मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ४, मराठी भयकथा - [Mirror Mirror a Tale of Terror Part 4, Marathi Bhaykatha] राणी रुपमतीवर वाईट नजर ठेऊन राजा कनिष्क राणी रुपमतीशी गैरवर्तन करायला जातो आणि...
राणी रूपमती निद्राधीन असताना कनिष्कचा आत्मा तिथे येतो व आपला शब्द खरा करतो
पुर्वार्ध: आपण पाहिले की, राणी रुपमतीवर वाईट नजर ठेऊन राजा कनिष्क राणी रुपमतीशी गैरवर्तन करायला जातो आणि राजा यशवर्धन त्याला त्याच्या अपराधाबद्दल मृत्युदंड देतो, पण मरताना कनिष्क राजा यशवर्धनला सांगतो की तो परत येऊन त्याच्या समोर त्याच्या पत्नीचा उपभोग घेईल. कनिष्कच्या खुनाचा बदला घ्यायला आलेल्या कुलदीपचा सर्व सैन्यानिशी खात्मा केल्यावर राजा यशवर्धन व राणी रूपमती निद्राधीन असताना कनिष्कचा आत्मा तिथे येतो व आपला शब्द खरा करतो. राणी रूपमती आत्महत्या करते. कनिष्कच्या आत्म्याला राजाध्यक्ष घराण्याचे पूर्वज एका आरशामध्ये कैद करतात. भविष्यात कनिष्कच्या आत्म्याला नष्ट करण्याचा उपाय सापडल्यास कनिष्कला मुक्त करता यावे यासाठी ते आरशाच्या मागे मंत्र लिहून ठेवतात. श्रीनिवास त्या आरशाचे काढलेले फोटो आपल्या वडीलांना दाखवतो, तेव्हा कनिष्क सोबत काही इतर आत्मेही या जगात आल्याचे ते श्रीनिवासच्या निदर्शनास आणुन देतात. पुढे चालू...वर्तमान स्थिती: या सगळ्या भानगडीत अमोलकडे कुणाचेच लक्ष नव्हते. राजाध्यक्ष येण्याआधीच तो कुठे तरी गायब झाला होता. आपल्या छोट्या बहिणीवर गुदरलेल्या प्रसंगामुळे बिचारा चांगलाच हादरला होता. दोनच दिवसात त्याच्या बहिणीची अवस्था पार बिकट झाली होती. ही नक्की काय भानगड आहे? याचा विचार करून करून त्याला वेड लागायची पाळी आली होती. प्रियाच्या काळजीने तो खुपच बेचैन झाला होता. हा कनिष्क अचानक कुठून उपटला आणि तो आपल्या बहिणीच्या मागे का लागला आहे हे त्याला समजेना. बराच वेळ विचार करत असताना अचानक त्याला क्लिक झाले की हा सगळा प्रकार तो आरसा घरात आल्यापासुन सुरु झालाय.
राजा यशवर्धनाच्या वंशावळीतील शेवटच्या वंशजाचा पुर्ण कुटुंबासह आगीत होरपळून मृत्यू होणे, त्या भीषण आगीत फक्त तो आरसाच वाचणे, नेमका त्या घरातील नोकराने तो आरसा आपल्याला विकणे, सुरुवातीपासुन त्या नोकराचे संदिग्ध वागणे या सर्वांची त्याला आता सांगड लागत होती. या सगळ्याच्या मागे नक्की हा आरसाच आहे याची त्याला खात्री पटली. एकदा आरशामागची स्टोरी समजली की या अडचणीवर उपाय शोधणे सोपे जाईल, हे त्याच्या लक्षात आले. पण इतक्या जुन्या आरशाची माहिती मिळणार कशी आणि कुठे? इंटरनेट वर शोधुन पहिले पण काही खास अशी माहिती मिळाली नाही.
