सुडचक्रभेद, मराठी भयकथा - सर्वनाशाच्या सीमेवर पोहोचल्यामुळे त्या सुडचक्राचा भेद करण्यासाठी कुटुंबियांनी लढवलेल्या अजब शक्कलेची रंजक कहाणी सुडचक्रभेद.
दोन मित्रांच्यात जिवंतपणी सुरु झालेले सुडचक्र त्यांच्या मृत्युनंतरही सुरु राहीले. दोन्ही कुटुंब सर्वनाशाच्या सीमेवर पोहोचल्यामुळे त्या सुडचक्राचा भेद करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी लढवलेल्या अजब शक्कलेची रंजक कहाणी म्हणजेच सुडचक्रभेद.
सुडचक्रभेद - मराठी भयकथा
‘सुड’ आणि ‘प्रतिशोध’ला मिळालेल्या अभुतपूर्व प्रतिसादानंतर वाचकांच्या आग्रहास्तव ‘सुड’ या कथेचा तिसरा भाग सादर करतोय. ज्या वाचकांनी सुड आणि ‘प्रतिशोध’ ह्या कथा अजुन वाचल्या नाहीत त्यांनी आधी त्या वाचुन मगच सुडचक्रभेद ही कथा वाचावी अशी सर्वांना नम्र विनंती आहे जेणेकरून कथेचे तिन्ही भाग सलग वाचल्यामुळे कथेचा पुरेपुर आनंद लुटता येईल.
एक सुडचक्र पुर्ण झाले होते, खरंच?
सात्विकने आपल्या वडिलांच्या मृत्युचा, भगवानदासांकडुन बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाचा म्हणजे आपल्याच शालेय मित्र गोपाळचा, त्याच्या मैत्री आणि विश्वास या पैकी कशाचाही मुलाहीजा न बाळगता अमानवीय ताकदींच्या मदतीने खुन करवला. रुबी, जिच्या मदतीने गोपाळरावांचा सर्व पैसा काबीज करुन त्यांना भिकेला लावले; तिलाही त्याने आपल्या मार्गातुन अत्यंत हुशारीने दुर केले. दहा एक वर्ष मनात खदखदत असलेल्या सुडाला खतपाणी घालुन इतके वाढवले की भगवानदासांच्या संपुर्ण कुटुंबाची वाताहात लावली. एवढे करूनही त्याने काय साधले? त्याच्या पापांचा घडा भरल्यावर त्यालाही अत्यंत पिडादायक पद्धतीने मृत्युला सामोरे जावे लागले. गोपाळरावांनी वडीलांच्या सल्ल्याला धुडकावून स्वत:च्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली. सात्विकच्या नादाला लागून केवळ कमावलेला पैसा, इज्जत, पित्याचा आणि पत्नीचा दोघांचाही विश्वासच नाही तर स्वत:चा जीव पण गमावुन बसले. सात्विकचा सुड उगावल्यावर स्वत: मुक्त झाले पण मागे मात्र आपल्या पत्नी, मुलगा आणि वडीलांच्याही सर्व इच्छा आकांक्षाना तिलांजली देऊन त्यांना दु:खाच्या आगीत होरपळायला सोडुन गेले. सात्विक आणि गोपाळरावांच्या या सुडचक्रात त्या दोघांचे आणि रुबीचे अशी तीन कुटुंब उध्वस्त झाली. खरच, काय साध्य झाले यातुन? आणि जे काही साध्य झाले त्याचे मुल्य सात्विक, रूबी आणि गोपाळरावांच्या जीवापेक्षा का अधिक होते? एवढे करूनही हे सुडचक्र इथेच थांबले असते तरी ठीक होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या नशिबात पुढे काय वाढुन ठेवले आहे याची पुसटशी कल्पनाही सात्विक आणि गोपाळरावांच्या कुटुंबियांना नव्हती.
सात्विकच्या मृत्युची बातमी भगवानदासांना मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मुलाचे वर्षश्राद्ध करताना आपल्या मुलाला एक वर्षानंतर का होईना, पण न्याय मिळाला या भावनेने त्यांचे डोळे भरून आले. गोपाळरावांच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल या विचाराने त्याचे दु:ख थोडे हलके झाले. श्राद्धाचा कार्यक्रम उरकुन महादेवासह जड अंत:करणाने ते आपल्या घरी परतले. दरवाज्यातून त्यांनी पाऊल आत टाकले तोच त्यांचा लाडका कुत्रा शेरू विचित्रपणे गुरगुरु लागला. भगवानदासांपाठोपाठ महादेव आत आल्यावर तर तो बेफाम झाला आणि मोठ मोठ्याने भुंकु लागला. शेरुच्या या विचित्र वागण्याचे भगवानदासांना मोठे आश्चर्य वाटले. त्याला चुचकारत ते झोपाळ्यावर बसले आणि महादेव हातातील सामान ठेवण्यासाठी घरात गेला. शेरू अजुनही दरवाज्याकडे पाहात गुरगुरत होता. कधी दोन पावले पुढे जाऊन जोरजोरात भुंकायचा तर कधी घाबरुन मागे यायचा. जसे त्याचे भुंकणे वाढले तसे भगवानदास वैतागले, “अरे कशाला भुंकतोस एवढा? कोणी नाही तिथे! चल जा घरात”! असे म्हणत त्याला हाकलण्यासाठी हात वर करत ते झोपाळ्यावरून उठले, इतक्यात थंड वाऱ्याचा एक जोरदार झोत उघड्या दारातून आत शिरला तो एवढा वेगात आला की त्यामुळे तोल जाऊन भगवानदास मागच्या मागे झोपाळ्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला झोपाळ्याची लोखंडी कडी लागुन खोक पडली आणि भळाभळा रक्त वाहू लागले. ते पडतात तोच तो वारा शेरुकडे वळला आणि पापणी लवायच्या आत ऑलसेशियन जातीचा आडदांड शेरू एखाद्या चेंडु सारखा सोफ्याखाली फेकला गेला.
[next]भगवानदासांचा वेदनेने भरलेला आवाज ऐकुन राधाबाई आणि महादेव धावतच बाहेर आले. आपल्या सासऱ्यांना रक्ताने भिजलेले पाहुन राधाबाईंना भोवळच आली. त्यांच्या मागुन धावत आलेल्या गंगुने त्यांना वेळीच पकडले म्हणुन बरे नाहीतर त्या जमिनीवरच कोसळायच्या. महादेवाने भगवानदासांना उठवुन बसवले आणि शेवंताला पटकन किचनमधुन हळद आणायला सांगितले. तिने हळद आणताच त्याने चिमुटभर हळद आपल्या मालकांच्या जखमेवर दाबुन धरली. थोडे पाणी प्यायल्यावर भगवानदासांना थोडी हुशारी वाटु लागली. शेरुच्या विव्हळण्याचा आवाज ऐकु आल्यावर त्यांची नजर त्याला शोधु लागली. सोफ्याखाली अंगाचे मुटकुळे करुन विव्हळत असलेल्या शेरुला पाहुन ते लगबगीने उठले व त्याला बाहेर बोलवु लागले. कसाबसा खुरडत लंगडत तो बाहेर आला. त्याचे पुर्ण शरीर थरथरत होते. त्याला प्रेमाने उचलुन घेतल्यावर तो वेदनेने विव्हळला म्हणुन त्यांनी नीट पाहीले तर शेरुच्या पायाला झालेली भली मोठी जखम पाहुन त्यांचा जीव वरखाली झाला. शेरुला ते पोटच्या पोरासारखी माया करत असत आणि शेरुचाही त्यांच्यावर तेवढाच जीव होता. तातडीने ते शेरुला जनावरांच्या डॉक्टरकड़े घेऊन गेले. डॉक्टरांनी शेरुला तपासले. एक्स रे मधे शेरुच्या मागच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. लगेच त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले. तिथुन परतत असताना महादेवाच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टर कडुन स्वत:च्या जखमेचेही ड्रेसिंग करुन, खबरदारी म्हणुन टिटॅनसचे इंजेक्शन पण घेतले.
घरी आल्यावर विश्रांती घेत असताना पुन्हा एक वाऱ्याचा थंड झोत अंगावरुन गेल्यामुळे त्यांची निद्रा भंग झाली आणि झालेल्या प्रसंगावर ते विचार करू लागले. शेरुचे दरवाज्याकडे पाहत विचित्र गुरगुरणे, घाबरणे, वाऱ्याचा झोत आकस्मिकपणे आत शिरणे आणि त्यांना व शेरुला त्याने कस्पटासारखे उडवणे सगळेच अनाकलनिय वाटत होते. काहीच संदर्भ लागत नसल्याने शेवटी त्यांनी तो विचार झटकुन टाकला व झोपेच्या अधीन झाले. इतर कोणाच्याही लक्षात आले नसले तरी त्या इमानी प्राण्याने बरोबर ओळखले होते. भगवानदास परत येताना आपल्या सोबत काहीतरी अमंगळ आणि अमानवीय घेऊन आले होते. जे चांगले तर नव्हतेच पण भगवानदास आणि कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आले होते आणि ते खुप ताकदवान होते. भगवानदासांवरील हल्ला ही त्या घरातील सदस्यांवर येऊ घातलेल्या संकटांची नांदीच होती. त्या दिवसानंतर घरात खुप विचित्र अनुभव येऊ लागले.
