चकवा, मराठी भयकथा - [Chakwa, Marathi Bhaykatha] माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन याचीच भयकथा म्हणजे चकवा.
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन...
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात. असेच दुर्लक्ष शरद आणि हिरवे कुटुंबियांच्या जीवावर कसे बेतले याचीच भयकथा म्हणजे चकव
‘शरद हिरवे’, एक मनमिळाऊ, प्रेमळ आणि कष्टाळु मुलगा. बबनराव आणि वत्सला बाईंचे शेंडेफळ असल्याने जास्त लाडावलेला. इतर दोन्ही भावंड उच्च शिक्षित पण हा शिक्षणात जेमतेम त्यामुळे कसा बसा १० वी पास झाला तोही त्याच्या मोठ्या बहिणीच्या कृपेने. तिने मानेवर बसुन अभ्यास करून घेतला म्हणुनच शरदचं घोडं कसं बसं गंगेत न्हाल. बस, याच्या पुढे आणखी शिकणे आपल्याला काही शक्य नाही असे त्याने घोषित केले. “तुझा मोठा भाऊ रमेश बघ; आज MCom झालाय तोही फर्स्ट क्लास मध्ये, तुझी मोठी बहीण निलीमा B.Sc टॉपर आहे आणि साधी १० वी पास होताना तुझ्या तोंडाला फेस आलाय. तुझ्या आयुष्यात भिकाच मागणे लिहिले असेल तर मी तरी काय करणार? म्हणुन एक तर चांगला शिक, नाही जमत असेल तर दरमहा ५००० रुपये घरात आणुन दे; आणि तेही जमत नसेल तर बाहेरचा रस्ता पकड. तुला फुकट पोसणे मला शक्य नाही. तु आणि तुझे नशीब; पाहुन घ्या काय ते!” असे त्याच्या वडिलांनीही घोषित करून टाकले.
पठ्ठ्याने दुसरा पर्याय निवडला. कागदावर रेघोट्या मारून त्याला काळे करण्यापेक्षा गॅरेज मध्ये कष्ट करून हात काळे करणे त्याला जास्त सोपे वाटले. घरा जवळ असलेल्या रवि पाडळकरच्या गॅरेज मध्ये हेल्पर म्हणुन तो काम करू लागला. अभ्यासात कमजोर असला तरी शरद मुळचा हुशार होता, शिकवलेले लगेच आत्मसात करायचा. रविला गाड्या रिपेअर करताना लक्ष्यपूर्वक पहायचा, शंका विचारायचा आणि रवि पण त्याला हातचे राखुन न ठेवता सर्व काही शिकवायचा. लहानपणापासुन मल्लखांब खेळून मजबुत झालेल्या शरीराचा त्याला आत्ता उपयोग होत होता. अवजड आणि कष्टाची कामे सुद्धा तो विनासायास आणि विना कुरकुर करायचा. लवकरच तो रविच्या मर्जीत बसला.
महिन्याच्या शेवटी ओवर टाइम पकडून ५५०० रुपये जेव्हा त्याने वडिलांच्या हातात ठेवले तेव्हा आपल्या मुलाची पहिली कमाई बघून त्या बापाचे हृदय उचंबळुन आले. त्यांना आता खात्री पटली होती की शिक्षणाच्या नावाने बोंब जरी असली तरी शरदला दोन वेळेच्या भाकरीची कधीच कमी जाणवणार नाही. आपले पाणावलेले डोळे पुसत त्यांनी त्याला सांगितले, “तुला शिकायचे नाही ना? नको शिकुस. जे तुला आवडते, जे जमते ते कर. आता मला तुझी काळजी नाही. जा हे पैसे तुझ्या आईला नेऊन दे आणि तिचा आशीर्वाद घे.” कायम कठोर वाटणाऱ्या आपल्या वडीलांचे इतके सौम्य रूप देखील आहे हे पाहून शरदला आश्चर्य वाटले. त्याचे पण डोळे भरले. त्यांना मिठी मारून तो म्हणाला, “बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी सर्व घर सांभाळेन तुम्हाला कोणालाच काहीही कमी पडू देणार नाही.” बबन रावांनी त्याचे डोळे पुसत त्याला घट्ट मिठी मारली. पिता पुत्राचा तो इमोशनल सिन घरातील सर्वांचेच डोळे ओले करून गेला.
