लग्न पहावे करुन, मराठी भयकथा - [Lagna Pahave Karun, Marathi Bhaykatha] अमेय नावाच्या एका तरुणाच्या आयुष्यात लग्न ठरताना कशी जीवघेणी संकटे आली आणि त्यातुन तो कसा सुखरूप बाहेर पडला याची भयचकित करणारी कहाणी.
अमेय नावाच्या एका तरुणाच्या आयुष्यात लग्न ठरताना कशी जीवघेणी संकटे आली आणि त्यातुन तो कसा सुखरूप बाहेर पडला याची भयचकित करणारी कहाणी.
गोडबोले दांपत्याला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी असे छोटे चौकोनी कुटुंब. मोठी आश्विनी तर धाकटा अमेय. सुहासराव एक LIC Agent होते तर त्यांच्या पत्नी सौ. अलका या गृहिणी होत्या. लोणावळ्याला त्यांचा एक छोटा फ्लॅट होता. छान दिवस चालले होते. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होते. सुहासराव स्वभावाने खुप हौशी होते तर सौ. अलका विनोदी स्वभावाच्या होत्या. किरकिर न करता येईल तो दिवस मजेत घालवावा एवढे साधे तत्व पाळुन दोघे नवरा बायको आपल्या मुलांना मोठ्या मायेने वाढवत होते. खिशाला परवडेल ती सगळी हौसमौज होत होती. मुलांमध्ये आश्विनी जितकी बडबडी आणि अवखळ होती अमेय तितकाच अबोल आणि शांत होता. आश्विनी अभ्यासात थोडी कच्ची होती पण अमेय मात्र खुप हुशार, कायम नंबरात येणारा. क्रिकेटचे त्याला भारी वेड होते. रोज न चुकता तो लोणावळा क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवर तो प्रॅक्टिस करायला जात असे. सर्व काही छान चालु होते पण म्हणतात ना की आपण विचार करतो एक नियतीच्या मनात काही भलतेच चालु असते.काही दिवसांपासून अमेयला भास होऊ लागले होते. कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेऊन आहे असे त्याला वाटायचे. हळूहळू या भासांचे रुपांतर भितीत होऊ लागले. तो एकटे राहायला घाबरू लागला. झोपेतुन दचकुन उठायचा. एकटक शुन्यात नजर लावून पाहात बसायचा. पुढे पुढे तर शाळेत एकटे जाण्याच्या विचारानेच त्याच्या पोटात गोळा यायचा. त्याची शाळा बुडू लागली. अभ्यासावर याचा परिणाम झाला नसता तर नवलच म्हणायचे. सुहासराव सकाळी बाहेर पडायचे ते रात्री उशीरा घरी परतायचे त्यामुळे अमेयच्या आईलाच घरातील व घराबाहेरील सर्व कामे बघावी लागायची. शाळेतून अमेयच्या अनुपस्थिती बद्दल पत्र आल्यावर मात्र तिने सगळा विषय एका रात्री सुहासरावांच्या कानावर घातला. नववीतील मुलाचे असे घाबरणे जरा विचित्रच होते. त्यांनी या विषयावर अमेयशी रविवारी बोलायचे ठरवले आणि झोपेच्या अधीन झाले.
‘अमेय!’ सुहासरावांची हाक कानावर पडताच पाठमोरा बसलेला अमेय एकदम दचकलाच. भितीने त्याची छाती वेगात वर खाली होत होती. त्याची ती अवस्था पाहुन सुहासराव चिंतीत झाले. त्यांनी त्याला जवळ बसवुन प्रेमाने त्याची विचारपुस सुरु केली. इतके दिवस मनात सुरु असलेली घुसमट अमेयने वडीलांसमोर मोकळी करायला सुरवात केली. “त्या दिवशी दुपारी ग्राऊंड मध्ये क्रिकेट खेळताना एका मुलाने सिक्स मारल्यामुळे लांब गेलेला बॉल आणण्यास मी गेलो होतो. बराच वेळ शोधल्यावर मला तो बॉल एका पत्रावळीत पडलेला दिसला. त्या पत्रावळीत दही भाताच्या दोन मुदी होत्या आणि त्यावर काळे उडीद, गुलाल, सुया टोचलेली लिंब, काळी बाहुली असे बरेच काही टाकलेले होते. नेमका त्या भातात बॉल पडल्यामुळे पुरता बरबटला होता. बॉल साफ करण्यासाठी म्हणुन मी उचलला व त्या पत्रावळीला ओलांडुन कुठे कागद दिसतो का ते पाहू लागलो आणि अचानक एक काळी आकृती माझ्या अंगावर धाऊन आली. मी तोल जाऊन खाली पडलो आणि बेशुद्ध झालो. नंतर मित्रांनी तोंडावर पाणी मारल्यावर मी शुद्धीवर आलो. घरी आल्यापासून मला सतत ती आकृती दिसते, अंगावर धाउन येते, मला तिची खुप भीती वाटते. तुला सोबत घेऊन जाणार असे ती सारखे म्हणते. आधी फक्त घाबरवायची पण आता तर ती मला मारझोड करू लागली आहे”, असे म्हणुन अमेयने आपल्या पाठीवरील आणि मांडीवरील वळ दाखवले. ते पाहुन सुहासरावांच्या मनात कालवा कालव झाली. दाराआडून ऐकणारी अमेयची आई एकदम सुन्न झाली. सुहासरावांना हा काय प्रकार आहे ते समजेना. त्यांना वाटले की अमेय अभ्यास करायला नको म्हणुन काही बाही कारणं सांगतोय पण अमेयची आई कोकणातील असल्यामुळे काय प्रकार आहे ते लगेच समजली. कोणीतरी उतारा काढून ठेवला असावा आणि अमेयने नेमका त्याला स्पर्श करुन ओलांडल्यामुळे, काही तरी अमानवीय त्याच्या मागे लागले असावे. वेळीच काहीतरी उपाय केला पाहिजे हे तिने ताडले.
