विश्वासघात भयकथा (मराठी भयकथा) - संकटात राजवर आपले सर्वस्व गमावण्याची वेळ येते. राज या संकटातुन आपला संसार वाचवू शकतो का? याची रोमहर्षक कहाणी.
चुकीच्या व्यक्तिवर विश्वास ठेऊन, त्याला आपल्या खाजगी व वैवाहिक आयुष्यातील गोष्टी सांगणे?
विश्वासघात भयकथा (मराठी भयकथा)
(Vishwasghaat Marathi Bhaykatha) चुकीच्या व्यक्तिवर विश्वास ठेऊन, त्याला आपल्या खाजगी व वैवाहिक आयुष्यातील गोष्टी सांगणे, साध्या सरळ स्वभावाच्या राजच्या आयुष्यात भयंकर वादळ घेऊन येते. त्या संकटात त्याच्यावर आपले सर्वस्व गमावण्याची वेळ येते. राज या संकटातुन आपला संसार वाचवू शकतो का? याची रोमहर्षक कहाणी
आयुष्यात गोड बोलणारे, सोबत काम करणारे, तोंड ओळख असलेले असे अनेक जण आपल्या सभोवती वावरत असतात. त्यातील सर्वचजण आपल्याबद्दल चांगला विचार करणारेच असतात असे गरजेचे नसते. अशाच एका चुकीच्या व्यक्तिवर विश्वास ठेऊन, त्याला आपल्या खाजगी व वैवाहिक आयुष्यातील गोष्टी सांगणे, साध्या सरळ स्वभावाच्या राजच्या आयुष्यात भयंकर वादळ घेऊन येते. त्या संकटात त्याच्यावर आपले सर्वस्व गमावण्याची वेळ येते. राज या संकटातुन आपला संसार वाचवू शकतो का? याची रोमहर्षक कहाणी.
राज एक उंचपुरा देखणा युवक. शिक्षणात मन रमत नसल्यामुळे कसेबसे पदवीपर्यन्त शिक्षण घेऊन पुढे नोकरीच्या शोधार्थ शहरात आला. काही आवश्यक कोर्सेस करुन त्याने एका नामांकित कंपनीत जॉब मिळवला. वर्ष सरत होती. एकामागुन एक कंपनी बदलत तो नुकताच एका कंपनीत रुजू झाला होता. तिथे एका ट्रेनिंग दरम्यान त्याची भेट कविताशी झाली. कविता एक कर्तुत्ववान आणि हुशार मुलगी होती. हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाच्या राजला पाहाताच क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. तिच्या स्वप्नातील राजकुमाराच्या छबीत राज अगदी चपखल बसला होता. ट्रेनिंग नंतरही कविता सतत त्याच्या संपर्कात राहून त्याला आपल्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करायची. पण तो तिला केवळ मैत्रीण मानत असल्याने थोडे अंतर राखुनच असायचा.
राजच्या घरी त्याचे लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते पण कधी मुलींच्या तर कधी त्यांच्या घरच्यांच्या अवाजवी अपेक्षांमुळे ते काही जमत नव्हते. एक दिवस राजची आई त्याला भेटायला शहरात त्याच्या रूमवर आली असताना अचानक कविता तिथे येऊन पोहोचली. राजने तिची आईशी ओळख करुन दिली. कविताच्या वागण्यातुन तिला राजबद्दल वाटणाऱ्या भावना राजच्या आईच्या चाणाक्ष नजरेतुन सुटल्या नव्हत्या. राजला दुकानातून काही तरी आणायला सांगून त्याच्या आईने त्याला बाहेर पाठवले आणि कविताला राजबद्दल काय वाटते असे विचारले. कविताने पण न लाजता तो आवडत असल्याचे राजच्या आईला सांगितले. पण त्याला ती आवडत नाही हे सांगताना मात्र तिचे डोळे पाणावले. राजच्या आईची खात्री पटली की हीच मुलगी आपल्या मुलाचा संसार नेटाने करू शकेल. कविता गेल्यावर तिने राजला कविता बद्दल विचारले, तेव्हा राजने कविता केवळ आपली मैत्रीण असुन तिच्याबद्दल तशा भावना नाहीत असे सांगुन विषयाला बगल दिली.
गावी परतल्यावर राजच्या आईने सर्व विषय त्याच्या वडिलांच्या कानावर घातला व कविता राजसाठी योग्य वाटल्याचे सांगितले. जातपात मानत नसल्यामुळे अडचण काहीच नव्हती. राजच्या वडिलांनी फोनवर राजला कविताशी लग्न करण्यास काय अडचण आहे असे विचारले. तेव्हा त्याच्या पत्नीबद्दलच्या अपेक्षात ती बसत नाही असे त्याने सांगितले. राज तिस वर्षांचा झाला होता. आधीची दोन लग्न जुळून तुटल्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर जरा नाराजच होते. ते त्याला म्हणाले, “जातीत इतक्या मुली पाहिल्या पण कुठेच काही जमले नाही. मुलगी सुशिक्षित आहे, तुझ्यावर प्रेम करते, तुला व्यवस्थित सांभाळेल. दिसायलाही ठीकठाक आहे आणि तुमची जोड़ी पण चांगली वाटते. तिला विचार, जर हो म्हणाली तर तिच्या घरच्यांशी बोलुन लग्न पक्के करू.” वडिलांच्या शब्दापुढे मान तुकवुन राजने नाईलाजानेच कविताला लग्नाबद्दल विचारले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने लगेच होकार दिला. पुढे महिन्याभरात बोलणी, साखरपुडा वगैरे होऊन लग्न झाले सुद्धा.
