पुरातनकाल, महाराष्ट्र - [Puratankal, Maharashtra] नद्यांच्या खोऱ्यांमधून प्राचीन मानव भटक्या अवस्थेत जीवन जगत होता.
नद्यांच्या खोऱ्यांमधून प्राचीन मानव भटक्या अवस्थेत जीवन जगत होता
प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्रात मानवी वस्ती झाली नाही असे पूर्वी समजले जात असे.परंतु हल्लीच्या संशोधनाद्वारे येथे अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व होते ते सिद्ध केलेले आहे. तसेच प्राचीन हवामानातील बदलांचा क्रम निश्चित करण्याचे आणि त्यांची मानवी संस्कृतीच्या विविध टप्प्यांशी सांगड घालण्याचे प्रयत्नही झाले आहेत.
परिणामतः महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक जीवनासंबंधी आज आपल्याला बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे.
[next]
अन्न गोळा करणारा मानव
साधारणपणे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी आद्य पुराश्मयुगात देशातील इतर ठिकाणांप्रमाणेच महाराष्ट्रातही, घोड, भिमा, प्रवरा, गोदावरी आणि वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यांमधून प्राचीन मानव भटक्या अवस्थेत जीवन जगत होता. त्यांच्या वीस ते तीस जणांच्या टोळ्या असत. शिकार व रानातील फळे आणि कंदमुळे गोळा करणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. त्यासाठी या नद्यांच्या काठांवर उदंड विखुरलेल्या गोट्यांपासून ते दगडी हत्यारे तयार करीत. या हत्यारांमध्ये बहुगुणी अशा हातकुऱ्हाडी खूप आहेत. त्यांचा कापण्यासाठी, कंदमुळे उकरण्यासाठी उपयोग होई. फरशीसारखे हत्यार जनावरांची कातडी खरडून साफ करण्यासाठी वापरीत.
तोडहत्यारही त्यांत आढळते. कदाचित तासून टोकदार केलेल्या लाकडी काठ्या त्यांनी शिकारीसाठी वापरल्या असाव्यात. जंगली हत्ती (Elephas namadicus) व जंगली बैल (Bos namadicus) यासारख्या प्राण्यांचीही त्यांनी शिकार केली असावी. कारण या प्राण्याच्या अश्मास्थि नेवासे (जि. अहमदनगर ) व मोठ्या प्रामणात गोदावरीची उपनदी मांजरा हिच्या काठावर वसलेल्या धनेगांव (जि. उस्मानाबाद) येथे सापडल्या. त्या काळातील हवामान आजच्यापेक्षा आधिक शुष्क होते व नद्या उथळ होत्या. प्रवरेचे नेवाशाजवळील पात्र तेव्हा आतापेक्षा जवळजवळ १० ते २० मीटर उंच आणि दगडगोट्यांनी भरलेले होते. कालांतराने, म्हणजे साधारण दीड लाख वर्षांपूर्वी, प्रवरा, गोदावरी कृष्णा, व इतर नद्यांची पात्रे खोल होण्यास सुरूवात झाली; कारण हवामान अधिक आर्द्र झाले व पावसाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले.
मध्य-पुराश्मयुगात म्हणजे साधारण एक लाख वर्षांपूर्वी मानवाने तासणी (scrapers) व अणी (points) यासारखी छोटी हत्यारे घडविण्यास सुरूवात केली. ही हत्यारे चर्ट, जास्पर यासारख्या अत्यंत कणखर दगडांपासून बनवीत. हे दगड सर्व महाराष्ट्रभर सापडतात. या हत्यारांहूनही छोटी हत्यारे साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगांत उपयोगात आणली गेली. यामध्ये छोटी छोटी पाती व छिलक्यांपासून बनविलेल्या हत्यारांचा समावेश होता. ती गारेच्या दगडापासून बनविलेली असत. चाळीसगांव ( जि. जळगांव ) जवळील पाटणे येथे अशा प्रकारच्या हत्यारांचे सर्वच प्रकार मिळालेले आहेत. साधारणपणे याच काळात मानवाने मासेमारीही शोधून काढली. या काळात हवामान पुन्हा शुष्क होऊ लागले होते व नद्यांची पात्रे उथळ होती. कोकणात समुद्र मागे हटला व फार मोठा भूभाग वर आला. कदाचित परशुरामाने समुद्र मागे हटविला या पौराणिक आख्यायिकेची ही शास्त्रीय पूर्वपीठिका असावी.