एक दिवस छोट्या रोहितला बाथरूममध्ये आंघोळीला बसवुन राधाबाई टॉवेल आणायला म्हणुन बेडरूममध्ये गेल्या आणि रोहितच्या किंकाळीने त्यांच्या हृदयात धस्स् झाले. हातातील टॉवेल तसाच टाकुन त्या बाथरूमकडे धावल्या आणि क्षणभर दारातच थबकल्या. उकळत्या पाण्याने भरलेली बादली रोहितच्या अंगावर उपडी झाली होती आणि तो त्यामुळे गंभीर भाजला होता. त्याचे शरीर लाल लाल झाले होते आणि त्याच्या शरीरातुन वाफा निघत होत्या. राधाबाईंनी पटकन थंड पाण्याचा नळ सुरु करुन पाईपने त्याची धार रोहितच्या डोक्यावर धरली. लहानगा रोहित वेदनेने कळवळत होता त्याला राधाबाईंनी उचलुन छातीशी कवटाळले तसा तो प्राणांतिक वेदनेने किंचाळला व रडु लागला. राधाबाईंनी चमकुन पाहीले तर त्याच्या पाठीवरची कातडी निघुन त्यांच्या हातावर चिकटली होती. ते पाहुन त्यांचा जीव गलबलला आणि काय करावे ते न सुचल्यामुळे त्या ढसाढसा रडु लागल्या. रामा गड्याने फोनवर सगळा वृत्तांत भगवानदासांना कळवताच ते तातडीने डॉक्टरांना सोबत घेऊनच घरी आले. रोहित दुसऱ्या डिग्रीपर्यंत भाजला होता त्यामुळे डॉक्टरनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवायचा निर्णय घेतला. सगळ्यांचा लाडका असलेल्या रोहितची ती अवस्था घरातील नोकर माणसांपासुन सर्वांचेच काळीज हेलावून गेली.
[next]हॉस्पिटलमध्ये रोहित सोबत राधाबाई थांबल्या होत्या आणि मदतीला शेवंता होतीच. भगवानदास रोज सकाळ संध्याकाळ जातीनं जेवणाचा डबा घेऊन येत असत, चौकशी करुन काय हवं नको ते पाहुन जात असत. दुकानाकडेही त्यांना लक्ष द्यावे लागत होते. पंधरा दिवसांच्या सेवा सुश्रुशेनंतर हळुहळु रोहितची त्वचा पुर्ववत होऊ लागली. त्याला पुर्ण बरे व्हायला महिन्याहुन जास्त कालावधी लागला. सुदैवाने तो लहान असल्यामुळे सर्व जखमा लवकर भरल्या आणि शरीरावर कुठेच व्रण राहीले नव्हते. स्पंज बाथ देताना होणाऱ्या गुदगुदल्यांमुळे रोहितच्या चेहऱ्यावर हसु येत असे ते पाहुन राधाबाईंच्या जीवाला खुप शांतता मिळत असे. इतके दिवस आपल्या प्राणप्रिय मुलाला भोगाव्या लागलेल्या यातनांबद्दल मनातल्या मनात त्या स्वत:लाच दोष देत होत्या. रोहितला डिस्चार्ज मिळाल्यावर त्या आपल्या सासऱ्यांना म्हणाल्या की माझेच चुकले. मी रोहितला बाथरूममध्ये एकटे सोडुन जायलाच नको होते. त्याने गरम पाणी अंगावर घेतले असणार आणि नको तो अनर्थ घडला. भगवानदास त्यांची समजुत घालणार इतक्यात त्यांच्या मांडीवर निजलेला रोहित पटकन म्हणाला की, “आई! मी तर पाण्याला हात पण लावला नव्हता, तु बाहेर गेल्यावर गरम पाण्याची बादली आपोआप हवेत वर गेली आणि सगळे पाणी माझ्या डोक्यावर सांडले. खरच तुझी शप्पथ”!. त्याचे ते उदगार ऐकताच भगवानदासांच्या अंगावर सरकन काटा आला. ‘चल, काहीही सांगु नकोस. तुच खोडी केली असणार म्हणुन भाजलास. बादली अशी हवेत आपोआप कशी काय वर जाईल? उगीच माझी खोटी शप्पथ घेऊ नकोस’, राधाबाई रोहितला दटावत म्हणाल्या. ‘अगं आई खरच!’ रोहित काकुळतीला येऊन म्हणाला. तसे “बरं बरं तसेच असेल जा खेळ जा”, म्हणत भगवानदासांनी विषयाला तिथेच पुर्णविराम दिला.
रात्री जेवण झाल्यावर भगवानदासांनी रोहितला झोपवून झाल्यावर राधाबाईंना काही महत्वाचे बोलायचे असल्यामुळे आपणास भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे राधाबाई हॉलमध्ये आल्या. झोपाळ्यावर चिंताक्रांत बसलेल्या आपल्या सासऱ्यांना पाहुन त्यांचे मन निरनिराळ्या शंकांनी ग्रासले. “काय झाले मामंजी”?. राधाबाईंच्या प्रश्नाने भगवानदास भानावर येत म्हणाले, “सुनबाई! रोहितच्या वाक्याने मी आज नखशिखांत हादरलो”. राधाबाई काही बोलणार तोच त्यांना हातानेच थोपवत ते पुढे म्हणाले, “तु हॉस्पिटलमध्ये होतीस म्हणुन तुला काही सांगितले नाही पण आता सांगणे मला गरजेचे वाटते. गोपाळचे वर्षश्राद्ध केल्यापासून घरात खुप विचित्र घटना घडु लागल्या आहेत. रोहितला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्याच रात्री माझा डोळा लागतो न लागतो तोच शेरुच्या भुंकण्याने माझी झोप चाळवली. मी तो शांत व्हावा म्हणुन त्याला हाका मारू लागलो तसा त्याचे भुंकणे थांबले आणि विचित्र गुरगुरणे सुरु झाले. थोड्याच वेळात जमिनीवर नखे घासल्यासारखा आवाज येऊ लागला नंतर शेरू एकदाच मोठ्याने विव्हळला आणि शांत झाला. थकल्यामुळे मी उठण्याचा आळस केला आणि तसाच झोपुन गेलो. सकाळी जाग आल्यावर बेडवरून उतरण्यासाठी म्हणुन अंगावरचे पांघरुण बाजुला केले आणि पाहतो तर काय! गदगदलेल्या कातर स्वरात ते म्हणाले, आपला शेरू माझ्या बाजुला झोपला होता, पण कायमचा! असे वाटत होते कोणीतरी अजस्त्र ताकदीने त्याची मान पिरगळली होती, ती पुर्णपणे उलटी फिरली होती. या माझ्या हातांनी मी त्याला मुठमाती दिली” आणि ते एखाद्या लहान मुलासारखे रडु लागले. हे ऐकताच राधाबाईंचे पण डोळे भरले आणि त्यांच्या डोळ्यातुन टपटप आसवे गळु लागली. शेरुने सर्वांनाच जीव लावला होता. त्याचे जाणे घरातील एखाद्या व्यक्तीच्या जाण्याइतकेच दु:खदायक होते.
दु:खाचा भर ओसरल्यावर भगवानदास स्वत:ला सावरत म्हणाले, “त्याला बाहेर साखळीने बांधलेले असताना तो माझ्या अंथरूणात कसा काय आला काही कळले नाही. शेरुचा मृत्यु ही तर सुरवात होती. आपले एक कापड दुकान आगीत पुर्णपणे जळुन खाक झाले. आपल्या सुंदरी गायीने एका कालवडीला (स्त्री बछड़ा) जन्म दिला होता. तिला कोणीतरी काटेरी तारेने बांधले, त्यातुन सुटायच्या प्रयत्नात फास बसुन तिचा मृत्यु झाला. गंगु रात्री तिच्या खोलीत झोपली असताना दोन गड्यांना हलणारही नाही असे लोखंडाचे जड कपाट तिच्या अंगावर कोसळले, नेमकी त्याचवेळी कुस बदलल्यामुळे ती वाचली. थोड्याशा मुक्या मारावर निभावले. त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सकाळी तुमचा डबा घेऊन घरातुन बाहेर पडतच होतो तेवढ्यात रस्त्यावरून सरळ जाणारी एक जीप अचानक आमच्या दिशेने आली आणि घराच्या चौथऱ्यावर इतक्या वेगाने आदळली की तिचा एक्सलच तुटला, महादेवाने वेळीच मला मागे खेचले नसते तर आज तुझा सासरा जिवंत नसता. त्या जीपच्या चालकाला विचारले की असा कसा साईड सोडुन या बाजुला आलास तर म्हणाला की मी तर बरोबरच जात होतो पण कोणीतरी गाडीचे स्टेअरिंग अचानक उजवीकडे फिरवल्याचे मला व्यवस्थित जाणवले”. हे सर्व ऐकुन राधाबाई सुन्नच झाल्या. हे सर्व काय घडतय आपल्या बाबतीत हेच त्यांना समजत नव्हते.