जेमतेम सहा महिने गेले असतील, कविता आणि राज मधे वाद व्हायला सुरवात झाली. कविता खुप तापट आणि संशयी स्वभावाची होती. राजचे कोणत्याही मुलीशी वा स्त्रीशी साधे बोलणेही तिला सहन होत नसे. राजच्या कोणा मैत्रिणीचा चुकुन जरी फोन आला तर तिच्या तळपायाची आग मस्तकात जात असे. मोकळ्या स्वभावाच्या राजला ती बंधने सहन होईनाशी झाली. त्याची घुसमट होऊ लागली. रोजच्या कटकटीने, त्याला आता लग्नाला होकार दिल्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागला. तेव्हाच वडिलांना स्पष्ट नकार कळवला असता तर बरे झाले असते असे राजला वाटु लागले. कविताचा स्वभाव त्याने काही प्रसंगातुन ओळखला होता म्हणुनच त्याला ती मैत्रीण म्हणुन ठीक वाटली पण आयुष्याची जोडीदारीण म्हणुन योग्य वाटत नव्हती. आई वडिलांना तो विरोध करू शकला नाही, हे शल्य त्याला सतत टोचत होते. पण लग्न तर करुन बसलो आता कोणाला दोष देण्यात काय अर्थ? नशीब आपले, आता भोगा! अशी स्वतःचीच समजुत घालुन तो दिवस ढकलु लागला.
हळु हळु त्यांची भांडणे वाढु लागली. राजच्या आणि कविताच्या घरच्यांच्या कानावर त्यांची कुरबुर जाऊ लागली. पण नवरा बायकोत भांडणे तर होतातच या अलिखित नियमावर विश्वास ठेऊन दोन्ही कुटुंब, होईल सर्व ठीक म्हणुन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा परिणाम म्हणुन राज आणि कविता एकत्र राहत असुनही मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात होते. जिथे मनंच जुळली नाहीत तिथे शरीरं तरी एकत्र कशी येणार त्यामुळे दोघांचीही चिडचिड अधिकच वाढत होती. अशीच रडतखडत लग्नाला चार वर्ष उलटुन गेली पण मुल काही झाले नाही. वेगळे होण्याचा विचार मनात जोर धरत असल्यामुळे चुकुन माकुन कधी एकत्र आलेच तर मुल होणार नाही याची काळजी राज घेत होता. कारण घटस्फोट द्यायचा तर पोटगी, मुलांचा हक्क आणि पुढील कटकटी त्याला नको होत्या. अशातच राजने आपली नोकरी पुन्हा बदलली. कविताला सुद्धा सरकारी नोकरी लागली, पण दोघांतील धुसफुस काही कमी होण्याची चिन्हे दिसेनात. याचा परिणाम म्हणुन दोन्ही कुटुंबात अशांतता पसरली.
नवीन कंपनीत राजची ओळख सुनीलशी झाली. सुनील एक वाया गेलेला मुलगा होता. सिगरेट, तंबाखु, दारु, वेश्या म्हणाल ते व्यसन त्याला होते. निर्व्यसनी आणि सरळमार्गी राज त्याला वेळोवेळी व्यसनांपासुन दूर राहण्यास आणि आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यास सांगायचा पण सुनील मधे काडीमात्रही फरक पडत नव्हता. दिसायला सुमार असलेला सुनील बोलण्यात उस्ताद होता. समोरच्याला तो आपलेसे करून घ्यायचा आणि मग त्याच्या चांगुलपणाचा फायदा उचलायचा. दुर्दैवाने राज त्याच्या गोड बोलण्याला त्याचा चांगुलपणा समजला. त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करुन आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी त्याच्याशी शेयर करू लागला. अगदी कविता आणि त्याच्या संबंधांबद्दलही सुनीलकडे त्याने सर्व काही सांगुन आपले मन मोकळे केले. सुनीलने राजचे पाणी जोखले होते. सरळ साधा राज आपले काहीही वाकडे करू शकणार नाही, हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. राजवर खाण्यापिण्यात थोडाफार खर्च करुन त्याला आपलेसे करुन घेतले आणि त्याच्याबद्दल सर्व काही माहिती मिळवली.