[next] रात्री तिने आपल्या भावाला झाला प्रकार फोन करुन कळवला. तसा त्याने तिला उपाय सांगितला, “दोन दिवसांवर अमावस्या आहे तेव्हा अमावस्येच्या रात्री भाताच्या दोन मुदी घेऊन त्यावर दही आणि काळे उडीद घालून अमेयच्या डोक्यापासून पायापर्यंत असे सात वेळा फिरवून पत्रावळीत काढ. रात्री दोननंतर ती पत्रावळ एखाद्या तीठ्यावर ठेऊन त्यावर दोन मुठी गुलाल आणि एक काळी बाहुली ठेव आणि अमेयवरुन धारीवाले लिंबु एकवीस वेळा उतरवून त्या लिंबाचे तीन तुकडे करून तीन दिशांना फेक नंतर त्या अमानवीय शक्तीस तिला चढवलेला भोग घेऊन अमेयला सोडण्यास विनंती कर आणि कोणाशी न बोलता घरी परत येऊन दोघांनीही आंघोळ करा”. सुहासरावांचा या सगळ्या प्रकारावर विश्वास नसल्यामुळे अमेयच्या आईने त्यांच्याकडे काही न बोलता सगळे झोपल्यावर अमेयच्या मामाने सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी केली व रात्री २ वाजल्यानंतर अमेयला घेऊन घराजवळील एका तीठ्यावर जायला निघाली. अमेयमध्ये आता बदल जाणवु लागला होता. तो तीठ्यावर जायला विरोध करू लागला पण त्याला जबरदस्तीने ओढत ती तीठ्यावर घेऊन आली. तिथल्या वातावरणातील तणाव तिला जाणवू लागला. तिथे पोहोचताच अमेय आणखीनच उग्र झाला. तिने भावाने सांगितल्याप्रमाणे पटकन गुलाल व काळी बाहुली त्या मुदी ठेवलेल्या पत्रावळीवर टाकली आणि अमेयवरून एकवीस वेळा लिंबु उतरवण्याचे दिव्य कार्य सुरु केले. चढवलेले भोग घेण्यासाठी तिथे जमलेल्या आत्म्यांचे अस्तित्व तिला जाणवत होते. तिला दरदरुन घाम सुटला होता. कसेबसे एकवीस वेळा लिंबु उतरवून तिने त्याचे तीन भाग केले आणि तीन दिशांना फेकले व भोग स्विकारुन आपल्या मुलाला सोडण्याची त्या अनामिक शक्तीला विनंती केली. त्या शक्तीने अमेयला सोडून आपल्यासाठीचा भोग भक्षण करण्यास सुरवात करताच अमेय शुद्धीवर आला. एवढ्या रात्री आई आणि तो दोघेच त्या सुनसान तीठ्यावर असल्याचे लक्षात येताच तो प्रचंड घाबरला. पत्रावळीतील भोग अधाशासारखे खाणाऱ्या त्या पिशाच्चाला पाहुन तर त्याची बोबडीच वळली. आईचा हात धरून तो तिला घराच्या दिशेने ओढु लागला.
