मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग २, मराठी भयकथा - [Mirror Mirror a Tale of Terror Part 2, Marathi Bhaykatha] त्या आरशात बंदिस्त असलेल्या एका वासनांध आत्म्याला ती अनावधानाने मुक्त करते आणि तो तिचे शोषण करू लागतो.
आरशात बंदिस्त असलेल्या एका वासनांध आत्म्याला प्रिया अनावधानाने मुक्त करते आणि...
पुर्वार्ध:आपण पाहिले की, अशोक सरदेशमुख नावाचे एका अँटिक शॉपचे मालक आपल्या बेजवाबदार मुलाला सुधारण्याच्या प्रयत्नांत हार्ट अटॅकमुळे मरण पावतात. त्यांचा मुलगा आपल्या बहिणीसमवेत त्यांचा पिढीजात व्यवसाय सांभाळू लागतो. एका माणसाबरोबर अमोल एका आरशाचा व्यवहार करतो आणि तो आरसा आपल्या बहिणीला भेट देतो. त्या आरशात बंदिस्त असलेल्या एका वासनांध आत्म्याला ती अनावधानाने मुक्त करते आणि तो तिचे शोषण करू लागतो. पुढे चालु...
डॉ. कुलकर्णी या गेली कित्येक वर्ष त्यांच्या फॅमिली डॉक्टर होत्या. त्यांनी प्रियाला लहानाची मोठी होताना पहिले होते. त्यांच्या मनात प्रियाबद्दल खुप प्रेम होते. त्या तिला आपली मुलगीच मानत आणि सरदेशमुख परिवाराबद्दलही त्यांना खुप आपुलकी होती. सुशीलाबाईंचा फोन झाल्यावर त्या लगबगीने सरदेशमुखांच्या घरी पोहोचल्या. डॉक्टर येताच सुशिलाबाई त्यांना सोबत घेऊन प्रियाच्या रूमपाशी आल्या त्यांनी बराच वेळ प्रियाच्या रूमचे दार ठोठावले पण आतुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसे सुशिलाबाई घाबऱ्या घुबऱ्या झाल्या. अमोल आणि काही घरगड्यानी मिळुन दारावर धडाका मारायला सुरवात केली पण तो मजबूत दरवाजा जरासुद्धा हलला नाही. थकुन ते थांबले आणि जणू दरवाजा उघडाच असल्यासारखा हलकेच उघडला गेला. सुशीलाबाईनी आत डोकावून पहिले आणि पलंगावर मृतवत पडलेल्या अनावृत्त प्रियाला पाहून त्यांचे काळीज गलबलले.
[next] त्या पटकन आत गेल्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. ब्लॅंकेटने त्यांनी प्रियाचा अनावृत्त देह झाकला आणि दरवाजा उघडला व डॉक्टरांना आत येण्यास सांगितले. त्यांच्या पाठोपाठ आत शिरू पाहणाऱ्या अमोलला त्यांनी दारातच अडवले आणि बाहेरच थांबण्यास सांगितले व दरवाजा लावला. प्रियाची अवस्था पाहून कुलकर्णी मॅडमही हादरल्या. तिची प्राथमिक तपासणी केल्यावर तिच्यावर पाशवी बलात्कार झाला असावा अशी शंका त्यांनी सुशीलाबाईंकडे व्यक्त केली आणि सखोल तपासणीसाठी प्रियाला क्लिनिकवर घेऊन जावे लागेल असे त्यांनी सांगताच सुशीलाबाई कमालीच्या हादरल्या. आपल्या मुलीच्या बाबतीत असे काही घडू शकेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.
