सुड, मराठी भयकथा - [Sud, Marathi Bhaykatha] असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा.
असंगाशी संग, प्राणाशी गाठ! ही म्हण, आपण ऐकली असेल; पुस्तकातही वाचली असेल पण प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर वाचा सात्विक आणि गोपाळरावांची ही कथा
गोपाळराव गावातील एका सुखवस्तु कुटुंबात जन्मलेले एक प्रतिष्ठित व्यापारी. लहानपणापासून मागतील ते मिळाल्यामुळे थोडेसे हेकेखोर स्वभावाचे. व्यापाराचे बाळकडु लहानपणापासूनच मिळाले असल्यामुळे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे अगदी उत्तम रितीने त्यांच्या अंगवळणी पडले होते. गोड बोलून माल ग्राहकाच्या गळ्यात मारणे म्हणजे त्यांच्यासाठी ‘बाए हाथ का खेल’ झाले होते. जेमतेम दहावी पास झाले असतील आणि त्यांच्या वडीलांनी म्हणजेच भगवानदासांनी त्यांना आपल्या पिढीजात कापडधंद्यात ओढले. मुळचे हुशार असलेल्या गोपाळरावांनी वडीलांच्या तालमीत व्यापारातील सर्व खाचाखोचा समजुन घेतल्या होत्या. कुठे स्वस्त आणि चांगल्या प्रतीचे कापड मिळते, कापडाचा पोत कसा ओळखावा, ग्राहकाला गरज नसलेली वस्तुपण त्याला बोलण्यात गुंगवून त्याच्या गळ्यात कशी मारावी, बाजारातील मंदीतही धंदा कसा टिकवावा असे एक ना अनेक फंडे भगवानदासांनी त्यांना शिकवले. स्वकर्तुत्वावर गोपाळरावांनी धंदा वाढवला. दोनाची चार दुकाने झाली. सुरत, पैठण, इचलकरंजी, मालेगाव, मुंबई अशा अनेक शहरात ते एकटेच जाऊन डील यशस्वी करून यायचे. भगवानदासांना आता खात्री पटली की गोपाळराव धंदा सांभाळण्याइतके तरबेज झाले आहेत. गोपाळरावांनी वयाची एकविशी ओलांडताच भगवानदासांनी त्यांचे दोनाचे चार हात करुन टाकले. वर्षभरात गोपाळरावांना पुत्ररत्न पण प्राप्त झाले.असेच एका संध्याकाळी मुंबईतील कापड खरेदीचा व्यवहार आटपून गोपाळराव एका बारमधे महागड्या स्कॉचचे पेग रिचवत रिलॅक्स बसले होते. इतक्यात त्यांची नजर भिंतीजवळील एका टेबलकड़े गेली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दहावीतील त्यांचा वर्गमित्र सात्विक दारु पित बसलेला दिसला. इतक्या वर्षांनी जुन्या मित्राला पाहुन गोपाळरावांचे मन अलगद भुतकाळात गेले. नाव जरी सात्विक असले तरी स्वभावाने अगदी विरुद्ध असलेला कुलकर्ण्यांचा हा कार्टा पुरता अवली होता. याच्या अंगी नाना कळा होत्या. कधी शांत म्हणुन बसणे नाही, सतत मुलींच्या खोड्या काढणे, मास्तरांच्या नकला करणे, तास बुडवून पोहायला जाणे, मुलांच्या आपापसात मारामाऱ्या लावून गंमत बघत बसणे, परीक्षेत कॉप्या करणे, इतरांचे डबे गपचुप चोरून खाणे हे असले याचे आवडीचे उद्योग. म्हणतात ना, “समान शीले व्यसने सु सख्यम”. गोपाळरावांना तो एखाद्या हीरोप्रमाणे आदर्श वाटायचा कारण जे त्यांच्या मनात असायचे सात्विक ते कृतीत उतरवायचा. वडीलांच्या धाकामुळे गोपाळराव थोडे कंट्रोलमधे असायचे पण सात्विक बरोबर असताना त्यांच्यातील खरा गोपाळ बाहेर पडायचा. हळुहळु दोघांची चांगलीच गट्टी जमली आणि दोघे मिळून मास्तरांच्या नाकी नऊ आणु लागले. कधी एकदा दाहावीची परीक्षा होते आणि दोघे शाळेतून आपले तोंड काळे करतात असे सर्वांना झाले होते. आपल्या मुलाचे प्रताप भगवानदासांच्या वेळोवेळी कानावर येत असत पण लहान आहे अजुन असे म्हणुन ते कानाडोळा करत असत. आणि शेवटी तो दिवस आला. दहावीच्या परीक्षेत दोघे काठावर पास झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे दिवटे शाळेतून कायमचे जाणार या आनंदात स्वखर्चाने संपुर्ण शाळेला पेढे वाटले.