[next] विचार करून करून त्याचे डोके दुखू लागले होते आणि इतक्यात अमोलला आठवले की त्या जळक्या हवेलीतुन आरसा खाली आणल्यावर आपण त्या माणसाला पैसे दिले होते तेव्हा रिसीट वर रिसिव्हडचा शिक्का मारून सही घेतली होती. त्या रिसीटवर त्या माणसाचे नाव आणि पत्ता पण नक्कीच असेल. त्या माणसाची तो आरसा विकुन तिथुन लवकरात लवकर जाण्यासाठी चाललेली घाई अमोलला आठवली आणि तो माणुसच या रहस्यावरील पडदा उठवू शकेल याची त्याला खात्री पटली. लगेचच तो आपल्या दुकानाकडे निघाला. बिलबुक मध्ये शोधताना त्याला त्या माणसाची सही असलेली रिसीट सापडली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्या रिसिटवर त्या माणसाचे नाव आणि पत्ता होता. सुदैवाने तो पत्ता बाजुच्याच गावातील होता. त्याने त्या पत्याचा फोटो घेतला आणि तडक त्या माणसाच्या शोधात त्या पत्त्यावर निघाला.
तासभर गाडी चालवल्यावर अमोल त्या पत्त्यावर पोहोचला. अमोलला येताना पाहताच तो माणुस आपल्या घरातून पळून जाऊ लागला पण अमोलने त्याला शिताफीने पकडले. त्या माणसाचा गळा आपल्या मजबुत पंज्यात पकडून अमोलने त्याच्या दोन कानाखाली वाजवल्या आणि त्याला विचारू लागला “का पळतोयस? त्या आरशाबद्दल काय माहित आहे तुला? तु मुद्दाम तो आरसा मला विकलास ना? खरे काय ते सांग नाहीतर जीवच घेईन तुझा!” अमोलच्या रुद्रावताराचा अपेक्षित परिणाम त्या माणसावर झाला. “प्लिज मला मारू नका मी तुम्हाला सगळे सांगतो, पण आधी मला सोडा,” म्हणत अमोलच्या तावडीतून तो सुटण्याचा प्रयत्न करू लागला.
अमोलने त्या माणसाच्या गळ्यावरील पकड ढिली करताच तो माणुस दीर्घ श्वास घेऊ लागला. श्वास नॉर्मल झाल्यावर तो माणुस बोलू लागला आणि अमोलच्या चेहेऱ्यावरील भाव झपाट्याने बदलू लागले. राग, घृणा, आश्चर्य, आशा, आनंद, शंका अशा अनेक भावनांचे मिश्रण त्याच्या चेहऱ्यावर दिसु लागले. त्या माणसाने सगळे काही खरे खरे सांगून टाकले आणि अमोलला आपल्या बहिणीला वाचवण्याचा एक मार्ग दिसू लागला. तो आपल्या पुढच्या प्लॅनची मनात आखणी करत असतानाच त्याचा मोबाईल खणखणला. अनोळखी नंबर दिसल्यामुळे अमोल कॉल कट करणार इतक्यात अप्लिकेशनने कॉलरचे नांव दाखवले, “श्रीनिवास राजाध्यक्ष.” ते पाहताच अमोलने तो कॉल रिसिव्ह केला.
“हॅलो, अमोल सरदेशमुख! मी श्रीनिवास राजाध्यक्ष बोलतोय. मी एक पॅरानॉर्मल एक्सपर्ट आहे आणि तुमच्या बहिणीच्या केस करीत तुमच्या घरी आलोय. मला तुमच्याशी थोडे अर्जंट बोलायचे होते. तुम्ही मला लवकरात लवकर किती वेळात भेटू शकाल? हा तुमच्या बहिणीच्या जीवाचा प्रश्न आहे.” श्रीनिवास राजाध्यक्ष एका श्वासात बोलून गेला. “मी देखील त्याच कामासाठी थोडा बाहेर आलो होतो आणि माझ्या हाती खुप महत्वाची माहिती लागली आहे त्या माहितीचा आपल्याला या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यासाठी खुप उपयोग होईल. मी तासाभरात घरी पोहोचतोच आहे तोपर्यंत तुम्ही सांभाळून घ्या.” एवढे बोलुन अमोलने फोन कट केला आणि त्या माणसाला आपल्या गाडीत बसण्यास सांगितले.