[next]सात्विक परत आलाय! भगवानदासांच्या तोंडुन अचानक आलेल्या या वाक्याने राधाबाईंचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. काय? त्यांचा प्रश्न घशातच अडकला. होय. आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटनांना तोच जवाबदार आहे. एक्सिडेंटच्या रात्री मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. साधारण दोन अडीच वाजले असतील, हवेत अचानक खुप गारवा आला होता, माझा बेड कोणीतरी एका बाजुने वर उचलुन वेगाने जमिनीवर आदळल्यासारखे मला जाणवले. मी जमिनीवर कोसळलो. सावरतो तोच मला माझा गळा कोणीतरी खुप ताकदीने आवळतय असे जाणवु लागले. माझ्या गळ्यावर हातांची पकड मला स्पष्ट जाणवली. मी घुसमटल्यामुळे त्या पकडीतुन सुटण्याचा प्रयत्न करू लागलो तेवढ्यात आवाज ऐकुन आलेल्या रामाने आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ माझ्या अंगावर टाकल्याबरोबर माझ्या गळ्यावरील पकड सुटली पण अचानक रामा धाडकन भिंतीवर फेकला गेला. तो सावरतो न सावरतो तेवढ्यात त्याच्या चेहऱ्यात अमुलाग्र बदल झाला त्याच्या चेहऱ्याचा जागी सात्विकचा चेहरा दिसु लागला होता. रामाच्या तोंडुन सात्विक बोलला, की तो मृतांच्या जगातुन आपला सुड घेण्यासाठी परत आलाय आणि आपल्या कुटुंबातील माणसांपासुन पाळीव प्राण्यांपर्यंत एकालाही तो जीवंत सोडणार नाही. अर्धवट राहीलेला बदला पुर्ण केल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आपल्या रोहितच्या अंगावर गरम पाण्याची बादली त्यानेच उपडी केली होती. सुदैवानेच रोहित वाचला. आपण वेळीच त्याचा बंदोबस्त नाही केला तर आपल्यापैकी कोणीच वाचणार नाही हे नक्की. हे सर्व ऐकल्यावर राधाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली.
सुडाने पेटलेल्या सात्विकचा आत्मा भगवानदासांच्या घरात धुमाकुळ घालत असताना त्याच्या मुंबईतल्या घरात वेगळेच सुडनाट्य सुरु झाले होते. मुंबईतील त्याच्या 2 BHK फ्लॅटमधे त्याची विधवा आई सुलोचना आणि धाकटा भाऊ सत्यजित राहात होते. सत्यजित एक देखणा आणि तडफदार तरुण होता. कॉलेजमधुन मास्टर्स डिग्री घेतल्यावर आता Ph.D करत होता. फावल्या वेळात तो खाजगी शिकवण्या घ्यायचा. बऱ्यापैकी पैसे मिळायचे सोबत वडीलांची पेंशन होती. वडीलांच्या आणि भावाच्या विम्याचे पैसे मिळाले होते ते वेगळेच. सात्विकने गोपाळरावांचा लुबाडलेला पैसा तो स्वत: बरोबर वर घेऊन जाऊ न शकल्यामुळे तो पण सत्यजितलाच मिळाला होता. एकंदर सत्यजित एक ऐशारामी आयुष्य जगु शकेल एवढा पैसा जवळ बाळगुन होता. पण तो सात्विकच्या अगदी उलट स्वभावाचा होता. निर्व्यसनी, आईची काळजी घेणारा, मेहनती आणि परोपकारी वृत्तीचा एक चांगला मुलगा होता. एकदा शिकवणी आटपल्यावर मित्रांबरोबर सहज फिरायला म्हणुन तो मुंबईतील एकदम पॉश भागात गेला होता. सुंदर आणि टुमदार बंगले पाहुन आपला पण असा एखादा बंगला असावा असे नकळत त्याच्या मनात येऊन गेले. फिरता फिरता ते सर्व एका दगडविटांच्या ढिगाऱ्याने भरलेल्या मोठ्या खड्यापाशी आले. सर्वत्र जळल्याच्या खुणा दिसत होत्या. त्या आलिशान बंगल्याच्या मधोमध असलेल्या त्या ढिगाऱ्याला पाहुन सर्वांनाच आश्चर्य वाटले. काळोखही दाटत होता आणि सर्वांना एक प्रकारची उदासिनता पण जाणवु लागल्यामुळे तिथुन निघावे असे सर्वानुमते ठरले पण सत्यजितचे पाय तिथेच खिळले होते. भान हरपुन तो त्या ढिगाऱ्याच्या दिशेने पाहात होता.
अमरने त्याला हाताला धरून हलवले तसा तो भानावर आला. त्याची नजर परत त्या ढिगाऱ्याकडे वळली आणि नकळत त्याच्या तोंडुन शब्द निघाले, ‘वॉ, व्हॉट अ ब्युटी’! त्याबरोबर त्याचा मित्र अमर सत्यजितला वेड तर नाही ना लागले अशा नजरने त्याच्याकडे पाहात म्हणाला, “तु ठीक आहेस ना! या दगडविटांच्या ढिगाऱ्यात तुला ब्युटी दिसतेय? चल घरी जाऊ, उशीर होतोय”. त्याने सत्यजितला जवळ जवळ ओढतच नेले. चालताना पण सत्यजित सतत वळुन वळुन पाहात होता जणु तो पछाडला होता. रात्री त्याच्या आईने त्याला जेवायला ये म्हणुन तिन वेळा हाक मारली पण हा आपल्याच तंद्रित होता. जेवताना पण तीच गत. सुलोचना बाईंना थोडे विचित्र वाटले पण असेल काही म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले. रोजच्या सवयीने जेवण झाल्यावर सत्यजित शतपावली करायला खाली आला तेव्हा त्याला काळोखात एका बाकड्यावर ती एकटीच बसलेली दिसली. ही इकडे एवढ्या लांब कशी आली असा विचार करत असतानाच नकळत त्याची पावले तिच्या दिशेने वळली. तो जवळ जाताच ती उठली आणि चालु लागली, सत्यजित भुरळ पडल्यासारखा तिच्या मागे चालु लागला.
[next]अमरने, ‘ए सत्त्या’! अशी हाक मारली पण ती हाक सत्यजितच्या कानापर्यंत पोहोचलीच नाही. तो तसाच तिच्या मागे चालत राहीला. हा असा भंजाळल्यासारखा कुठे निघाला? संध्याकाळपासुन याची लक्षणे काही ठीक नाही दिसत असे म्हणत अमर त्याच्या मागे हाक मारत चालु लागला. सत्यजित सोसायटीच्या गेट मधुन बाहेर पडुन आता मुख्य रस्त्यावर आला. अर्धा रस्ता पार केल्यावर उजवीकडे वळुन रस्त्याच्या मधोमध चालु लागला. मोठ्याने हॉर्न वाजवत “ए मरायचय काय रे” असे त्याच्या अंगावर खेकसत वाहनचालक त्याच्या बाजुने जाऊ लागले. समोरून एक मोठा ट्रक सुसाट वेगात येत होता तरी सत्यजित तसाच त्याच्या रोखाने जात होता. तो ट्रक त्याला चिरडणार इतक्यात अमरने त्याला बाजुला खेचले आणि तो ट्रकवाला कर्कश हॉर्न वाजवत सत्यजितला एक सणसणित शिवी हासडत त्याच वेगात निघुन गेला. तोल जाऊन दोघेही खाली पडले. कोपराला आणि गुडघ्याला खरचटुन रक्त आले होते तरी सत्यजित उठुन रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. रस्त्याच्या पलीकडे उभी राहुन ती त्याला बोलवत होती. अमरने त्याला मागे खेचले आणि एक खाडकन त्याच्या थोबाडीत लगावली. जशी सत्यजितची नजर तिला शोधत रस्त्यापलीकडे पोहोचली तशी ती हवेत विरघळुन गेली. भानावर आलेला सत्यजितचा हात आपल्या दुखऱ्या गालावर गेला. अमर, मी इथे कसा आलो? मी तर सोसायटीत होतो. तु इथे काय करतोस? माझा गाल का दुखतोय? तु माझ्याकडे असा काय बघतोस? अशा अनेक प्रश्नांनी त्याने अमरला भंडावून सोडले. त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत अमर सोसायटीच्या दिशेने चालु लागला. बुचकाळ्यात पडलेल्या सत्यजितची पावले पाठमोऱ्या अमरला गाठण्यासाठी वेगात पडु लागली.
घरी पोहोचल्यावर काही न बोलता सत्यजित झोपायला गेला. अंथरुणावर पडल्यावर परत तिचा सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. तिच्या विचारात कधी डोळा लागला ते त्याला कळलेच नाही. थोड्याच वेळात तो गाढ झोपी गेला. साधारण दोन वाजले असतील. खिडकीतून येणाऱ्या थंड झुळुकीने सत्यजितला जाग आली. सहज त्याची नजर गेली तर ती खिडकीत उभी होती. चंद्राच्या प्रकाशात तिचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसत होते. भारल्यासारखा तो तिच्याकडे पाहात होता. मादक हसत ती तिथुन दुर गेली. त्याबरोबर अंगावरील पांघरुण दुर करुन त्याची पाऊले दरवाज्याकडे वळली. दरवाज्याच्या कड्या उघडुन तो बाहेर आला तर त्याला ती जिन्याच्या पायऱ्यांवर उभी असलेली दिसली. तो बाहेर आलेला पाहताच ती वळली आणि पायऱ्या चढत वर जाऊ लागली. सत्यजित तिच्या पाठोपाठ जिना चढुन टेरेसवर आला. ती कठड्यावर उभी राहुन त्याला बोलवत होती. तो तिच्या दिशेने जाऊ लागताच ती हवेत तरंगत इमारतीपासून दुर जाऊ लागली. सत्यजित कठड्यावर चढला आणि पुढे पाऊल टाकणार इतक्यात सुलोचनाबाईंनी त्याला हाताला धरून मागे खेचले. सत्यजित टेरेसवर कोसळला तशी ती गायब झाली. पाणी पिण्यासाठी उठलेल्या सुलोचना बाईंनी सत्यजितला दरवाजा उघडुन जिन्याने वर जाताना पाहीले आणि तो कुठे जातोय ते पाहायला त्याच्या मागोमाग त्याही वर आल्या होत्या. आज सत्यजित दोन वेळा नशिबानेच वाचला होता.