बोलण्यात ज्या ज्या मुली किंवा स्त्रियांचा उल्लेख राज कडुन झाला होता त्यांची नांवे आणि संदर्भ त्याने निट लक्षात ठेवले. आई आजारी असल्याचे सांगुन त्याने राज कडुन तेरा हजार रुपये उसने मागितले. राजने आपली एफडी तोडून, त्याला ते कविताच्या नकळत दिले सुद्धा. एक दिवस त्याने राजला जेवणाचे सापत्निक आमंत्रण दिले. एका मोठ्या हॉटेलमधे दोघांना बोलावून यथेच्छ खावु घातले. कविताला पाहुन त्याच्या मनात एक कुटील डाव शिजु लागला. राज आणि कविताच्या भांडणाचा गैरफायदा घ्यायचे त्याने मनोमन ठरवले. त्याने कविताला फेसबुक वर शोधुन काढले नुकतीच ओळख झाल्याने तिने देखील त्याला फ्रेंडलिस्ट मधे ऍड केले. हळुहळु त्याने तिचा विश्वास संपादन केला. ती सुद्धा त्याच्या बरोबर सर्व काही शेयर करु लागली. त्याने हळुहळु तिच्या मनात राजबद्दल विष कालवायला सुरवात केली. एकीकडे कविताला तो राज विरोधात भडकवत होता तर दुसरीकडे राजला कविताला सोडण्यासाठी प्रोत्साहित करत होता. आपापसात संभाषण नसल्यामुळे राज आणि कविता सुनीलच्या षडयंत्राला बळी पडून एकमेकांपासून अधिकाधिक दूर जात होते.
मतभेदांची जागा आता द्वेषाने घेतली होती. दोघे सुनीललाच आपला हितचिंतक समजत होते. सुनीलने राजशी बोलण्यात ज्या मुली व स्त्रियांचा उल्लेख झाला होता त्यांच्याशी राजचे अनैतिक संबंध होते हे कविताला संदर्भासहीत पटवुन दिले. आधीच संशयी असलेल्या कविताला आता खात्री पटली होती की राज व्यभिचारी आहे आणि ती त्याला सर्वांसमोर बेइज्जत करण्याची एकही संधी सोडत नव्हती. दोन्ही कुटुंबासमोर राजची छी थु होऊ लागली. तो खोट्या बदनामीमुळे मनाने खचु लागला होता, स्वतःच्या निरपराधित्वाचे पुरावे देऊन तो थकला होता. त्याला हेच कळत नव्हते की कविताला ही सगळी माहिती कोण पूरवत होते. एवढे सगळे उद्योग करूनही सुनील कविताला आपल्या जाळ्यात अडकवण्यात असफल झाला होता, त्यामुळे त्याची खुप चरफड होत होती. कविता राजचा द्वेष करत होती पण त्याला सोडण्याचा विचार तिच्या मनाला शिवतही नव्हता. तिला फक्त त्याला धडा शिकवायचा होता.
सुनील बद्दल कविताला काहीच वाटत नव्हते हे लक्षात येताच काहीही करुन कविताचा उपभोग घ्यायचाच असे ठरवुन तो सकाळीच घराबाहेर पडला. शहराबाहेरील एका स्मशानाजवळ राहणाऱ्या एका अघोरी संप्रदायातील साधुच्या झोपडीजवळ तो आला. वातावरणातील तणावाने त्याच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. वारा पडला होता आणि जळत असलेल्या एका चितेच्या दुर्गंधीने सारा आसमंत भरला होता. त्या अघोऱ्याच्या झोपडीसमोरील एका वठलेल्या विशाल वृक्षावर बसलेली दोन गिधाडं, मान वाकडी करुन त्याच्याकडेच पाहात असल्याचे लक्षात येताच सुनील नखशिखांत हादरला. ती गिधाडे त्याला एकटक पाहात होती जणु काही त्याच्या मरण्याचीच ती वाट पाहात होती. नकळत सुनीलची नजर पण त्यांच्या नजरेत गुंतली आणि तो भारल्यासारखा बराच वेळ त्यांच्याकडे पाहात ऊभा होता. इतक्यात कावळ्यांच्या कर्कश कावकावीने दचकुन तो भानावर आला आणि अघोऱ्याच्या झोपडीच्या दिशेने पावले टाकू लागला. जसजसा तो झोपडीच्या जवळ जाऊ लागला, तसतसा त्याच्या मनावरील ताण अधिकाधिक वाढत होता.
त्याने झोपडीत वाकुन पाहिले तर सर्वांगावर चिताभस्म चोपडलेला एक अजस्त्र अघोरी साधु जमीनीवर नग्नावस्थेत बसुन काही तरी खात होता. निट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो एका माणसाचा हात होता कदाचित बाजुच्या स्मशानात जळत असलेल्या चितेतून त्या अघोऱ्याने तो तोडुन आणला होता. भाजलेल्या मांसाच्या दुर्गंधीने सुनीलला ढवळून आले. तो झोपडीतून बाहेर जाणार इतक्यात त्या अघोऱ्याने त्याच्याकडे वळुन पाहिले आणि ओरडला, “जय काली!” त्याचे डोळे म्हणजे जणू धगधगते अंगार होते.