प्रियाला कनिष्कपासून कसे वाचवायचे याचा विचार करत असताना अमोलच्या लक्षात येते की ज्या माणसाने त्याला तो आरसा विकला तोच काही तरी मदत करू शकेल. तो त्याच्या पत्यावर जाऊन त्याला गाठतो. तो माणुस त्याला सगळी माहिती देतो. श्रीनिवास राजाध्यक्ष्यला तासाभरात भेटण्याचे काबुल करून अमोल त्याला माणसासोबत आपल्या घराकडे जायला निघतो.
[next] इकडे क्लिनिकमध्ये डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाचे पुर्ण चेकअप केले आणि त्या सुशीला सरदेशमुख यांच्या समोर येऊन बसल्या. त्या काय सांगतात याची सुशीलाबाई आतुरतेने वाट पाहत होत्या. एक मोठा उसासा सोडून डॉक्टर कुलकर्णी म्हणाल्या, “हे बघा मिसेस सरदेशमुख, मी काय सांगते ते लक्षपुर्वक ऐका, बातमी वाईट आणि चांगली अशी दुहेरी आहे. तुम्ही मुळात घाबरून जाऊ नका. वाईट बातमी ही की प्रियावर अत्याचार झाला आहे. गेल्या चौवीस तासात प्रियाने खुप सोसले आहे. चांगली बातमी ही की क्रुरतेचा कळस झाला असुनही प्रिया त्यातुन सावरली आहे. तपासणीत मला सीमेनचे अंश कुठेच आढळले नाहीत, त्यात तिचे पिरियड्स येऊन वीस दिवस होऊन गेल्यामुळे ती प्रेग्नंट होण्याची शक्यता ९९% निगेटिव्ह आहे...”
“...तिच्या शरीरावर खुप मारहाणीच्या खुणा आहेत पण ती फास्ट रिकव्हर करते आहे. अशा परिस्थितीत एखादी मुलगी कोलमडून पडली असती पण प्रिया मनाने खंबीर आहे त्यामुळे ती यातून लवकर बाहेर पडेल. पण त्यासाठी आपल्या सर्वाना, खास करून तुम्हाला आणि अमोलला विशेष प्रयत्न करावे लागतील. तिचे मन चांगल्या गोष्टीत रमेल, ती खुश राहील, घडून गेलेल्या प्रकारची तिला कोणत्याच प्रकारे आठवण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वाटल्यास तिला कुठे तरी दुसरीकडे घेऊन जा जेणेकरून तिचे मन रमेल आणि ती लवकरात लवकर नॉर्मल होईल.”
[next] सुशीलाबाईंचे डोळे अखंड पाझरत होते, गदगदलेल्या स्वरात त्या डॉक्टर कुलकर्णींसामोर हात जोडत म्हणाल्या, “माझी प्रिया पुन्हा पहिल्यासारखी होईल ना डॉक्टर?” यावर डॉक्टर कुलकर्णी उत्तरल्या, “थोडा वेळ लागेल पण ती नक्की ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. मुख्य म्हणजे तिच्या समोर अशा रडत राहू नका जेणेकरून तिला या वाईट प्रसंगाची आठवण होत राहील. तुम्ही खुश राहा मग ती पण यातून लवकर बाहेर पडेल.” सुशीलाबाईंनी आपले डोळे पुसले आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले. “पण त्या कनिष्कचे काय? तो तर माझ्या प्रियाच्या जीवावर उठलाय!” सुशीलाबाईंच्या आवाजात चिंता डोकावत होती. “तुम्ही त्याची काळजी नका करू. श्रीनिवास आणि अमोल आहे ना त्याची काळजी घायला?” डॉक्टर कुलकर्णी उत्तरल्या.