रिझल्टच्याच दिवशी सार्वजनिक महिला शौचालयाच्या भिंतीवर चढुन आत वाकुन पाहाताना काही लोकांनी या दोघांना रंगे हाथ पकडले आणि लाथा बुक्क्यांचा यथेच्छ प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हे कमी होते की काय म्हणुन भगवानदासांच्या कानावर ही बातमी जाताच त्यांनी पोलिस स्टेशनमधे जाऊन दोघांना बेदम चोपले, इतके की शेवटी इन्स्पेक्टर आणि चार हवालदारांना मधे पडावे लागले. भगवानदास एक प्रतिष्ठित व्यापारी होते. समाजात त्यांना खुप मान होता, त्यामुळे आपल्या मुलाच्या या कृत्याचा त्यांना मोठा धक्का बसला होता, शरमेने त्यांची मान खाली गेली होती. इन्स्पेक्टरने त्यांची समाजातील पत पाहुन त्या दोघांना केवळ वॉर्निंग देऊन सोडुन दिले. त्या दिवसानंतर गोपाळरावांना आज सात्विक दिसत होता.
[next] टिचकीच्या आवाजाने भानावर येत गोपाळरावांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तर सात्विक त्यांच्याकडे पाहात स्माईल करत उभा होता. दोघांनी एकमेकांना कडकडुन मिठी मारली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोन दोन पेग झाल्यावर जेवण करुन दोघे बार मधुन बाहेर पडले तोपर्यंत रात्रीचा एक वाजुन गेला होता. सात्विकचा निरोप घेण्यासाठी गोपाळरावांनी चल भेटुया परत, म्हणत शेकहॅंडसाठी हात पुढे केला तर सात्विक त्यांना म्हणाला, “अरे यार! इतक्या वर्षांनी भेटला आहेस आणि लगेच काय जायच्या गोष्टी करतोस”? उशीर झाला असुन सकाळी लवकर उठुन गावी परतायचे असल्याचे गोपाळरावांनी त्याला सांगितले. “जाशील रे! चल माझ्यासोबत”, असे म्हणत सात्विकने जबरदस्तीने गोपाळरावांना कार मध्ये बसवले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने जॉब वर जायचे तसेही त्याला टेंशन नव्हतेच. साधारण पंधरा मिनिटातच गाडी एका डान्सबार समोर थांबली. बाहेरून काहीच वाटत नव्हते पण बेहऱ्याने दरवाजा उघडताच आत मोठ्या आवाजातील फिल्मी गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या आठ दहा मुली, त्यांच्यावर नोटा उडवणारे लोक व कस्टमर्सशी लगट करत त्यांच्या ऑर्डर्स सर्व्ह करणाऱ्या वेट्रेस पाहुन गोपाळराव दरवाज्यातच थबकले. आजपर्यंत डान्सबारबद्दल केवळ ऐकले होते पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी हे सगळे पाहिल्यावर गोपाळराव एकदम बुजुन गेले. त्यांची ती अवस्था लक्षात येताच सात्विकने त्यांना जवळ जवळ ढकलतच आत नेले. कोपऱ्यातील एका टेबलवर ते बसताच लगेचच एक वेट्रेस ऑर्डर घेण्यासाठी आली. सात्विकने तिला छेडत गोपाळरावांना काय घेणार म्हणुन विचारले. गोपाळराव इतके बुजले होते की मान खाली घालुनच बसले होते. त्यांच्याकडुन उत्तर येत नाही असे लक्षात येताच सात्विकने दोन बियर आणि मसाला पापडची ऑर्डर देऊन गोपाळरावांना रिलॅक्स होऊन एन्जॉय करण्यास सांगितले. पोटात बियर गेल्यावर गोपाळरावांना थोडी तरतरी आली आणि जवळपास अर्ध्या तासानी त्यांची भीड चेपली. पुढे दोन तास त्या दोघांनी फुल टु धमाल केली. पोरीँवर नोटा उडवल्या, त्यांच्या सोबत नाचले, अजुन दोन दोन बियर प्यायले. बाहेर पडले तेव्हा साडेचार वाजले होते.