अमेयची आई काही न बोलता अमेय सोबत घरी निघाली. सुदैवाने त्यांना वाटेत कोणी भेटले नाही पण बिल्डिंगचा राऊंड मारून गेटवर परत आलेल्या वॉचमनने त्या दोघांना गेटमधुन आत शिरताना हटकलेच. अमेय काही बोलणार इतक्यात त्याच्या आईने त्याच्या तोंडावर हात धरुन वॉचमनला न पाहिल्यासारखे करत बिल्डिंग मधे प्रवेश केला. घरात शिरून दार लावल्यावरच तिला हायसे वाटले. आश्विनी आणि सुहासराव गाढ झोपेत होते त्यामुळे वायफळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम टळल्याचा तिला आनंद झाला. अमेयला आंघोळीस जाण्यास सांगुन नंतर तिनेही आंघोळ केली आणि झोपी गेली. सकाळी अमेय बराच नॉर्मल वाटत होता, न खळखळ करता शाळेतही गेला त्यामुळे आपला मुलगा आता त्या दुष्टचक्रातुन बाहेर पडल्याची तिची खात्री पटली. तिने आपल्या भावाला सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला तसा त्यालाही आनंद झाला. काही दिवस बरे गेले पण एका रात्री अमेयला परत काही तरी दिसले आणि तो प्रचंड घाबरला. त्याला चांगलाच ताप भरला होता. त्याच्या आईने दोन मुठीत समुद्री मीठ घेऊन ते अमेय वरून सात वेळा उतरवले आणि संडासात फ्लश केले तसा तो नॉर्मल झाला. हा प्रकार आता दर अमावस्या पौर्णिमेला घडू लागल्यावर मात्र तिने सुहासरावांच्या मागे तो फ्लॅट सोडून दुसरीकडे राहायला जायचा लकडा लावला.
शेवटी अमेयची दहावी सुरु व्हायच्या काही महिने आधी सुहासरावांनी लोणावळ्याचा फ्लॅट भाड्याने देऊन पुण्याला शिफ्ट व्हायचे ठरवले. थोडी फार ओळख आणि पैसे दाबून त्यांनी अमेयची एका शाळेमध्ये आणि आश्विनीची एका कॉलेज मध्ये एडमिशन करून दिली. पुण्यामध्ये सोमवारपेठेत त्यांच्या धाकट्या भावाचा तीन बेडरूम्स हॉल आणि किचन असलेला १४०० sq feet चा मोठा फ्लॅट रिकामाच होता. तो मुंबईत मुलुंड मध्ये स्थायिक झाला होता त्यामुळे काही भाडे ठरवून त्याने सुहासरावांच्या पुण्यातील वास्तव्याची सोय आपल्या रिकाम्या फ्लॅट मधे करुन दिली. पुढील काही वर्ष ठिक गेली. सुहासरावांचा पुण्यातही चांगला जम बसला, सोबत लोणावळ्याला विकलेल्या पॉलिसीजच्या नुतनिकरणापासून मिळणारे कमीशन होतेच. ते लोणावळ्यात आणि पुण्यात दोन्ही शहरात ये जा करून आपला व्यवसाय वाढवू लागले. पण म्हणतात ना, दुर्दैव हे काही लोकांच्या पाचवीलाच पुजलेले असते. सगळे चांगले सुरु असताना अचानक सुहासरावांना अर्धांगवाताचा झटका आला आणि त्यांची डावी बाजु लुळी पडली. बोलणे हेच भांडवल असलेला त्यांचा व्यवसायही या झटक्या बरोबर लुळा पडला. नवीन पॉलिसीधारक बनणे बंद झाल्यामुळे कमाई घटली. भरीत भर म्हणून आश्विनीचे ग्रॅज्युएशनही काही पुरे होईना. तिच्या मार्च ऑक्टोबर अशा वाऱ्या सुरुच होत्या.
[next] बारावी नंतर अमेयने MCA ला ऍडमिशन घेतली होती. आपले पाहिले प्रेम क्रिकेटला तिलांजली देऊन तो अभ्यासावर खुप मेहनत घेऊ लागला. अलकाबाईंनी हिंमत न हारता निव्वळ हौस म्हणुन शिकुन घेतलेले शिवणकाम व्यवसाय म्हणुन सुरु केले. रात्रंदिवस लोकांचे ब्लाऊज आणि ड्रेस शिऊन त्यांची पाठ दुखायची, पाय सुजायचे पण त्यांनी कधी तक्रार नाही केली. आपल्या परीने त्या घरखर्चाला हातभार लावतच होत्या. वाईटात चांगले म्हणुन आश्विनीचे शिक्षण अर्धवट असुनही एक दिवस अचानक जातीतीलच एका उच्चशिक्षित मुलासोबत तिचे लग्न जमले. गोडबोले कुटुंबियांसाठी हा एक सुखद धक्काच होता. आपल्याला जेवढे शक्य होईल तितका खर्च करून सुहासरावांनी आश्विनीचे लग्न व्यवस्थितपणे लावून दिले. एका मोठ्या जवाबदारीतून ते मोकळे झाले होते. पुढे अमेयने MCA चांगल्या मार्कानी पास होत एका MNC कंपनीत जॉब मिळवला आणि गोडबोले कुटुंबाची विस्कटलेली घडी हळू हळू पुन्हा बसु लागली.