“अगं बाई! या भानगडीत मी अमोलला विसरूनच गेले. तो आहे कुठे?” सुशीला बाईनी विचारले, तशा कुलकर्णी मॅडम म्हणाल्या, “मी श्रीनिवासला सांगितलं होतं त्याला कॉन्टॅक्ट करायला. आत्ताच त्याचा कॉल येऊन गेला. अमोल तासाभरात घरी पोहोचतोय. तुम्ही प्रियाला घेऊन घरी जा. काही वाटलंच तर मला फोन करा. जाताना ही औषधे सोबत घेऊन जा. मी रात्री क्लिनिक बंद केल्यावर एखादी चक्कर मारेन.” प्रियाला बोलावण्यासाठी सुशिलाबाईनी हाक मारली पण काहीच रिप्लाय आला नाही. प्रिया न सांगता कुठेतरी गायब झाली होती.
डॉक्टर कुलकर्णी, प्रियाला तपासतात व तिच्यावर अत्याचार झाल्याचे सुशीलाबाईंना सांगतात. त्या सुशीलाबाईंना दिलासा देतात पण त्या कनिष्क पासून प्रियाला कसे वाचवावे या विवंचनेत पडतात. प्रियाला घरी नेण्यासाठी त्या हाक मारतात पण प्रिया गायब झालेली असते.
[next] आरसा विकणाऱ्या माणसाला सोबत घेऊन अमोल आपल्या घरी पोहोचला, श्रीनिवास त्याची वाटच पाहत होता. अमोलला पाहताच तो त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, “मिस्टर अमोल, एक प्रॉब्लेम झालाय. डॉक्टर कुलकर्णींच्या क्लिनिक मधुन प्रिया गायब झाली आहे.” “काय? अशी कशी गायब झाली? तुम्ही तिला शोधलेत का? पोलीस कम्प्लेंट तरी केलीत का?” अमोलने आगतिक होत विचारले. “त्याचा काही उपयोग नाही कारण माझ्या असिस्टंटना ई.एम.एफ रिडरवर कनिष्क क्लिनिक मध्ये उपस्थित असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानेच तिला आपल्या सोबत कुठल्यातरी अज्ञात स्थळी नेलंय.” श्रीनिवास शांतपणे म्हणाला.
त्याबरोबर अमोलचा संय्यम सुटला आणि तो जवळ जवळ श्रीनिवासच्या अंगावर ओरडलाच, “मग तुम्ही इतका वेळ काय केलेत? माझी वाट पाहत बसला होतात का? कुठे घेऊन गेला असेल तो प्रियाला? काय हाल केले असतील त्याने तिचे, ईश्वरालाच ठाऊक?” “कदाचित मला माहित आहे, तो तिला कुठे घेऊन गेला असेल ते!” गोपाळच्या या वाक्यावर सगळ्यांच्या नजर त्याच्याकडे वळल्या. तो कोण आहे आणि त्याला हे कसे माहित असे श्रीनिवासने विचारताच, गोपाळ म्हणाला; “मी गोपाळ, मीच सरदेशमुखांना तो आरसा विकला होता. या सगळ्याला जवाबदार मीच आहे. यशवर्धन राजाच्या शेवटच्या वंशजांकडे मी नोकरी करत होतो. नोकरीला लागल्यापासून मला वाड्यात सगळीकडे वावर करता येत होता फक्त एक खोली होती की जीथे जायला मला मज्जाव होता. त्यामुळे त्या खोलीत नक्की काय आहे ते पाहण्याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नव्हती...”
[next] “...काही दिवसातच मला वाड्याची पुरती माहिती झाली. कुठे काय आहे हे सगळे मला माहित झाले होते. आणि एके दिवशी तशी संधी मला मिळाली. राजे उदयभान आपल्या परिवारासह एका लग्नसमारंभासाठी परगावी गेले होते. वाड्यामध्ये दोनचार नोकर आणि मी याव्यतिरिक्त आणखी कोणीच नव्हते. रात्री वाड्यात सामसुम झाल्यावर राजे उदयभान यांच्या कपाटाची चावी त्यांच्या उशीखालुन मिळवली आणि कपात उघडले. चोरकप्प्यात ठेवलेली एक चावी मला मिळाली. ती घेऊन मी चोरपावलांनी त्या खोली जवळ गेलो आणि हळुच दरवाज्याला लावलेले कुलुप उघडले...”