पुन्हा एकदा, साधारण १६००० वर्षापूर्वी हवामान अधिक आर्द्र बनले. मध्याश्मयुगाची सुरूवात या सुमाराची मानतात. या काळात भुभागावरील घनदाट झाडीच्या आवरणामुळे महाराष्ट्रातील काळी माती तयार झाली. वनस्पती व प्राणी या दोहोंच्या समृद्धिमुळे या काळातील मानवी जीवन पूर्वीपेक्षा सुखकर बनले. यामुळे लोकसंख्येत खूप वाढ झाली. बहुसंख्येने आढळणाऱ्या मध्याश्मयुगीन मानवी वस्तीच्या स्थानांवरून याला पुष्टि मिळते. मध्याश्मयुगीन मानवाने बनविलेली गारेच्या दगडाची पाती असलेली हत्यारे या ठिकाणी इतस्ततः विखुरलेली आढळतात. मध्याश्मयुगीत मानवाने लहान प्राण्यांची शिकार करी व या कामात पाळीव कुत्र्यांची मदत घेई. कुत्रा हा प्राणी याच काळात माणसाळवला गेला. कदाचित् या काळात मानव रानटी रोपांची कापणी करून त्यापासून धान्य गोळा करत असण्याचीही शक्यता आहे त्यामुळे मानवी जीवनाला ऋतुमानाच्या संदर्भात थोडीफार स्थिरता लाभली असावी.
[next]
आद्य शेतकरी
मध्याश्मयुगात झपाट्याने झालेली लोकसंख्येची वाढ शेतीची सुरूवात होण्यास कारणीभूत झाली. विशिष्ट भौगोलिक मर्यादेथ उपलब्ध असणाऱ्या ठराविक अन्नसाधानांवर अवलंबून असणारी माणसे वाढली. त्यामुळे कृत्रिम मार्गांनी अन्नपुरवठा वाढविणे अपरिहार्य झाले आसावे. आणि ते शेतेचा अवलंब करूनच शक्य होते. जमिनीवर पडलेले बी पुढील हंगामात जमिनीतून पुन्हा उगवते हे मानवाच्या नजरेत आले असणारच. त्याला नुसते निसर्गाचे अनुकरण केले म्हणजे पुरे होते. महाराष्ट्रात अन्नधान्यांचे शेतीद्वारा उत्पादन करण्यास साधारणपणे चार हजार वर्षांपूर्वी सुरूवात झाली असे तापीच्या खोऱ्यातील (जि. धुळे) पुराव्यावरून म्हणता येईल. इ.स.पू. १७०० च्या सुमारास माळव्यामधील आद्य शेतकऱ्यांनी खानदेशात स्थलांतर केले. ते पुढे गोदावरी आणि भिमेच्या खोऱ्यातही येऊन पोचले. तापीच्या खोऱ्यात त्यांच्या वसाहतींचे अधिकांश केंद्रीकरण झालेले दिसते. त्यामानाने प्रवरा-गोदावरीच्या खोऱ्यांत ते उणावलेले, तर भिमेच्या खोऱ्यात तुरळक आढळते. यातील बहुसंख्य वसाहती म्हणजे १००-२०० च्या आसपास लोकसंख्या असलेली छोटी परंतु स्वावलंबी अशी खेडी होती. या छोट्या छोट्या खेड्यांना जोडणारे एक मोठे प्रादेशिक केंद्र असे. उदाहारणार्थ, तापीच्या खोऱ्यातील प्रकाशे (जि. धुळे), गोदावरीच्या खोऱ्यातील दायमाबाद (जि. अहमदनगर), भिमेच्या खोऱ्यातील इनामगांव (जि. पुणे), या प्रादेशिक केंद्राची लोकसंख्या १००० किंवा त्याहून अधिक होती.