सकाळपासुन सत्यजितला ताप होता. दोन वेळा सणकुन आपटल्यामुळे त्याचे अंग चांगलेच ठणकत होते. तापात तो सतत बरळत होता, ‘मला ती बोलवतेय, मला तिच्याकडे जायचय’. सुलोचना बाई त्याच्या कपाळावरच्या मिठाच्या थंड पाण्यात भिजवलेल्या घड्या बदलत असतानाच अमर तिथे आला. सत्यजितला तश्या अवस्थेत पाहुन, काय झाले याला? असे म्हणत सत्यजितच्या गळ्याला हात लावुन ताप किती आहे ते बघितले. सत्यजित चांगलाच तापला होता. सलोचनाबाईंनी रात्रीच्या प्रकाराबद्दल त्याला सर्व काही सांगितले. ते ऐकल्यावर अमरने आदल्या दिवशी संध्याकाळी पडक्या बंगल्यापाशीचे सत्यजितचे विचित्र वागणे तसेच रात्री रस्त्याच्या मधुन चालण्याच्या प्रसंगाबद्दल सगळे काही तपशीलवार त्याच्या आईला सांगितले. सत्यजीतच्या या विचित्र वागण्याने सुलोचनाबाईंना चिंतेने ग्रासले. आधी नवरा आणि मग नुकताच मोठा मुलगा गमावल्यामुळे आजकाल सत्यजितसाठी त्या थोड्या जास्तच हळव्या झाल्या होत्या. त्याला साधी शिंक जरी आली तरी त्यांचा जीव वरखाली होत असे. आदल्या रात्रीपासुन सुरु झालेल्या विचित्र घटनांमुळे त्यांना सत्यजितची जास्तच काळजी वाटु लागली होती. दिवसभर सत्यजितचे बरळणे सुरूच होते. डॉक्टर तपासुन औषधे देऊन गेले होते पण त्याने फारसा फरक पडलेला दिसत नव्हता. रात्री मायलेक उपाशीच झोपी गेले.
[next]साधारण तीन वाजता ती पुन्हा खिडकीपाशी आली. सत्यजितला हाका मारू लागली पण सत्यजित खुप अशक्त झाला होता त्यामुळे त्याच्यात उठायचे त्राण पण उरले नव्हते. तो बाहेर येत नाही हे लक्षात येताच बंद दरवाज्यातून आरपार जात तरंगतच ती त्याच्या जवळ आली. तो भान हरपुन तिच्या डोळ्यात एकटक पाहात होता जणू तिचे लावण्य तो आपल्या डोळ्यांनी पित होता. आपल्या मादक अदांनी ती त्याला घायाळ करू लागली. त्याच्या रुंद छातीवर फिरणारे तिचे हात हळुहळु वर सरकु लागले. त्याच्या गळ्याभोवती तिच्या हातांची पकड अधिकाधिक घट्ट होऊ लागली. सत्यजितला श्वास घेणे जड होऊ लागले आणि तो खोकु लागला. त्या आवाजाने सुलोचना बाई जाग्या झाल्या. इकडे तिच्या चेहऱ्यावरचे मादक भाव नाहीसे होऊन त्यांच्या जागी हिंस्त्र भाव आले होते. तिचा सुंदर चेहरा आता बिभत्स आणि भयानक दिसु लागला होता. अस्ताव्यस्त पसरलेल्या केसांमुळे तिच्या भयानकतेत भरच पडत होती. प्रमाणबद्ध, सुंदर आणि रेखीव शरीर बदलुन जळल्या सारखे काळे आणि विद्रुप दिसु लागले होते आणि त्याला सडल्यासारखी घाण येऊ लागली होती. पुर्ण ताकदीने ती सत्यजितचा गळा आवळु लागली. सत्यजितचे डोळे फिरू लागले होते. शरीरातील सर्व शक्ती गेल्यासारखा तो मलुल पडुन होता आणि गळ्यावर वाढत्या दबावाबरोबर हळुहळु मृत्यु त्याच्या समीप येत होता.
सत्यजितच्या बेडरूमचा दरवाजा उघडुन सुलोचना बाई पाणी घेऊन आत आल्या आणि आपल्या मुलाचा छताडावर बसुन त्याचा गळा आवळणाऱ्या त्या भयंकर जाखिणीला पाहुन त्यांची बोबडीच वळली, त्या दरवाज्यातच गोठून गेल्या. सुलोचना बाईंना पाहाताच तिने सत्यजितला सोडले आणि वेगाने त्यांच्यावर झडप घेतली. सुलोचना बाईंना आठ दहा फुट दूर उडवून हिडीस हास्य करत मुख्य दरवाज्यातून ती आरपार निघुन गेली. त्यांच्या हातातील तांब्या जाऊन टिपॉय वर पडल्याने मोठा आवाज करत त्याच्यावरील काच फुटली. सुदैवाने सुलोचना बाई सोफ्यावर पडल्या त्यामुळे त्यांना फारसे काही लागले नाही पण मोठा झटका बसल्याने मानेचे आणि कंबरेचे स्नायु चांगलेच दुखावले होते. कसेबसे त्या धक्क्यातून सावरत त्या उठुन उभ्या राहतात तोच बेल वाजली. लंगडत लंगडत त्यांनी दरवाजा उघडला. पाहतात तर दारात मोठ्या आवाजामुळे जागे झालेले आजु बाजुचे शेजारी जमा झाले होते. काय झाले? कसला आवाज झाला? या त्यांच्या प्रश्नावर ‘सत्यजित’! एवढे बोलुन त्या बेशुद्ध झाल्या. काही बायकांनी त्यांना सावरले. पुरुष मंडळी आत जाऊन पाहिले तर त्यांना सत्यजित जमिनीवर निचेष्ट पडलेला आढळला. काही जण त्या दोघांना जवळच्या हॉस्पिटलमधे घेऊन गेले. डॉक्टरांनी सत्यजितला लगेचच CPR दिला, परंतु मेंदुला काही वेळासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यामुळे तो कोमामधे गेला होता. त्याला सर्व कळत होते पण त्याचे शरीर कोणताही प्रतिसाद द्यायला असमर्थ होते. डॉक्टरनी सांगितले की हा पुढच्या मिनिटाला पण कोमातुन बाहेर येऊ शकतो किंवा काही वर्ष पण लागू शकतात, नक्की किती वेळ लागेल हे सांगणे अवघड आहे.
घडल्या प्रकाराने सुलोचना बाई एवढ्या धास्तावल्या की त्यांनी आपल्या मुलाला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. फोन करुन त्यांनी महादुला आपण सत्यजितसह गावी येत असल्याचे कळविले. मुळातच लाघवी असलेल्या सत्यजितला त्याच्या लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले असल्यामुळे महादु आणि रखमा या निपुत्रिक दांपत्त्याचा त्याच्यावर खुप जीव होता. मालकीण बाई आणि सत्यजित येणार हे कळल्यावर साफसफाई करुन त्यांनी घर आरशासारखे लख्ख केले. घरात लागणारा सर्व जिन्नस भरून ते त्यांची वाट पाहू लागले. ट्रॅफिकचा त्रास वाचावा म्हणुन सत्यजित आणि एका नर्सला सोबत घेऊन सुलोचना बाई भल्या पहाटे एका अॅमब्युलंस मधुन गावी निघाल्या. पहाटेच्या गार वाऱ्यामुळे त्यांच्या डोळ्यावर झापड येऊ लागली होती. बसल्या बसल्याच त्या डुलकी घेऊ लागल्या. गाडी मुंबईतुन बाहेर पडणार इतक्यात ड्रायव्हरने करकचुन ब्रेक लावल्यामुळे त्यांचे डोके डॅशबोर्ड वर दाणकण आपटले. मेंदुला झिणझिण्या आल्या होत्या. आधारासाठी पट्टा लावलेला असुनही त्यांच्या मानेला एक जोराचा हिसडा बसला. सत्यजितला व्यवस्थित बांधले असल्यामुळे सुदैवाने तो खाली पडला नाही. पण त्याच्या जवळ बसलेली बेसावध नर्स मात्र ड्रायव्हर शेजारील सीटवर चांगलीच आपटली. कपाळ चोळत सुलोचना बाईंनी ड्रायव्हरकडे काय झाले म्हणत पाहिले. तो नखशिखांत थरथरत होता. उत्तरादाखल त्याने फक्त समोर बोट दाखवले. सुलोचना बाईंनी त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
[next]रस्ता अडवुन ती गाडीसमोर तरंगत होती. सुलोचना बाईंकडे पाहात ती दात विचकुन कुत्सित हसली. “भाग रही हो? तुम मुझसे बच नही सकती। मैं तुम्हारे बडे बेटेका बदला तुम्हे और तुम्हारे छोटे बेटेको मारकर लुंगी। तिन बार वो मुझसे बच गया था मगर इस बार नही बचेगा। तुम यहाँसे आगे नही जा सकती। तुम्हे मरना होगा”। असे कर्कश आवाजात म्हणत ती खदाखदा हसु लागली. ते ऐकुन सुलोचना बाईंचे तर हातपायच गार पडले. नर्स मागुन ओरडली, ‘सखाराम! गाडी पळव’. त्याबरोबर भानावर आलेल्या ड्रायव्हरने एक्सीलरेटर दाबला पण अॅमब्युलंसची पुढची चाके जणू लॉक झाली होती, मागची चाके जोरात फिरत असल्यामुळे अॅमब्युलंस डावी उजवीकडे नाचु लागली होती. तो प्रकार पाहुन मागुन येणाऱ्या तुरळक गाड्यानी आपला मार्ग बदलला. भीतीने घसा कोरडा पडलेल्या सुलोचना बाई मनात आपल्या कुलदेवतेचा धावा करत होत्या. डॅशबोर्ड वर लावलेल्या हनुमानाचा फोटो नजरे समोर पडताच त्या हनुमानचालीसा म्हणु लागल्या त्याबरोबर परिस्थितीत फरक पडु लागला. त्या जखिणीची ताकद कमी पडु लागली हे लक्षात येताच त्यांची हिंमत वाढली. मुलाच्या प्राणांच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ती माऊली गाडीतून खाली उतरली आणि सोबत आणलेले पवित्र गंगाजल त्यांनी त्या जखिणीवर शिंपडले त्याबरोबर भयाकारी किंचाळत ती तिथुन नाहीशी झाली. थोडे गंगाजल अॅमब्युलंस वर शिंपडून त्या पटकन आत शिरल्या आणि अॅमब्युलंस वेगाने मार्गस्थ झाली. झाल्या प्रकाराने सर्वच जण शॉक मधे होते. हा सर्व प्रकार जेमतेम पाच सात मिनिटांत आटपला होता पण त्याचा परिणाम इतका जबरदस्त होता की तासभर कोणीही काहीच बोलले नाही. सुलोचना बाईंनी सत्यजितकडे पाहात मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल मनोमन कुलदेवतेचे आभार मानले. अॅमब्युलंस वेगाने एक एक गाव मागे टाकत होती जणु आतील लोकांसारखीच तिलाही घरी पोहोचायची घाई लागली होती.