“...आत मिट्ट काळोख होता. लाईट लावल्यास कोणाच्या तरी लक्षात आले असते म्हणून मी माझ्याकडे असलेली बॅटरी सुरु केली. खोलीत एक आरसा सोडला तर बाकी खोली रिकामीच होती. मी कुतूहलाने त्या आरशापाशी गेलो आणि त्याच्यावर घातलेले पांढरे कापड दूर केले आणि त्या आरश्यावरील कोरीव काम पाहत स्वतःशीच विचार करत होतो की या आरशात असे काय आहे की ज्यामुळे याला एवढ्या कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहे? एवढ्यात त्या आरशामध्ये एक भयानक चेहरा दिसु लागला. तो पाहताच मी घाबरून मागे सरकलो आणि तिथुन निघुन जाणार एवढ्यात मला माझ्या नावाने हाक मारलेली ऐकु आली...”
अमोल घरी पोहोचतो तेव्हा त्याला प्रिया गायब झाल्याचे कळते व तो भडकतो. गोपाळ कनिष्कच्या संपर्कात कसा येतो याची हकीकत सांगू लागतो.
[next] “...मी मागे वळलो आणि बॅटरीच्या उजेडात त्या खोलीत चौफेर नजर फिरवली पण कोणीच दिसले नाही. मला भास झाला असावा असे समजून मी दरवाज्याच्या दिशेने वळणार एवढ्यात परत माझ्या नावाची हाक ऐकु आली. आरश्याच्या दिशेने आवाज आल्याने बॅटरीचा झोत मी आरश्याच्या दिशेने फिरवला तर पुन्हा तोच भयानक चेहरा दिसला. तोच मला हाक मारत होता. मी भीतीने पुरता गारठलो होतो. तिथुन पळून जाणार एवढ्यात त्याने मला पुन्हा हाक मारली आणि आपल्या जवळ बोलावले. भीत भीतच मी त्याच्या जवळ गेलो. त्याने मला सांगितले की त्याला शेकडो वर्षे त्या आरश्यात कैद केले होते आणि त्याला तिथुन बाहेर पडायचे होते. त्यासाठी एका कुमारिकेची गरज होती जीला त्या आरशामागे लिहिलेला संस्कृत मधील मंत्र वाचता येईल. आणि जर का मी त्याला त्या आरशातून मुक्त होण्यासाठी मदत केली तर तो मी जे मागेन ते मला देईल...”
“...मला वाटले की तो अल्लादिनच्या गोष्टीतल्या जीनसारखा एखादा जीन वगैरे असावा. तो मला मालामाल करेल म्हणून मी तयार झालो. संस्कृत वाचता येणारी एखादी कुमारी त्या खोलीत घेऊन येणे जरा कठीणच होते त्यामुळे मी काय करावे असा विचार करत होतो. इतक्यात त्यानेच मला सुचवले की दुसऱ्या दिवशी जेव्हा उदयभान राजे आपल्या परिवारासह परत येतील तेव्हा रात्री सगळे झोपल्यावर मी वाड्याला आग लावावी त्यात सर्व जळुन मरतील, मग मी त्या कुमारिकेला वाड्यावर घेऊन यावे आणि तिच्याकडून आरशामागील मंत्र म्हणवून घ्यावा आणि पुढचे तो पाहुन घेईल...”