“हे कसे शक्य आहे डॉक्टर? ती कालपासून घरीच आहे. दुपारी डोकं दुखतंय सांगून दुकानातून घरी आली. नंतर पुर्णवेळ आपल्या रुममध्येच होती आणि संध्याकाळी जेवायला बोलावले तेव्हा तिची अवस्था बघवत नव्हती आणि आता तर..” असे म्हणून सुशिलाबाई धाय मोकलून रडू लागल्या. कुलकर्णी मॅडमनी त्यांना सावरले. आपल्या आईच्या रडण्याचा आवाज ऐकून दरवाज्या पलीकडे असलेला अमोल हवालदिल झाला होता. आताच नक्की सांगता येत नाही पण प्रियाची अवस्था पाहता हे सगळे गेल्या चौवीस ते छत्तीस तासात घडले असावे असा माझा अंदाज आहे. वस्तुस्थिती मी तुम्हाला सखोल तपासणी केल्यावरच सांगु शकेन. आपल्याला प्रियाला लवकरात लवकर माझ्या क्लिनिकला घेऊन जावे लागेल. प्रियाला कपडे घालुन झाल्यावर त्यांनी दरवाजा उघडला आणि अमोलला आत बोलावले. “काय झालंय प्रियाला, डॉक्टर? आणि आई का रडतेय?” अमोलने काळजीने विचारले. “ते नंतर सांगते आधी प्रियाला घेऊन माझ्या क्लिनिकला चल,” असे म्हणत डॉक्टर कुलकर्णी अमोल सोबत प्रियाच्या पलंगापाशी पोहोचल्या.
अमोल प्रियाला उचलण्यासाठी हात लावणार इतक्यात एका जोराचा ठोसा अमोलच्या पोटात बसला आणि तो हवेत उडून दरवाज्यावर आदळला. त्या अनपेक्षित प्रकाराने सर्वच जण चक्रावले. पाठोपाठच चिडलेल्या कनिष्कच्या आवाज त्यांच्या कानात शिरला. “प्रिया माझी आहे आणि तिला इतर कोणीही हात लावला तर जीवानिशी जाईल. होय, मीच उपभोग घेतला आहे तिचा! तुम्हीच काय, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.” यावर वेदनेने कळवळलेला अमोल म्हणाला, “कोण आहेस तु? दिसत का नाहीस?” “मी आहे राजा कनिष्क. मी तुमच्या मर्त्य जगातील नाही. मी कोणाला दिसावे हे माझ्या इच्छेवर अवलंबुन आहे. तुम्ही प्रियाचा नाद सोडा. ती आता तुमची राहिली नाही. येत्या अमावास्येला मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.” कनिष्कचा आवाज रूममध्ये घुमत होता.
डॉक्टर कुलकर्णी प्रियाला तपासल्यावर तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवतात. आणि सखोल तपासणीसाठी प्रियाला क्लिनिकवर घेऊन चलण्यास अमोलला सांगतात. अमोल प्रियाला हात लावताच कनिष्कच्या आत्मा त्याला मारहाण करतो आणि प्रियाला अमावास्येला सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला वाचवण्यासाठी काय करतात ते पुढे वाचुया...
[next] “कोण आहेस तु? का छळतोयस माझ्या लेकीला? तु इथून निघुन जा. माझ्या लेकीच्या केसाला पण मी धक्का लागु देणार नाही.” सुशिलाबाई कडाडल्या. त्यामुळे भडकलेल्या कनिष्कने आपले हिडीस रूप त्यासर्वांसमोर प्रकट केले. त्याला पाहताच सर्वांची बोबडीच वळली. सोबत आलेल्या नोकरांनी तर केव्हाच सुबाल्या केला होता (पळुन गेले होते). आजच्या आधुनिक जगात हे आत्मा, भुत वगैरे अस्तित्वात असते यावर त्यांच्यापैकी कोणाचाच विश्वास नव्हता पण कनिष्कला पाहताच सर्वांची मतीच गुंग झाली होती. कनिष्कच्या ज्या देखण्या रूपावर प्रिया भाळली होती तोच चेहरा आता इतका बिभत्स आणि भयानक दिसत होता की अचेतन पडलेली प्रिया तिथुन दूर जाण्यासाठी शरीरातील उरली सुरली ताकद गोळा करून दरवाज्याच्या दिशेने सरकु लागली. इतक्यात काही समजण्याआधीच हवेचा एका जोरदार लोट इतर सर्वांना दरवाज्याबाहेर लोटू लागला. त्याचा जोर एवढा प्रचंड होता की त्यांच्या पैकी कोणाचाच टिकाव लागला नाही आणि ते दरवाज्याबाहेर ढकलले गेले.
