प्राक्कालीन वाङ्मयीन अभिव्यक्ती, महाराष्ट्र - [Prakkalin Vangmayin Abhivyakti, Maharashtra] पुरातन साहित्यानुसार, हाल सातवाहनाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी पैठणला होती.
पुरातन साहित्यानुसार, हाल सातवाहनाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी पैठणला होती
अलीकडेच पुण्याच्या जुन्या बाजारात एक जुन्या पावलीच्या आकारचे तांब्याचे नाणे मिळाले आहे. त्या नाण्याच्या एका बाजूवर झूल घातलेला हत्ती डावीकडून उजवीकडे जात असलेला दाखविलेला असून डाव्या बाजूच्या कडेला, ब्राह्मी लीपीत, ‘रय्यो सिरि हालस्स’ (राज श्री हाल यांचे) अशी अक्षरे आहेत व नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उज्जयिनीचे सुप्रसिद्ध राजमुद्रा चिन्ह आहे.कलियुगातील राजवंशांतल्या राजांचे संबंधी पुराणांत जी काही त्रोटक माहिती मिळते. त्यानुसार आंध्रभृत्य सातवाहनवंशीय हालसातवाहन याचा सतरावा क्रमांक आहे व त्याचा राज्यकाल पाच वर्षांचा होता असा उल्लेख आहे. प्रारंभी उल्लेख केलेल्या नाण्याची प्राप्ती होण्यापूर्वी केवळ वाङ्मयीन क्षेत्रांतून कांही थोडी माहिती उपलब्ध होती. परंतु आता ह्या नाण्यामुळें त्या माहितीला संपूर्ण दुजोरा मिळाला असून, हाल नावाचा सातवाहन वंशातला राजा सुमारे १८०० वर्षापूर्वी होता, त्याचे राज्य विस्तृत होते, अर्वाचीन कर्नाटकाचा उत्तरेकडचा पट्टा व दक्षिण महाराष्ट्रापासून विंध्य पर्वतावलीपलीकडे माळव्यातही त्याची सत्ता होती, इतकी शुद्ध व स्पष्ट ऐतिहासिक तथ्ये प्रमाणित झाली आहेत.
पुरातन साहित्यानुसार, हाल सातवाहनाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी पैठणला होती. त्याचे अधिकांश राज्य नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात होते. एका प्राचीन गाथेत, ‘हाल सातवाह पैठण सोडून गेला तरी गोदावरी (नदीने) तसे केले नाही. प्रतिस्थान/प्रतिष्ठान = पैठण सोडून ती दूर हटली नाही’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका पुरातन गाथेत, ‘शुभ्र उत्तुंग हिमाच्छादित पर्वत उत्तरेत आहे, हालसातवाहनाची यशोराशी दक्षिणेत तितकीच उंच आहे’. असे हालसातवाहनाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. ह्या दोन्ही गाथा श्लेषपूर्ण आहेत. गाथासप्तशतीच्या एका जुन्या हस्तलिखिताच्या पुस्तिकेत, हालसातवाहन कुंतलाधिपति होता असे उल्लेखिले आहे. कृष्णानदी व तिच्या उपनद्या ज्या भूभागात वहातात, त्या भागाला, तिथली भूमी काळी असल्याने, कुंतलदेश अशी संज्ञा होती. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरचा काही भूभाग व कर्नाटाकाच्या उत्तर सीमेवरचा काही भाग ह्या दोहोंना मिळून कुंतलदेश ह्या नांवाने संबोधिले जात असे. गोदावरीच्या तीरावरचे, राजधानी असलेले प्रतिष्ठान हे शहर मोठे नगर मानले जात असे आणि कृष्णेच्या एका उपनदीच्या-पंचगंगानदीच्या- काठावर वसलेले नगर लहान म्हणून, क्षुल्लकपूर (वर्तमानकालातील कोल्हापूर) सातवाहनाचे कालात समजले जाई. त्या काळच्या ग्रीक व रोमन प्रवासवर्णनांत क्षुल्लकपुराचा पाठभेद ‘हिप्पोकूरा’ असा आढळतो.
