शाळा, मराठी कथा - [Shala, Marathi Katha] पाच मित्रांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते.
गप्पांच्या ओघात चार पाच मित्रांचे भुताचा शोध घेण्याचे ठरते आणि...
अमानवीय शक्ती आपले अस्तित्व कोणाला कधी कुठे कशाप्रकारे दाखवुन देतील याचा काही भरवसा नाही. गप्पांच्या ओघात चार पाच मित्रांचे भुताचा शोध घेण्याचे ठरते आणि त्यांची ती विचित्र इच्छा एका अमानवीय शक्ती पुर्ण करते. जे काही त्यांनी पहिले ते खरेच भुत होते की भास होता हे माहित नाही पण ते जे काही होते ते नक्कीच अंगावर काटा आणणारे होते. त्या पुर्ण प्रसंगाचा शहारा अनुभवण्यासाठी वाचा शाळा ही भयकथा.रात्री जेवण झाले कि आम्ही काही मित्र आमच्या शैलू नावाच्या एका मित्राच्या एस टी डी बुथवर गप्पा मारायला जमायचो. गप्पात इतर तरुण मुलांच्या विषयासारखे मारामार्या, मुली, सिनेमे, कॉलेज मधील प्रोफेसर इत्यादी विषय असायचे पण हळूहळू विषय भुताटकी या विषयावर जायला लागला, ज्याला जो काही अनुभव असे किंवा काही माहीत असे त्याप्रमाणे तो शेयर करायचा. ऐकताना खुप थ्रिल वाटायचे. त्या एस टी डी बुथपासून माझ्या घरी जाण्याच्या रस्त्याला लागुनच एक पहिली ते चौथी साठी पुर्व प्राथमिक कौलारू शाळा होती. तिला दगडी चिरा वापरून बांधलेला गडगा (कंपाउंड) होता आणि रस्त्याच्या बाजुचा तो गडगा तोडुन शाळेत जायची वाट केली होती, गेटचा पत्ताच नव्हता. दिवसा काही वाटायचे नाही पण रात्री त्या शाळेच्या बाजुने जाताना ती खुप भयाण वाटायची, रस्त्यावरील पोलवरच्या दिव्याच्या प्रकाशात शाळेच्या दारांना लावलेली कुलपे आणि चंदेरी रंगाचा ध्वजस्तंभ चमकायचा, वार्यामुळे जिर्ण झालेले झोपाळे आणि घसरगुंड्या करकरायच्या. शांत वातावरणात ते आवाज खुप भीतीदायक वाटायचे. पण कधी काही दिसले नाही.
[next]असेच एका रात्री जेवल्यावर मी एस टी डी बुथवर गेलो होतो, अजुन आमची गँग जमा झाली नव्हती. हळूहळू एक-एक तारा उगवायला लागला. चार पाच जण जमल्यावर भुताचा विषय निघाला. प्रताप म्हणाला की त्या शाळेत भुत आहे. साहजिकच मी त्याचे म्हणणे उडवून लावले तेव्हा तो म्हणाला की, “अरे त्या शाळेच्या आवारात गेले की पैंजणाचे आणि नाणे जमिनीवर घरंगळत गेल्यासारखे आवाज येतात आणि दारे आपोआप हलतात.” मी काही मानायला तयार नव्हतो कारण माझा रोजचा रस्ता असल्यामुळे त्या शाळेजवळूनच मी नेहमी यायचो जायचो अर्थात बाईकवरून पण कधीच काही दिसले नव्हते. झाले! भुताचा छडा लावायचे ठरले आणि आम्ही चौघे शाळेच्या दिशेने निघालो.
चालताना माझा पाय अमितला लागल्यामुळे मी त्याला हात लावुन नमस्कार केला. त्याचा स्पर्श मला एकदम थंडगार वाटला. वास्तविक रत्नागिरी समुद्र किनार्याजवळ वसल्यामुळे मुंबई सारखाच येथेही प्रचंड उकाडा असतो, थंडीचा तर काही संबंधच नाही. त्यामुळे मला थोडे नवल वाटले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात आम्ही शाळेजवळ पोहोचलो. शाळेच्या आवारात प्रवेश करताच एक थंड हवेच्या झोताने आमचे स्वागत केले, सर्व अंग मस्त शहारले. तो थंडगार हवेचा स्पर्श मती गुंगावून गेला कारण तो वारा नैसर्गिक नाही वाटला. मन आत जायला विरोध करत होते पण मी तिकडे दुर्लक्ष केले कारण मित्रांच्यात मला माझे हसे करून घ्यायचे नव्हते. आम्ही ध्वजस्तंभाजवळ जाऊन उभे राहिलो आणि शाळेचे अवलोकन करत होतो. इतक्यात आमचा एक मित्र वैभव, एस टी डी बुथच्या दिशेने येण्याऐवजी माझ्या घराच्या दिशेने येताना दिसला. त्याला विचारले की “इकडून कुठून येत आहेस?” तर तो म्हणाला, की “कोणा मित्राकडे गेला होता.” आम्हाला थोडे विचित्र वाटले कारण त्याने अंगात एक टी शर्ट आणि कापलेल्या जीन्सची हाफ पॅंट घातली होती आणि नेहमी बाईकने फिरणारा वैभव काळोखातुन चक्क चालत येत होता. त्याला फार प्रश्न न विचारता आता शाळेला एक पुर्ण वळसा घालून काही दिसते का ते बघायचे ठरले.