[next] “...कर्मधर्म संयोगाने एके दिवशी तुमच्या दुकानासमोरून जाताना मला एक मुलगी संस्कृत मध्ये स्तोत्र म्हणत दुकानात देवाच्या फोटोसमोर उदबत्ती लावताना दिसली आणि माझा शोध संपला. ठरल्याप्रमाणे मी रात्री वाड्याला आग लावली त्यात राजे उदयभान त्यांचा परिवार आणि सर्व नोकर चाकर जळुन मरून गेले. दुसऱ्या दिवशी मी त्या मुलीला वाड्यात आणुन तिच्याकडुन तो मंत्र म्हणवून घेऊन त्या जिनची मुक्ती करून घ्यावी या इराद्याने जेव्हा सरदेशमुखांच्या दुकानात आलो तेव्हा मला ती मुलगी दिसली नाही पण अमोल सरदेशमुख भेटले. बोलता बोलता माझी नजर त्यांच्या मागे असलेल्या एका फोटो फ्रेमवर गेली जिच्यात अमोल सरदेशमुख, ती मुलगी आणि एक वयस्क जोडपे होते...”
“...त्यांना संशय येऊ नये म्हणुन मी त्या मुलीबद्दल काही विचारले नाही. प्रत्यक्षात आणि फोटोतही त्या मुलीच्या गळ्यात मला मंगळसुत्र आढळले नव्हते. त्यामुळे ती कुमारिका असावी तसेच चेहेऱ्यातील साम्यामुळे ती त्यांची बहीण असावी असा मी अंदाज बांधला. त्यांचे जुन्या वस्तुंचे खरेदी विक्रीचे दुकान असल्यामुळे तो आरसा तिच्यापर्यंत पोहोचेल अशी मला आशा वाटली. आणि मी स्वस्तात व्यवहार निपटवून तो आरसा त्यांना विकला...”
“...त्याच दिवशी सुट्टी घेऊन गावी गेलेला वाड्यातील एक जुना नोकर माझ्या घरी येऊन मला भेटला. त्याने मला त्या आरशाबद्दल विचारले. मी मला काही माहित नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने मला त्या आरश्यात बंदिस्त असलेल्या आत्म्याविषयी सांगितले. आणि मला माझी चुक उमगली. पण मी केलेली चुक सुधारण्यासाठी काहीच करू शकत नसल्यामुळे मी गप्प बसणेच योग्य समजलो...”
कनिष्क, गोपाळला वाडा पेटवून द्यायला सांगतो, व संस्कृत वाचता येणाऱ्या एका कुमारिकेला शोध घ्यायला सांगतो. गोपाळला संस्कृत मध्ये श्लोक म्हणत असलेली प्रिया दिसते आणि तो तिला वाड्यावर नेण्याचे ठरवतो. जुन्या नोकरांकडून आरशात बंदिस्त असलेल्या कनिष्क बद्दल कळण्यावर गोपाळला आपली चुक उमगते.
[next] त्याच्याकडुन मला समजले की त्या वाड्याच्या तळघरात एक भाला लपवला आहे. राजाध्यक्षांकडून त्या आरश्याची सुरक्षा काढून घेतल्यावर, त्या वेळेच्या राजाच्या पत्नीला विचित्र स्वप्ने पडू लागली तिचे सतत गर्भपात होऊ लागले. तेव्हा एका प्रचंड तपोबल असलेल्या ऋषींनी राणीच्या त्रासाचे कारण आरश्यात कैद असलेला आत्मा असल्याचे सांगितले. तेव्हा राजाने त्या आत्म्याचा पुरता बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्या ऋषींनी तो आरसा महालातील एका खोलीत बंद करून टाकला. त्या खोली पुरतीच त्या आत्म्याची ताकद मर्यादित राहील असा उपाय केला. आपल्या मंत्र सामर्थ्याने त्यांनी एक दिव्य भाला निर्माण केला आणि राजाला दिला.