त्याचे ते भयाण रूप पाहुन सुनील तिथुन पळुन जायच्या बेतात होता पण त्या अघोऱ्याने त्याला आत बोलावले व म्हणाला, “तु अपने दोस्त की स्त्री को पाना चाहता है ना? मैं तुम्हारी मदत करूँगा लेकीन तुम्हे मेरे लिये एक कुंवारी कन्या लानी होगी जिसकी बली चढाकर मैं और भी शक्तिशाली बन जाऊँगा। मैं तुम्हे एक वशीकरण मन्त्र बताऊंगा, जिसके इस्तमालसे तुम्हे वो स्त्री वश हो जायेगी उसके बाद आनेवाली पुरणमासी को तुम्हे मेरे लिए एक कुंवारी कन्या का इंतजाम करना होगा। मंजुर है तो बोलो!” हे ऐकताच सुनीलने थोडा विचार करुन त्या अघोऱ्याला वचन दिले. मग अघोरऱ्याने त्याला आपल्या झोपडीत बसवुन वशीकरण विधी समजावून सांगितला.
‘कामाख्या देश कामाख्या देवी,
जहॉं बसे इस्माइल जोगी,
इस्माइल जोगी ने लगाई फुलवारी,
फूल तोडे लोना चमारी,
जो इस फूल को सूँघे बास,
तिस का मन रहे हमारे पास,
महल छोडे, घर छोडे, आँगन छोडे,
लोक कुटुम्ब की लाज छोडे,
दुआई लोना चमारी की,
धनवन्तरि की दुहाई फिरै।’
“किसी भी शनिवार से शुरू करके ३१ दिनों तक नित्य ११४४ बार इस मंत्र का जाप करें, तथा लोबान, दीप और शराब रखें, फिर किसी फूल को ५० बार अभिमंत्रित करके स्त्री को दे दें। वह उस फूल को सूँघते ही वश में हो जाएगी।”
सुनीलने सर्व विधी समजुन घेतला आणि घरी परतला. ती रात्र कविताचा कशा कशा प्रकारे उपभोग घ्यायचा या विचारात त्याने जागुन काढली. येणाऱ्या शनिवारी त्याने वशीकरण विधीस प्रारंभ केला पण मुळच्या चंचल स्वभावाच्या सुनीलसाठी ती साधना करणे केवळ अशक्य होते. पन्नास एक वेळा मंत्रजाप झाल्यावर लगेचच त्याचे ध्यान भटकु लागले. समोर कविता दिसू लागली तिच्या विषयीच्या वासनेच्या विकारात बरबटलेले त्याचे मन त्याला स्वस्थ बसु देईना. शेवटी हे जप वगैरे आपले काम नाही हे उमजुन तो त्या अघोऱ्याकडे परत आला. अघोरी त्याच्याकडे तुच्छतेने पाहात भयाकारी हसला. “एक दिनभी जाप नही कर पाए और तुम्हे भोगने के लिए स्त्री चाहिए? मुझे पहलेही समझ लेना चाहिये था की तुम जैसे वासनांध व्यक्तिसे जप तप जैसा कोईभी कार्य होना कदापी संभव नही। चला जा यहाँसे वरना तुझेही बली चढाऊँगा।”
ते ऐकताच सुनीलने त्या अघोऱ्याचे पाय धरले व मदतीसाठी विनवले. तेव्हा तो अघोरी म्हणाला, “जिस स्त्री की तुम्हे लालसा हैं, वो इतनी आसानीसे तुम्हारे हाथ नहीं लगेगी। तुम्हे उसे अपने पतीसे दूर करना होगा, और उसके बादही तुम उसे तुम्हारे पास आने के लिए विवश कर पाओगे।” “लेकीन ये कैसे संभव है महाराज? मैंने हर मुमकिन कोशिश करके देख ली पर कोई फायदा नहीं हुवा।” सुनीलने असे म्हणताच तो अघोरी त्याला म्हणाला, “वो तुम जैसे तुच्छ इंसान के बसकी बात नही हैं। उसके लिये हमें किसी अमानवी ताकद की सहायता लेनी होगी, आओ मेरे साथ।” असे म्हणुन तो सुनीलला घेऊन झोपडीसमोरील झाडाजवळ आला आणि दारुमध्ये दोन बोटे बुडवून ती त्याने दोन्ही डोळ्यांना लावली. नंतर स्वतः जवळील भस्म चिमटीत धरून तो काही मंत्र म्हणु लागला.