बघता बघता शरद २६ वर्षांचा झाला. रविच्या तालमीत तो एक उत्तम मेकॅनिक बनला होता, भल्या भल्या मेकॅनिकना न सुटणारे गाड्यांचे प्रोब्लेम्स तो अस्से सोडवायचा. रविबरोबर भागीदारी करून त्याने एक मोठे गॅरेज बांधले, अत्याधुनिक मशिन्स आणली. स्वतःची सुमो आणि स्कोर्पियो घेतली आणि दोन्ही गाड्या भाड्याला पण लावल्या होत्या. इतक्या लहान वयात तो चांगलाच सेटल झाला होता. त्याच्या वडिलांना दिलेले शब्द त्याने खरे करून दाखवले. तो आता सर्व घर सांभाळत होता. रमेशला सरकारी नोकरी मिळण्यासाठी त्याने दोन लाख रुपयांची मदत केली. निलीमाच्या लग्नाचा अर्ध्याहुन अधिक खर्च त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतला. लग्नात सर्व कामांमध्ये तो जातीने लक्ष घालत होता. शरदच्या वडीलांना त्यावेळी त्याचा खुप आधार वाटला. शरदला टोचुन बोलल्याबद्दल मनोमन देवाकडे किती तरी वेळा त्यांनी क्षमायाचना केली होती. आता आपल्या धाकट्या मुलासाठी सुद्धा त्यांच्या मुखातुन नेहेमी आशीर्वादच बाहेर पडत. शरद आपल्या चांगल्या वागणुकीमुळे सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. पूर्वी त्याला बेजवाबदार म्हणुन हिणवणारे सर्व जण आता त्याचे एक जवाबदार मुलगा म्हणुन कौतुक करताना थकत नसत.
शरदला लहानपणापासूनच पुर्वाभास होत. अनुभवांवरून तो शिकला होता की मनाने दिलेला इशाऱ्याकडे दुर्लक्ष्य केल्यास नुकसानच होते. किती उदाहरणे होती याची. एकदा रवि गाडी जॅक वर चढवुन प्रॉब्लेम शोधण्यासाठी गाडीच्या खाली जाणार इतक्यात शरदला असे जाणवले की जॅक सरकणार आहे, रवि त्या गाडीच्या खाली जाणार इतक्यात शरद ओरडला रवि दादा थांब! आणि जॅक सटकुन गाडी खाली आदळली. एकदा गाडीची डिलिवरी देण्यासाठी गणपतीपुळ्याला अभिषेक हॉटेल मध्ये जायचे होते. एक मार्ग आरे वारे मार्गे आहे जो शोर्टकट आहे आणि दुसरा हाय वे वरून जो की जवळ पास दुप्पट अंतराचा पडतो. गॅरेज मधून थोडे दूर आल्यावर शरदच्या मनात आले की आरे वारे मार्गे न जाता हायवे वरून जावे तसे त्याने रविला सांगितले तेव्हा रविने त्याला मुर्खात काढत वेळ आणि डिझेल दोन्ही दुप्पट लागेल असे सांगुन आरे वारे मार्गेच चलण्यास सांगितले.