अमेय आता पंचवीस वर्षाचा युवक झाला होता. चांगला कमवतही होता. अलकाबाईंना त्याच्या लग्नाचे वेध लागले आणि सुरु झाले अमेयसाठी वधुसंशोधन! अनेक मुली पाहिल्या त्यातुन एक मुलगी त्यांच्या आणि अमेयच्या पसंतीस उतरली. मुलीकडच्यांनाही अमेय पसंत पडला. दोघे संसाराची स्वप्न पाहु लागले. आता साखरपुड्याची बोलणी करणार इतक्यात मुलीकडुन नकार कळवला गेला. कारण काय तर मुलगा व्यसनी आहे आणि मुलाचे चारित्र्यही ठीक नाही अशी आम्हाला बातमी लागली आहे म्हणे. गोडबोले कुटुंबियांना यावर हसावे की रडावे तेच कळेना, कारण अमेय एक निर्व्यसनी मुलगा होता आणि मुळातच थोडा अंतर्मुख असल्यामुळे स्वत:हुन कोणत्या मुलीशी बोलायचाही नाही. मग चारित्र्य खराब असण्याचा तर प्रश्नच नव्हता. पुढे कोणातरी मार्फत कळले की अमेय ट्रेकिंगला त्याच्या काकांबरोबर जात असे आणि त्या मुलीला ती स्वत: ट्रेकिंगला गेली असता त्या ग्रुपमधील एका मुलाने अमेय बद्दल वाईट साईट सांगुन तिचे त्याच्याबद्दलचे मत खराब केले होते. त्या मुलावर विश्वास ठेऊन कोणतीही शहानिशा न करता त्या मुलीच्या घरच्यांनी नकार कळवला होता.
ते लग्न मोडले म्हणुन अमेयच्या आईने ज्योतिषाला त्याची पत्रिका दाखवली. त्याने हा दोष आहे, तो दोष आहे सांगत नाना उपाय सुचवले पण काही उपयोग नाही झाला. असे करता करता अनेक ज्योतिषी झाले. जो जे उपाय सांगेल ते उपाय अलकाबाई करत होत्या पण काही उपयोग नाही. नंतर कोणीतरी वास्तुच्या ब्रम्हस्थानी शौचालय असल्यामुळे सर्व अडचणी येत असल्याचे सांगितले तसे बाथरूम मधील कमोड काढुन फक्त बाथरूम ठेवले. नंतर मात्र एक दिवस एक आरती जोशी म्हणुन मिरजेचे स्थळ चालुन आले. मुलगी साताऱ्याच्या एका शाळेत शिक्षिका म्हणुन जॉब करत होती. तिथे तीने भाड्याने एक रूम घेतली होती आणि मैत्रिणी सोबत राहत होती. दिसायला गोरी, सुंदर, स्मार्ट, वागण्यास शालीन आणि संस्कारीही वाटत होती. चेहऱ्यावरील गोड स्माइल तिच्या सौंदर्यात भरच टाकत होते. पाहाताच क्षणी ती सर्वांनाच पसंत पडली आणि गोडबोले कुटुंबीयांनी आपली पसंती कळवली सुद्धा. मुलीकडुनही होकार आला. दोन्ही घरात आनंदी वातावरण होते. बोलणी झाली, इतकेच काय सुपारीही फुटली. आरती वरचेवर अमेयला भेटायला येऊ लागली. फोनवरून सतत सुहासरावांचीही ती विचारपुस करत असे. त्यांच्या उपचारासाठी त्यांना मिरजेला येण्यासाठीही तिने आणि तिच्या वडीलांनी खुप आग्रह करुन नेले. तिथल्या डॉक्टरांच्या उपचारांनी सुहासरावांच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. तिची सगळ्यांसाठीची काळजी बघुन सर्वांनाच ती अमेयसाठी योग्य वाटली. सगळे खुश होते पण हाही आनंद फार काळ टिकला नाही. अमेयच्या बाबतीत एक एक वाईट घटना घडू लागल्या.