सावरून ते परत रूममध्ये जाण्याआधीच बाहेर पळण्याच्या प्रयत्नात असलेली प्रिया आत खेचली गेली. “आई, दादा मला वाचव!” हे प्रियाचे शब्द सरदेशमुखांच्या त्या प्रशस्त बंगल्यात घुमले आणि त्या पाठोपाठ दरवाजा बंद झाला. जणु काही प्रियाच्या रुमने तिला गिळंकृत केले होते. प्रिया, प्रिया! असे हाका मारत अमोल आणि सुशिलाबाई दरवाजा ठोठावू लागले पण नंतर काही प्रियाचा आवाज ऐकु आला नाही. प्रियाच्या रूममध्ये भयाण शांतता पसरली. झाल्या प्रकाराने सर्वचजण प्रचंड हादरले होते. प्रियाच्या काळजीने सुशीला बाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मुलीच्या काळजीने ती माउली टाहो फोडत होती. “अमोल माझ्या प्रियाला वाचव रे! तिला परत आण. तो सैतान माझ्या प्रियाचे हाल हाल करेल रे! माझी पोरगी, काय रे हे तिच्या नशिबी आले?” सुशीला बाईंचा आक्रोश पाहावत नव्हता. कुलकर्णी मॅडम डॉक्टर असुनही सुन्न झाल्या होत्या. काय बोलावे, काय करावे तेच त्यांनाही सुचेना. प्रियाला वाचवण्यासाठी लवकरात लवकर हालचाली करणे आवश्यक आहे हे त्यांनी ताडले. थोड्या वेळाने भानावर आलेल्या कुलकर्णी मॅडमनी सुशीलाबाईंना धीर दिला आणि त्यांच्या ओळखीच्या एका पॅरानॉर्मल एक्स्पर्टना फोन लावला.
[next] डॉक्टर कुलकर्णीनी पॅरानॉर्मल एक्स्पर्ट श्रीनिवास राजाध्यक्ष यांना घडलेल्या प्रकाराची फोनवर थोडक्यात माहिती दिली आणि सरदेशमुखांचा पत्ता दिला व त्या आपल्या क्लिनिकला निघुन गेल्या. दुपारी ठीक तीन वाजता त्या सरदेशमुखांच्या बंगल्यावर परतल्या त्यांच्या पाठोपाठ रुबाबदार व्यक्तिमत्व लाभलेला एक देखणा तरुण आपल्या पॅरानॉर्मल टीम सोबत आवश्यक ते साहित्य जसे इ.एम.एफ. रीडर, इ.व्ही.पी रेकॉर्डर, डिजिटल थर्मामीटर, हॅण्डहेल्ड अँड स्टॅटिक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, थर्मोग्राफिक इन्फ्रारेड मोशन सेन्सर्स, नाईट व्हिजन व्हिडीओ कॅमेरा, डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर आणि लॅपटॉप्स घेऊन तिथे आला. श्रीनिवासने घोस्ट हंटिंग मधील पहिली स्टेप सुरु केली ती म्हणजे माहिती गोळा करणे. डॉक्टर कुलकर्णी आणि सुशीलाबाईंशी झालेल्या चर्चेतुन त्याला कळले की तो आत्मा कनिष्क नावाच्या कोणा राजाचा होता, जो प्रियाचा लैंगिक छळ करत होता. याचा अर्थ तो प्रकार पॅरानॉर्मल सिडक्शन अँड अब्युझचा होता. तो आत्मा चांगलाच शक्तिशाली होता. तसेच येत्या अमावास्येला तो प्रियाला आपल्या सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत होता म्हणजेच प्रियाच्या आयुष्याला धोका होता. हाती असलेला वेळ फार कमी होता, अवघा एक दिवस, कारण दुसऱ्या दिवशी रात्री अमावस्या सुरु होणार होती. श्रीनिवास राजाध्यक्षच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.