खाडी वरील पूल क्रॉस केल्यावर लागलेल्या चढावात ब्रेक फेल झालेला एक ट्रक त्यांना समुद्रातच घेऊन गेला असता पण शरदने ऐन वेळी स्टेअरिंग फिरवल्यामुळे ते वाचले नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. एकदा रमेश नारळाच्या झाडाखालीच काढलेले नारळ सोलत बसला होता, शरद तिथुन जात असताना त्याला असे जाणवले की रमेश जिथे बसलाय तिथे झाऊळ पडणार आहे त्याने वळुन रमेशला तिथुन उठण्यास सांगितले, रमेश उठतो न उठतो तोच वरून एक सुकलेली झाऊळ तिथे कोसळली. रमेश थोडक्यात वाचला होता. अशा अनेक अनुभवांमुळे शरदचे बोलणे रविच काय पण घरातले कोणीही हलक्या मध्ये घेत नसे.
शरदची मोठी बहिण निलीमा बाळंतपणासाठी माहेरी आली होती, तिला मुलगा झाल्याची बातमी आली आणि हिरवे कुटुंबीयांमध्ये व सासरी वनारसे कुटुंबियांमध्ये आनंदाची लाट पसरली. शरदच्या आईला लेकीसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते. आपल्या लेकीचे आणि नातवाचे कोडकौतुक करण्यात त्या पुन्हा एकदा तरुण झाल्या होत्या जणु काही त्यांना हत्तीचे बळ आले होते. बाळ तिन महिन्यांचे झाल्यावर निलीमाला बाळासह सासरी सोडायला जाण्याची जय्यत तयारी सुरु झाली. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, शतावरी कल्प, मसाज साठी तेल, बाळासाठी अंगडे टोपरे, पाळणा अशा ढीगभर गोष्टी जमा करून सर्व जण स्कोर्पियोमधुन सिंधुदुर्गातील तळेरे गावातील निलीमाच्या सासरी वनारसे कुटुंबीयांकडे निघाले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते. घरातुन सर्वजण निघणार तोच गाडीचे एक चाक पंक्चर असल्याचे शरदच्या निदर्शनास आले ही त्याला मिळालेली पहीली सुचना होती पण त्याकडे दुर्लक्ष्य करून त्याने पंक्चर चाक बदलत न बसता सर्वांना सुमोमध्ये बसण्यास सांगुन सामान पटापट शिफ्ट केले आणि ते तळेरे गावाकडे मार्गस्थ झाले.
जेमतेम २० एक किलोमीटर गेले असतील तर गाडीतील डिझेल संपले. ही शरदला मिळालेली दुसरी सुचना होती. भाडे संपवुन आदल्या रात्री उशिरा आल्याने उद्या सकाळी डिझेल भरू असा विचार करून तो डिझेल न भरता सरळ घरी आला होता. उत्साहाच्या भरात सुमोत डिझेल भरायचे तो विसरून गेला होता. सगळे त्याला दोष देवू लागले, आधी का नाही चेक केले, बहीण सासरी जायची ते तुला ठाऊक नव्हते का वगैरे वगैरे. सगळ्यांची किरकिर ऐकत बसण्यापेक्षा जाऊन डिझेल घेऊन येऊ असा विचार करून तो कॅन घेऊन कोणाची लिफ्ट मिळते का ते पाहु लागला.
तास भर वाट पाहूनही कोणीच त्याला लिफ्ट दिली नाही. शेवटी पाच किलोमीटर दूर पाली गावातील पेट्रोल पंपाच्या दिशेने तो चालतच निघाला पाऊण तास चालल्यावर त्याला एक पेट्रोल पंप दिसला, डिझेल घेऊन तो परत आला आणि ते गाडीमध्ये ओतुन त्यांचा प्रवास पुन्हा सुरु झाला. पेट्रोल पंपावर गाडी फुल करून आणि हवा चेक करून ते पुढे निघाले. एवढे होईतोवर साडे सहा वाजुन गेले होते. एव्हाना ते तळेऱ्या पर्यंत पोहोचायला पाहिजे होते पण दोन तास असेच फुकट गेल्यामुळे आता त्यांना पोहोचायला रात्र होणार होती. त्यात गाडीत तान्हे बाळ असल्यामुळे शरद ४० च्या स्पीड ने गाडी चालवत होता. रस्त्यातील खड्डे आणि स्पीड ब्रेकर सांभाळून पार करत होता. त्यामुळे तळेरे गावी पोहोचायला त्यांना रात्रीचे ९.३० वाजले. वानारसेंचे दुकान तळेरे बाजारपेठेत होते तर घर कासारड्याला होते. कासार्डे गावी पोहोचायला त्यांना १५ मिनिटे पुष्कळ होती.