[next] हालसातवाहन प्राकृत भाषेचा पुरस्कर्ता होता व त्या भाषेत वाङ्मयरचना करणाऱ्या विद्वानांचा तो अतुलनीय आश्रयदाता होता असे उल्लेख त्यानंतरच्या अनेक साहित्यांत मिळतात. महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झालेला असून, अनेक शतकांच्या कालप्रवाहात त्या प्राकृत भाषेचे रूपांतर मराठी बोलीत झाले.
हालसातवाहनविरचित विश्वविख्यात गाथासंग्रहातील भौगोलिक उल्लेख व पशुपक्षी वगैरेंची नावें अधिकांश महाराष्ट्र प्रदेशातील आहेत. किंबहुना, त्या प्रदेशातले सामान्य जनजीवन, ग्रामीण व्यवस्था, पीकपाण्याची परिस्थिती, वेशभूषा, घरे व झोपड्या आणि त्यांत राहणाऱ्या लोकांची कौटुंबिक सुखदुःखे, सामूहिक उत्सव, सणवार, शेती आणि रानावनांतील व्यवसाय इत्यादींची मनोवेधक शब्दचित्रे ह्या गाथांतून साकारलेली आहेत. आतापर्यन्त तर याच तऱ्हेची सामाजिक परिस्थिती थोड्याच फरकाने ह्या प्रदेशात चालू राहिली होती. त्या काळी सार्वजनिक उत्सवाच्या घाईगर्दीत साजरा केला जाणारा इंद्रध्वज महोत्सव, वर्तमानकाळी महाराष्ट्रात गुढी-पाडवा म्हणून घरोघरी साजरा होतो; तत्कालीन मदनोत्सवाचे अर्वाचीन रूप शिमगा-होळी आहे.
राजा हालसातवाहनाने संपादित केलेल्या गाथासंग्रहाचे स्थान ललित वाङ्मयाच्या क्षेत्रांत अत्युच्च कोटीचे आहे. तसेच तत्कालीन आणि वर्तमानकालीन महाराष्ट्रातील समाजजीवनाविषयी संशोधन करण्यच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
[next] ह्या संग्रहासाठी हालसातवाहनाने एक कोटी उपलब्ध गाथांतून ७०० गाथांची निवड केली अशी माहिती ग्रंथाच्या एका प्रस्तावनात्मक गाथेत मिळते. खुद्द हालसातवाहनानें रचलेल्या ४४ गाथा ह्या गाथासप्तशतीत आहेत. त्या खेरीज निदान २६१ इतर कवींनी रचलेल्या गाथांचा समावेसह झाला आहे. त्यापैकी कांहींची नांवे मोठी सूचक आहेत. उदाहरणार्थ, मालवाधिप, आंध्रलक्ष्मी, समुद्रशक्ती, विंध्यराज इत्यादि. ह्या प्रादेशिक नावावरून असा निष्कर्ष निघतो की हाल सातवाहनाने आपल्या राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून गाथा निवडत्या होत्या.
तत्कालीन ग्रामीण लोकवाङ्मयातील कल्पनांच्या आधारे रचलेल्या काही गाथा ह्या गाथासंग्रहात असण्याची शक्यता आहे. काही गाथांतील उत्तान शृंगाराचे वातावरण अलीकडच्या मराठी लावण्यांची आठवण करून देते. परंतु हालसातवाहनाच्या सप्तशतीसाठी गाथांची निवड करण्यासाठी जे संपादक मंडळ होते, त्यात स्वतः हालसातवाहनाबरोबर त्याच्या दरबारी असलेली बृहत्कथाकर्ता कवि गुणाढ्य आणि श्रीपालितासारखा मार्मिक रसिक ह्यांचा समावेश होता हालवाहनाने श्रीपालित कवीचा फार सन्मान केला होता, अशी वाङ्मयीन किंवदंती आहे. ‘हालेन उत्तम पूजेया श्रीपालि तो लालितः’ श्रीपालिताची प्रचुर प्रशंसा जैन ग्रंथांत आढळते.