अहमदनगर जिल्ह्यात जोर्वे गांवनजिक पर्थम उजेडात आली म्हणून ‘जोर्वे’ या नावांने ओळखली जाणारी नवीनच संस्कृती महाराष्ट्रात साधारणपणे इ.स.पू. १४०० च्या सुमारास उदयास आली. पूर्वीच्या संस्कृतींप्रमाणेच या संस्कृतीचे लोकही त्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण रंगीत भांडी, गारांची हत्यारे आणि तांब्याचे दागिने व हत्यारे इत्यादिंचा वापर करीत. अर्थात्च तांबे दुर्मिळ असल्यामुळे त्याचा वापर फार जपून केला जाई. कोकणचा सागरकिनारा व विदर्भातील काही प्रदेश सोडला तर जोर्वे संस्कृतीच्या लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वसाहती स्थापन केल्याचा पुरावा आहे. शेती, पशूपालन, शिकार व मासेमारी यांवर अवलंबून असलेली मिश्र अशी त्यांची अर्थव्यवस्था होती. पुण्याजवळील इनामगांव येथे मिळलेल्या पुराव्याद्वारे असे दिसते की या लोकांनी कालव्याद्वारे कृत्रिम पाणीपुरवठा करण्याची सोय केलेली होती. व त्यामुळे ते वर्षांतून दोनदा, अदलूनबदलून पीक घेत असत.
जोर्वे संस्कृतीचे लोक मोठ्या चौकोनी घरात रहात. घराच्या भिंती कुडाच्या असत व छप्पर गवताने शाकारलेले असे. घरांमध्ये कणग्या व बलदांमधून धान्य साठवीत. घरात हल्लीसारख्या चुलीवर अन्न शिजवीत. घराबाहेरील अंगणात मोठा खड्डा करून त्यामध्ये जनावराचे मांस भाजीत. सुफलनाच्या संकल्पनेशी निगडित अशी त्यांची एक मातृदेवता होती. तसेच एक शिरोहीन देवता होती. तिचा कदाचित संततीच्या कल्याणशी संबंध असावा. त्यांची पुरूषदैवतेही होती. मरणोत्तर जीवनावर त्यांची श्रद्धा होती व म्हणून ते मृताला स्वतःच्या घरातच जमिनीखाली पुरत असत. लहान मुलाच्या मृत्युनंतर दोन मोठे कुंभ तोंडाला लावून ठेवीत. त्यात लहान मुलांना पुरले जाई. प्रौढ माणसाला मात्र उत्तरेकडे डोके करून उताणे पुरले जाई. दफनविधी पूर्ण होण्याअगोदर मृतव्यक्तिंची पावले घोट्यापासून तोडली जात. कदाचित् मृत व्यक्ती पळून जाऊन त्याचे भूत बनू नये हा या कृतीमागचा उद्देश असावा. ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचे नियंत्रण करणारे प्रमुख इ,स.पू. १२०० च्या आसपास पुढे आले. अशा एका प्रमुखाचे घर इनामगांव येथील उत्खननात उजेडात आले आहे. त्याच्या घराच्या बाजूस एक सार्वजनिक कोठार होते. या कोठारात दुष्काळात उपयोगी यावे म्हणून धान्य साठविले जाई. ते बहुधा लोकांकडून कर म्हणून गोळा केलेले असावे. खंदक खणणे, संरक्षणासाठी तटबंदी उभारणे, पाणीपुरवठ्यासाठी कालवे खोदणे व बांध घालणे (इनामगांव येथील पुराव्यावरून) व यासाठी श्रमणाऱ्यांची व्यवस्था करणे अशी सार्वजनिक जबाबदारी प्रमुखाचीच असे. शेतीच्या पाण्याचे वाटपही तोच करीत असावा.
अशा आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत भरभराटीला आल्या. परंतु इ.स.पू. च्या दुसऱ्या सहस्त्रकाच्या अखेरीस या वसाहतींमधील संपूर्ण जीवन अगदी संपुष्टात येत असलेले आपल्याला दिसते. याचे कारण म्हणजे या सुमारास हवामानामध्ये पराकोटीच्या बदल घडून आला. हवामान अधिकाधिक शुष्क बनले. पावसाचे प्रमाण कमी झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून तापी, प्रवरा, गोदावरी या नद्याच्यां खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन वसाहती उजाड झाल्या. भिमेच्या खोऱ्यातील लोक मात्र कसेबसे तग धरून राहिले. परंतु त्यांना कमालीचे दारिद्रय आले. त्यांनी बांधलेल्या गोल झोपड्या व नित्कृष्ट दर्जाची भांडी यामध्ये त्यांचे दारिद्रय दिसते. तसेच शेतीचे प्रमाणही अतिशय कमी झाले व लोकांना अन्नासाठी शिकारीवरच अधिकाधिक अवलंबून रहाण्याची वेळ आली. अशा रीतीने जीवनमान इतके खालावले की लोकांना मेंढपाळीच्या व्यवसायाकडे वळावे लागले व त्यामुळे हळूहळू त्यांच्या जीवनास निमभटके स्वरूप प्राप्त झाले. इ.स.पू. ७०० पर्यंत त्यानाही वसाहतस्थळे सोडून द्यावी लागली.