कासार्डे गावातील पेट्रोल पंपावरून डावीकडे वळले की एक मोठा मोकळा माळ लागत असे साधारण दोन किलोमीटर कच्चा रस्ता पार केल्यावर एक आमराई लागत असे तिच्या पलीकडे वानारसेंचे घर होते. घराला पोहोचायला तीन रस्ते होते. पहिला रस्ता सर्वात जवळचा होता पण तो खुप खराब होता, दुसरा आमराईतून जायचा तर तिसरा आमराई वळसा घालून जायचा. शरदचे म्हणणे होते की पहिल्याच रस्त्याने जाऊ, खरेतर सर्वजण प्रवासामुळे खुपच कंटाळले होते पण तरीही सर्वानुमते पहिला रस्ता टाळावे असे ठरले कारण गाडीत निलीमा आणि बाळ होते आणि रस्ता खुपच खाच खळग्यांचा होता. शरदच्या मनाने त्याला धोक्याची सुचना दिली होती पण सर्वांच्या म्हणण्यापुढे त्याला आपली मान तुकवावी लागली आणि सुरु झाले एक दुष्ट चक्र. निलीमाला सासरी सोडण्याच्या गडबडीत कोणाच्याच लक्षात आले नव्हते की ती रात्र अमावस्येची होती आणि संध्याकाळी ४ वाढून १७ मिनिटांनी अमावस्या सुरु झाली होती.
शरदने आमराईतून जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे गाडी वळवली तोच गाडीचा मागचा टायर एक मोठा खिळा घुसुन पंक्चर झाला. ही त्याला मिळालेली तीसरी सुचना होती. झाले, सगळ्यांनी गाडीच्या नावाने लाखोली वाहायला सुरवात केली. झक मारली आणि आज निलीमाला सोडायला आलो असे शरदला झाले. पुढच्या १५ मिनिटात त्याने गाडीचे पंक्चर चाक बदलले आणि सगळे पुन्हा मार्गस्थ झाले. साधारण दोन किलोमीटर पार केल्यावर त्यांना आमराई लागली तोवर रात्रीचे १० वाजले होते. दोन अडीच तासाच्या रस्त्यासाठी सहा तास लागल्यामुळे सगळेच वैतागले होते. बाळ पण सतत रडत असल्यामुळे सगळ्यांचे डोके उठले होते. कधी एकदा घरी पोहोचतो असे सगळ्यांना झाले होते. बराच वेळ लघवी दाबून ठेवलेल्या निलीमाला आता अजून रोखून ठेवणे अशक्य झाले होते. शेवटी नाईलाजाने तिने गाडी थांबवण्यास सांगितले. जवळच एका आंब्याच्या झाडाच्या आड उरकुन ती परत आली आणि तिथेच घात झाला एका हडळीने तिला धरले. गाडीमध्ये बसायला निलीमा तयारच होईना. सर्वांनी समजावले पण व्यर्थ. मी इथेच झाडावर बसते तुम्ही व्हा पुढे जाताना माझ्या बाळाला माझ्याकडे देऊन जा असे म्हणुन एकदम भेसूर हसली.