[next] सूक्ष्म दृष्टीन पाहिले असता, संपादकांनी गाथांची निवड करण्यासाठी जे निकष केल्याचे स्पष्ट होते ते साधारणपणे पुढीलप्रमाणे दिसून येतात-
- गाथेत केवळ दार्शनिक तत्त्वचर्चा अपेक्षित नसून जीवनविषयक मार्मिक उद्गार असावेत.
- गाथांचा क्रम विशिष्ट विषयाला धरून नसावा; प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण असावी.
- मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच आहे. जीवन नागरी असो किंवा ग्रामीण अथवा वन्य असो, मानव धनाढ्य असो, त्याच्या भावनामध्ये बाह्य परिस्थितीने बदल होत नाही.
- अधिकांश गाथांत ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब असावे.
- गाथा, ललित वाङ्मयांतील उत्तमोत्तम अलंकारानी प्रचुर असावी; तिच्या ग्राम्य किंवा अश्लील असे लवमात्र नसावे.
- गाथेत, धार्मिक संप्रदायांतला मानभावीपणा उघड व्हावा, तसेच दैनंदिन जीवनातील शुद्ध आनंदाचे क्षण चित्रित व्हावेत.
- महाराष्ट्री प्राकृत भाषेतील श्लेष अलंकारासहित व्यंगार्थयुक्त गाथेची रचना असावी. परिणामतः एका गाथेतून दोनतीन किंवा त्याहूनही अधिक, गर्भितार्थ निघावेत.
[next] ह्या गाथासंग्रहात भात, तूर आदी धान्यांची शेते, समुद्रकिनाऱ्याची मिठागरे, आणि गावातली घरे, झोपड्या व पर्णकुटी, त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री ह्याच्यामधले प्रेम व प्रेमाचा अभाव, मत्सर आणि अनुराग ह्या समाजाच्या सर्व थरांत आढळून येणाऱ्या अवस्था, सर्वांविषयींची चित्तवेधक शब्दचित्रे येतात. म्हणून जगांतल्या सर्वोत्तम संग्रहवाङ्मयांत गाथासप्तशतीची गणना होऊ लागली.
परंतु, ह्या सर्व पैलूंचा विचार करून कविवत्सल हालसातवाहन आणि त्याचे गाथाकार हल्लीच्या युगातल्या समाजशास्त्राच्या सिद्धांतांचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रज्ञासारखे होते असे मानणे निराधार ठरेल. सातवाहन इतिहासखंडात, सामाजिक न्याय आणि आर्थिक उन्नती ह्याविषयींचे हल्लीचे सुधारणावादी प्रगत विचार नव्हते. हालसातवाहन आणि त्याचे समकालीन सहयोगी, राजा आणि प्रजा व त्यांच्यामधल्या निरनिराळ्या स्तरांच्या राजकारणात मग्न होते. शासक वर्ग लोकसंख्येच्या मानाने फार लहान होता. ‘प्रजेचे कल्याण करावे’ हा राजाचा आणि त्याच्या सेवकवर्गाचा धर्म मानला जाई. ह्यापलीकडे सामूहिक संपादक मंडळ ह्यांनी ग्रांमीण जीवनाचे परीक्षण अत्यंत सहृदय आणि सुसंस्कृत नागरे साहित्याच्या निकषांवर केले. ह्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते म्हणून त्यांच्या अशा परिश्रमांमुळे एक नवीन साहित्यिक दृष्टीने निर्माण झाला. त्याच्यानंतरच्या थोर सारस्वतांना ही कलाकृती मोठी कौतुकास्पद वाटली. कविकुलगुरू कालिदासाने गाथासप्तशतीमधून अनेक कल्पना आणि शब्दप्रयोग आत्मसात केले. भारतातील सर्व प्रदेशांत, भारतीय ललित वाङ्मयाच्या परीक्षणांत सप्तशतीमधील अलंकारयुक्त गाथा नंतरच्या कालखंडातील रसिकांच्या मते मानदंड ठरल्या.
