नभाने आकाशचा हात धरला आणि ती दचकलीच. आकाश प्रेतासारखा एकदम थंड पडला होता. तिने मोबाईल मधील टॉर्च चालू केला.
मोबाईलच्या प्रकाशात तिने आकाशकडे पाहिले आणि तिला धक्काच बसला. आकाशचे डोळे पांढरे पडले होते. ती त्याला हाका मारू लागली पण त्या त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हत्या. तो भारल्यासारखा एकटक मोरी वरच्या धक्क्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीच ओळख दिसत नव्हती. नभाने आकाशचा हात धरला आणि घराच्या दिशेने निघाली पण आकाश आपल्या जागेवरून तसूभरही हलला नाही. आता ती आपला पुर्ण जोर लावून त्याला घराच्या दिशेने ओढू लागली. पण तिला त्यात यश आले नाही.
तिला संशय आला की त्या जागेवर नक्कीच कोणती तरी अमानवीय शक्ती असावी जीने आकाशला आपल्या कब्जात घेतले असावे. अचानक तिच्या लक्षात आले की घरात तिला होणाऱ्या त्रासापासून तिचे रक्षण करण्यासाठी आदल्याच दिवशी एका गुरुजींनी सिद्ध करून दिलेले हनुमानाचे लॉकेट तिच्या गळ्यात होते. तिने मागचा पुढचा विचार न करता ते लॉकेट गळ्यातून काढले आणि आकाशच्या गळ्यात घातले. त्याच क्षणाला आकाशचा विरोध थांबला. ते पाहताच ती त्याला ओढतच मोरीच्या पलीकडे घेऊन गेली. आकाश भानावर येताच त्याचे डोळे नॉर्मल झाले आणि शरीराचे तापमानही सामान्य झाले.
आकाशला मोरीच्या पलीकडे घेऊन जाताना तिची पूर्ती दमछाक झाली होती त्यामुळे तिचा उर धपापत होता. ती दीर्घ श्वास घेऊ लागली. तिला असे धापा टाकताना पाहून आकाश तिच्या जवळ गेला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. आकाश सामान्य झाल्याचे पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. आकाश तिचे सांत्वन करत होता. तिचा भर ओसरल्यावर तो तिला म्हणाला, “आत्ता इथे नक्की काय झालं होतं नभा? आणि तू अशा धापा का टाकत आहेस?”
“मला नाही माहीत नक्की काय झाले ते, पण मोरीवर आल्याबरोबर अचानक तुझे शरीर एकदम थंड पडले आणि डोळे पुर्णपणे पांढरे फटक झाले होते. तु पुतळ्यासारखा एकदम निश्चल उभा राहिला होतास. मी इतकी ताकद लावली पण तु जागेवरून १ इंच पण नाही हललास. जणू काही तुझे पाय जमीनीला चिकटले होते. मी तुझ्या गळ्यात मला गुरुजींनी दिलेले लॉकेट घातल्याबरोबर तू नॉर्मल झालास. त्याच क्षणी मी तुला ओढत या मोरीच्या पलीकडे घेऊन आले, आणि त्यात माझी एवढी दमछाक झाली. जणू काही कोणी तरी त्या क्षणापुरता तुझा ताबा घेतला होता.”
“तू ठीक आहेस ना माझ्या राजा? तुला नक्की काय झाले होते?” नभाच्या स्वरातून काळजी ओसंडून वाहत होती, ती जाणवून आकाश मनोमन सुखावला. “मला खरंच माहीत नाही गं राणी! काय झाले ते, पण माझे शरीर खुप जड झाल्यासारखे वाटले. जणू कोणीतरी मला जखडून टाकले होते. तुझ्या हाका मला ऐकू येत होत्या पण काहीच करता येत नव्हते. ना बोलता येत होते ना हलता येत होते. फार भयंकर अनुभव होता तो. माझा माझ्या शरीरावर ताबाच राहीला नव्हता. पण अचानक असे का व्हावे? माझे डोके घणाचे घाव घातल्यासारखे दुखू लागले आहे. आधी इथून लवकर घरी जाऊ मग बघू काय करायचे ते?” असे म्हणुन आकाश नभाचा हात हातात धरून भरभर पावले टाकू लागला.