तिचा पुरा अवतार बदलून गेला होता. केस पिंजारलेले, कुंकू कपाळभर पसरले होते. दात विचकून खिडकीतून ती बाळाकडे बघत होती आणि त्याला घ्यायला ती आपले हात पुढे करत होती. तो सर्व प्रकार पाहून वत्सला बाईंना लक्षात आले की निलीमाला कोणीतरी धरले आहे. आता काय करायचे असा विचार करत असतानाच निलीमाने डोळे गरगर फिरवत मी याला वेताळाला बळी देऊन अधिक शक्ती प्राप्त करून घेणार म्हटल्यावर मात्र सर्वांचे धाबे दणाणले. एकीकडे बाळाला वाचवणे महत्वाचे तर दुसरीकडे निलीमाला, दुहेरी कात्रीत सारे कुटुंब अडकले होते. तेवढ्यात निलीमा बाळाला घेण्यासाठी गाडीच्या खिडकीतून अर्धी आत आली तसे शरदने बबन रावांना आणि रमेशला निलिमाच्या हातांना घट्ट धरून ठेवण्यास सांगितले आणि गाडी दामटली. निलिमा अर्धी आत आणि अर्धी बाहेर लोंबकळत होती. वत्सला बाईंनी बाळाला निलीमापासून दूर नेत आपल्या छातीशी धरले होते.
भीतीने त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते आणि त्याच वेळी आपल्या लेकीची अवस्था पाहून त्या माऊलीला मरणप्राय यातना होत होत्या. इकडे निलीमा बेफाम होत होती. सर्वांकडे की खाऊ का गिळू अश्या नजरेने पाहत तोंडाने भयाकारी आवाज काढत मला सोडा, माझे बाळ मला द्या नाहीतर मी सर्वांना ठार मारीन असे म्हणत दात विचकुन काळजाचा थरकाप व्हावा अशा आवाजात भेसूर हसू लागली. तुमच्या पैकी कोणीही वाचणार नाही; मी कोणालाच सोडणार नाही असे म्हणत ती पूर्ण शक्तीने बबन राव आणि रमेशला गाडी बाहेर खेचू लागली. इकडे गाडी चालवताना शरदला जाणवले की आपण फिरून फिरून एकाच जागेवरून तीनदा गेलोय. चौथ्या वेळी त्याची खात्री पटली की आपण फेऱ्यात अडकलोय. अजून घर कसे येत नाही असे वाटून सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला होता, सगळ्यांना हे सांगावे की नाही असा विचार करत असतानाच निलीमाने बबन राव आणि रमेशला गाडी बाहेर ओढले.
ते दोघे गाडी बाहेर फेकले गेले आणि निलीमासह जमिनीवर आदळले. शरद गाडी थांबावे पर्यंत निलीमा एका आंब्याच्या झाडावर सरसर चढत शेंड्याला जाउन पोहोचली होती. बबनराव आणि रमेश चांगलेच आपटले होते, जागो जागी त्यांना खरचटले आणि मुका मार लागला होता. गाडी थांबवून शरद त्यांच्या जवळ आला. निलीमा फार भयाकारी हसत होती ते हसणे ऐकून सर्वांनाच घाम फुटला होता. शरद वडीलांना आणि भावाला आधार देवून उठवू लागला ते पाहून निलीमाने झाडाच्या शेंड्यावरून खाली उडी मारली आणि बाळाला घेण्यासाठी गाडीकडे धावली तसे शरदने आणि रमेशने तिला घट्ट पकडले. शरद ओरडला बाबा गाडीतील दोरी आणा! तसे बबनराव पटकन गाडीतून दोरी घेऊन आले.