चौथ्या वेळेसही सत्यजित आपल्या हातुन वाचल्यामुळे रूबी जाम चवताळली होती. आता तर ते तिच्या सीमेच्या बाहेर निघुन गेले होते त्यामुळे असहाय्यपणे ती नुसती धुसफुसत होती. तिच्या बंगल्याच्या भग्नावशेषांजवळ जेव्हा सत्यजित अपघातानेच आपल्या मित्रांसह गेला होता तेव्हा तिच्याकडे सात्विकचा सुड उगवायची आयती संधी सत्यजितच्या रुपात चालून आली होती. आपल्या सौंदर्याची मोहिनी सत्यजित वर टाकण्यात ती यशस्वी झाली होती पण दोन वेळा अमर आणि सुलोचना बाईंमुळे तो वाचला होता. तिसऱ्यावेळी ती यशस्वी होणार इतक्यात सुलोचना बाई बेडरूममध्ये आल्याने तिचा तोही डाव फसला होता आणि आता तर सुलोचना बाईंनी भीती दूर सारुन तिच्या विरुद्ध दंड थोपटले होते त्यामुळे ती सुडाच्या आगीत ऊभी जळत होती. जिवंत असताना अप्सरेला लाजवेल अशी ती रूपगर्विता आज मृत्यूनंतर सुडाने पेटलेली एक जखिण बनुन आपल्या बंगल्याच्या भग्नावशेषांजवळ सत्यजितच्या परतण्याची वाट पाहु लागली.
रात्री साधारण आठ वाजता ते चौघे आपल्या गावी पोहोचले. रखमाने सर्वांसाठी रूचकर स्वयंपाक बनवला होता पण सर्वजण प्रचंड तणावाखाली असल्यामुळे जेमतेम दोन-तीन घास पोटात ढकलुन झोपायला गेले. लाडक्या सत्यजितची ती अवस्था पाहुन रखमा आणी महादुच्याही घशाखाली घास उतरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यजितला गावातील हॉस्पिटल मध्ये चेकपसाठी सोडुन सखाराम नर्स सोबत मुंबईला रवाना झाला. म्हणतात ना त्या विधात्याच्या मनात काय चालले आहे हे आपण सामान्य माणसे नाही जाणु शकत! आपल्या सुन आणि नातवाला घेऊन भगवानदासही त्याच दिवशी हॉस्पिटल मध्ये आले होते. रोहित आता पुर्ण बरा झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच तिघांच्याही चेहऱ्यावर हसु फुलले. डॉक्टरांना धन्यवाद देत ते त्यांच्या केबिन मधुन बाहेर पडले. ते आपल्या कारमधे बसायला जाणार तोच रोहितची नजर चेकअप संपवून महादुची वाट पाहात उभ्या असलेल्या सुलोचना बाईं आणि व्हिलचेअर वर बसलेल्या सत्यजितवर पडली. त्याला काय वाटले कुणास ठाऊक तो धावतच त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची विचारपुस करू लागला. त्या गोंडस आणि चुणचुणीत मुलाला आपली आपुलकीने चौकशी करताना पाहुन आज आपला नातू असता तर याच्या एवढाच असता असे सुलोचना बाईंच्या मनात येऊन गेले. सात्विकच्या आठवणीने त्यांचे डोळे भरले. त्यांना पदराने डोळे पुसताना पाहुन भगवानदास आणि राधाबाई त्यांच्याजवळ आले. व्हिलचेअर वर बसलेल्या सत्यजितला पाहुन दोघांनाही गोपाळरावांची आठवण आली आणि नकळत त्या दोघांचेही डोळे भरले.
[next]भेटीची सुरवात एकदम भावुक झाल्यामुळे दोन्ही कुटुंबाना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटला. भगवानदासांनी स्वत:हुन सुलोचना बाईंना घरापर्यंत लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. ‘चला ना आजी’! म्हणत छोट्या रोहितनेही लकडा लावल्यामुळे सुलोचना बाईंनी पण फार आढेवेढे न घेता होकार दिला. हॉस्पिटलच्या ब्रदरनी (पुरुष नर्स) सत्यजितला कार मधे बसवण्यास मदत केली. महादुला फोन करुन न येण्यास सांगुन त्या कारमध्ये बसल्या. गावात नवीन दिसता, या आधी कधी पाहिल्याचे आठवत नाही! भगवानदास म्हणाले. आम्ही इथलेच पण गेली नऊ दहा वर्ष मुंबईत वास्तव्याला आहोत. काल रात्रीच आलोय. हा माझा मुलगा सत्यजित, Ph.D करतोय आणि खाजगी शिकवण्याही घेतो मुंबईत. सुलोचना बाई उत्तरल्या. पण हे असे झोपलेले का आहेत? काय होतय त्यांना? राधाबाईंचा काळजीयुक्त प्रश्न ऐकुन भगवानदासानी चमकुन त्यांच्याकडे पाहिले तशा त्या वरमल्या. नकळत सुलोचना बाईंचे डोळे भरले. ते पाहुन सर्वच गप्प झाले. घर जवळ येताच सुलोचना बाईंनी सर्वांना चहाचे आमंत्रण दिले. त्याचा स्विकार करत सर्वजण घरात आले. महादुने सत्यजितला उचलून घरात नेले. रखमाने दिलेला चहा प्यायल्यावर राधाबाईंनी न राहवुन परत सत्यजितची चौकशी केली तेव्हा सुलोचना बाईंनी सत्यजित वर बेतलेल्या प्रसंगाचे सव्विस्तर वर्णन केले. ते ऐकुन राधाबाई आणि सुलोचना बाईंचे आभार मानत निरोप घेतला. घराबाहेर पडताना अचानक भगवानदासांना कोणीतरी धक्का मारल्यासारखे जाणवले क्षणभर ते धडपडले पण राधाबाईंनी त्यांना सावरले. सात्विकचा विचार त्यांच्या मनात चमकुन गेला तशी भगवानदासांच्या शरीरातून एकदम एक थंड शिरशिरी उमटली पण तसे काही न दर्शवता, `भेटु परत! काही मदत लागली तर संकोच न बाळगता फोन करा' म्हणत ते घराकडे मार्गस्थ झाले.
जेवण उरकुन सुलोचना बाई वामकुक्षी घेत आपल्या खोलीत पडल्या होत्या अचानक “आई” या हाकेने त्या जाग्या झाल्या. आवाज सात्विकचा वाटल्याने त्या चटकन उठून बसल्या. पाहतात तर सत्यजित त्यांच्या पायापाशी बेडजवळ ऊभा होता. त्याला पाहाताच त्यांना खुप आनंद झाला. त्याला प्रेमाने मिठी मारत त्या म्हणाल्या, “चमत्कारच म्हणायचा, गावी आलो आणि लगेचच तु कोमातुन बाहेर आलास”. आई, मी सत्यजित नाही सात्विक आहे. सात्विकचा आवाज कानात शिरताच त्या सत्यजितच्या मिठीतून दूर झाल्या आणि विस्मयाने त्याच्याकडे पाहु लागल्या. सात्विकचा आत्मा सत्यजितच्या शरीरातून बोलत होता. “तुम्ही इथे आल्याचे जाणवताच मी तुम्हाला भेटायला आलोय. तु अजिबात काळजी करू नकोस मी त्या रूबीचा पुरता बंदोबस्त करेन. ती परत तुम्हाला त्रास नाही देणार. मी सत्यजितच्या शरीरातून बाहेर पडल्यावर तो कोमातुन बाहेर येईल. त्या भगवानदासाला पण मला धडा शिकवायचाय. त्याचं पुरं खानदान नष्ट केल्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार. येत्या अमावस्येला माझी शक्ती इतकी वाढेल की मला कोणीच रोखु शकणार नाही”. सुलोचना बाईंनी विचारले कोण रूबी? ‘तिच, जिने सत्यजितला मारायचा प्रयत्न केला आणि तुम्ही येताना तुमची गाडी अडवली होती’. सात्विकच्या आवाजातुन राग व्यक्त होत होता. “पण तु तिला कसा ओळखतोस आणि ती आमच्या जीवावर का उठली आहे? आणि ती असं का म्हणाली की तुझ्या मोठ्या मुलाचा बदला मी तुम्हा दोघांना मारून घेईन? काय केलस तु तिच्या बरोबर? आणि भगवानदासांसारख्या देवमाणसानी काय बिघडवले रे तुझे? हा नक्की काय प्रकार आहे सात्विक? जिवंतपणी काय कमी छळलस जो मेल्यावरही आम्हाला त्रास देत आहेस? तुझ्यामुळे तुझे बाबा गेले, मग तुही गेलास आता माझ्या सत्त्याला पण माझ्यापासून दूर कर, मी एकटी मागे राहुन तरी काय करू? माझाही जीव घे म्हणजे समाधान मिळेल तुझ्या आत्म्याला”! सुलोचना बाईंच्या या प्रश्नांवर उत्तरादाखल एक फ्लॉवर पॉट वेगाने भिंतीवर जाऊन आदळला आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. अचानक सत्यजित खाली कोसळला. फ्लॉवर पॉट फुटल्याच्या आवाजाने जागे झालेले महादु आणि रखमा धावतच सुलोचना बाईंच्या खोलीत आले. महादुच्या मदतीने सत्यजितला उचलून बेडवर ठेवल्यावर रखमाने फ्लॉवर पॉटचे तुकडे गोळा केले आणि सर्वजण बाहेर जाण्यासाठी वळले तोच, सत्यजितची ‘आई’ ही हाक सुलोचना बाईंच्या कानात शिरली. वळुन पाहतात तर सत्यजित कोमातुन बाहेर आला होता. त्यांनी त्याला छातीशी घट्ट धरले. सर्वांच्याच डोळ्यातुन आनंदाश्रु पाझरु लागले. रखमा आणि महादुही त्या आनंदोत्सवात सामील झाले.