मोठ्या मुश्किलीने कशी बशी गाडी चालवत ते गोपाळराव उतरलेल्या लॉजपाशी आले. दारु खुपच जास्त झाली असल्यामुळे सात्विक पण लॉजवरच झोपला. दोघांना जेव्हा जाग आली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. मोबाईल वर बायकोचे आणि भगवानदासांचे जवळपास वीस एक मिस कॉल्स पाहुन गोपाळरावांच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यांची ती धावपळ पाहुन सात्विक ने त्यांना शांत होण्यास सांगितले. “अजुन किती दिवस वडीलांना घाबरत आणि असे मन मारत जगणार आहेस? काल तु किती खुश होतास आणि आत्ता तुझी अवस्था बघ! अरे आपले आयुष्य आपल्या मर्जीने जग”! सात्विकची ती वाक्य गरम शिश्यासारखी गोपाळरावांच्या कानात शिरत होती. त्यांच्या मेंदुला झिणझिण्या आल्या. सात्विक बरोबरच तर बोलत आहे, अजुन किती दिवस? हा प्रश्न त्यांच्या मेंदुत प्रतिध्वनित होत राहीला. काल सात्विकमुळे पहिल्यांदा त्यांनी इतके एन्जॉय केले होते. दहावीच्या रिझल्टच्या दिवसापासून आजतागायत केवळ काम आणि कामच करत होते. बस! ठरले तर आता, आपण पण सात्विकप्रमाणे आयुष्य एन्जॉय करायचे असे मनाशी ठरवून त्यांनी परत यायला अजुन दोन चार दिवस लागतील असे घरी कळवुन टाकले. इतकी वर्ष गोपाळराव कधीच आपल्या आज्ञा बाहेर न गेल्याने व धंदा व्यवस्थित सांभाळत असल्याने, असेल काही काम असा विचार करुन भगवानदासांनी पण जास्त चौकशी केली नाही.
[next] गोपाळरावांमधे आलेला बदल लक्षात येताच सात्विकचे डोळे एका वेगळ्याच तेजाने चमकले. मनातल्या मनात त्याने स्वतःची पाठ थोपटली. रात्रीच्या हँगओव्हर वर उतारा म्हणुन एक एक बियर पिऊन दोघे जेवायला गेले. रात्री पुन्हा एकदा दुसऱ्या एका डान्सबारमध्ये सात्विक गोपाळरावांना घेऊन गेला. तिथे रूबी नावाच्या एका अप्रतिम सौंदर्य लाभलेल्या बारबालेला गोपाळराव आपले हृदय देऊन बसले. त्या रात्री जवळ जवळ लाखभर रुपये तिच्यावर ऊधळुन गोपाळराव पहाटे पहाटे लॉजवर परतले. पुढचे दोन दिवस हेच चालु होते. तिसऱ्या दिवशी नाईलाजाने ते घरी परतले पण रूबीचा मोबाइल नंबर घेऊनच. गोपाळरावांचे धंद्यातील लक्ष उडाले. ‘जळी स्थळी काष्ठी पाषाणी’ त्यांना रूबीच दिसत होती. तिच्या समवेत घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी त्यांना स्वस्थ बसु देत नव्हत्या. थोड्या थोड्या वेळाने ते रूबीला कॉल करत असत, सुरवातीला ती कॉल घेत असे पण दोनच दिवसानंतर ती त्यांचा फोन टाळु लागली त्यामुळे ते आणखीनच व्याकुळ होऊ लागले. त्यांच्यातील हा बदल भगवानदास आणि गोपाळरावांच्या पत्नीच्या लक्षात यायला वेळ नाही लागला पण धंद्याचे टेंशन सांगुन त्यांनी वेळ मारून नेली. कसाबसा शुक्रवार गेला आणि धंद्याच्या नावाखाली गोपाळरावांनी मुंबई गाठली. सात्विकला सोबत घेऊन पुन्हा एकदा रूबीला भेटले. कस्टमर्स मुळे फोनवर जास्त बोलता येत नसल्याचे सांगुन रूबी त्यांना समजावत आत घेऊन गेली आणि आपल्या अदांनी त्यांचा रुसवा काढुन टाकला. दोन दिवसांनी गोपाळराव घरी परतले ते रुबीवर तीन लाख रुपये उडवूनच.