निलीमा त्या तिघांना कशीच आवरत नव्हती. तिच्या शरीरात अमानवीय शक्ती आली होती. तिघांनी मिळून निलीमाला दोरीच्या सहाय्याने बांधले पण त्याला जवळ जवळ अर्धा तास लागला. शेवटी दोरीने जखडलेल्या निलीमाला गाडीतील मागच्या सीटवर बांधून शरद त्यांना म्हणाला की आपण चकव्यात सापडलो आहोत, मघापासून नुसते गोल गोल फिरतोय. यातून एकदा बाहेर पडू मग बघू निलीमाचे काय करायचे ते. सगळे गाडीत बसुन देवाचा धावा करू लागले. थोडावेळ गेल्यावर दूरवरून दोन आगीचे गोळे त्यांच्या दिशेने येताना पाहून हे काय नवीन संकट म्हणुन सगळे जण घाबरले पण जवळ आल्यावर गाडीच्या प्रकाशात जावईबापू आणि निलीमाचे सासरे बॅटरी घेऊन आलेले दिसताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी विचारुपूस सुरु करताच आधी घरी चला, सगळे सांगतो असे म्हणुन त्यांना गाडीत बसवून शरदने गाडी घराच्या दिशेने वेगाने दामटली.
फेऱ्यातून सुटल्यामुळे लगेचच ते आमराईतून बाहेर पडले आणि दोन तीन मिनिटातच घरी पोहोचले. घरी पोहोचताच निलीमाला बांधलेल्या अवस्थेतच देवघरात घेऊन गेले त्याबरोबर ती प्रचंड किंचाळू लागली, सुटण्यासाठी धडपड करू लागली. तेव्हा तिच्या सासऱ्यांनी दुर्गा देवीच्या समोरील कुयरितील हळद आणि कुंकू घेऊन आपल्या मुलाला निलीमाच्या कपाळावर लावण्यास सांगितले, नंतर त्यांनी देवीच्या कलशातील पाणी तिच्या डोक्यावर शिंपडण्यास सुरवात केली. एक नारळ घेऊन त्यांनी तो निलीमाच्या अंगावरून सात वेळा फिरवला तसेच भाताची एक मुद आणि चतकोर भाकरी घेऊन ती पण सात वेळा फिरवली आणि घराच्या दक्षिणेस नेऊन गाऱ्हाणे घातल्यावर एका दगडावर ती मुद आणि चतकोर भाकरी ठेऊन तो नारळ फोडला. खोबऱ्याचे पाच तुकडे त्यांनी त्या दगडावर ठेवले आणि चार तुकडे चार दिशांना फेकले आणि दिलेले मान्य करून घे आणि आपल्या सुनेस सोड असे बोलून नमस्कार करून ते घरात परतले.
इकडे निलीमा हळू हळू शांत होऊ लागली. तसा झाला सगळा प्रकार बबन रावांनी आपल्या व्याह्यांना आणि जावई बापुना सांगितला, तेव्हा ते आधी भडकलेच की जवळचा रस्ता सोडून आमराईतून तुम्हाला यायला कोणी सांगितले होते? पण निलीमा आणि बाळाच्या तब्येतीचा विचार करून आम्ही त्या रस्त्यावरून गाडी घातली असे सांगताच ते थोडे शांत झाले, अहो त्या रस्त्यावर चकवा आहे आम्ही दिवसापण त्या रस्त्यावरून येत नाही. अजून कसे आले नाही असा विचार करत असतांना तुमच्या गाडीची लाईट दूर आमराईत गोल गोल फिरताना दिसली तेव्हाच आम्हाला शंका आली, की तुम्ही चकव्यात सापडलात म्हणुन. दैव बलवत्तर हो तुमचे म्हणुन त्यातून सुखरूप बाहेर पडलात, हे शब्द कानावर पडताच शरदचे म्हणणे दुर्लक्षित केल्यामुळे केवढ्या मोठ्या संकटात सापडलो आणि केवळ नशिबानेच सगळे वाचलो हे जाणवून सर्वजण खजील झाले आणि पुन्हा अशी चूक न करण्याचा हिरवे कुटुंबीयांनी कानाला खडा लावला. सर्व काही विसरून आपल्या नातवाचे कौतुक करण्यात हिरवे आणि वनारसे कुटुंबिय रममाण झाले.
- केदार कुबडे
अभिप्राय