[next]
महापाषयुगीन घोडेस्वार
आधीच दुर्बळ झालेल्या या ताम्रपाषाणयुगीन लोकांना त्यांच्या वस्त्यांमधून हाकून लावण्यास दक्षिणेतून आलेले महापाषाणयुगीन संस्कृतीचे घोडेस्वारही अंशतः कारणीभूत असावेत असे दिसते. फार थोड्या अवधीत ते ही गोष्ट साध्य करू शकले. त्याचे श्रेय त्यांच्याजवळ असलेल्या उत्तम प्रतीच्या लोखंडी हत्यारांना व चपळ घोड्यांना जाते. दक्षिण भारतात हे लोक सर्वत्र पसरलेले होते. महाराष्ट्रात मात्र फक्त विदर्भात, विशेषतः नागपूरजवळ त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा अधिक मिळतात. हे महापाषाणयुगीन लोक मृत व्यक्तीला विधीपूर्वक पुरत असत. त्यासाठी ते दफनस्थलाच्या भोवती मोठाले दगड गोलाकार ठेवीन. म्हणूनच त्यांना महापाषाणयुगीन असे संबोधिले जाते. मृत व्यक्तीला दागदागिन्यांनी शृंगारत असत, इतकेच नव्हे तर तिच्या घोड्यालाही सजवून तिच्याबरोबर पुरत असत. याखेरीज बरीचशी लोखंडी अवजारे व हत्यारे पुरण्यात येत. ही महापाषाणयुगीन संस्कृती महाराष्ट्रात इ.स.पू. साधारण १०००-५०० या काळात नांदत होती.
[next]
नागर संस्कृतीची सुरूवात
इ.स. पूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाच्या मध्याच्या सुमारास लोहयुगीन संस्कृती परिपक्व होऊ लागली व त्याचबरोबर भविष्यात येऊ घातलेल्या नागर संस्कृतीच्या पाऊलखुणा जाणवू लागल्या. महाराष्ट्रातल्या काळ्या जमिनीची यशस्वी लागवड करणे केवळ लोखंडी नांगरामुळेच शक्य झाले. लोखंडाचा अधिकाधिक उपयोग, शेतीचे वाढते उत्पादन आणि कला व कारागिरीमधील प्रगती. या सर्वांचा परिणाम म्हणून आसपासच्या प्रदेशांबरोबर दळणवळण सुरू झाले. गौतम बुद्धाच्या काळी मुंगईजवळील सोपारा (प्राचीन शूर्पारक) या बंदरास हळूहळू बाहेरच्या देशांशी संपर्क साधण्याचे केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. सोपारा म्हणजेच बायबलच्या जुन्या टेस्टामेंटमध्ये उल्लेखिलेले ‘ओफीर’ होय किंवा कसे याबद्दल नक्की काही सांगता येत नसले तरी पाश्च्चात्य जगाबरोबरच्या व्यापारासाठी असलेले सोपाऱ्याचे महत्त्व हे आजच्या मुंबईइतकेच होते यात शंका नाही. कदाचित म्हणूनच अशोकाने त्याचा स्तंभलेख तिथे उभारला. याच सुमारास सोळा महाजनपदांपैकी एक "अश्मक" हे महाजनपद महाराष्ट्रात ( औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांच्या आसपासचा प्रदेश ) भरभराटीला आले होते; तर ‘तगर’ (उस्मानाबाद जिल्हयातील ‘तेर’ ) हे नगरराज्य उदयाला येत होते. महाराष्ट्राच्या या प्रदेशाचा मौर्य साम्राज्यात समावेश झाल्यामुळे साहजिकच उत्तर भारताशी संपर्क वाढला. महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडणारे दोन व्यापार मार्ग तेव्हां अस्तित्वात होते.- एक सोपाऱ्याहून नाशिक, पितळखोरे, अजिंठा आणि महेश्वर यामार्गे उज्जैन, व दुसरा पैठणहून औरंगाबाद, भोकरधन, अजिंठा, घटोत्कच, महेश्वर यामार्गे उज्जैन - असे हे मार्ग होते. या प्राचीन मार्गांद्वारे कोणकोणती स्थळे एकमेकांशी जोडली गेली होती याची उत्तम कल्पना महाराष्ट्रातील कोरीव लेण्यांमुळे येऊ शकते. उदाहरणार्थ, पैठण ते कोल्हापूर हा मार्ग नेवासे जुन्नर, शेलारवाडी, शिरवल आणि कऱ्हाड असा गेल्याचे दाखविता येते. तसेच पश्चिम किनारपट्टीतील सोपारा ते कोल्हापूर हा मार्ग कल्याण, महाड, खेड व कऱ्हाड या गांवावरून जात होता असे दिसते.