कारण पॅरानॉर्मल सिडक्शन अँड अब्युझ या प्रकारात व्हिक्टीम वाचण्याची शक्यता फार कमी असते. वासनेने पिसाळलेला अतृप्त आत्मा आपल्या झाडाचा (व्हिक्टिमचा) जीव घेऊनच थांबतो, त्यानंतर नवा बळी आणि पुढेही हे अघोरी सत्र सुरूच राहाते. त्या शक्तीशी निपटण्यासाठी केवळ मॉडर्न टेक्निकच नव्हे तर आध्यात्मिक मदतही लागेल हे श्रीनिवास राजाध्यक्ष जाणुन होता. त्याच्याकडील गॅजेट्सनी तो आत्म्याचे अस्तित्व पाहू शकत होता, पण त्याला वश करण्यासाठी त्याची साधना, मंत्र तंत्र याचीच जास्त गरज पडणार होती. त्याच्या पिढ्यानपिढ्या हेच काम साधनेच्या जोरावर करीत असल्यामुळे त्याच्या गाठीशी पुर्वजांचे अनुभव, लहानपणापासून केलेली साधना आणि मॉडर्न टेकनॉलजी अशी तिहेरी ताकद होती. कोणतीही कृती करण्याआधी त्याला राजा कनिष्कची माहिती मिळवणे गरजेचे होते. ज्याच्याशी पंगा घ्यायचा त्याची सगळी माहिती हाती असल्याशिवाय कोणतीही गोष्ट केल्यास ती आपल्या अंगलट येऊ शकते हे तो अनुभवाने जाणत होता. का कुणास ठाऊक त्याला राहुन राहुन राजा कनिष्क हे नांव आपण कुठे तरी वाचले किंवा ऐकले आहे असे वाटत होते.
प्रियाच्या आईच्या बोलण्याने भडकलेला कनिष्क स्वतःचे मुळ रूप दाखवतो, आणि सर्वाना प्रियाच्या रूमच्या बाहेर ढकलून देतो. डॉक्टर कुलकर्णी पॅरानॉर्मल एक्सपर्ट श्रीनिवास राजाध्यक्ष्यला फोन करतात. तो आपल्या सहकाऱ्यांसह आधुनिक उपकरणे सोबत घेऊन येतो आणि सर्व परिस्थिती समजावून घेऊ लागतो. श्रीनिवास राजाध्यक्षचा कनिष्कशी सामना होतो तेव्हा काय घडते ते आता वाचुया...
[next] श्रीनिवास राजाध्यक्ष, डॉक्टर कुलकर्णी आणि सुशीलाबाईंशी चर्चा करत असताना, अचानक प्रियाच्या रूमचा दरवाजा उघडला. ते पाहताच सुशिलाबाई गडबडीने जिना चढून जाऊ लागल्या, श्रीनिवासने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्या प्रियाच्या रूममध्ये शिरल्या होत्या. आणि इथेच घात झाला. त्या आत शिरताच दरवाजा बंद झाला आणि कनिष्कचा आत्मा सुशीलाबाईंच्या शरीरात शिरला. डॉक्टर कुलकर्णी, श्रीनिवास राजाध्यक्ष आणि त्यांची टीम प्रियाच्या दरवाज्याजवळ पोहोचली. श्रीनिवासने हळूच दरवाजा ढकलला. करकर आवाज करत तो दरवाजा उघडला. सर्वांनी आतमध्ये नजर टाकली. प्रिया तिच्या पलंगावर बेशुद्धावस्थेत पडली होती आणि सुशिलाबाई केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत तिच्या डोक्याजवळ बसल्या होत्या. त्या तिच्याकडे एकटक पाहत तिला कुरवाळत होत्या. “मिसेस सरदेशमुख! आर यु ओके?” असे म्हणत डॉक्टर कुलकर्णी सुशीलाबाईंकडे जाऊ लागल्या पण श्रीनिवास राजाध्यक्षने त्यांना अडवले. त्याबरोबर सुशीलाबाईंनी मान वळवुन त्यांच्याकडे पहिले आणि डॉक्टर कुलकर्णींच्या मनात धस्स झाले.