मंत्र पूर्ण होताच त्याने ते भस्म फुंकर मारून सगळीकडे उडवले त्याबरोबर त्याला आजुबाजुला वावरणारे सर्व आत्मे दिसू लागले. त्यातील काही शांत होते तर काही अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. काही भेसुर रडत होते तर काही मुसमुसत होते. त्यातील जे सर्वात जास्त अस्वस्थ हालचाली करत भेसुर रडत होते त्याला त्याने आपल्या कामासाठी निवडले कारण त्याच्या इच्छा अतृप्त असल्यामुळे त्याला वश करणे सोपे होते.
त्याने पुन्हा दारुमधे दोन बोटे बुडवून त्या बोटांच्या चिमटीत भस्म धरून मंत्र उच्चारण सुरु केले, त्यासरशी तो आत्मा अधिकच किंचाळु लागला व वेगाने हालचाल करू लागला. अघोऱ्याने ते भस्म त्याच्या दिशेने फुंकताच त्या आत्म्याने मुर्त रूप धारण केले आणि अघोऱ्या समोर येऊन तरंगु लागले.
अघोरी! तुने मुझे बंदी क्यु बनाया हैं?
ते भयानक पिशाच्च पाहुन सुनीलची तर बोबडीच वळली. ते पिशाच्च आळीपाळीने अघोरी आणि सुनीलकडे पाहात किंचाळत म्हणाले, “अघोरी! तुने मुझे बंदी क्यु बनाया हैं? मुझे आजाद करदे वरना मैं तुम दोनोंको जान से मार डालुंगा।” त्यावर अघोरी म्हणाला, “तुम्हे मेरा एक काम करना होगा उसके बाद मैं तुम्हे आजाद कर दुंगा। पर तुमने मुझे धोका दिया तो तुम्हे बहुत पिडा दुंगा और तुम मेरा कुछ भी नहीं बिगाड़ सकते, इस लिये जो कहता हु वो कर।” अघोरीच्या बंधनातुन सुटका होणे अशक्य आहे याची जाणीव झाल्यावर ते पिशाच्च त्याला म्हणाले, “ठीक हैं बताओ मुझे क्या करना हैं?” अघोरीने त्याला कविताच्या शरीरात शिरून तिला आणि तिच्या नवऱ्याला त्रास द्यायला सांगितले, जेणे करुन राज कंटाळून तिला सोडुन देईल आणि मग तिला वश करणे सोपे होईल.
मध्यरात्रीच्या सुमारास ते पिशाच्च राजच्या घरासमोर आले आणि अदृश्य रुपात दरवाज्यातून आरपार गेले. ते कविताला शोधत घरातील बेडरूममधे आले. राज आणि कविता आपल्या भांडणाचा त्या दिवसाच्या कोटा पुरा करुन एकमेकांकडे पाठ करुन झोपले होते. ते पिशाच्च कविताच्या शरीरावर फुटभर अंतरावर तरंगत होते. बेडरूम मधील वातावरण अचानक खुप थंड आणि जड झाल्यामुळे कविताची झोप चाळवली गेली. ती कुस बदलून पाठीवर वळली. तहानेने घसा कोरडा पडला असल्यामुळे तिला जाग आली आणि आपल्या शरीरावर तरंगत असलेल्या त्या हिडिस आणि भयंकर अशा पिशाच्चाला पाहुन तिच्या तोंडातील किंकाळी तोंडातच विरली. भीतीने तिचे शरीर थरथर कापु लागले. मदतीच्या आशेने तिने राजकडे पाहिले तर तो पांघरुण अंगावर ओढुन गाढ झोपला होता. तिची नजर परत त्या पिशाच्चाकडे गेली. तिच्याकडे पाहुन ते कुत्सित हसले. “अब तुम्हे तुम्हारा पति तो क्या भगवान भी बचा नहीं सकता।” म्हणत एक विकट हास्य केले.
कविताला आपल्या शरीरावर प्रचंड दबाव त्यावेळी जाणवला ती घुसमटली, हात पाय झाडत तिने राजला हाक मारायचा प्रयत्न केला पण घशातुन आवाजच फुटत नव्हता. तिने राजला हलवण्यासाठी आपला हात त्याच्या दिशेने सरकवायचा प्रयत्न केला पण तो तसुभरही हलला नाही. तिच्या शरीरावर जणु तिचा कंट्रोलच उरला नव्हता. अत्यंत आगतिक अवस्थेत ती राजकडे पाहात होती. आज खऱ्या अर्थाने तिला राजची गरज वाटत होती पण तो तिच्या जवळ असुनही खुप दूर होता. त्या पिशाच्चाने सुक्ष्म रूप धारण करुन तिच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला. आपल्याच शरीराच्या एखाद्या कोपऱ्यात आपण कैद होत असल्यासारखे तिला जाणवू लागले. तिचे मन राजला साद घालत होते पण तिचा आवाज राजपर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते.