[next]
सातवाहन काळ
सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्राचे भाग्यविधाते होत. त्यांनी महाराष्ट्रावर तीनशे वर्षे (इ,स,पू. १०० ते इ.स. २३०) राज्य केले. त्यांच्या काळातील कला, नाणी, कोरीव लेख, वाङ्मय इ. विपुल पुरावा उपलब्ध आहे. असे असले तरी त्यांच्या इतिहासात अनेक कूटस्थळे आहेत. त्यांच्या प्राचीन वास्तू, कोरीव लेख व त्यांची राजधानी या सर्व महाराष्ट्रातील पुणे-नाशिक-औरंगाबाद या भागात मिळालेल्या आहेत. त्यांच्या घरण्याचा जनक राया सिमुक याच्या अस्तिवाची निशाणी देणारा फक्त एकच कोरीव लेख शिल्लक आहे. या राजाचा कोरीव पुतळा जुन्नरजवळील नाणेघाटात उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या बैठकीवर राजाचे नांव कोरलेला लेख फक्त आज शिल्लक आहे. सिमुकाचा पुत्र पहिला सातकर्णी व त्याची राणी व राजपुत्र यांचीही तीच कथा आहे. सिमुकाचा धाटका भाऊ कृष्ण याने नाशिक येथे एक गुंफा खोदविली. नाणेघाट येथे असलेला राणी नागनिका हिच्या कोरीव लेखात तिचा पती पहिला सातकर्णी याच्या पराक्रमाचा वृत्तांत दिलेला आहे. त्याचा पुत्र दुसरा सातकर्णी याने पंचावन्न वर्षे राज्य केले व त्याच्याच कारकीर्दीत सांचीची अप्रतिम तोरणे कोरली गेली. या सर्व राजांची कारकीर्दीत इसवी सनाच्या सुरूवातीच्या आधीची आहे. परंतु त्यानंतर जवळजवळ एक शतकाचा इतिहास मात्र अजूनही अस्पष्ट आहे. सातवाहनांपैकी सर्वात थोर राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या कारकीर्दीचा काळ आधिक निश्चितपणे सांगता येतो. इ.स. १२४ मध्ये क्षत्रप नहपान याचा पराभव करून दिले. शक क्षत्रप नहपान हा राजा कनिष्काने नेमलेला पश्चिम भारतातील राज्यप्रमुख किंवा मांडलिक राजा होता. गौतमपुत्राच्या आईने नाशिकच्या क्रमांक तीनच्या लेण्यात लिहून ठेवलेल्या वृतांतात त्याचे वर्णन शक-पहलव-आणि-यवन यांचे मर्दन करणारा (शकयवनपहलव निसूदन) व ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचे पाणी प्याले आहेत म्हणजेच ज्याचे सैन्य तिन्ही समुद्रांच्या सीमापर्यंत पोचलेले आहे (त्रिसमुद्रतोयपीतवाहन) असे केलेले आहे. यामध्ये कसलीही पोकळ बढाई नाही. त्याने विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा संपूर्ण प्रदेश जिंकून घेतलेला होता असे त्याच्या या प्रदेशात सर्वत्र सापडलेल्या नाण्यांवरून दिसून येते. आणि म्हणूनच एक कविराज म्हणतात, "उत्तरेकडे हिमालय व दक्षिणेकडे सातवाहन राजा यांच्यामुळे पृथ्वीचा तोल साधलेला आहे."