सुशीलाबाईंच्या चेहऱ्यात अमुलाग्र बदल झाला होता. त्यांच्या डोळ्यातील काळा भाग नाहीसा झाला होता आणि त्यांचे डोळे पुर्णपणे पांढरेफटक पडले होते. मान वाकडी करत त्या डॉक्टर कुलकर्णी बाईंकडे पाहत दात विचकत विचित्र हसल्या. त्यांचा तो अवतार पाहताच डॉक्टर कुलकर्णी प्रतिक्षिप्त क्रियेने चार पावले मागे सरकल्या. सुशीलाबाई पुढे सरकणाऱ्या श्रीनिवासला पाहुन पुरूषी आवाजात भेसूर किंचाळल्या, “श्रीनिवास राजाध्यक्ष, बरे झाले तु इथे आलास? तुझ्या पुर्वजांमुळे मी या आरशात शेकडो वर्षे बंदिस्त होतो पण आता मी बाहेर आलोय. तुझ्या पुर्वजांकडून मी बदला नाही घेऊ शकलो पण तुला मारून मी माझा बदला पुर्ण करेन.” आणि सुशिलाबाई श्रीनिवासचा गळा पकडण्यासाठी पुढे धावल्या. श्रीनिवासने आपल्याकडील इन्फ्रारेड लाईट त्यांच्या चेहऱ्यावर सोडला त्याबरोबर त्या किंचाळत पलंगाच्या मागे जाऊन लपल्या.
[next] इन्फ्रारेड लाईटमुळे कनिष्कला सुर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांनी भाजल्यासारख्या वेदना झाल्या होत्या त्यामुळे तो आणखीनच चिडला. श्रीनिवासने आपल्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ सुशीलाबाईंच्या अंगावर फेकली. ती माळ त्यांच्या अंगावर पडताच कनिष्क किंचाळत त्यांच्या शरीरातून बाहेर पडला आणि श्रीनिवासला धक्का मारत निघुन गेला. त्याबरोबर नुकतीच कॉलेज पासआऊट झालेली आणि थ्रिलची आवड असलेली, श्रीनिवास राजाध्यक्षची २१ वर्षाची एक असिस्टंट 'दिव्या', सुशीलाबाईंकडे धावली. तिने सुशीलाबाईंना सावरले. थोड्याच वेळात सुशिलाबाई भानावर आल्या पण त्यांचे सर्व शरीर जड झाले होते, आणि डोके कमालीचे दुखत होते. डॉक्टर कुलकर्णीनी त्यांची नाडी तपासली आणि त्यांना डोकेदुखी वरची एक गोळी दिली आणि पाणी पाजले. थोड्याच वेळात सुशीलाबाईंना हुशारी वाटू लागली.
लगेच डॉक्टर कुलकर्णीनी प्रियाला तपासले. तिची नाडी खुप मंद झाली होती, तिला तातडीने ट्रीटमेंटची गरज होती त्यामुळे त्यांनी प्रियाला आपल्या क्लिनिकमध्ये हलवण्यास सांगितले. श्रीनिवास राजाध्यक्षांनी आपले दोन असिस्टंट विकास आणि सुरेश त्यांच्या सोबत पाठवले. सुशिलाबाई देखील हट्टाने त्यांच्यासोबत गेल्या. ते सगळे गेल्यावर श्रीनिवासचे इतर सहकारी कामाला लागले, त्यांनी आपली हायटेक उपकरणे रूममध्ये सेट करायला सुरवात केली. हॅण्डहेल्ड अँड स्टॅटिक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा प्रियाच्या पलंगासमोर लावला गेला. इ.एम.एफ रीडर दरवाज्याजवळ बसवला गेला. थर्मोग्राफिक इन्फ्रारेड मोशन सेन्सर्स सर्व रूममध्ये बसवले गेले. सोबत नाईट व्हिजन व्हिडीओ कॅमेरा पण सेट केला गेला. कोणत्याच उपकरणामध्ये कनिष्कच्या अस्तित्वाची रिडिंग्स मिळाली नाहीत पण इतर अनेक नवीन रिडिंग्स मात्र मिळत होती. याचे श्रीनिवासला आश्चर्य वाटले.