[next] अमेय कारने ऑफिस वरुन येत असताना कुंभार वाड्याजवळ चश्मा वर सरकवण्यासाठी त्याने आपला उजवा हात वर केला इतक्यात एक दगड सरसरत आला आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला. तो दगड इतक्या जोरात हाडावर बसला होता की हातावरचे मांस निघुन रक्त येऊ लागले होते. अमेय वेदनेने कळवळला, कशीबशी कार सावरत त्याने रस्त्याच्या कडेला उभी केली. बाहेर येऊन पाहीले पण त्याला कोणीच संशयास्पद आढळले नाही. बाजुने एखादा ट्रक किंवा बस सारखे अवजड वाहन पण जाताना दिसले नाही की ज्याच्या चाकाखालुन तो दगड उडुन आला असावा अशी शंका घ्यावी. एका हाताने कार चालवत अमेय कसा बसा घरी पोहोचला. नेमका योग्य वेळी हात वर केल्याने दगड हातावर बसला होता नाहीतर डोक्यावर किंवा डोळ्यावर बसला असता तर मोठा अनर्थ झाला असता. अमेय आई बरोबर KEM मधे जाऊन आला. X-RAY मधे जरी हाडाला चिर गेलेली दिसली नाही तरी डॉक्टरनी जखमेचे ड्रेसिंग करून काही दिवस क्रेप बँडेज वापरण्याचा सल्ला दिला कारण हात चांगलाच सुजला होता. जीवावरचे हातावर निभावले यात समाधान मानुन दोघे घरी परतले. अमेय जखमी झाल्याचे कळताच आरती तातडीने त्याला बघायला आली. त्याची विचारपुस करून काळजी घेण्यास सांगुन गेली. अधुन मधुन तिचे चौकशीसाठी फोनही येत असत.
या प्रसंगाला जेमतेम आठवडा झाला असेल, घरी मुंबईचे काका काकी व भावोजींसह आश्विनीही आल्यामुळे अमेय हॉल मध्ये आपल्या चुलत भाऊ कौस्तुभ सोबत झोपला होता. रात्री साधारण दोनच्या सुमारास कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटल्याने अमेयला जाग आली. काळोखात डोळे ताणुन तो पाहु लागला की कोण हाक मारतय. एवढ्यात बिन बाह्यांची पांढरी बनियन आणि लेंगा घातलेली एक व्यक्ती हॉल मधुन किचन मध्ये जाताना त्याला दिसली. यंत्रवत तो त्या व्यक्तीच्या मागे जाऊ लागला. बेसिनपाशी जाऊन ती व्यक्ती बेडरूम कडे वळली आणि गायब झाली तसा अमेय शुद्धीत आला. आपण किचन मधे कसे आलो याचा विचार करत त्याने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. बाथरूमला जाऊन आल्यावर आता तो झोपायला म्हणुन हॉल मध्ये येणार तोच पुन्हा त्याला ती व्यक्ती मुख्य दरवाजा जवळ दिसली. अमेयने “कोण आहे?” असे विचारताच ती व्यक्ती त्या बंद दारातून आरपार बाहेर निघुन गेली. तो प्रकार पाहुन अमेयला घामच फुटला. पण आपली उत्सुकता शमवण्यासाठी तो दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. लॅचचा आवाज त्या शांततेत चांगलाच घुमला. आवाजाने झोप चाळवलेल्या कौस्तुभने हा एवढ्या रात्री बाहेर कुठे चालला असे म्हणत घड्याळात बघितले. अमेय, अमेय असे म्हणे पर्यंत अमेय दार उघडुन बाहेर गेला होता.
अमेयच्या पाठोपाठ कौस्तुभही दारातुन बाहेर गेला. कॉरिडोअर पार करून ती व्यक्ती लिफ्टच्या बंद दारातुनही आरपार गेलेली दिसली तसा अमेयही लिफ्ट कडे जाऊ लागला. लिफ्ट तळमजल्यावर होती पण दाराचे लॉक खराब झाल्याने ते कधीही उघडत असे. लिफ्ट सुरु असताना मधेच चुकुन कोणी दार उघडले की ती आहे तिथे बंद पडून लॉक व्हायची मग जो पर्यंत कोणी स्क्रु ड्रायव्हरने ते लॉक उघडत नाही तोपर्यंत आतील माणसे लिफ्टमधेच अडकुनच राहायची. लिफ्ट मधुन हाक मारली की कोणी ना कोणी येऊन लॉक उघडायचे. त्यामुळे बिल्डिंगच्या रहिवाश्यांनाही याची सवय झाल्याने ती दुरुस्त करण्याचीही कोणी तसदी घेतली नव्हती. अमेयने लिफ्टचे दार उघडले आणि तो आत पाऊल टाकणार इतक्यात कौस्तुभने त्याला मागे खेचले, नाहीतर अमेय पाच मजले खोल असलेल्या त्या लिफ्टच्या खड्यात पडला असता. कौस्तुभने मागे खेचल्यावर अमेय भानावर आला पण त्याला काहीच आठवेना की तो तिथे कसा आणि का आला. मग कौस्तुभ अमेयसह घरात परतला. कोणताही अनर्थ घडु नये म्हणुन त्याने आतुन कुलुप लावले. सकाळी लवकर उठलेल्या अलकाबाई दरवाजाला आतुन घातलेले कुलुप पाहुन आश्चर्यचकीत झाल्या. सकाळी कौस्तुभ कडुन सगळा वृत्तांत कळल्यावर सगळ्यांनाच अमेयची काळजी आणि कौस्तुभचे कौतुक वाटले. पण ही तर सुरवात होती.