ते म्हणाले, “राजन, जोपर्यंत हा आरसा या खोलीत बंद आहे तोपर्यंत काही भीती नाही. पण जर का या आरश्यात बंदिस्त असलेला आत्मा भविष्यात बाहेर आला तर त्याला नष्ट करण्यासाठी हा भाला मी तुला देत आहे. हा भाला त्या आत्म्याला तेव्हाच नष्ट करू शकेल जेव्हा तो आत्मा दृश्य स्वरूपात येईल.” राजाने ऋषींना त्या आत्म्याला तेव्हाच नष्ट करण्यास विनंती केली. “त्यासाठी त्या आत्म्याला आरश्यातुन मुक्त करावे लागेल आणि कदाचित तसे करणे म्हणजे विषाची परीक्षा घेणे ठरेल. त्यामुळे तसे करण्याऐवजी हा आरसा कायम या खोलीत बंद राहील आणि त्याच्यापर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही अशी व्यवस्था कर. म्हणजे भविष्यात काही अडचण येणार नाही.” असे म्हणुन ते ऋषी निघुन गेले.
[next] राणीला होणार त्रास बंद झाला आणि तिला मुलगा देखील झाला त्यामुळे राजाला वाटले की आता काही चिंता करायची गरज नाही आणि त्याने तो भाला तळघरात एका गुप्त जागी लपवला. बाकीचा महाल काळाच्या ओघात ढासळून गेला आता फक्त हा वाडा तेवढाच उरला होता. आता तोही पार जळुन गेला आणि तो आरसा पण गायब झालाय. म्हणजे खरे संकट आता येऊ घातले आहे.
“तो मला म्हणाला, की त्याचे आणि माझे नशीब म्हणुन त्या आगीतुन आम्ही वाचलो आता परत त्या वाड्याकडे जाऊ नकोस म्हणुन सल्ला पण दिला. आणि माझी खात्री आहे की तो आत्मा त्या मुलीला घेऊन त्या वाड्याच्या तळघरातच गेला असणार. जेणेकरून त्याला कोणी शोधू शकणार नाही आणि तो आपले काम बिनबोभाट करू शकेल. आपल्याला घाई करणे आवश्यक आहे. चला मी तुम्हाला तिथे घेऊन चलतो. तेवढेच माझ्या पापाचे प्रायश्चित्त.”
राजाध्यक्षांकडून आरशाची सुरक्षा काढून घेतल्यावर त्यावेळच्या राजाच्या राणीला त्रास होऊ लागतो, एक सिद्ध ऋषी त्या आरशाला एका खोलीत बंद करून टाकतात व कनिष्कला नष्ट करण्यासाठी एक दिव्य भाला निर्माण करतात. कनिष्क प्रियाला त्या वाड्याच्या तळघरात घेऊन गेला असावा अशी शक्यता गोपाळ वर्तवतो.
[next] श्रीनिवास अमोलला म्हणाला, “आत्ता आले माझ्या ध्यानात. कनिष्कच्या आत्म्याला या आरशात कैद नव्हते केले तर माझ्या पुर्वजांनी त्या आरशाद्वारे आत्म्यांच्या जगाशी मर्त्य जगाला जोडले. नंतर मंत्राद्वारे तो आरसारूपी दरवाजा उघडला आणि कनिष्कला मर्त्य जगातून आत्म्यांच्या जगात जाण्यास भाग पाडले. त्या मंत्राने केवळ तो दरवाजा उघडतो. आरशावर लिहिलेला मंत्र हा आत्म्यांच्या जगाचा दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ठेवलेले परवलीचे वाक्य आहे आहे.”
आपल्या अतृप्त इच्छांमुळे तो सदैव या मर्त्य जगात येण्यासाठी संधीच्या शोधात राहणार हे वेळीच ओळखुन, “जोपर्यंत ते त्याचा पुरता बंदोबस्त करत नाहीत तोपर्यंत हा आरसा इतर कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.” असे माझ्या पुर्वजांनी राजा यशवर्धनाला सांगितल्याने आपसुकच त्या आरशाच्या संरक्षणाची जवाबदारी राजाकडून आमच्या कुटुंबावर सोपवली गेली.