गौतमीपुत्र सातकर्णीचा पुत्र वसिष्ठीपुत्र पुळुमावीचा इ.स. १५० च्या सुमारास क्षत्रप रूद्रदामनाने पराभव केला. त्यामुळे त्याला आपली राजधानी पैठणहून धन्यकटक (गुंटुरजवळील धरणीकोटा, आंध्र प्रदेश) येथे हलवावी लागली. तेव्हांपासून सातवाहनांची सत्ता दक्षिण दख्खनमध्येच अधिक केंद्रित झाली. कदाचित म्हणूनच पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख ‘आंध्र’ असा केलेला आढळतो. राजा यज्ञश्री सातकर्णीच्या कारकीर्दीत (इ.स. १६०-१८४) सातवाहन सत्तेचे पुनरूज्जीवन झालेले दिसते. परंतु त्याच्यानंतर गादीवर आलेले राजे दुबळे ठरले व इ.स. २३० च्या सुमारास सातवाहनांच्या सत्तेचा अस्त झाला.
सातवाहनांची कारकीर्द प्रत्येक सांस्कृतिचा क्षेत्रात कमालीची प्रगती घडवून आणणारी ठरली. या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर वसाहती झाल्या. हवामान पुन्हा अनुकूल होते, काळ्या जमिनीत यशस्वीरीत्या लागवड करण्याचे तंत्र आत्मसात झाले व त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन समृद्ध "गृहपतींचा" एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. त्यांनी बौद्ध विहारांना उदारहस्ते दाने दिल्याचे उल्लेख मिळतात. त्याचप्रमाणे व्यापारी, धंदेवाईक, कारागीर यांच्या श्रेणी निर्माण झाल्या. अनेक नवीन नगरे वसविली गेली. रोमन इतिहासकार प्लिनी, सातवाहनांच्या साम्राज्यात तटबंदीने युक्त अशी तीस शहरे होती, असे सांगतो त्यांच्या साम्राज्यात भरभरटीला आलेल्या उद्योगधंद्याच्या अनेक केंद्रांपैकी तगर (तेर, उस्मानाबाद जिल्हा ) हे महत्त्वाचे होते. ग्रीक इतिहासकारांनी त्याचे वर्णन दक्षिणापथामधील (विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेश) सर्वात मोठी बाजारपेठ असे केले आहे. अंतर्गत व्यापाराबरोबरच परदेशांशीही, विशेषतः रोमन साम्राज्याशीं मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू होता. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी नांवाच्या ग्रंथात, इथून निर्यात होणाऱ्या, आयात केल्या जाणाऱ्या वस्तू, त्यासाठी देशातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या सुविधा, चलन या सर्वांची तपशीलवर जंत्री मिळते. मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, मलमल, विविध औषधी जडीबुटी, अत्तरे, कमावलेली कातडी आणि लाकूड प्रचंड प्रमाणात निर्यात होत असत; तर रोमन मद्य, वाद्ये, काचसामान, चांदी, सातवाहनांच्या दरबार व अंतःपुरासाठी गायनकलेत निपुण असणारी मुले व नर्तकी इत्यादी आयात करण्यात येत. अर्थातच व्यापारात भारताची चढती बाजू होती व आपल्याकडून जाणाऱ्या दुर्मिळ वस्तूंसाठी रोमन लोकांना सोन्याची लक्षावधि नाणी आपल्याला काढून द्यावी लागते. स्त्रिया या सुंदर नाण्यांच्या माळा गुंफून आपल्या गळ्यात घालत. ही पद्धत पुतळ्यांच्या माळेच्या रूपांत आजतागायत टिकून आहे. यवन व्यापारीही आपल्या देशात राहिलेले होते. खरे पाहता हे व्यापारी सातवाहनांच्या पूर्वीच भारतात येऊन पोचलेले होते. आणि म्हणूनच अशोकाने खास त्यांच्यापर्यंत बुधाची शिकवणूक पोचविण्यासाठी ‘यवन-धर्मरक्षिता’ची नेमणूक केलेले होती. लेण्यांमधील कोरीव लेखांवरून असे लक्षात येते की बरेच यवन व्यापारी धेनुकाकट या शहराचे रहिवासी होते. हे शहर नक्की कोणते याची अजूनही ओळख पटलेली नाही. कदाचित् आजचे जुन्नर हेच प्राचीन धेनुकाकट असणे शक्य आहे. हे ‘यवन’ लोकांच्या रोजच्या पहाण्यात होते. त्यामुळे लोकांच्या कलाभिव्यक्तिचाही ते विषय बनले होते.
