लॉंग ड्राईव्ह, मराठी भयकथा - [Long Drive, Marathi Bhaykatha] एका पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राईव्ह जय आणि सरिताच्या अंगाशी; आणि ती लॉंग ड्राईव्ह रोमॅंटिक न ठरता जीवघेणी कशी ठरते याची ही कहाणी.
रोमॅंटिक न ठरता जीवघेणी ठरलेली एक लॉंग ड्राईव्ह
बऱ्याच लोकांना रात्री लॉंग ड्राईव्हवर जायची हौस असते. खुप रोमॅंटिक वाटते म्हणे. अशीच एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राईव्ह जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता जीवघेणी कशी ठरली याची ही कहाणी.
रत्नागिरीला कोल्हापुरमार्गे जाताना आंबा नावाचे एक गाव लागते. गाव संपताच चौदा किलोमीटर लांबीचा जबरदस्त वळणांचा एक घाट लागतो. आंबा गावावरून त्याचे नाव आंबाघाट असे पडले असावे. तर अशा या आंबा गावात छोटी - मोठी खुप रिसॉर्ट्स आहेत कारण पावसाळ्यात चिल करण्यासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांचे हे लाडके ठिकाण आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात मनसोक्त आणि चिंब भिजल्यावर सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत दोन चार पेग लावुन मस्त गरमा-गरम गावरान चिकन किंवा बोकडाचे मटण, तांदळाची भाकरी आणि सोलकढीवर ताव मारण्याची मजा काही औरच आहे. आंबाघाटातुन हिरव्यागार दरीचे दिसणारे विहंगम दृश्य, शेकडो छोटे - मोठे धबधबे आणि दाट धुके अक्षरशः वेड लावते. घाटात दोन - तीन वॉच पॉइंट्स बनवले आहेत जिथे पर्यटक आपल्या गाड्या थांबवुन सृष्टिसौंदर्याच्या आनंद लुटू शकतात.
जय आणि सरिता दरवर्षीप्रमाणे पावसाळा एन्जॉय करायला एम.टी.डी.सीच्या रिसोर्टमधे उतरले होते. हे रिसॉर्ट मुख्य रस्त्यापासून थोडे आत असल्यामुळे इथे इतर अती हौशी पर्यटकांचा त्रास नव्हता. तिथली शांतता आणि प्रायव्हसी त्यांना खुप आवडायची. त्या दिवशी पाऊस जरा नेहमीपेक्षा जास्तच कोसळत असल्यामुळे ते दिवसभर रिसॉर्टमधे बसुन कंटाळले होते. त्यात चार वाजल्यापासून लाईट गेली होती. एक भले मोठे झाड कोसळल्यामुळे वायर्स तुटल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत लाइट यायची काही लक्षणे दिसत नव्हती. खानसामा सहा वाजताच जेवण बनवुन निघुन गेला होता कारण झाड कोसळल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते आणि त्याला खुप उलटा सुलटा प्रवास करत घरी जावे लागणार होते. नाईट शिफ्टच्या वॉचमॅनने आठ वाजता त्यांना जेवण गरम करून वाढले. पाऊस आता थांबला होता तेव्हा थोडे पाय मोकळे करावे असा विचार करून ते रिसॉर्ट बाहेर पडले पण सर्वत्र चिखल झाला होता त्यामुळे त्यांनी तो बेत रद्द केला व व्हरांड्यात खुर्च्या टाकुन बसले. जयने सिगरेट शिलगावली आणि धुराची वलये तो हवेत सोडू लागला.
अचानक सरिता त्याला म्हणाली की, ‘झोपायला अजुन खुप वेळ आहे आणि इथे बसुन बोअर होण्यापेक्षा चल ना आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया’. जय म्हणाला, गुड आईडिया! पण रस्ते तर ब्लॉक आहेत आपण जाणार तरी कुठे? इतक्यात त्याच्या लक्षात आले की कोल्हापुरला जाणारा रस्ता ब्लॉक आहे पण आपण घाटाकड़े जाऊ शकतो. घाट संपल्यावर साखरपा गावात लाइट असेल तर मस्त आले आणि गवती चहापात टाकलेला फक्कड चहा पिता येईल. आपल्या हुशारीवर खुश होत आणि स्वतःला शाबसकी देत त्याने सरिताला तयार व्हायला सांगितले आणि आपल्या कारकडे वळला. थंड वातावरणात धुक्याला चिरत फॉग लॅम्प लावलेली त्याची कार सफाईने वळणे घेत घाट उतरु लागली.
इतक्यात एक कार फुल स्पीडने त्याला ओवरटेक करून एकदम जवळून पास झाली. जय थोडा हडबडला पण त्याने आपली कार सावरली. त्या ड्राईवरला तो एक शिवी हासडणार इतक्यात समोर गेलेली गाडी अचानक डावीकडे वळली आणि संरक्षक कठड्यांवर जोरात आदळली, तिची विंड शिल्ड तुटून काचा रस्त्यावर विखुरल्या आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच रेलिंग तोडून ती कार दरीत फेकली गेली. जयने अर्जेंट ब्रेक लावले, निसरड्या रस्त्यावरून त्याच्या कारची चाके सरकली आणि ती पुर्ण एकशे ऐंशी डिग्रीमधे वळून थांबली. झाल्या प्रकाराने जय व सरिताला खुप मोठा धक्का बसला होता. दोघांचे उर धपापत होते. सीटबेल्ट लावले असल्यामुळे त्यांना काही लागले नव्हते फक्त मानेला जोराचा हिसडा मात्र बसला होता.