भगवानदासदासांनी पैशाबद्दल विचारताच प्रवासात हरवल्याचे सांगुन त्यांनी वेळ मारून नेली. पण भगवानदासदासांना संशय येऊ लागला होता. पुढे पुढे गोपाळरावांच्या मुंबई वाऱ्या खुपच वाढल्या. भगवानदासांनी एक दिवस चांगलेच फैलावर घेतल्यावर पहिल्यांदाच गोपाळरावांनी त्यांना दुरुत्तरे केली. इतक्या वर्षांपासून मनात साचलेले सर्व काही त्यांनी आज वडीलांसमोर ओकुन टाकले. आपले स्वातंत्र्य हिरावून घेऊन आपल्यावर जबरदस्तीने स्वतःची मते लादल्याबद्दल त्यांनी वडीलांना खुप दोष दिला. मुलाचे ते आरोप ऐकुन भगवानदास मनातुन खचले. त्यांना गोपाळरावांचा प्रत्येक शब्द बाणासारखे टोचत होता. साश्रु नयनांनी त्यांनी गोपाळरावांना ‘तुला जसे वाटेल तसे तु जग, यापुढे तु आणि तुझे नशीब’ असे म्हणुन दोन दुकाने त्यांना सांभाळायला दिली आणि दोन स्वतःला ठेवली. एकाच घरात राहुनही पितपुत्राला एकमेकांचे दर्शन ही दुर्लभ झाले. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. वडीलांचा अंकुश हटल्यामुळे गोपाळरावांचे वागणे पुर्णपणे बेताल आणि एखाद्या जंगली मदमस्त हत्तीसारखे बेमुर्वत झाले. आता ते मुंबईत रुबीकडेच पंधरा पंधरा दिवस मुकाम ठोकु लागले.
[next] असेच एकदा ते मुंबईतुन गावी परतले आणि दुकानात बसले असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर रूबीने पाठवलेल्या एका क्लिपचा MMS मिळाला ज्यात त्यांनी रुबीसोबत घालवलेले बेधुंद क्षण चित्रित केले होते. क्लिप पाहाताच गोपाळरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्लीप पाहुन होते न होते तोच रूबीचा फोन आला. तिने गोपाळरावांना ‘आपली अब्रु वेशीवर टांगली जाऊ नये असे वाटत असेल तर दर महिन्याला नियमित पणे दहा लाख रूपये ढीले करत जा’ असे धमकावले. गोपाळरावांना चढलेली इश्काची धुंदी खाडकन उतरली. त्यांच्या तळ पायाची आग मस्तकात गेली पण गावात इज्जतीचा पंचनामा होण्यापेक्षा रुबीच्या मागण्या गुपचुप पुर्ण करणेच आपल्या हिताचे आहे असे वाटुन ते गप्प बसले. त्यांचे मन या नसत्या फंदात अडकवल्याबद्दल सात्विकला दोष देत होते पण त्याची तरी काय चुक? रुबीच्या हातात त्यांनी स्वत:हुन आपली मान दिली होती आणि आता ती तिला हवी तशी पिरगळत होती. आपल्या पत्नीशी प्रतारणा केल्याचा आणि वडीलांचा अपमान केल्याचा त्यांना प्रचंड पश्चात्ताप झाला पण कोणत्या तोंडाने माफी मागणार होते. पुढे पुढे रुबीच्या मागण्या वाढु लागल्या आणि त्या पुरवताना त्यांच्या तोंडाला फेस येऊ लागला. लाखांची खाक व्हायला वेळ नाही लागला. ते कर्जबाजारी झाले, तब्येत खालावली. त्यांची ती अवस्था भगवानदासांचे काळीज चिरत होती पण ते कारणापासून पुर्णपणे अनभिज्ञ होते.
शेवटी एक दिवस रूबीने पन्नास लाखांची मागणी करताच गोपाळरावांचा संयम संपला, त्यांनी सात्विकशी भेटुन या समस्येवर कायमचा तोडगा काढायचे ठरवुन मुंबई गाठली. सात्विकला सोबत घेऊन त्यांनी रुबीशी तडजोड करायचा प्रयत्न केला पण तिने ते साफ धुडकावून लावले आणि आपल्या गुंडाना सांगुन त्या दोघांना धक्के मारून बाहेरचा रस्ता तर दाखवलाच वर नियमित पैसे न दिल्यास घरी आणि दुकानासमोर येऊन तमाशा करायची धमकी द्यायला ती विसरली नाही. अपमानाने धुमसत गोपाळराव सात्विक सोबत बाहेर पडले. बाहेर पडताना सात्विक आणि रुबीची झालेली नेत्रपल्लवी गोपाळरावांच्या लक्षातही आली नाही. ते आपल्या अपमानाच्या आगीत जळत होते. जिच्यावर आपण इतका जीव लावला, ती म्हणेल तितका पैसा दिला त्या रूबीने आपल्याशी असे वागावे हे त्यांना सहन झाले नाही.