[next] अमेयने कंपनी बदलली. या कंपनीत मार्च एंडिंगमुळे अमेयला घरी परतायला रात्रीचे दोन तर कधी तीनही वाजायचे. असाच एकदा रात्री घरी परतत असताना बावधन क्रॉस केल्यावर अमेयच्या कारला डाव्या बाजुने जोराचा झटका बसला आणि काही कळायच्या आत कार उजव्या बाजुला आडवी घासत रस्ता पार करून मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. सुदैवाने समोरून कोणतीही गाडी येत नव्हती नाहीतर मोठा अपघात झाला असता. सिटबेल्ट लावलेला असल्यामुळे अमेयला एक जोराचा झटका बसण्यापलीकडे काहीच झाले नाही. पण तो पुरता हादरला होता. कार मधुन उतरून त्याने पाहिले तर रस्त्यावर कारच्या टायरचे काळे आडवे पट्टे उमटले होते परंतु रस्त्यावर किंवा आजुबाजुला चिटपाखरूही नव्हते. आपल्याला भास झाला नाही याची त्याला खात्री होती पण तिथे कोणीच न दिसल्यामुळे तो चक्रावला होता. त्याला कारच्या डाव्या दरवाजावर हाताच्या आकाराचे दोन मोठे डेंट पडलेले दिसले. जणू काही कोणीतरी प्रचंड ताकदीने आपल्या हातांनी त्याच्या कारला ढकलले होते. विचारांच्या तंद्रीत तो कारमधे बसला तसे त्याला साइड विंडोवर मानव सदृश्य हातांचे ठसे दिसले पण बोटांचा आकार खुपच निमुळता आणि लांब होता. झाला प्रकार तर्काच्या पलीकडला होता. अमेय घरी पोहोचला तो अंगात ताप घेऊनच.
दोन दिवस तापात काढल्यावर झालेला प्रकार त्याने घरी सांगितला. ते सर्व ऐकुन सर्वच हवालदिल झाले. लागोपाठ अमेयवर काही ना काही संकटे येतच होती. आपल्याच मुलाच्या मागे हे सर्व का लागले आहे या चिंतेने सुहासरावांची तब्येत खालावली. लग्नाची तारीख दिड महीन्यानंतरची निघाल्यामुळे गोडबोले कुटुंबाची खुप धांदल उडाली होती. सुहासराव आजारी असल्यामुळे अमेयलाच सर्व आपल्या खांद्यावर घ्यावे लागले. पत्रिकांची ऑर्डर देण्यासाठी म्हणुन संध्याकाळी तो अप्पा बळवंत चौकात जाऊन येतो सांगुन बाहेर पडला. अलकाबाई आणि सुहासराव लग्नातील मानपानाबद्दल बोलत बसले होते आणि इतक्यात टेलिफोनची घंटी वाजली. फोनवर एक अनोळखी इसम होता, त्याने अलकाबाईंना धमकी दिली की, “आरती जोशी बरोबर तुमच्या अमेयच्या लग्नाच्या नाद सोडून द्या नाहीतर अमेयला कुठे गायब करुन टाकीन याचा पत्ता पण लागणार नाही. बऱ्या बोलाने हे लग्न मोडा नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. पत्रिका छापायला गेलाय ना तो? सुखरूप घरी कसा पोहोचतो तेच बघतो मी! आरतीचे माझ्यावर प्रेम आहे पण तिच्या बापामुळे ती नाइलाजाने या लग्नाला तयार झाली आहे. पण मी हे होऊ देणार नाही. आरती फक्त माझी आहे”. एवढे बोलून फोन कट झाला.