[next]आम्हा पाच जणांपैकी अमित आणि वैभव तिथेच थांबतो म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटले कारण ते दोघेही खुप भित्रे होते. दोन-तीन वेळा त्यांना आमच्या सोबत राहण्यास सांगुनही ते तिथेच थांबले म्हणुन त्यांना तिथेच सोडून सचिन, प्रताप आणि मी असे तिघे शाळेच्या गडग्याच्या बाहेरून शाळेला एक चक्कर मारून परत आलो. आम्हाला काहीच वावगे दिसले नाही पण येताना सचिन म्हणाला की, “आपण त्यांना तिथे एकटे सोडून यायला नको होते, आता जर का ते तिथे दिसले नाहीत किंवा त्यांना काही झाले तर मग आपले काही खरे नाही.” आम्ही ध्वजस्तंभाजवळ येऊन बघतो तर नेमकी त्याची भीती खरी ठरली होती; खरेच तिथे कोणीही नव्हते. आता मात्र आम्ही तिघेही घाबरलो की त्यांना काही झाले तर नसेल? आम्ही धावत शाळेच्या आवराबाहेर गेलो आणि ते दोघे एस टी डी बुथवर गेले असावेत असा विचार करून एस टी डी बुथच्या दिशेने चालू लागलो तर वैभव आम्हाला एस टी डी बुथकडुन आमच्या दिशेने बाईक वर येताना दिसला. तो आम्हाला शिव्या घालु लागला की आम्ही त्याला सोडून भुत बघायला का गेलो? आम्ही म्हटले की “तु तर आमच्या बरोबर होतास ना! घाबरलास म्हणुन पळुन गेलास अमित बरोबर!” तसा तो वैतागला आणि म्हणाला, “काही पण नका सांगु. मी आत्ता जेवुन एस टी डी बुथमध्ये आलोय एवढाच! आणि अमित तर मुंबईला गेलाय तो कुठून येईल माझ्यासोबत?” आम्हाला वाटले की तो थापा मारतोय म्हणुन आम्ही एस टी डी बुथमध्ये आलो आणि शैलुच्या आईला विचारले की हा एस टी डी बुथमध्ये कधी आला? तर काकी म्हणाल्या, आत्ताच आला. आम्ही चक्रावलो की जर हा आमच्या सोबत नव्हता आणि अमित मुंबईला गेलाय मग मगाशी आमच्या सोबत जे दोघे होते ते कोण होते?
परत सगळ्यांनी धीर एकवटला आणि या प्रकरणाचा छडा लावायचाच असा निर्धार करून वैभव, सचिन, प्रताप, शैलू आणि मी असे सगळे त्या शाळेकडे निघालो. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच आम्हाला मगाशी जाणवलेला थंडगार वारा पुन्हा एकदा जाणवला. पुन्हा मन आक्रंदु लागले की उगाच विषाची परीक्षा नको, सगळे व्यवस्थित आहे तोपर्यंत परत चला पण चारजण सोबत असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. आम्ही शाळेच्या उघड्या खिडकीतुन आत वाकुन बघितले, आत भयाण शांतता होती. रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश उघड्या खिडकीतुन आत जात होता त्यात आम्हाला आतील दृश्य अंधुक अंधुक दिसत होते. इतक्यात लोखंडी ट्रंक सरकावल्याचा आवाज माझ्या कानांनी स्पष्टपणे टिपला आणि अंगावर सरकन काटा आला. तो आवाज इतरांनी पण ऐकला होता पण सुदैवाने कोणीही पळाले नाही नाहीतर सगळ्यांचीच फाटली असती. बघुया काय होते ते! असा विचार करून आम्ही अजुन लक्षपुर्वक आत पाहु लागलो आणि अचानक शाळेच्या व्हरांड्यामधुन कोणी तरी धावत गेल्यासारखा आवाज आला म्हणुन खिडकी सोडून आम्ही धावत व्हरांड्याला लागुन असलेल्या मोठ्या जाळीदार खिडकीकडे गेलो आणि आत पाहु लागलो. कुठूनशी प्रचंड दुर्गंधी आली जिने नाकाला झिणझिण्या आल्या आणि व्हरांड्याच्या टोकाला एक मानव सदृश्य आकृती दिसली. साधारण पाच साडेपाच फुट उंच असेल, अंगात फुल हाताची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके गुंडाळलेला असा त्या आकृतीचा अवतार होता. दरवाज्यांना कुलुपे असताना हा आत कसा काय गेला असेल असा विचार मनात येतो न येतो तोच एक कर्कश किंकाळी फोडून तो माणुस आमच्या समोरच गायब झाला जणु काही हवेतच विरून गेला. ते पाहून सगळ्यांनाच दरदरून घाम फुटला. वळून पाहतो तर वैभव आणि प्रताप केव्हाच शाळेच्या आवाराबाहेर गेले होते. शैलू, सचिन आणि मीच उरलो होतो. आम्ही तिघे जीव मुठीत घेऊन धावत रस्त्याच्या दिशेने धावु लागलो तर डोक्यावरून केसाला घासत सरसरत काही तरी गेलेले जाणवले. बघतो तर लहान मुलांची स्लीपर होती ती तशीच परत शाळेवर भिरकावली आणि रस्ता पार करून पलीकडे असलेल्या नवलाई देवीच्या देवळाच्या आवारात गेलो.