[next] रूबीला शिव्या घालत आणि चरफडत ते सात्विक सोबत एका बारमधे आले. दोन निप पिऊन सुद्धा आज त्यांना जरादेखील नशा आली नव्हती. सात्विकने सध्या रूबीला थोडे पैसे देऊन गप्प करू मग शांतपणे विचार करू काय करायचे ते असे सुचवताच, गोपाळरावांना ते पटले आणि त्यांनी सोबत आणलेले दहा लाख रूपये सात्विककडे रूबीला देण्यासाठी सुपुर्द केले. दहा लाख पाहताच सात्विकच्या डोळ्यात क्षणभरासाठी पुन्हा एकदा तीच चमक तरळुन गेली. गोपाळरावांना लॉजवर सोडुन, उद्या संध्याकाळी भेटु असे सांगुन सात्विक दहा लाख रुपयांनी भरलेली ब्रिफकेस घेऊन प्रसन्न मुद्रेने बाहेर पडला. गोपाळरावांना रात्रभर झोप लागली नाही, विचार करुन त्यांचे डोके फुटायची पाळी आली होती. पहाटे पहाटे त्यांना थोडी झोप लागली. दुपारी बारा-साडे बाराला त्यांना जाग आली आणि रूबीला आपल्या रस्त्यातून अलगद दूर करायची एक योजना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली.
सात्विकची दिवसभर मोठ्या अधिरतेने ते वाट पाहात होते, शेवटी संध्याकाळी पाच वाजता तो लॉजवर आला. गोपाळरावांनी रुबीची सुपारी द्यायची योजना त्याला सांगितली. क्षणभर विचार करुन त्याने त्या योजनेतील त्रुटी त्यांना सांगितल्या. एक म्हणजे रुबीचे बॉडीगार्ड सतत तिच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. दोन म्हणजे जर का सुपारी घेणारा पकडला गेला तर रूबी कडुन जिवाला आणि इज्जतीलाही धोका होऊ शकतो आणि तिसरे म्हणजे पोलिसांपर्यंत ही गोष्ट गेली तर अटक व्हायची भिती पण आहे. “मग काय तिला असेच सोडुन द्यायचे आणि आयुष्यभर तिची भर करत राहायचे”? गोपाळराव कडाडले. “नाही! एक उपाय आहे ज्याने साप पण मरेल आणि काठी पण नाही तुटणार”, सात्विक म्हणाला. त्याने आपली योजना सांगताच गोपाळरावांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित पसरले.
[next] जवळपास दोन तास त्यांची कार धावत होती. एक तीव्र वळण घेऊन एका झोपडीवजा घराजवळ ती थांबली तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. दाराची कडी वाजवताच एका चाळीशीच्या आसपास वय असलेल्या एका उघड्याबंब माणसाने दरवाजा उघडला. सात्विकने त्याला कानात काहीतरी सांगताच मान हलवून त्यांना बाहेरील बाकावर बसायला सांगुन तो आत गेला. पाचच मिनिटांत तो परत आला आणि त्यांना घेऊन आत गेला. घर एकदम साधे सुधेच होते. शेणाने सारवलेल्या जमिनीवर एका कोपऱ्यात एक चटई टाकलेली होती समोरच एक जुनी खाट होती त्यावर एक अत्यंत वृद्ध पुरुष झोपला होता. असे वाटत होते की तो शेवटच्या घटका मोजतोय. नुसती घरघर ऐकू येत होती. एका कोपऱ्यात एका माठात पाणी भरून ठेवले होते आणि भिंतीवर एक बल्ब लटकत होता ज्यातून रोगट पिवळसर प्रकाश बाहेर पड़त होता. एकंदर वातावरण कुबट, उदास आणि नकारात्मक उर्जेने भरले होते. हे सर्व पाहुन गोपाळराव संभ्रमात पडले होते. इतक्यात त्या माणसाने दरवाज्याची कडी लावली आणि बल्ब बंद केला. खोलीत अंधाराचे साम्राज्य पसरले. डोळ्यांवर ताण देऊनही काही दिसत नव्हते.