सकाळ होताच त्या पिशाच्चाने कविताला आपल्या तालावर नाचवायला सुरवात केली. एक सणसाणित लाथ झोपलेल्या राजच्या पाठीत बसली आणि तो बेडवरुन खाली फेकला गेला. झोपेत बेसावध असताना जमीनीवर दाणकण आदळल्यामुळे त्याला चांगलाच मार बसला. वेदनेने कळवळत त्याने कविताकडे पाहिले, ती त्याच्याकडे पाहात खुनशी हसत होती. तिच्या डोळ्यात त्याला प्रचंड तिरस्कार आणि द्वेष दिसला. खाऊ की गिळू अशा नजरेने ती राजकडे पाहात होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहुन क्षणभर राजही मनातुन चरकला. तिला जाब विचारायचे धाडस काही त्याला झाले नाही. पाठ चोळत तो कसाबसा उठला आणि बाहेर जाऊ लागला तशी कविता खदाखदा भेसुर हसु लागली. तिचा तो अवतार पाहुन ही आपली पत्नी नसुन दुसरीच कोणीतरी असल्याचे राजच्या मनात आले. पण तो विचार मनातुन झटकुन टाकत मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायची त्याने ठरवले आणि किचन मधे ब्रेकफास्ट बनवण्यासाठी गेला.
इकडे कविता आतल्याआत रडत होती भेकत होती, “राज मला माफ कर, मी नाही तुला लाथ मारली रे!” पण ती पूर्णपणे त्या पिशाच्चाच्या कह्यात गेली होती. राजने पटापट आवरुन नाष्टा आणि डबा बनवला. कपडे बदलण्यासाठी तो बेडरूम मध्ये गेला तर कविता त्याच्याकडे रागाने पाहात बाहेर निघुन गेली. राजच्या टिफिन मधील भाजीत तिने दोन तिन चमचे मिर्चीपुड बेमालुमपणे मिसळली आणि आवरायला निघुन गेली. तिला बाय न करताच तो आपला टिफिन घेऊन चुपचाप निघुन गेला. पुर्ण रस्ता तो कविताला नक्की झालय तरी काय हाच विचार करत होता. कविता आवरुन ऑफिसला गेली. तिचा दिवस ठीक-ठाक गेला. राज जसा ऑफिसला पोहोचला, तसा त्याने सुनीलला झालेला सगळा प्रकार सांगितला. तो ऐकुन त्याला मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. ‘ये तो बस शुरवात हैं आगे आगे देख होता है क्या’ असे मनात म्हणत त्याने राजला कविताला वेड लागले असावे असे सांगितले आणि अजुन काही विपरित घडण्याआधी तिला सोडुन दे असे सुचवले.
दुपारी पहिला घास तोंडात घालताच राजच्या तोंडाची होळी झाली. त्याने निट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की भाजीत खुप जास्त मिर्चीपुड टाकली होती, हे काम कविताचेच असावे अशी त्याची खात्री पटली. बिचारा दिवसभर उपाशीच राहीला. संध्याकाळची मानसोपचार तज्ञांची भेट घेऊन त्याने सर्व वृत्तांत त्यांना कथन केला. त्यांनी शरीर संबंधांचा अभाव हे कविताच्या अशा विचित्र वागण्यामागचे कारण असावे असा निश्कर्ष काढला व राजला थोडे प्रेमाने आणि समजुतीने घ्यायला सांगितले. कविताला आवडणारे मोगऱ्याचे गजरे आणि काजु कतली घेऊन तो घरी आला. कविता किचनमधे जेवण बनवत होती. डायनिंग टेबलवर हातातील पिशवी ठेऊन तिला सरप्राइज द्यावे असा विचार करुन तो कपडे बदलण्यासाठी बेडरूम मध्ये गेला तर त्याच्या सर्व कपड्यांवर कुंकु टाकलेले त्याला दिसले. एक शर्ट त्याने हातात घेतला, कात्रीने त्याच्या चिंध्या केलेल्या दिसताच त्याचा रोमॅंटिक मुड नाहीसा झाला आणि कविताला जाब विचारायला तो तणतणत किचनमधे गेला.
समोरचे दृश्य पाहुन त्याचे पाय दारातच खिळले. त्याने आणलेले मोगऱ्याचे गजरे पुर्ण किचनभर पसरले होते आणि किचनच्या एका कोपऱ्यात कविता केस पिंजारलेल्या अवस्थेत मांसाचे लचके तोडावे तसे पॅकेट न फोडताच कागदासकट काजु कतलीच्या पॅकेटचे लचके तोडुन खात होती. राज दरवाज्यात येताच ती खायची थांबली आणि गरकन वळुन तिने राजकडे पाहिले. सकाळ सारखीच तिची भयाण नजर राजच्या काळजाचा थरकाप उडवून गेली. राजच्या हातातील चिंध्या झालेला शर्ट गळुन पडला. तो तसाच धावत घराबाहेर पडला आणि त्याने सुनीलला फोन लावला. त्यावेळी सुनील बारमध्ये दारु पित बसला होता. त्याने आपण बारमध्ये असुन आजची रात्र घरी न जाता एखाद्या मित्राकडे काढण्यास राजला सांगितले. इकडे सुनीलवर दारुचा अंमल पुरता चढला होता, त्यात कविता विषयीची त्याची वासना उफाळून आली. आता त्याला कविता खेरीज काहीच सुचेनासे झाले. तो हेही विसरला की कविताला पिशाच्चाने पछाडले आहे. रिक्षा पकडुन तो तडक राजच्या घरी निघाला.