अंतर्गत व बहिर्गत दोन्ही प्रकरच्या व्यापारधंद्यामुळे पूर्वी कधीही लाभली नव्हती अशी समृद्धी येथील लोकांना प्राप्त झाली. त्यामुळे पितळखोरे, अंजिठा (सुरुवातीची लेणी), भाजे, कार्ले, नाशिक, जुन्नर इत्यादिंसारखी शेकडो लेणी खोदणे शक्य झाले. यांपैकी बहुतेक लेणी उत्तमोत्तम शिल्पांनी नटलेली आहेत. या शिल्पांचे वैशिष्ट्य असे की दगडात कोरलेली असूनही ती विलक्षण सजीव वाटतात. स्फिंक्स व त्रिदल या ग्रीक चिन्हांचाही समावेश जुन्नर आणि नाशिक येथील शिल्पांमध्ये झालेला दिसतो. यातील बहुतांशी गुंफा या मनोरम चित्रांनी नटलेल्या होत्या. परंतु आता तीं सर्व नष्ट पावली आहेत. निसर्ग व मानव यांच्या तडाख्यातून तीं सुटु शकली नाहीत. याला अपवाद फक्त अजिंठा येथील क्रमांक ९ व १० या गुफांमधील चित्रांचा. या चित्रांची शैली दगडी शिल्पांशी खूपच जवळीक दर्शविते.
[next]
सुवर्णयुग
सातवाहनांच्या उतरणीच्या काळात त्यांच्या साम्राज्याचे हळूहळू विघटन झाले. कोल्हापूर-बेळगांवचे चुटु, सागरकिनाऱ्यावरचे महारथी-मांदव यासारखे मांडलिक राजे स्वतंत्र झाले. मध्य महाराष्ट्रात काही काळ अभिरांनी राज्य केले. परंतु लवकरच सामर्थ्यशाली वाकाटकांची सत्ता इ.स. २५० च्या सुमारास उदयाला आली. मध्य भारतातील छोट्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या विंध्यशक्तिने वाकाटक घराण्याची स्थापना केली. भारतीय इतिहासात वाकाटक इतके महत्त्व पावले की के.पी. जयस्वालांसारख्या नाणावलेल्या इतिहासकाराने त्यांना अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याचे श्रेय देऊ केले. ते उत्तरेकडील गुप्तसम्राटांचे समकालीन होते. जरी समुद्रगुप्ताने जवळजवळ सर्व देश जिंकला तरी वाकाटक राजा प्रवरसेन (इ.स. २७०-३३०) याच्या अधिसत्तेखाली असलेल्या प्रदेशात पाऊल घालण्याचे धैर्य त्याला झाले नाही. समुद्रगुप्ताचा वारस दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य-याने वाकाटकांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपली कन्या प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक राजा दुसऱ्या रूद्रसेनाशी करून दिला. या रूद्रसेनाची राजधानी नंदीवर्धन (नगरधन, जिल्हा नागपूर) इथे होती. दुर्दैवाने प्रभावतीला अल्पकाळातच वैधव्य आले व अल्पवयीन राजपुत्राची प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पहावा लागला. या कामी तिला तिच्या पित्याचे खूपच सहाय्य मिळाले. काही विद्वानांच्या मते त्याने राजपुत्राच्या शिक्षणासाठी प्राचीन भारतातील थोर कवी कालिदास याची नियुक्ती केली होती. वाकाटकांच्या राजधानीतील त्याच्या वास्तव्यातच प्रेमविव्हल होऊन या कवीने ‘मेघदूत’ हे सुप्रशिद्ध काव्य रचले असावे असेही म्हटले जाते.