त्या माणसाने ती चटई बाजुला केली आणि एक कळ फिरवली. त्याबरोबर जमिनीतील एका गुप्त तळघराचा दरवाजा उघडला आणि खालुन वर येणाऱ्या प्रकाशात पायऱ्या दिसु लागल्या. ते पाहुन गोपाळराव आणि सात्विक दोघेही स्तिमित झाले. त्या माणसाने त्यांना आपल्या पाठोपाठ येण्यास सांगितले आणि पायऱ्या उतरत त्यांनी त्या तळघरात प्रवेश केला. तळघरातील वातावरण एकदम थंड होते. नकळत गोपाळरावांच्या मनात भिती निर्माण झाली पण सात्विकसोबत असल्यामुळे त्यांना खुप आधार वाटत होता. खाली गेल्यावर एक प्रशस्त आणि स्वच्छ खोली होती. हवेच्या आवागमनासाठी केलेल्या योजनेमुळे श्वास घ्यायला मुळीच त्रास होत नव्हता. एका तेजस्वी पुरुषाने त्यांचे स्वागत केले. त्याच्या डोळ्यातील तेज, त्याचे सामर्थ्य उजागर करत होते. त्याने कपाळावर, दंडावर, मनगटांवर आणि छातीवर भस्म लावलेले होते आणि अंगावर फक्त एक धोतर नेसले होते. निघताना सात्विकने फोन केल्यामुळे त्याने सर्व तयारी आधीच करुन ठेवली होती. एका अग्निकुंडाभोवती हळद, कुंकु, समिधा, काळे उडिद, दारु, काळ्या दूर्वा, भस्म अशा नानाविध साहित्य भरलेले द्रोण व्यवस्थित रचुन ठेवले होते. एका कोपऱ्यात एक ताट झाकून ठेवले होते त्यातून ठिबकणाऱ्या रक्ताने जमिनीवर थारोळे साचले होते. ते पाहुन गोपाळरावांच्या मनात कालवा-कालव झाली पण ते गप्पच राहीले.
[next] त्या बाबाने हात पुढे करताच सात्विकने गोपाळरावांना दोन लाख रुपये भरलेले पाकिट बाबाच्या हातात देण्यास सांगितले पण त्या बाबाने ते हातात न घेता अग्निकुंडाजवळ ठेवण्यास सांगितले. नंतर ते उचलुन आपल्या मदतनिसाकडे देण्यास सांगितले. आता वेळ न दवडता त्याने अग्निकुंड प्रज्वलित केला. स्वतःच्या गळ्यात अस्थिमाला घातली, गावठी कडक दारुचा एक पेला आपल्या घशात रिता केला आणि प्राणरक्षा मंत्र म्हणत त्या अग्निकुंडात तिथे रचलेल्या वस्तुंची आहुती देऊ लागला. मंत्र पुर्ण होताच त्याने भोग लावण्यासाठी आणलेल्या कोंबडयाची मान एका झटक्यात उडवली आणि त्यातुन गळणारे रक्त एका द्रोणात जमा केले आणि त्याच्या मदतनिसाने पाचच मिनिटात सराईतासारखे त्या कोंबडयाला साफ करुन त्याचे मांस, त्याच्या रक्ताने भरलेला तो द्रोण आणि दारुने काठोकाठ भरलेला एक द्रोण असे सर्व एका ताटात भरून त्या बाबासमोर आणून ठेवले. तसेच कोपऱ्यात ठेवलेले बोकडाचे चार किलो मांस पण समोर आणून ठेवले. त्या कोंबडयाच्याच पिसांचे एक रिंगण त्या दोन्ही ताटांभोवती केले. त्यानंतर त्या बाबाने आवाहनाला सुरवात केली आणि थोड्याच वेळात त्या तळघरातील वातावरण एकदम बदलून गेले. ते एकदम जड वाटू लागले, हवेचा संचार थांबला आणि एक भयानक खविस तिथे प्रकट झाला. त्याबरोबर बाबाने प्रथम त्या खविसासाला रक्त, कोंबड़ा, बोकडाचे मांस आणि दारुचा भोग लावला. ते सर्व फस्त करुन तृप्त झालेल्या खविसाने बाबाला ‘काय काम आहे?’ असे विचारले तेव्हा त्याने कोणत्याही परिस्थितीत आज रात्री रूबीला ठार मारुन मार्गात जो आडवा येईल त्यालाही संपवुन सर्व पुरावे नष्ट करण्यास सांगितले. ‘जो हुक्म’ म्हणुन तो खविस डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तिथुन गायब झाला. ‘तुमचे कार्य आज रात्रीच पुर्ण होईल’, असे सांगुन बाबाने त्यांना निघण्यास सांगितले तसेच झाल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तुमचा मृत्यु निश्चित आहे हे ही सांगितले.