[next] आमच्या पूर्वजांखेरीज त्यावेळी ती जवाबदारी पार पाडू शकेल असे कोणीच नव्हते. त्यामुळे राजाला तो निर्णय घेणे अपरिहार्य होते. इतर कोणी कोणत्याही उद्देशाने तो मंत्र म्हणुन आत्म्यांच्या जगाचे पोर्टल उघडू नये यासाठी हा सगळा प्रपंच करावा लागला होता. त्या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे की मर्त्य जगाचा आत्म्याच्या जगाशी संपर्क प्रस्थापित होऊ दे. आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ हा आहे की मर्त्य जगाचा आत्म्यांच्या जगाशी संपर्क बंद होऊ दे.
कनिष्कने गोपाळला टार्गेट करून प्रियाकडून पहिला मंत्र म्हणवून घेतला आणि आत्म्यांच्या जगाचे पोर्टल उघडले. कनिष्कच्या मर्त्य जगात येण्याचा रस्ता सुकर झालाच पण कनिष्क पाठोपाठ इतरही अतृप्त आत्मे त्या पोर्टल मधुन मर्त्य जगात दाखल झाले आहेत त्यामुळेच ई.एम.एफ रीडर वर मला तसे संकेत मिळाले. तेव्हाच मला डाऊट आला की प्रियाच्या रूममध्ये एक नाही अनेक अमानवीय शक्ती उपस्थित असाव्यात. सुशीलाबाईंच्या शरीराला सोडून जेव्हा कनिष्कच्या आत्मा मला धक्का मारून गेला तेव्हा तो त्या आरशात शिरला असावा. म्हणुनच त्याची रिडिंग्ज मला नंतर मिळाली नाहीत. पण इतर आत्म्यांचे अस्तित्व दाखवणारी रिडिंग्ज मात्र मिळाली.
[next] आपल्याला कनिष्कच्या बंदोबस्त करावा लागेलच पण त्याच बरोबर इतर वाईट आत्म्यांना त्या पोर्टलचा सुगावा लागण्याआधीच त्या जगातून या जगात आलेल्या पाहुण्यांना घरचा रस्ता दाखवावा लागेल व ते पोर्टल नष्ट करावे लागेल. त्या आरशामागील कप्प्यात असलेले भुर्जपत्र आम्हाला तिथे सापडले नाही. एकतर इतक्या वर्षांच्या कालावधीत ते नष्ट झाले असावे किंवा कनिष्कने आरशातून मर्त्य जगात आल्यावर स्वतः ते नष्ट केले असावे. माझ्या वडीलांच्या सांगण्यानुसार त्यामध्ये “आरश्यावरील श्लोक वाचल्यास अनर्थ घडेल त्यामुळे वाचु नये” अशा आशयाचा काही तरी मॅटर होता.
“तो गेल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही कारण घडायचे ते घडून गेले आहे. तुम्ही प्रियाला घेऊन या, तोपर्यंत मी कनिष्कच्या पाठवणीच्या तयारीला लागतो.” श्रीनिवासने असे म्हणताच अमोल आणि गोपाळ वाड्याकडे जायला निघाले. सोबत श्रीनिवासने दिलेली रुद्राक्षांची माळ घ्यायला ते विसरले नाहीत. श्रीनिवासने गरज पडल्यास मदत व्हावी म्हणुन आपले दोन असिस्टंट्स रमेश आणि जयेश सुद्धा त्यांच्या सोबत पाठवले.
गोपाळ कडून सगळी हकीकत कळल्यावर श्रीनिवासला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. तो त्याच्या पुर्वजांनी कनिष्कच्या बंदोबस्तासाठी केलेल्या उपाययोजनेला सोप्या शब्दात सांगतो. अमोल आणि गोपाळ श्रीनिवासच्या दोन असिस्टंट्सना सोबत घेऊन वाड्याकडे जायला निघतात.
क्रमश:
मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर
- मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग १ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग २ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ३ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ४ - मराठी भयकथा
- मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ५ - मराठी भयकथा
अभिप्राय