सुलोचना बाईंचा निरोप घेऊन भगवानदास आणि राधाबाईं आपल्या घरी परतले पण दरवाजातून आत पाऊल टाकताना सात्विकने ‘आज काय वाढुन ठेवलय देव जाणे’ हा विचार दोघांच्या मनात थोडी भिती उत्पन्न करुन गेला. तसे सात्विकच्या बंदोबस्तासाठी गावातील भगत आला होता पण त्याला काही यश आले नाही उलट सात्विकचे प्रताप आणि वाढले होते. मन घट्ट करुन त्यांनी आत प्रवेश केला. दुपारचे जेवण करुन घरातील सर्वजण थोडे सुस्तावले होते, तोच फोनच्या घंटीने सगळ्यांची झोप चाळवली. “कोणी सुलोचना म्हणुन बाई आहेत फोनवर तुमच्याशी काहीतरी अर्जंट बोलायचे आहे म्हणाल्या” रामाचे हे वाक्य ऐकताच भगवानदास गडबडीने उठले. फोनवर ते फक्त ऐकत होते, आम्ही लगेचच निघतो म्हणुन त्यांनी फोन ठेवला. भगवानदासांनी राधाबाईंना रोहितला पटकन तयार करुन बाहेर घेऊन येण्यास सांगुन महादेवलाही फोन करुन लगेच घरी येण्यास सांगितले. भगवानदासांची कार सुलोचना बाईंच्या घरासमोर थांबली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. महादुच्या मागे उभ्या असलेल्या सत्यजितशी राधाबाईंची नजरानजर झाली आणि नकळत दोघांची नजर एकमेकांत गुंतली पण क्षणभरच. ‘माफ करा मी आपल्याला असे तातडीने बोलवले पण विषय खुप महत्वाचा आहे म्हणुन नाईलाज झाला’ म्हणत सुलोचना बाईंनी आपली दिलगिरी व्यक्त केली. सकाळी तर सत्यजित कोमात होता आणि आता आपल्या समोर चक्क ऊभा आहे याचे राधाबाई आणि भगवानदास दोघांनाही मोठे नवल वाटले. सत्यजितच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली असता आधी चहा तर घ्या, मग आपण सविस्तर बोलुच म्हणत सुलोचना बाईंनी महादुला सर्वांना चहा देण्यास सांगितले.
[next]“तुम्ही सात्विक कुलकर्णीला ओळखता का”? सुलोचना बाईंच्या या प्रश्नाने भगवानदासांना एक जोराचा ठसका लागला. उबळ शांत झाल्यावर भगवानदास म्हणाले, “हो! पण तुम्ही हा प्रश्न विचारण्या मागचे कारण नाही समजलो”. “सात्विक माझा मोठा मुलगा, तो आता हयात नाही”, या सुलोचना बाईंच्या वाक्याने भगवानदास आणि राधाबाईंना मोठा धक्काच बसला. दुपारी घडलेला सर्व प्रसंग सुलोचना बाईंनी त्यांना सांगितला, घरात क्षणभर शांतता पसरली. सुलोचना बाईं पुढे म्हणाल्या, “सात्विकचा आत्मा माझ्या सत्यजितच्या शरीरातून बाहेर पडला आणि सत्यजित कोमातुन बाहेर आला ही एक चांगली गोष्ट घडली पण सात्विक तुमच्या जीवावर का उठलाय ते मला नाही समजले. येत्या अमावस्येला तो काहीतरी विलक्षण करणार आहे म्हणाला. तुम्हाला सावध करण्यासाठी म्हणुन मी तातडीने बोलावुन घेतले कारण परवाच अमावस्या आहे”.
मोठा उसासा सोडत भगवानदासांनी अनेक वर्षांपूर्वी सुरु झालेल्या सुडचक्रावरून पडदा उठवायला सुरवात केली. “महिला शौचालय प्रकरणी पोलिसांनी सोडुन दिले असले तरी माझ्या मुलाचे भवितव्य, वाया गेलेल्या सात्विकपासुन सुरक्षित करण्यासाठी इन्स्पेक्टरला पैसे चारुन मी केस बनवून घेतली आणि सात्विकला बालसुधार गृहात पाठवायची व्यवस्था केली. जेणेकरून गोपाळच्या संपर्कात न राहिल्याने तो त्याला बिघडवु शकणार नाही आणि कदाचित बालसुधार गृहात राहिल्यामुळे स्वत: पण सुधारेल असे मला वाटले होते. पण दुर्दैवाने त्या धक्क्याने तुमचे यजमान गेले. सात्विक आपल्या वडीलांच्या मृत्युला मला जवाबदार मानत होता. माझा बदला घेण्यासाठी त्याने गोपाळला एका रूबी नावाच्या बारगर्लच्या नादाला लावुन कफल्लक बनवले नंतर एका बाबाच्या मदतीने अमानवीय शक्तीच्याद्वारे तिचा खुन करण्याची योजना बनवली आणि गोपाळच्या मनात तो खुन स्वत:च्या डोळ्यांनी बघण्याची इच्छा निर्माण करुन त्या अमानवीय शक्ती कडुन त्याचाही खुन करवला. बरोबर आपल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी गोपाळच्या आत्म्याने मेंटल असायलम मध्ये सात्विकचा खुन केला आणि आपला सुड उगवला. त्याला मुक्ती मिळाली पण आता सात्विकचा आत्मा सुडासाठी आमच्या पुऱ्या खानदानाचाच विनाश करायला निघालाय. आमच्या घरात त्याने आत्तापर्यंत खुप त्रास दिलाय. एक एक दिवस आम्ही जीव मुठीत धरून काढतोय. पण आता हे सगळे असह्य होत चाललय. हे सुडचक्र इथेच थांबावे असे वाटते कारण यात दोन्ही घराण्यांचा केवळ सर्वनाशच होईल”, एवढे बोलुन भगवानदास शुन्यात हरवल्यासारखे बसुन राहीले.
हे सर्व ऐकल्यावर सुलोचना बाईंना आपल्या मुलाच्या कृत्याची प्रचंड चीड आली. सात्विक या थराला जाईल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते. भगवानदासांची माफी मागत त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाच्या कृत्त्याबद्दल मी तुमची मनापासुन माफी मागते. सात्विकच्या वडीलांचा त्याच्यावर खुप जीव होता त्यामुळे जेव्हा जेव्हा मी त्याच्या खोड्यांवर त्याला शिक्षा करायचे तेव्हा तेव्हा ते त्याला वाचवायचे. याचा परिणाम व्हायचा तोच झाला, सात्विक वाया गेला. बालसुधार गृहाचे तर फक्त निमित्त झाले. आपल्या मुलाचे आयुष्य खराब होण्याला आपणच जवाबदार आहोत या भावनेने ते खचले आणि त्यातच ते गेले. जे झाले त्यात तुमचा काही दोष नव्हता उलट तुमचा उद्देश चांगलाच होता. सात्विकला बालसुधार गृहात पाठवण्यामागे तुम्ही होतात हे तर आमच्या ध्यानीही नव्हते. इतकेच काय आम्ही तुम्हाला ओळखतही नव्हतो. तुमचे झालेले नुकसान तर मी भरून नाही देऊ शकत पण अजुन नुकसान होऊ नये म्हणुन प्रयत्न जरूर करू शकते आणि या कामी मला तुमच्या मदतीची फार गरज आहे. तुमच्या कुटुंबाबरोबर माझ्या कुटुंबाचाही जीव धोक्यात आहे त्यामुळे आपल्याला एकत्र मिळूनच या समस्येवर मार्ग काढायला हवा”. सत्यजितनेही आपल्या भावाच्या कृत्याबद्दल भगवानदास आणि राधाबाईंची माफी मागितली. जे झाले ते झाले, माझ्या मुलामुळे तुला तुझा भाऊ आणि तुझ्या आईला आपला मुलगा गमवावा लागला आहे. त्यामुळे तुम्हीही आम्हाला माफ करा. कृपा करुन तुझ्या भावाने सुरु केलेले हे सुडचक्र तु पुढे सुरु ठेऊ नयेस अशी माझी तुला हात जोडून विनंती आहे म्हणत भगवानदासांनी खरोखरच सत्यजित समोर हात जोडले. त्यांचे जुळलेले हात तसेच आपल्या हातात धरून सत्यजितने पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना मिठी मारली. तशा राधाबाईही सुलोचना बाईंना बिलगल्या. छोटा रोहित आपल्या निरागस डोळ्यांनी हा भावुक प्रसंग पाहात होता.