लॉजवर परतेपर्यंत कोणी काहीच बोलले नाही. त्या खविसाचे ते भयानक रूप आठवुन अजुनही गोपाळरावांच्या अंगावर काटा येत होता पण आपल्या डोक्यावरची रूबी नावाची टांगती तलवार आता कायमची नाहीशी होणार हा विचार त्यांना सुखावुन गेला. लॉजवर पोहोचायला साडे अकरा वाजले होते. दोघांनाही कडकडून भूक लागली होती त्यामुळे त्यांनी मटण बिर्याणी वर मनसोक्त ताव मारला. सात्विकने मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल गोपाळरावांनी कृतज्ञतेने त्याला घट्ट मिठी मारून आभार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी भेटायचे कबुल करुन सात्विकने गोपाळरावांची आज्ञा घेतली पण जाता जाता रूबीला मरताना पाहायला मिळाले असते तर खऱ्या अर्थाने बदला घेतल्याचे समाधान मिळाले असते असे बोलुन तो निघुन गेला. त्याचे ते वाक्य गोपाळरावांच्या मनात खळबळ उडवून गेले आणि नकळत रूबीला मरताना पहायची इच्छा त्यांच्या मनात जोर धरु लागली.
[next] रात्रीचा एक वाजला होता, गोपाळरावांसारख्या अनेक श्रीमंत शौकिनांना भिकेला लावून रूबी आपल्या आलिशान बंगल्याच्या वातानुकुलित बेडरूम मध्ये गाढ झोपली होती. अचानक तो अक्राळ विक्राळ खविस तिच्या बेडरूम मधे अवतरला. त्याच्या आगमनाबरोबरच हवेचे चलनवलन थांबले. AC सुरु असुनही गरम वाटु लागल्यामुळे रुबीची झोप चाळवली. तिला जाग आली आणि त्या बेडरुममधे ती एकटी नाही हे तिला जाणवले. डोळे किलकिले करत ती अंधारात पाहायचा प्रयत्न करू लागली आणि तिच्या बेडसमोर कोणी तरी उभे असल्याचे तिला जाणवले. घाबरल्यामुळे आपसुकच तिच्या तोंडुन स्त्रिसुलभ किंकाळी निघाली. ती ऐकताच तिच्या बॉडीगार्डने तिच्या बेडरुमच्या दरवाज्यावर नॉक करत दरवाजा उघडला व लाईट लावला. CFL च्या प्रकाशात बेडरुम उजळून निघाली आणि समोर उभ्या असलेल्या भयानक खविसला पाहुन रूबीला तर भोवळच आली. तिच्या बॉडीगार्डने स्वत:जवळील पिस्तुलातून त्या खविसवर गोळी झाडायला आपला हात पिस्तुलाकडे नेण्याआधीच आपल्या राकट पंजाच्या एकाच वारात त्या खविसने त्या बॉडीगार्डची मान धडावेगळी केली. या गडबडीमुळे इतर दोन बॉडीगार्ड पण धावत बेडरूम मध्ये आले. त्या खविसने त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या केल्या. शुद्धित आलेल्या रूबीने किंचाळायला तोंड उघडले पण यावेळी त्यातुन आवाज बाहेर पडायलाही त्या खविसने संधी दिली नाही. त्याच्या हाताची लांब धारधार नखे इतक्या विलक्षण वेगाने फिरली की त्यांनी तिच्या शरीराची खांडोळीच केली. तिचे आ वासलेले मुंडके सोडले तर एकही अवयव शाबूत उरला नव्हता. खिडकीतून हे भयंकर निर्दय हत्याकांड वासलेले दोन डोळे पाहात होते, सूडाच्या समाधानाऐवजी त्यात मूर्तिमंत भिती आणि दुःख दिसत होते. घरातील सर्वांची हत्या करुन तो खविस गायब होणार इतक्यात त्याला काही तरी जाणवले आणि त्याने खिड़कीच्या रोखाने पाहीले, तिथे कोणीच नव्हते. इतक्यात कार सुरु झाल्याचा आवाज आला आणि अत्यंत वेगात एक कार रुबीच्या बंगल्यासमोरून निघुन गेली. खविस त्या घरातून गायब झाला आणि तो बंगला क्षणात आगीच्या ज्वालांमध्ये घेरला गेला आणि घरातील सिलेंडरच्या स्फोटाने सारा परिसर हादरला. बंगल्याच्या नावावर तिथे फक्त दगड विटांच्या ढिगाने भरलेला एक मोठा खड्डा उरला होता.