राजच्या घराची बेल त्याने वाजवली तसे कविताने दार उघडले. दार उघडताच तो कवितावर तुटून पडला. त्याला दाराबाहेर लोटत ती स्वतःची सुटका करू पाहात होती, पण लाथेने दरवाजा ढकलुन वासनेच्या चिखलात बरबटलेला तो डुक्कर मुसंडी मारून आत आला. कविताला जमिनीवर आडवे पाडून तो तिच्यावर झुकला तसा कविताचा अवतारच बदलून गेला. अचानक तिच्या शरीरात त्या पिशाच्चाने प्रवेश केला. आपल्या सावजाला कोणी दूसरा पुरुष काबिज करायचा प्रयत्न करतोय हे त्या पिशाच्चाला सहन झाले नाही. कविताने उजवा पाय सुनीलच्या पोटात दाबला त्याचे दोन्ही हात हातात धरून जोर लाऊन सुनीलला डोक्यावरून पुढे फेकुन दिले. सुनील फुटबॉल सारखा उडुन जाऊन समोरच्या भिंतीवर आदळला. त्याच्या डोक्याला आणि खांद्याला सपाटुन मार लागला होता.
अपमानाने आणि बदल्याच्या विचाराने पेटुन उठलेल्या सुनीलने पुन्हा तिच्यावर हल्ला केला. तिने दोन हातात त्याची मान अशी काही पिरगळली की ती पुर्णपणे उलटी फिरली. सुनीलचा खेळ संपला होता. समोरच्या उघड्या गॅलरीतुन सुनीलचे कलेवर एखादा कागदाचा बोळा भिरकवावा तितक्या सहजतेने तिने भिरकावून दिले. सुनीलचे प्रेत शंभर एक फुट दूर, रस्त्यावरून सुसाट चाललेल्या एका लोडेड कंटेनर खाली आले आणि त्याचा चेंदामेंदा झाला. ड्रायव्हरला क्षणभर काही कळलेच नाही. दारुच्या नशेत कंटेनर दामटत तो तसाच सुसाट निघुन गेला. सुनील कुत्र्याच्या मौतीने मेला होता, अगदी कोणाच्याही नकळत! प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे इतर ट्रक व मोठ्या गाड्या त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवत निघुन गेल्या. थोड्याच वेळात त्याच्या शरीराचा मागमुसही उरला नव्हता.
राजने दुपारीच सगळा प्रकार वडिलांच्या कानावर घातल्याने ते तातडीने शहराकडे रवाना झाले. त्यांनी गावच्या मांत्रिकाला पण सोबत घेतले होते. फोन करुन राजला त्यांनी बसस्टॅंड वर बोलावून घेतले. तिथुन तिघंही राजच्या घरी आले. काही झालेच नाही अशा आविर्भावात कविताने दरवाजा उघडत त्यांचे स्वागत केले. भितभितच राज सर्व प्रथम आत आला, पाठोपाठ त्याचे वडील आले पण मांत्रिक दारातच थबकला त्याला काहीतरी अमानवीय अस्तित्व त्या घरात असल्याचे जाणवले होते. मांत्रिकाला पाहाताच कविताच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य गायब झाले आणि त्याची जागा द्वेषाने घेतली. मांत्रिकावर जळजळीत नजर टाकत ती मोठ्याने पुरषी आवाजात ओरडली, “ये क्यु आया है यहाँ? अभी लौट जाओ नहीं तो पछताओगे” आणि भेसुर हसु लागली.
मांत्रिकाने आपल्या झोळीतील विभुति काढून तिच्या कपाळावर लावताच ती किंचाळत आत पळाली. हा प्रकार राज आणि त्याचे वडील थिजल्यासारखे पाहात होते. मांत्रिकाने डोळे बंद करुन समाधी लावताच त्याला सर्व प्रकार समजला. त्याने कविता वर एका अघोऱ्याने सुनीलच्या सांगण्यावरून राजला त्रास देण्यासाठी एक भयानक पिशाच्च सोडले असुन तिला वाचवण्यासाठी एक अनुष्ठान करावे लागेल असे सांगितले. मांत्रिकाने कविताच्या कपाळावर विभुति लावुन मंत्र म्हणत उजवा आंगठा दाबुन ठेवल्यामुळे ते पिशाच्च केवळ गुरगुरत कविताच्या शरीरात निपचित पडले होते. ही संधी साधुन राजने कविताला बेडला जखडुन टाकले. मांत्रिकाने एक ताईत मंत्रुन तिच्या गळ्यात घातला आणि समाधी लावुन जमीनीवर बसला. इकडे झाला सर्व प्रकार ध्यानस्थ अघोऱ्याला त्याच्या मंत्र सामर्थ्यामुळे समजला होता. मांत्रिकाने आपल्या साधनेच्या जोरावर आपले शरीर राजच्या फ्लॅटवरच सोडून सुक्ष्म देह धारण केला आणि क्षणात त्या अघोऱ्यासमोर येऊन ऊभा राहीला.