[next]सगळे घामाने चिंब भिजले होते आणि सगळ्यांचेच उर धपापत होते, कोणीही एक अवाक्षर देखील काढले नाही. ‘सगळेजण सुटलो बाबा एकदाचे’ असा विचार करत असतानाच आमचे लक्ष्य शाळेकडे गेले. दोन दरवाज्यांमध्ये अर्धी भिंत आणि भिंतीवर दोन मोठ्या जाळीच्या खिडक्या होत्या आणि त्याच्या मागे व्हरांडा होता. अचानक खिडकीच्या आत उजव्या बाजुला एक ज्योत पेटलेली आम्हाला दिसली. मेणबत्ती किंवा समईची ज्योत जशी दिसते अगदी तशीच ती ज्योत होती. ती ज्योत कशावर पेटली होती ते कळत नव्हते आणि कुणी पणती किंवा मेणबत्ती धरून असेल तर तेही दिसत नव्हते. जणु काही ती ज्योत अधांतरी होती. आता हळू-हळू ती ज्योत खिडकीच्या उजव्या टोकापासून डाव्या टोकाकडे सरकु लागली. दरवाज्यांना कुलपे लावलेली असताना तो माणुस आता कसा गेला आणि ती ज्योत कोणी पेटवली असा विचार मनात येतो न येतो तोच मला एक अनामिक ओढ वाटू लागली आणि नकळत मी शाळेच्या दिशेने ओढला जाऊ लागलो. शैलूच्या हे लक्षात येताच त्याने मला घट्ट पकडून ठेवले आणि वैभवला पटकन जाऊन देवीचा अंगारा घेऊन यायला सांगितले. इकडे एकट्या शैलूला मी आवरत नाही हे पाहून प्रताप आणि सचिनने पण मला पकडून ठेवले, पण मी त्या तिघांना ओढत शाळेच्या दिशेने पुढे सरकु लागलो होतो. इतक्यात वैभवने देवीचा अंगारा माझ्या कपाळावर लावला आणि मी शरीरातील सगळी ताकद गेल्यासारखा सैल पडलो. माझा विरोध मावळून गेला. थोड्या वेळाने मी भानावर आलो तेव्हा झाला प्रकार सगळ्यांनी मला सांगितला. आपण उगाच या भानगडीत पडलो असे वाटुन सर्वानुमते असे ठरले की “आपण शाळेच्या बाहेर उभे राहून माफी मागुया की आम्ही परत तुझ्या वाटेला जाणार नाही. आम्हाला माफ कर.” नंतर आम्ही सर्वांनी देवीचा अंगारा कपाळावर लावला व त्या अज्ञात शक्तीची माफी मागितली आणि आपापल्या घरी गेलो. सुदैवाने कोणी आजारी पडले नाही की कोणाला काही त्रास झाला नाही.
पुढे चौकशी केल्यावर असे कळले की पुर्वी एका तरुण वडाराचा खुन करून त्या शाळेमागच्या संडासात त्याचा मृतदेह टाकला होता. वडार लोक म्हणजे रस्त्याच्या बाजुला चर खणणारे त्यांचा पेहराव तसाच असतो फुल बाहीची बनियन, कमरेला टॉवेल आणि डोक्याला फडके. आम्हाला शाळेच्या व्हरांड्यात दिसलेली आकृती हुबेहूब त्या वडाराशी जुळणारी होती. सुदैवाने त्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्याला, शिपायाला किंवा शिक्षकांना एवढेच काय आजु बाजुला राहणाऱ्या लोकांनाही कधीच काही जाणवले किंवा त्रास झाला नव्हता त्यामुळे आम्ही सर्वानीच ही गोष्ट तिथेच विसरून जायचे ठरवले. आज या कथेच्या रूपाने त्या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आजही रत्नागिरीला घरी जाताना मी जेव्हा त्या शाळेवरून जातो तेव्हा शाळेकडे नजर जातेच, आणि तो प्रसंग आठवल्यावर अजुनही अंगावर सरकन काटा येतो. पण परत कधीच असा काही अनुभव तिथे आला नाही. आम्हाला दिसले ते भुत होते की आमच्याच मनात वसलेली एक प्रतिमा? कोणास ठाऊक, पण अनुभव मात्र आजही ताजा आहे जसा काही काल परवाच घडला असावा.
अभिप्राय