गोपाळराव रात्री दोन वाजता लॉजमधील आपल्या रूममध्ये धापा टाकत शिरले. घामाने चिंब भिजलेले त्यांचे शरीर लटलटा कापत होते. पाण्याचा अख्खा जग घशात रिकामा करुन त्यांनी आपले शरीर बेडवर झोकून दिले. त्यांच्या डोळ्यासमोरुन अजुनही लाडक्या रुबीचे छिन्नविछिन्न शरीर जात नव्हते. कशीही असली तरी रुबीवर त्यांनी प्रेम केले होते. डोळ्यांसमक्ष झालेला तिचा तो भयानक मृत्यु त्यांचे काळीज पिळवटुन गेला. तिच्या मृत्यूबद्दल ते स्वतःला दोषी मानु लागले. नकळत त्यांचे डोळे भरले, शर्टाच्या बाहीने डोळे पुसताना अचानक वातावरणातील त्यांना परिचित असा जडपणा जाणवू लागला, त्या रुममधील हवा जणू कोणी काढुन घेतली होती. त्यांनी ओळखले की खविसचे आगमन झाले आहे. खविसला पुरावा नष्ट करण्याची बाबाची आज्ञा पाळणे बंधनकारक होते. गोपाळरावांनी आपले डोळे घट्ट मिटले होते. आपल्या गळ्यांवर एक जबरदस्त पकड त्यांना जाणवली आणि श्वासासाठी ते तडफडु लागले. हृदयविकाराचा एक तीव्र झटका बसुन त्यांचा खेळ संपला होता.
[next] गोपाळरावांना गडबडीत लॉज मध्ये शिरताना जवळील बार मध्ये बसलेल्या सात्विकने पाहीले होते, बरोबर रात्री तीन वाजता तो लॉजवर परत आला तेव्हा डोळे फिरलेल्या अवस्थेतील गोपाळरावांचा मृतदेह पोलीस पोस्टमॉर्टेमसाठी घेऊन जात होते. आपली योजना सफल झाल्याचे पाहुन तो मनोमन सुखावला. एका दगडात त्याने चार पक्षी मारले होते. पहिले म्हणजे रूबीला हाताशी धरून गोपाळरावांचा सर्व पैसा काबीज केला. नंतर गोपाळरावांकरवी रूबीला रस्त्यातून बाज़ुला केले. धुर्तपणे रूबीला मरताना पाहण्याची इच्छा गोपाळरावांच्या मनात सोडुन खविस कडुन त्यांचा परस्पर काटा काढुन घेतला. आणि पुत्रशोक करवुन भगवानदासांकडून आपल्या पित्याच्या मृत्युचा बदला घेतला. दहावीच्या रिझल्टच्या दिवशी इन्स्पेक्टरने सोडुन दिले असतानाही दुसऱ्या दिवशी गोपाळरावांच्या नकळत भगवानदासांनी इन्स्पेक्टरला पैसे चारुन सात्विकला बालसुधार गृहात धाडायची व्यवस्था केली. (जेणे करुन परत गोपाळराव आणि सात्विकची कधीच भेट होणार नाही.) त्या धक्क्याने सात्विकचे वडील वारले. बालसुधार गृहातच त्याने बदला घ्यायचा निश्चय केला होता आणि आज त्याने आपल्या पित्याच्या मृत्युचा सुड उगवला होता.
गोपाळरावांवर तो बरेच दिवस पाळत ठेऊन होता, मुंबईतील बार मधे त्यांना तो योगायोगाने भेटला नव्हता. गोपाळरावांना रूबीच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवुन ब्लॅकमेल करण्यापासून ते रूबीचा बाबाकरवी काटा काढुन गोपाळरावांना संपवण्यापर्यंत सर्व प्लॅन मागचा मास्टर माईंड तोच होता.
आपला सुड यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करायला त्याची कार डान्सबारच्या दिशेने मार्गक्रमण करु लागली...
क्रमशः
वाचा या कथेचा पुढील भाग ‘प्रतिशोध’
अभिप्राय