गाथासप्तशतीत अशा अनेक गाथा आहेत ज्या जपानच्या सुप्रसिद्ध हायकू कवितांची आठवण करून देतात. परंतु हायकू कवितेत निरुपम साहित्याचे सौंदर्य आणि तेज एकादाच प्रगट होते. सप्तशतीच्या गाथांमध्ये सहृदय रसिकाला अशा प्रकारच्या सौंदर्याचे दर्शन अनेकवार होते-जणू काव्यसृष्टीतल्या उज्ज्वल लावण्याची सोपानपंक्तीच दृष्टीत्पतीस येते.
[next] गाथासप्तशतींतल्या मार्मिक गाथांपैकी, काही गाथांचा प्रथमदर्शनी दिसणारा भावार्थ वानगीदाखल प्रस्तुत करणे उचित होईल.
एका चंद्राननेचे वर्णन ६७२ व्या गाथेत आले आहे. ‘चंद्राच्या सर्व कलांचे लागोपाठ दर्शन व्हावे असे कुतूहल असेल तर हळूहळू घुंगटपट सारत असतांना तिच्या मुखाकडे पहा.
हालसातवाहनाच्या प्राकृत कवींच्या कलेचे हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. रसास्वादाचा एक तरंग कडेवर पोचतो तोच त्याचा पाठोपाठ दुसरा अधिक विस्तृत तरंग येत आहे अशी चित्रपरंपरा ह्या गाथेत प्रकट झाली आहे. प्रत्येक गाथेच्या अंतर्हित काव्यप्रतिभेला ही उपमा सहज लागू पडते.
एक गाथा (क्रमांक १३) अशी आहे. ‘चुलीवर स्वयंपाक करीत असतांना गृहिणीचे हात काजळी लागून मलीन झाले, पती प्रेमाने जवळ आला. गडबडून जाऊन तसेच मलीन हात तिच्या चेहेऱ्याला लागले. तिचे प्रफुल्ल मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे दिसू लागले.’ ह्या गाथेच्या दुसऱ्या ओळीत भरपूर श्लेष आहे. विशेषतः, शेवटच्या तीन शब्दांत ह्यात भावनामय संकेत असा आहे की स्वयंपाक चालला असतांना अवचित पती तिथे आला. एकमेकांना पाहून उभयतांना आनंद झाला, इ. ही गाथा स्वतः हालसातवाहनाने रचलेली आहे.
[next] एका गाथेत (क्रमांक २२१) ग्रामीण जीवनातले हृदयंगम चित्र आहे. ‘तू गाव सोडून जात असतांना, तिने कुंपणाला अंग भिडवून, पायांच्या चवड्यावर उभे राहून तुला पाहाता यावे म्हणून अंगाला रग लागेपर्यंत धडपड केली. पण तरी तू तिला दिसलाच नाहीस. मग बिचारीनें काय करावे?’ या गाथेच्या अगोदरच्या गाथेत (क्रमांक२२०) अशाच प्रकारच्या प्रसंगाचे वर्णन ह्या शब्दांत आले आहे : ‘बाळा, तू गेलास तेव्हा त्या मुलीने धावत धावत जाऊन कुंपणाच्या एकेका छिद्रातून चंचल दृष्टीने, लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहिले. पिंजऱ्यातले पांखरू बाहेर पहाते तसे.’