प्रभावती गुप्त (इ.स. ४०५-४२०) तिच्या पित्याप्रमाणेच विष्णूची निस्सीम भक्त होती. तिने बहुधा बरीच मंदिरे बांधली असावीत. त्यापैकी प्रवरपूरस्वामीचे मंदिर राजधानीतील असावे. या मंदिराचे अवशेष पवनार येथे विनोबाजींचा आश्रम बांधत असताना सापडले. खणत असताना सापडलेल्या मूर्ती तेथील आश्रमात सिमेंटमध्ये बसविण्यात आलेल्या आहेत. यातील लक्षणीय असे एक शिल्प प्राध्यापक मिराशींच्या मते राम-भरतभेटीच्या प्रसंगाचे चित्रण करणारे आहे. परंतु संभाव्यातः ते शिव अंधकासुराचा वध करत असतानाच्या प्रसंगाचे चित्रण असण्याची आहे. "गंगा-भगवती" असा कोरीव लेख असलेले गंगेचे शिल्प अत्यंत वाखाणण्यजोगे आहे. प्रभावती गुप्त हिने नृसिंहाचीही काही देवळे बांधली. त्यापैंकी एका मंदिराचे अवशेष रामगिरीच्या (रामटेक) टेकडीवर मिळाले आहेत. हिंदू मंदिराच्या बांधणीच्या सुरूवातीच्या काळातील ही मंदिरे होत. य दृष्टीने मंदिरस्थापत्याच्या उत्क्रांतीच्या इतिहासात या मंदिरांचे स्थान अजोड आहे. ही मंदिरे महाराष्ट्रामध्ये इ,सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात फार मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वैष्णव संप्रदायाची निदर्शक होत. असे असले तरी शैव संप्रदायासही तितकेच महत्त्वाचे स्थान होते हे मुंबईतील जोगेश्वरी, घारापुरी, मंडपेश्वर ही लेणी व वेरूळ येथील रामेश्वर गुंफा (क्र. २१) यावरून सिद्ध होते.
प्रवरसेनाच्या मृत्यूनंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन शाखा झाल्या. एक प्रवरपूर (पवनार) येथे व दुसरी वत्सगुल्म (वाशिम, ता, अकोला) येथे. कालांतराने हरिषेणाच्या (इ.स. ४७५-५१०) अधिपत्याखाली दोन्ही घराणी पुन्हा एकत्र आली. हरिषेण हा वाकाटकांचा शेवटचाच ज्ञात असलेला राजा होय. तो कला व वाङ्मय यांचा आश्रयदाता होता. अजिंठ्याच्या उत्तर कालखंडातील सर्व गुंफा खोदण्याचे व उत्तमोत्त्म चित्रांनी सजविण्याचे काम त्याच्या कारकीर्दीतच पार पडले. त्याच्यानंतर आलेल्या राजाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. असे असले तरी प्राध्यापक मिराशींनी दशकुमार चरितम् या ग्रंथातील ऐतिहासिक माहितीच्या आधारे त्यांचा वृतांत थोडक्यात जुळवून दिलेला आहे. परंतु इ.स. च्या सहाव्या शतकाच्या सुरूवातीचा काळ हा अंदाधुंदीचा वा धामधुमीचा होता. मांडलिक राजे स्वतंत्र होऊ पहात होते. याच सुमारास त्रैकूटक घराण्याच्या राजांनी पश्चिम महाराष्ट्र आपल्या काबूत आणला व शिवावतार लकुलिशाचा संप्रदाय सुरू केला.
वाकाटक कारकीर्दीत आर्थिक सुबत्ता व राजकीय शांतता असल्यामुळे महाराष्ट्रात सुवर्णयुगाचे आगमन झाले. वात्स्यायनाचा "नागरक" बनण्याची लोकांमध्ये अहमहामिका सुरू झाली. अजिंठाच्या वैविध्यपूर्ण भित्तीचित्रांतून प्रतीत केले गेले ते हेच समृद्ध जीवन. लोकांचे दैनंदिन जीवन लक्षणीय रीत्या सुधारले होते. त्यांच्या निवासासाठी पक्के बांधकाम केलेल्या उत्तुंग इमारती होत्या. विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे ते परिधान करीत. शिवून तयार केलेले पोषाख हळूहळू अधिक लोकप्रिय होऊ लागलेले होते. सुंदरसुंदर अलंकार लोक वापरीत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शब्दातच सांगायचे झाले तर, "अजिंठा आपल्याला एका दूर, स्वप्निल परंतु तरीही सत्य अशा जगतात घेऊन जाते." थोडक्यात ते कालिदासाचे विश्व होते.
सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर भारतात महत्वाच्या घडामोडी होत होत्या. हूणांच्या आक्रमाणामुळे गुप्त साम्राज्य खिळखिळे झाले. याच काळात दक्षिणेकडे बदामीच्या चालुक्यांचा (जिल्हा विजापूर, कर्नाटक) उदय झाला. आणि दुसरा पुलकेशी या बलशाली सम्राटाने (इ.स. ६१० ते ६४२) तीन महाराष्ट्र (म्हणजे आजचा संपूर्ण महारष्ट्र) जिंकून घेतले.
- म. के. ढवळीकर
अभिप्राय