फोनवरील धमकी ऐकुन अलकाबाई मटकन खालीच बसल्या. अमेय नुकताच तापातुन उठलेला, सुहासरावांची तब्येत ही अशी आणि त्यावर आलेली ही धमकी ऐकुन अलकाबाईंच्या पायातील त्राणच निघुन गेले. अलकाबाईंना आता अमेयची खुप काळजी वाटु लागली. त्या अमेयला सारखा फोन लावत होत्या पण तो उचलत नसल्याने त्या आणखीनच बेचैन झाल्या. इकडे अमेय बाईक वरुन शनिवार वाड्याजवळ पोहोचला आणि रास्तापेठेतुन चौकात येत असलेल्या एका टेम्पो चालकाला अचानक रस्त्यात एक काळी आकृती उभी राहिलेली दिसली. तिचा भयानक चेहरा पाहुन त्याने करकचुन ब्रेक लावला पण त्यामुळे टेम्पो स्लिप झाला आणि चौकात सिग्नलला थांबलेल्या अमेयच्या बाईकला त्याने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अमेय हवेत चेंडुसारखा उडाला आणि जवळ पास दहा पंधरा फुट दूर जाऊन पडला. इतरही चार पाच बाईक्स, एक रिक्शा आणि एक कार त्या टेम्पोच्या धक्याने अपघातग्रस्त झाल्या. अमेय रस्त्यात बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्याला मार बसला होता, जागो जागी खरचटले होते. अमेयच्या सुदैवाने त्याची ऑफिस मधील एक सहकर्मी ‘नेहा’ त्याचवेळी तिथुन जात होती. तिने तो एक्सीडेंट पाहिला आणि अमेय रस्त्यावर पडलेला दिसताच ती पटकन तिथे आली. अजिबात वेळ न दवडता तिने ट्रॅफिक हवालदार व इतर पादचाऱ्यांच्या मदतीने अमेयला रिक्षात घालुन ससुनला नेले. अमेयला एडमिट केल्यावर तिने अमेयच्या फोनवरून त्याच्या घरी फोन करून ही धक्कादायक बातमी दिली.
[next] नेहा कडुन अमेयच्या अपघाताची बातमी कळताच गोडबोले कुटुंबावर दु:खाचे आभाळच कोसळले. अलकाबाईंना वाटणारी भीती खरी ठरली होती. नेहा कडुन फोनवर सगळा वृत्तांत कळताच अलकाबाईंना रडुच कोसळले. लगबगीने त्या सुहासरावांबरोबर ससुन हॉस्पिटलला पोहोचल्या. नेहाने त्यांना अमेयला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्याचे सांगितले. तिने तिच्या वडीलांना फोन करून आधीच कळवल्यामुळे तेही तिच्या आई सोबत ससुनला पोहोचले होते. त्यांनी आपल्या ओळखीच्या जोरावर अमेयच्या उपचारांवर डॉक्टर विशेष लक्ष्य देतील याची तजवीज केली होती. नेहाच्या कुटुंबियांनी खुप धीर दिल्यामुळे अलकाबाई आणि सुहासरावांना नेहाचा आणि तिच्या कुटुंबाचा खुप आधार वाटला. दोन तासांनी अमेयचे ऑपरेशन पुर्ण झाले पण तो अजुन शुद्धीवर न आल्यामुळे डॉक्टरांनी त्याला भेटण्यास सर्वांना मनाई केली. नेहाच्या वडीलांनी आपण हॉस्पिटल मध्ये थांबत असुन सर्वांना घरी जाण्यास सांगितले. अलकाबाई ऐकायला तयार नव्हत्या पण त्यांनी त्यांची समजूत घातली की अमेय आता धोक्याच्या बाहेर आहे आणि तसेही तो शुद्धीवर आल्याशिवाय त्याला भेटता येणार नव्हते त्यामुळे सगळ्यांनी तिथे थांबायची काहीच गरज नव्हती. ते स्वतः तिथे थांबले तर काही प्रॉब्लेम झाल्यास तो दूर करण्यास तेच जास्त सक्षम आहेत. शेवटी नेहा आणि तिची आई त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी सोबतीला येतो म्हणाल्यावर त्या तयार झाल्या. तसेच नेहाच्या वडीलांना काही वाटल्यास लगेच फोन करायला सांगुन त्या घराकडे निघाल्या.
घरी पोहोचल्यावर नेहाने पटकन चौघांचा स्वयंपाक बनवला व अमेयच्या आई वडीलांना व स्वतःच्या आईला जेवायला वाढले. कसे बसे दोन घास पोटात टाकुन अलकाबाई व सुहासराव पानावरून उठले. जेवणानंतर लगेचच त्यांनी नेहाच्या वडीलांना फोन करून सर्व काही ठीक असल्याची खात्री करून घेतली. अलकाबाईंनी नेहाला तिच्या वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन पाठवले. परत आल्यावर तिने अमेय ठीक असुन काळजीचे कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे अलकाबाईंच्या जीवात जीव आला. नेहाने सांगितले की अमेय कडुन त्याच्याबाबतीत घडत असलेल्या विचित्र घटनांबद्दल तिला सगळी माहिती अमेय कडुन मिळाली होती. तिच्या वडीलांना तिने याबद्दल सर्व सांगितले होते आणि त्यांनीही त्यांच्या माहितीतील एका सिद्ध पुरुषांच्या कानावर हा विषय घातला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीतरी जाणुन बुजुन अमेयला त्रास देण्यासाठी त्याच्या मागे एक दुष्ट शक्ती लावली आहे आणि तीच या सगळ्याला कारणीभुत आहे. हे ऐकताच अलकाबाईंना संध्याकाळी आलेल्या फोनची आठवण झाली. अलकाबाईंच्या मनातील आरती बद्दलच्या मायेची जागा नकळत द्वेषाने घेतली. ‘नाही लग्न करायचे तर स्पष्ट सांगायचे माझ्या मुलाच्या जीवावर कशाला उठायचे?’ त्या रागाने फणकारत उद्गारल्या.