ते दोघे घरी पोहोचण्याआधीच तिचे वडील व शेजारचे काका घरी पोहोचले होते. त्यांना एकटेच परतलेले पाहताच नभाच्या आईने त्यांना विचारले, “अहो नभा कुठे आहे?” “म्हणजे? ती आली नाही अजुन? रमेश भाऊ माझ्या सोबत होते, मी त्यांच्या गाडीवरून येणार होतो म्हणुन मीच त्या दोघांना पुढे पाठवले होते. दोघांना देवळातून निघून बराच वेळ झाला. एव्हाना पोहोचायला हवे होते. येतच असतील. तु काळजी करू नकोस, आकाश आहे तिच्या सोबत.” नभाचे बाबा म्हणाले.
हे ऐकताच नभाच्या आईने क्षणात घर डोक्यावर घेतले. “आकाश सोबत आहे याचीच तर काळजी आहे. तुम्हाला त्यांच्या सोबत घरी यायला काय झाले होते? तरुण मुलीला एका परक्या मुलाबरोबर तुम्ही एकटे पाठवलेतच कसे? ते ही परजातीतल्या! रात्रीचे ११ वाजत आलेत. मुलगी अजुन घरी आली नाही. तुम्ही एवढे निवांत कसे राहू शकता? तो नालायक कुठे घेऊन गेला असेल माझ्या पोरीला देव जाणे. माझ्या पोरींचे काही बरे वाईट झाले तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, सांगुन ठेवतेय.” वगैरे बोलून नभाची आई तिच्या नवऱ्याचा समाचार घेऊ लागली.
नभाचे वडील आपल्या बायकोची समजूत घालू लागले, “तू उगाच भलता सलता विचार करू नकोस. आकाश एक चांगला मुलगा आहे. तो नभाला सुखरूप घेऊन येईल.” पण नभाची आई ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. “मला काही ऐकायचे नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना शोधायला निघा. हेमंत आणि सचिनला पण सोबत न्या.” असे म्हणुन ती त्यांना पिटाळणार एवढ्यात नभा आणि आकाश तिथे येऊन पोहोचले. त्यांना पाहिल्यावर नभाची आई धावतच तिच्याकडे गेली आणि म्हणाली, “कार्टे कुठे उलथली होतीस?”
“तुला बाबांना घेऊन ये म्हणुन सांगितले तर तू हेमू आणि सचिनला परत पाठवलेस आणि बाबांना देवळातच सोडून आकाश सोबत फिरत होतीस होय गं? इथे काळजीने माझा जीव वर खाली होत होता. इतकी कशी बेजवाबदार झालीस तू?” तेव्हा तिला अडवत नभाचे बाबा मध्ये पडले. “अगं! ती आली ना सुखरूप घरी? आता तू कशाला तुझी बडबड सुरु ठेवली आहेस? तिला श्वास तर घेऊ दे. काही तरी अडचण आल्यामुळे त्यांना उशीर झाला असेल. तिला बोलू तर दे!”
एवढ्यात नभाच्या आईची नजर आकाशच्या गळ्यातील लॉकेट वर गेली आणि ती पुन्हा कडाडली, “काय गं! तुझं लॉकेट आकाशच्या गळ्यात कसं? काय प्रेमात बिमात पडलीस की काय त्याच्या? मी भलतं सलतं खपवून घेणार नाही हा, आधीच सांगतेय. तुझ्या मामांना कळले तर काय होईल माहित आहे ना तुला? उद्याच्या उद्या तुला बेळगावीला बोलावून घेतील. काढ रे ते लॉकेट आधी.” आकाशने ते लॉकेट काढून नभाकडे दिले. “अगं आई तसं काही नाही आहे. तू उगाच डोक्यात राख घालून घेऊ नकोस.” तोपर्यंत शेजारी आणि घरमालक तिथे गोळा झाले होते.