जमीनीपासून फुटभर उंचीवर तरंगणारा मांत्रिकाचा सुक्ष्म देह पाहुन अघोरी समजुन चुकला, की त्याचा सामना एका प्रचंड शक्तिशाली मांत्रिकाशी झालाय आणि त्याला हरवणे त्याच्या शक्तीच्या पालिकडचे आहे. मांत्रिकाने त्याला त्या पिशाच्चास मुक्त करण्यास आणि तिथुन कायमचे दूर निघुन जाण्यास सांगितले. त्याबरोबर अघोऱ्याने कसलेही आढेवेढे न घेता भस्म चिमटीत धरून काही मंत्र पुटपुटत ते हवेत फुंकले आणि त्या पिशाच्चास बंधनमुक्त केले. खात्री पटताच मांत्रिकाने पुन्हा एकदा अघोऱ्यास तेथुन निघुन जाण्यास बजावले आणि क्षणात तिथुन गायब होऊन राजच्या फ्लॅटमधील आपल्या शरीरात प्रवेश केला कारण अघोऱ्याच्या बंधनातुन मुक्त झाल्यावर पिशाच्चावरील त्याची मालकी संपल्यामुळे ते राज आणि कविताला हानी पोहोचवु शकत होते तसेच मांत्रिकाने सुक्ष्म शरीर धारण करुन आपला देह तिथेच सोडल्यामुळे त्याच्या देहाचाही ते ताबा घेऊ शकत होते.
परत सचेत होताच त्या मांत्रिकाने आपल्या कडील छोट्या अग्नीकुण्डात अग्नी प्रज्वलित केला आणि मंत्र म्हणत त्यात काही समिधा टाकल्या नंतर त्याने आपल्या झोळीतुन एक बाहुले काढले. आपल्याकडील विभुतिने त्याने जमिनीवर एक मंडल काढले त्यामधे कुंकवाने एक तारा काढला. त्याच्या ५ त्रिकोणात ५ कवड्या ठेवल्या आणि मधल्या पंचकोनात ते बाहुले ठेवले. नंतर कविताच्या आणि त्या बाहुल्याचा कपाळावर काळी हळद चोपडली आणि मंत्र म्हणत गोमुत्र शिंपडले त्याबरोबर कविता प्रचंड तडफडू लागली तिच्या तोंडून जंगली श्वापदांसारखी गुरगुर ऐकू येत होती. मांत्रिकाने आव्हान करताच ते पिशाच्च कविताच्या शरीरातून अनिच्छेनेच बाहेर पडले आणि त्याने त्या बाहुल्यामधे प्रवेश केला. पिशाच्चाने कविताचे शरीर सोडताच ती एकदम शांत झाली आणि इकडे ते बाहुले सजीव झाले.
बाहुले जीवंत होताच क्षणी त्या मांत्रिकाने मंत्र म्हणत त्या बाहुल्याला उचलून अग्निकुंडात टाकले आणि पिशाच्चमुक्ती मंत्र म्हणत विभुति फुंकु लागला. भयाण किंचाळत ते पिशाच्च तिथुन नाहीसे झाले आणि त्या अग्नीत ते बाहुले जळुन नष्ट झाले. कविता आता पुर्णपणे मुक्त झाली होती. राजने तिचे बंध सोडताच ती राजची माफी मागत त्याच्या मिठीत शिरली आणि तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करुन दिली. राजने देखील तिला माफ करुन आपल्या हृदयाशी धरले. काम यशस्वीरित्या पुर्ण झाल्याचे समाधान मांत्रिकाच्या चेहऱ्यावर विलसत होते. त्याने राजच्या वडिलांना सर्व काही ठीक झाल्याचे सांगितले आणि राज व कविताला आशीर्वाद देऊन तो आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ झाला.
सुनील सारख्या विश्वास घातकी माणसावर विश्वास ठेऊन आपली वैयक्तिक माहिती सांगण्याची मोठी किंमत राज आणि कविताला मोजावी लागली होती पण ‘अंत भला तो सब भला’ या उक्तिनुसार झाले गेले सर्व काही विसरून त्यांनी नव्याने आपला संसार सुरु केला. इकडे सुनील, पिशाच्च बनुन त्या गिधाडे बसलेल्या झाडाच्या, वठलेल्या फांदीवर उलटा लटकुन अघोऱ्याची वाट पाहु लागला...
विश्वासघात भयकथा (मराठी भयकथा) संबंधी महत्त्वाचे दुवे:
- केदार कुबडे
Thik hoti story... Evdh kahi भयानक navat
उत्तर द्याहटवा