अमेय शुद्धीत आल्याचा फोन येताच सकाळी सगळेजण दवाखान्यात पोहोचले. पण डोक्याला मार बसल्यामुळे अमेयला स्मृतिभ्रंश झालेला कळल्यावर सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता पसरली. सर्वजण अमेयशी बोलायचा, त्याला काही आठवतंय का हे जाणुन घ्यायचा प्रयत्न करू लागले. गोंधळ वाढल्यावर अमेयला त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी सर्वांना बाहेर जाण्यास सांगुन अमेयला विश्रांती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये काढल्यावर अमेयला काही आठवत जरी नसले तरी बाकी त्याची प्रकृती व्यवस्थित असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. अमेयला पाहण्यासाठी नातेवाईक येऊन जात होते. त्याची स्मृती गेल्याचे कळताच हळहळत होते. आरती आपल्या वडीलांसमवेत अमेयला पाहायला आलेली पाहताच अलकाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या तिला रागाच्या भरात वाट्टेल ते बोलल्या. त्यांचा राग ओसरल्यावर आरतीने रडत रडत आपले एका नरेश नावाच्या मुलावर प्रेम असल्याची कबुली दिली पण तो परजातीतील असल्यामुळे तिच्या वडीलांचा लग्नाला विरोध होता. वडीलांच्या दबावापुढे झुकून आपण या लग्नाला तयार झाल्याचेही कबुल केले. अमेयचे काही वाईट व्हावे अशी आपली इच्छा नव्हती आणि नरेश या थराला जाईल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे सांगत तिने सर्वांची माफी मागितली. आपली चुक उमजताच आरतीच्या वडीलांनी तिची आणि गोडबोले कुटुंबाची माफी मागत तिथुन निघणे उचित समजले. तेव्हा आरतीला नरेशशी बोलून त्याने जे काही केले आहे ते उठवून अमेयच्या जीवाला यापुढे काही धोका होणार नाही असे तिने आश्वासन दिल्यावरच अलकाबाईंनी त्या दोघांना जाऊ दिले.
[next] नेहा रोज सकाळ-संध्याकाळ अमेयला भेटायला येत होती. त्याचे खाणे-पिणे, त्याला काय हवे नको ते जातीने बघत होती. त्याला सर्व आठवावे म्हणुन ती सर्वांबरोबर जीव तोडून प्रयत्न करत होती. त्या सिद्ध पुरुषांकडून आणलेला अंगारा रोज अमेयच्या कपाळाला लावायची. त्यांनी सुरक्षेसाठी दिलेला ताईतही तिने अमेयच्या गळ्यात बांधला होता. अलकाबाई आणि सुहासराव कौतुकाने तिचे अमेय बरा व्हावा यासाठी चाललेले प्रयत्न पाहात होते. नेहाच्या आणि त्यांच्या अथक प्रयत्नाना शेवटी यश आलेच. अमेयची गेलेली स्मृती हळूहळू परत आली. अलकाबाईंनी मायेने नेहाला पोटाशी धरले. दोघींचे डोळे आनंदाश्रुंनी भरले होते. तिच्या नजरेतील अमेय विषयीचे प्रेम एव्हाना सर्वांनाच जाणवले होते. अमेयवरील संकटाने दोन्ही कुटुंबाना नकळत जवळ आणले होते. अलकाबाईंनी तिला जेव्हा “माझ्या अमेयला असेच आयुष्यभर सांभाळशील का?” असे विचारले तेव्हा उत्तरादाखल ती फक्त गोड लाजली. “काय अमेय, आमची मुलगी पसंत आहे ना?” असे नेहाच्या वडीलांनी अमेयला विचारताच अमेयही गालातल्या गालात हसला. ते पाहुन नेहा आणि अमेयच्या घरचे सारेच जण त्या आनंदात सहभागी झाले.
आरतीच्या वडीलांनी तिच्या लग्नाला संमत्ती दिल्यावर ती नरेशसह लग्नाची पत्रिका घेऊन आली. नरेशने आपल्या कृत्यबद्दल अमेयची आणि गोडबोले परिवाराची माफी मागितल्यावर सर्वांनी त्याला मोठ्या मनाने माफ केले आणि त्या दोघांचे तोंड गोड केले. अशा रीतीने अमेयला एवढ्या सगळ्या अग्नीदिव्यांना पार केल्यावर नेहाच्या रुपात सुयोग्य पत्नी मिळाली. म्हणतात ना शेवट गोड तर सर्वच गोड. नांदा सौख्यभरे!
अभिप्राय