नभाने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तो ऐकल्यावर घरमालक म्हणाले, “अहो ती मोरी चांगली नाही. तिथे एक लावसट आहे. काही वर्षांपूर्वी त्या मोरीच्या पाईपात एका तरुण मुलीचे प्रेत सापडले होते. कोणीतरी तिच्या सोबत कुकर्म करून तिचा मृतदेह त्या पाईपात टाकला होता. रात्री अपरात्री ती बऱ्याच लोकांना तिथे दिसली आहे. एकदा रात्री उशिरा येताना मी स्वतः तिला मोरीच्या कठड्यावर बसलेली पाहिली आहे.”
“माझ्याकडे स्वामींचा अंगारा असल्यामुळे कदाचित तिने मला काहीच त्रास दिला नाही. मोरीच्या अलीकडे आणि पलीकडे रस्त्यावरच्या दिव्याचा उजेड आहे. पण मोरीच्या इथे जो लाईटचा पोल आहे तिथे एम.एस.ई.बी वाल्यांनी इतक्या वेळा ट्यूब लावली पण दरवेळी ट्यूब लावली की दुसऱ्याच दिवशी ती फुटलेली दिसायची. पाच सहा वेळा ट्यूब बदलल्यावर त्यांनी नाद सोडून दिला.”
“तुम्ही तर सांगत आहात की तुम्ही मोरी जवळ पोहोचताच ट्यूब अचानक फुटली म्हणुन. आश्चर्य आहे, कारण बरेच दिवस झाले कम्प्लेंट देऊन तरीही एम.एस.ई.बी वाल्यांनी फुटलेली ट्यूब बदललीच नव्हती. मग ट्यूब बदलली कोणी? काहीच कळायला मार्ग नाही. तुमचं नशीब चांगले म्हणुन तुम्ही आज सुखरूप घरी परतलात. नभाने ते लॉकेट जर याच्या गळ्यात घातले नसते तर आज कदाचित हा जीवंत राहिला नसता.”
घरमालकांचे बोलणे ऐकल्यावर केवळ नभामुळे आज आपला जीव वाचला हे लक्षात आल्यावर, पुढे काहीही झाले तरी संकटात साथ देणाऱ्या नभालाच आपली पत्नी बनवण्याचा निर्णय आकाशने त्या क्षणाला घेतला. तिच्याकडे पाहात त्याने डोळ्यानेच आपली कृतज्ञता व्यक्त केली. उगाच कोणाला कसला संशय येऊ नये म्हणुन नभाने आकाशला निघण्यास खुणावले. तिचा इशारा समजून तो म्हणाला, “चला, खुप उशीर झाला आहे. मी आता निघतो. घरचे वाट पाहात असतील.” नभाचे बाबा म्हणाले, “सांभाळून जा रे बाबा! आणि जाताना मोरीच्या रस्त्याने नको जाऊस, ती लावसट का कोण, तुझी वाट पाहात बसली असायची.”
त्यांच्या या मिश्किल वाक्यावर सर्वच हसले. नभाचे आईवडील घरात शिरताच सर्वजण आपापल्या घरी जायला निघाले. आकाश पण जायला निघाला तसे नभा हळूच बाहेर आली. “सांभाळून जा.” असे म्हणुन तिने आजु बाजुचा अंदाज घेत पटकन त्याच्या गालावर एक किस केले आणि घरात जाण्यासाठी वळली. तिच्या अनपेक्षित कृतीने सुखावलेल्या आकाशने पटकन तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे खेचले. आकाशने दिलेल्या झटक्यामुळे ती आपसूकच त्याच्या मिठीत शिरली. कोणीतरी पाहील या भीतीने पटकन स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवत ती घरात पळाली.
दरवाजातून वळून बघत तिने डोळे मोठे करून त्याला दटावले. तिची अवस्था पाहून आकाशला हसू आवरत नव्हते. तिला बाय करून तो निघाला, तसे तिने त्याला पोहोचल्यावर फोन कर असे हाताचा अंगठा कानावर आणि करंगळी ओठांवर ठेऊन खुणेनेच सांगितले. त्यानेही मान डोलावून गाडीला किक मारली. आकाशच्या गाडीचा टेल लाईट दिसेनासा होईपर्यंत ती दरवाज्यातच उभी होती. “नभाऽऽऽ”, आईच्या हाकेला “ओऽऽऽ” देत नभा किचन मध्ये पळाली.
क्रमशः
- केदार कुबडे
अभिप्राय