[next]जाधव साहेबांना फोन करुन त्या बाबाची पुन्हा एकदा मदत घेण्याचा सल्ला महादेवाने भगवानदासांना दिला. महादेवाचा सल्ला मनाला पटताच लगेचच भगवानदासांनी इन्स्पेक्टर जाधवांना फोन केला आणि आपला मनसुबा सांगितला व काम झाल्यावर तुम्हाला आणि त्या बाबाला तुमच्या कामाचा योग्य तो मोबादला मिळेल हे सांगावयास ते विसरले नाहीत. हे सर्व होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजुन गेले होते. रोहित राधाबाईंच्या मांडीवरच झोपी गेला होता. ते पाहुन भगवानदासांनी ‘उद्या सकाळी लवकर तयार राहा आम्ही गाडी घेऊन येतो; आपल्याला तातडीने मुंबईकडे रवाना व्हायचे आहे’ असे सांगितले. ते वळतात तोच सत्यजितने भगवानदासांना घरी परतण्यात धोका आहे तेव्हा आजची रात्र इथेच काढुन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळेजण इथुनच मुंबईला निघणे योग्य होईल असे सांगितले. सत्यजितच्या म्हणण्याला सुलोचना बाईंनी पण दुजोरा दिला. तेवढ्यात जेवणाची पाने तयार असल्याचे सांगत महादुही आला. भगवानदासांनी राधाबाईंकडे पाहिले तर त्या आणि सत्यजित एकमेकांच्या चेहऱ्याकडेच पाहात होते. क्षणभर वाट पाहुन, ‘चला सुनबाई! झाले असेल तर जेवायला बसुया’! असे सुचक वाक्य म्हणत भगवानदासांनी मिशीतल्या मिशीत हसत महादुच्या मागोमाग चालण्यास सुरवात केली. आपल्या फजितीवर राधाबाई पुरत्या ओशाळल्या. सत्यजितने पुढे होत रोहितला उचलुन घेतले आणि राधाबाईंकडे पाहात एक स्मित करत, “चला जेवून घेऊया” म्हणाला. राधाबाई ‘हो’ म्हणत त्याच्याकडे पाहत प्रथमच लाजुन गोड हसल्या आणि त्याच्याबरोबर किचनच्या दिशेने चालु लागल्या. दोघांमधला मुक संवाद सुलोचना बाईंनी आपल्या अनुभवी नजरेने टिपला होता. स्वत:शीच काही विचार करत त्या कामाला लागल्या.
इन्स्पेक्टर जाधवांनी त्या बाबाशी संपर्क करून त्याला सर्व परिस्थिती समजावुन सांगितली आणि यातुन सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यास जे मागशील ते मिळेल असे सांगितले. तेव्हा त्या बाबाने गाडीत किती माणसे आहेत? गाडीचा रंग कोणता आहे? आशा तत्सम गोष्टी जाणुन घेतल्या. नंतर आपल्या मदतनिसाला सांगुन त्याने सर्व तयारी करून ठेवण्यास सांगितले. घुबडाच्या विष्ठेपासून बनवलेल्या पावडरने एक वर्तुळ बनवले नंतर काळ्या उडीदाच्या पिठापासुन गाडीची एक प्रतिकृती बनवून त्या वर्तुळात ठेवली आणि त्यावर सहा माणसांसाठी सहा लवंगा उभ्या खोचल्या नंतर त्याने त्या प्रत्येक लवंगेवर अभिमंत्रित पाण्याचा एक एक थेंब टाकला आणि एका तारेत ओवलेले लिंबु, मिरच्या, बीब्बा आणि एक काळे बाहुले मंतरून त्या गाडीच्या प्रतिकृती च्या पुढे खोचले. तयारी पुर्ण झाल्यावर त्या बाबाने हातात भस्म घेऊन प्राणरक्षाकवच मंत्र म्हणण्यास सुरवात केली. १००८ वेळा मंत्र म्हणुन तो सिद्ध होताच त्याने हातातील भस्म त्या गाडीच्या प्रतिकृतीवर टाकले त्याबरोबर ती गाडीची प्रतिकृती हवेत तरंगु लागली आणि त्या भोवती अग्नीचे एक सुरक्षा चक्र तयार होऊन गोल फिरू लागले. मग त्या बाबाने इन्स्पेक्टर जाधवांना फोन करून सांगितले की त्याची तयारी पुर्ण झाली आहे आता भगवानदासांनी निघावयास हरकत नाही.
बाबाने सांगितल्याप्रमाणे भगवानदासांनी सकाळी बरोबर पाच वाजून दोन मिनिटांनी गाडीसमोर एक नारळ वाढवला नंतर धारीवली चार लिंबे गाडीच्या चारही चाकांच्या पुढे ठेवली आणि सर्वांना गाडीत बसायला सांगितले. बरोबर पाच वाजून सहा मिनिटांनी त्यांनी महादेवला गाडी सुरु करून पुढे घ्यायला सांगितली आणि देवाचे नाव घेऊन त्यांच्या प्रवासाला सुरवात झाली. गाडी गेटमधून बाहेर पडताच सरळ दिशेत वेगाने जाणारी एक जीप अचानक त्यांच्या दिशेने वळली, ती जीप कारवर आदळणार म्हणुन प्रतिक्षिप्त क्रियेने सर्वांनी डोळे गच्च बंद केले पण काय आश्चर्य समान धृवांच्या चुंबकांमध्ये जसे प्रतिकर्षण असते तसे ती जीप कार पासून दूर ढकलली गेली आणि तशीच आपल्या रस्त्याने वेगाने निघुन गेली. सर्वांना खूप आश्चर्य वाटले पण भगवानदास समजुन चुकले होते की बाबाच्या सुरक्षा कवचाने त्याचे काम चोख केले होते. सर्वांनी अपघात टळल्यामुळे देवाचे आभार मानले आणि गाडी मुंबईच्या दिशेने धाऊ लागली. कारला साधा चारही पडला नाही हे पाहून सात्विक प्रचंड चिडला होता. त्याने वेगवेगळ्या तऱ्हेने त्या कारला थांबवायचा प्रयत्न केला पण ना तो कारचे नुकसान करू शकला ना आतील माणसांचा केसही वाकडा करू शकला. त्याच्या लक्षात आले की कोणी तरी त्या कारचे रक्षण करतोय आणि तो खुप शक्तिशाली आहे. सात्विक अदृश्य रुपात त्या कारचा पाठलाग करू लागला. रात्री उशिरा कारने जसा मुंबईच्या हद्दीत प्रवेश केला तसे तिच्या स्वागतासाठी रुबी हजर होतीच. तिला पाहताच सुलोचना बाईंच्या छातीत धस्स झाले पण ती गाडी पर्यंत पोहोचु पण शकत नसल्याने त्या निर्धास्त झाल्या. तिने रस्त्याच्या कडेला असलेले दगड धोंडे गाडीवर भिरकावले पण सुरक्षा चक्राला भेदुन एकही दगड गाडीपर्यंत पोहोचलाही नाही. सर्वांना सुखरूप घेऊन गाडी बाबाच्या घराच्या दिशेने निघुन गेली आणि सात्विकचा आत्मा रुबीच्या आत्म्याला सामोरा गेला त्याला पाहताच रुबीच्या सुडाची आग आणखीनच प्रखर झाली पण सात्विकचा आत्मा आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे हे जाणुन त्याच्याशी लढण्याऐवजी त्याचा बदला त्याच्या कुटुंबाकडून घेणे जास्त सोपे आहे हे तिने ताडले आणि कधी तरी त्या कार मधुन ती माणसे बाहेर पडतीलच त्यावेळी माझ्या तावडीतुन ती सुटणार नाहीत असा विचार करून ती त्या कारचा पाठलाग करू लागली. सात्विकही तिच्या मागोमाग जाऊ लागला.