जय सावरला व सरिताला गाडीतच बसायला सांगुन कारमधील टॉर्च घेऊन तो खाली उतरला व ऍक्सिडेंट झालेल्या स्पॉटकडे जाऊ लागला. तिथे जाऊन पाहातो तर ऍक्सिडेंटची कसलीच खुण त्याला दिसेना. ना तुटलेल्या काचा, ना तुटलेले रेलिंग, ना गाडीचे तुटलेले पार्ट्स, ना फुटलेला कठडा. सगळे जणु काही पुर्ववत झाले होते त्या कारचाही कुठे मागमुस नव्हता. जयला प्रथम काहीच समजेना. ऍक्सिडेंट होताना त्यानेच नाही तर सरितानेही पाहिला होता मग काहीच खुणा कशा नाही दिसत! सर्व व्यवस्थित कसे काय झाले आणि ती गाडी पण कुठे दिसत नव्हती. विचार करुन करुन त्याला वेड लागायची पाळी आली. ते खरच घडले होते; भास नक्कीच नव्हता. जय स्वत:लाच समजावत होता. जय परत कारकडे आला तसे सरिताने त्याला प्रश्न विचारुन भंडावुन सोडले.
अचानक ऍक्सिडेंट झालेली ती कार दरीतुन बाहेर रस्त्यावर आली आणि सुसाट वेगात घाट उतरत दिसेनाशी झाली तो प्रकार पाहुन चक्रावलेल्या जय आणि सरिताला काय बोलावे तेच सुचेना जणु दोघांची वाचाच बंद झाली होती. जे घडले होते ते अतर्क्य होते. तसाच थोडा वेळ गेल्यावर जयने स्वत:ला आणि सरिताला सावरले आणि घाट उतरण्यापेक्षा चहा पिण्याचा बेत टाळून रिसॉर्टवर परतलेलेच बरे असा विचार करुन त्याने आपली कार रिसॉर्टच्या दिशेने चालवायला सुरवात केली. अर्धे अधिक अंतर पार केल्यावर फुल स्पीड मधे तिच कार त्याला पुन्हा पास झाली ते पाहुन जयचे डोके पुरते चक्रावुन गेले. त्याची खात्री होती मगाशी ज्या कारचा ऍक्सिडेंट होताना त्यांनी पाहिला होता व नंतर जी कार दरीतुन रस्त्यावर उतरून वेगाने घाट उतरत गेली तीच कार आता त्याला पास होऊन परत घाट उतरत गेली होती.
हे नक्की काय गौडबंगाल आहे ते पाहण्यासाठी तो आपली कार परत घाटाच्या दिशेने वळवु लागला तेव्हा सरिताने त्याला विरोध करत कार रिसॉर्टकडेच घेण्यास सांगीतले पण झालेल्या प्रकाराने प्रचंड गोंधळलेला जय तिचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने तिला न जुमानता कार वळवली आणि तो वेगाने घाट उतरू लागला. मगाशी ऍक्सिडेंट झालेल्या स्पॉटजवळ येताच रस्त्याच्या मधुन त्यांना पांढर्या नऊवारी साडीतील एक बाई एक गाठोड कमरेवर घेऊन चालत जाताना दिसली. त्याने मोठ्याने हॉर्न वाजवला त्याबरोबर त्या बाईची केवळ मुंडी पुर्णपणे उलटी फिरली. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त खोबणी होत्या, त्यांच्याकडे पाहात आपले बोळके दाखवत ती एकदम हिडीस हसली. ते भयानक दृश्य पाहुन जयने आपली कार प्रतिक्षिप्त क्रियेने डावीकडे फिरवली त्याची कार प्रचंड वेगाने संरक्षक कठडयावर आदळली. कारची विंडशील्ड तुटून तिच्या काचा रस्त्यावर विखुरल्या आणि क्षणात रेलिंग तोडून कार दरीत फेकली गेली आणि ती बाई भयकारी हसत हवेत विरून गेली.
पौर्णिमेने आणखी एक बळी घेतला होता. सकाळी जयची कार क्रेनने वर काढण्यात आली तेव्हा त्यातुन जयचा मृतदेह कारचा दरवाजा कापुन बाहेर काढावा लागला. त्याचे डोळे सताड उघडे होते व त्यात मुर्तिमंत भीती दिसत होती. जणु ऍक्सिडेंटने नव्हे तर त्या भीतीनेच त्याचा जीव घेतला होता. चमत्कारच म्हणायचा की सरिता वाचली होती. आठ दहा ठिकाणी फ्रॅक्चर झाली होती पण बेशुद्धावस्थेत असलेली सरिता चक्क जीवंत होती. तिच्या आयुष्याची दोरी बळकट होती पण जय मात्र तितका सुदैवी नव्हता. तिची साथ अर्धवट सोडून तो पुढच्या प्रवासाला एकटाच निघुन गेला होता. पोलीस पंचनाम्याच्या तयारीला लागले होते आणि आणि इकडे तो ऍक्सिडेंट स्पॉट वाट पाहू लागला होता पौर्णिमेच्या आणखी एका बळीची...
अभिप्राय