सुशीलाबाईंच्या अंगात शिरलेला कनिष्क श्रीनिवास वर हल्ला करतो पण तो अयशस्वी ठरतो. डॉक्टर कुलकर्णी प्रियाला आपल्या क्लिनिकमध्ये हलवण्यास सांगतात. श्रीनिवासचे सहकारी आपली उपकरणे प्रियाच्या रूममध्ये सेट करू लागतात. कनिष्कबद्दल श्रीनिवासकडून कळल्यावर त्याचे वडील काय प्रतिक्रिया देतात ते आता वाचुया...
[next] विचार करत करत श्रीनिवास त्या आरशापाशी आला आणि त्याला निरखून पाहू लागला. आरशामागे संस्कृत मध्ये लिहिलेले दोन श्लोक त्याला दिसले. त्या आरशाचे काही फोटो त्याने विविध अँगल मधुन काढून घेतले. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. कनिष्कने चक्क त्याचे नांव घेऊन हाक मारली होती. त्याने नकळत त्याला हिंट पण दिली होती की शेकडो वर्षांपुर्वी त्याच्या पुर्वजांनी कनिष्कला त्या आरश्यात बंदिस्त केले होते. म्हणजे कनिष्कचा बंदोबस्त केला जाऊ शकतो, पण कसा? बराच वेळ तो विचार करत होता आणि त्याला आठवले की लहान असताना जेव्हा तो आपल्या आजोबांकडून आपल्या पुर्वजांच्या साहसकथा ऐकत असे त्यावेळी एका कथेत त्याने ते नांव ऐकले होते.
आता आजोबा तर हयात नव्हते पण त्याच्या वडीलांकडून त्याला त्याबद्दल नक्कीच अधिक माहिती मिळाली असती. ती माहिती त्याला कनिष्कचा पुरता बंदोबस्त करण्यात उपयोगी पडली असती. तातडीने तो आपल्या घरी परतला. त्याचे वडील देवव्रत राजाध्यक्ष त्यावेळी आराम करत होते पण राजा कनिष्कचे नांव ऐकताच ते ताडकन उठून बसले. कनिष्क परत आलाय हे कळताच ते कमालीचे चिंताक्रांत झाले. आता काय हाहा:कार उडेल याच्या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला. श्रीनिवास राजाध्यक्षने या आधी आपल्या वडीलांना कधीही इतके घाबरलेले पहिले नव्हते त्यामुळे हा प्रकार वाटतो तितका साधा नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचे वडील राजा कनिष्क आणि राजा यशवर्धन यांची त्यांच्या आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला ज्ञात होत आलेली कथा सांगु लागले.
कनिष्क बद्दल विचार करत असताना श्रीनिवासला आठवते की त्याच्या आजोबांनी सांगितलेल्या कथेत कनिष्कचा उल्लेख झालेला असतो. तो आपल्या वडीलांच्या कानावर कनिष्क मुक्त झाल्याची बातमी घालतो आणि ते प्रचंड हादरतात. पिढी दर पिढी ऐकत आलेली कथा ते सांगू लागतात...
पुढील भागात वाचा राणी रुपमतीवर वाईट नजर ठेवल्याबद्दल राजा यशवर्धनाने कनिष्कला दिलेली भयंकर शिक्षा आणि कनिष्कने त्याचा घेतलेला बदला याची रोमहर्षक कहाणी.
क्रमश:
मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर
- मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग १ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग २ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ३ - मराठी भयकथा
- मिरर मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ४ - मराठी भयकथा
- मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर भाग ५ - मराठी भयकथा
अभिप्राय