[next]पहाटेच्या गार वाऱ्यावर सर्वजण डुलक्या घेत असताना महादेवने त्यांची कार बाबाच्या घरासमोर थांबवली. इतका मोठा प्रवास करून आल्यामुळे सर्वांचेच अंग दुखत होते. पुऱ्या प्रवासात जेमतेम तीन वेळा त्यांनी गाडी थांबवली होती तीही नाईलाजाने कारण कितीही भीती असली तरी शरीरधर्म आजवर कोणाला चुकलाय? पण बाबाच्या मदतनीसाने त्यांना घाई करण्यास सांगितल्यामुळे अंग मोकळे करायचा विचार बाजूस सारून सर्वजण त्याच्या मागोमाग त्या तळघरातील गुप्त खोलीत गेले. बाबा त्यांची वाटच पाहत होता. त्याने सर्वांना तिथे आधीच बनवून ठेवलेल्या सुरक्षाचक्रात प्रवेश करण्यास सांगितले. जीव मुठीत धरून सर्वजण त्या रिंगणात आत शिरतात न शिरतात तोच रुबी भयानक हास्य करत तिथे प्रकटली त्याबरोबर बाबाने हातातील भस्म मंत्रुन रुबीच्या आत्म्यावर फेकले त्यामुळे ती एका अदृश्य बंधनात बांधली गेली. आपण पुरते अडकल्याची जाणीव होताच ती एकदम बेफाम झाली, बाबाला सोड म्हणु लागली. तिचा तो अवतार काळजाचा थरकाप उडवणारा होता. छोट्या रोहितचा विचार करून बाबाने मंत्राने त्याला वेळीच झोपवून टाकले होते. रुबी वेगाने वरखाली होऊ लागली. ती बाबाचा गळा पकडायचा प्रयत्न करू लागली तसे बाबाने तिच्यावरील बंधन अधिक आवळत तिच्या वर पुन्हा एकदा भस्म मंत्रुन फेकले त्याबरोबर तिचा रुद्रावतार शांत होवून भयंकर किंचाळत ती भेसूर रडू लागली. जिवंतपणी अप्सरेप्रमाणे सुंदर असणाऱ्या रुबीला खाविसाकडून मृत्यु प्राप्त झाल्यामुळे ती एक जखिण बनली होती. स्वत:च्या सौंदर्याचा तिला कोण गर्व होता! आपल्या सौंदर्याच्या तालावर कितीतरी श्रीमंत धेंडांना तिने हवे तसे नाचवले होते पण आज त्या बाबासमोर ती अगदीच आगतिक वाटत होती. बाबाने आपल्या घनगंभीर आवाजात रुबीसमोर दोन पर्याय ठेवले. एकतर तिने कुलकर्णी कुटुंबाचा सुड घेण्याचा विचार सोडुन द्यावा म्हणजे तो तिच्या मुक्तीसाठी प्रयत्न करेल आणि तिला पुनर्जन्म घेता येईल आणि हे जर मंजुर नसेल तर तो तिला अनंत काळासाठी बंधनात ठेवेल आणि तिला प्रचंड शिक्षा भोगावी लागेल. रुबी सत्यजित आणि सुलोचना बाईंकडे कडे रागाने पाहत होती, आपला बदला पुरा व्हायची शक्यता धुसर होत चालली असल्याचे तिच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. असे जखिण बनुन शिक्षा भोगत सडण्यापेक्षा मुक्ती घेऊन पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करून घेणे हा नक्कीच फायद्याचा सौदा होता. तिने सुडाचा विचार कायमचा सोडुन दिल्याचे बाबाला सांगितले आणि आपल्याला मुक्ती देण्याची विनंती केली. त्याबरोबर त्या बाबाने तिची बंधनातून मुक्तता केली आणि पिशाच्च मुक्ती मंत्र म्हणायला सुरवात केली, मंत्र पुर्ण होताच त्या तळघरात एक दिव्य प्रकाश उत्पन्न झाला ज्याने सर्वांचेच डोळे दिपुन गेले. बाबाने तिला त्या प्रकाशात विलीन होण्यास सांगितले आणि पाहता पाहता ती त्या प्रकाशात लुप्त झाली. रुबीचा आत्मा मुक्त होताच सुलोचना बाई आणि सत्यजितने सुटकेचा निश्वास सोडला पण भगवानदासांच्या कुटुंबावरती अजुनही टांगती तलवार लटकतच होती.
[next]सात्विक आपल्या शक्तींनी बाबाच्या घराबाहेरूनच तळघरात सुरु असलेला विधी पाहत होता. काही झाले तरी भगवानदासाचा बदला घ्यायचाच असा त्याने निश्चय केला होता. अर्ध्या तासात अमावस्या सुरु होणार होती आणि तो फक्त त्या क्षणाचीच वाट पाहत होता. अमावस्या सुरु झाल्यावर तो प्रचंड शक्तिशाली होणार होता आणि त्यानंतर तो बाबा त्याचे काहीच बिघडवू शकणार नव्हता. जस जसा वेळ सरू लागला तसतसा तो बाबा चिंतीत होऊ लागला कारण एकदा अमावस्या सुरु झाली की तो काहीच करू शकणार नव्हता. घाई करायला पाहिजे हे त्याने ताडले. तो सत्विकच्या आत्म्याचे आवाहन करू लागला तसा सात्विकचा आत्मा बाबाच्या तळघराकडे ओढला जाऊ लागला. तो आपला पुरा जोर लावत होता पण शेवटी बाबा आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याला तळघरात आणण्यात यशस्वी झाला. या चढाओढीत पंधरा मिनिटे अजुन गेली आणि आता अमावास्या सुरु व्हायला फक्त पंधरा मिनिटे उरली होती. बाबाने सात्विकला बंधनात बांधले आणि रुबी समोर ठेवलेला पर्याय सात्विक समोर ठेवला पण सात्विक मानायला तयार नव्हता. उलट तो बाबालाच धमकी देऊ लागला की ‘माझ्या रस्त्यातून बाजुला नाही झालास तर मी तुला ठार मारेन आणि जर का मला सूड घ्यायला मदत केलीस तर तुला हवी असलेली शक्ती मिळवायला मी लागेल ती मदत करेन’. त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करुन बाबाने आपली पुरी शक्ती पणाला लावली पण जस जसा वेळ सरत होता तास तशी सात्विकची ताकद वाढायला सुरवात झाली होती. शेवटी सात मिनिटे शिल्लक होती तेव्हा त्या बाबाने भगवानदासांना आता आपल्या हातातून वेळ निघुन चालली असुन आता जर का सात्विकचा बदला घेण्याच्या उद्देशाला आपण काट देऊ शकलो तरच यातुन वाचु शकतो कारण सात्विकला स्वत:हुन मुक्त व्हावेच लागेल आणि सर्वांचा जीव वाचेल नाहीतर तुमच्यासोबत मी सुद्धा वाचणार नाही असे सांगितले. त्या बरोबर सुलोचना बाईंची नजर घाबरलेल्या राधाबाईंना धीर देत असलेल्या सत्यजितवर पडली आणि त्यांच्या डोक्यात एक विचार चमकला की जर का सत्यजितचे राधाशी लग्न झाले तर दोन्ही घराण्यांचा एकमेकांशी संबंध जुळल्यावर वैर संपेल आणि वैरच नष्ट झाल्यावर सात्विक आपल्याच भावाच्या पत्नीचा आणि तिच्या नातेवाईकांचा खुन करण्याचा प्रश्नच उरत नसल्यामुळे त्याला मुक्त व्हावेच लागेल. सुलोचना बाईंनी हा विचार मांडताच भगवानदासांनी राधाबाईंकडे पाहीले. काय बोलावे ते न कळल्यामुळे त्या गप्पच बसल्या तेवढ्यात तो बाबा ओरडला,‘हेच योग्य होईल आता जास्त वेळ दवडू नका, मी याला अजुन बंधनात नाही ठेऊ शकत’. राधाने होकार देताच सत्यजितने द्रोणात ठेवलेल्या कुंकवाकडे आपला हात पुढे केला पण सात्विकने आपल्या सामर्थ्याने तो द्रोणच उडवून लावला आणि गरजला, ‘सत्यजित, मी तुला राधाशी लग्न करू देणार नाही. मी माझा सुड घेणारच’! असे म्हणत सात्विक गडगडाटी हास्य करू लागला. त्याबरोबर आता पुढे काय हा विचार करत असतानाच महादेवाने कोपऱ्यातील तलवारीकडे सत्यजितचे लक्ष्य वेधले. महादेवाला काय म्हणायचे आहे ते लक्षात येताच विजेच्या चपळाईने सत्यजित त्या तलवारीकडे झेपावला. तो काय करतोय हे सत्विकच्या लक्षात यायच्या आत सत्यजितने तलवारीवरून आपला उजवा अंगठा फिरवला आणि आपल्या रक्ताने राधाबाईंचा मळवट भरला. दुसऱ्याच क्षणाला अमावस्या सुरु झाली आणि सत्विकच्या डोक्यावर प्रकट झालेल्या दिव्य प्रकाशात तो ओढला गेला आणि पाहता पाहता गायब झाला. ते पाहताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
[next]सात्विकसाठी सुलोचना बाईंचे डोळे भरले होते. कसाही असला तरी तो त्यांचा मुलगा होता. मृत मुलाच्या सुडापेक्षा जिवंत मुलाचे सुख आणि भगवानदासांच्या कुटुंबियांचा जीव त्यांना जास्त मौल्यवान वाटला. सात्विक आता मुक्त झाला असल्यामुळे तेही एक समाधान त्यांना मिळाले होते. नवपरिणीत दाम्पत्याने सुलोचना बाई, भगवानदास, महादेव आणि बाबाच्या पाया पडून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. आपल्या सुनेच्या बेरंगी पांढऱ्या आयुष्यात सत्यजितच्या रुपात पुन्हा एकदा सुख नानाविध रंग घेऊन येणार आणि आपल्या नातवाला पुन्हा एकदा पित्याचे प्रेमळ छत्र लाभणार या विचाराने भगवानदास आंतरबाह्य सुखावले. त्याचवेळी आज आपली पत्नी हा दिवस पाहायला जिवंत हवी होती हा विचार त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या करुन गेला. माझा गोपाळ जिथे कुठे असेल तिथुन आशीर्वादच देत असेल असा विचार करुन त्यांनी आपले डोळे टिपले. बाबाने मंत्र म्हणुन रोहितला झोपेतुन जागे केल्यावर सत्यजितने त्याला उचलुन घेतले. भगवानदासांनी पुढे केलेले पैशाचे पाकीट नाकारुन बाबाने त्यांचे अभिनंदन करत ते लग्नात त्याच्या वतीने खर्च करण्यास सांगितले. शेवट गोड तर सगळे गोड या उक्तीला धरून, झाले गेले सर्व विसरून दोन्ही कुटुंबिय लग्नाच्या रितसर तयारीसाठी गावाकडे आनंदाने मार्गस्थ झाले. आशा तऱ्हेने दोन्ही कुटुबांच्या मिलनानेच त्या सुडचक्राचा भेद करणे शक्य झाले होते.
आमच्या सत्यजित आणि राधाच्या लग्नाला यायचं हं!
विषेश सुचना: आपल्या लाईक्स आणि कमेंट्स हाच आहेर.
अभिप्राय