आणखी एका गाथेचा (क्रमांक २३२) भावार्थ असा आहे. ‘एका उंचीची व आकाराची झाडे होती. मधे, पाने, फुले, लतांनी भरलेले कुंज होते... कालांतराने ती झाडे गेली, लता नष्ट झाल्या, कांही वृक्षांची खोडेच राहिली व पाळेमुळे उखडून गेली. नाहीशी झाली. आमचे समवयस्क जिवलग मित्र, मैत्रिणी आता राहिलेल्या नाहीत. आम्ही सुद्धा म्हातारे झालो. खोल मुळे धरलेले प्रेम पण विनाश पावले. असे हे आयुष्याचे उद्यान उध्वस्त झाले.. गेले ते दिवस.’
ह्या सातवाहन युगात, दक्षिण भारतांत बौद्धधर्माचा पुष्कळ प्रचार होता. एका गाथेत (क्रमांक३०८) वर्णन आले आहे:
‘पोपटांच्या चोचींप्रमाणे लाल भडक पळसाच्या फुलांनी भूमी शोभायमान झाली आहे. जणू बुद्धचरणांना वंदन करण्यासाठी लोटांगन घालणाऱ्या भिक्षु-संघासारखे हे दृश्य दिसते आहे.’ या गाथेत ‘भूमी’ करिता वसुधा हा श्लेषपूर्ण शब्द वापरला आहे.
[next] हालसातवाहनाचा एक प्रमुख अभिप्राय होता की, माणसे नगरांत राहाणारी असोत किंवा गावांत असोत, त्यांच्या भावना सर्वत्र सारख्याच असतात. एका गाथेत (क्रमांक ६६५) एक धिक्कारित अबला म्हणते आहे, ‘तू जरी भाग्यवान, सुंदर आणि गौरवर्ण असलास तरी तुझ्यामुळे माजे हृदय रक्तवर्ण झाले. तुझ्यासाठी अनुरागाने भरलेल्या माझ्या हृदयांत मी तुला साठवून ठेविले, परंतु तरीही तू मात्र शुभ्रच राहिला आहेस. आरक्त होत नाहीस.’ ह्या गाथेतील पुढच्या चित्रांची रांग ‘धवल’ ह्या शब्दाच्या ‘निव्वळ/शुद्ध बैल’, ह्या अर्थाने सुरू होते, आणि ‘राग’,‘रक्त’.व ‘रंजित’ ह्या तीन श्लेषपूर्ण शब्दांमुळे ती वाढत जाते.
‘दिसते तसे नसते,’ हे दाखविण्यासाठी एका अन्य गाथेत (क्रमांक६७९) एका महिलेला तिची सखी सांगते आहे, ‘हे बघ, ज्यांतले पाणी संपून गेले आहे असे हे शरद्ऋतुंतील पांढरे शुभ्र ढग, मिठाच्या मोठ्या ढिगांसारखे आणि कापसाच्या, धुवून सुकलेल्या गठ्ठ्यांसारखे शोभत आहेत.’ म्हणजे कसलाही ओलावा राहिलेला नाही. पांढरा फटफटीत रंग विरक्तिदर्शक मानला जाई.
एका गाथेत (क्रमांक ६९२) कृषिजीवनांतल्या एका मजेदार प्रसंगाचे वर्णन येते. ‘नुकताच नेमलेला नांगऱ्या, शिदोरीचा हारा घेऊन येणाऱ्या बाईला पाहून इतका गोंधळला की त्याने कासरा सोडण्याऐवजी बैलांच्या वेसणीच सोडल्या. ‘व्यंजना अशी आहे की त्याला वाटले नांगराला एक नवीन बैल जुंपायचा आहे.
[next] समुद्राच्या किनाऱ्यासंबंधी एक गाथा आहे (क्रमांक७४०) : ‘किनाऱ्यावरची जमीन शोधायला सोडलेला, पडावावरचा कावळा आकाशांत उडत उडत जाऊन, जमीन दृष्टीस न पडल्याने परत येऊन, डोलकाठीवर कावकाव करीत बसला. जसे विरहाने जळून काळे झालेली माझे प्रेम स्थिर आश्रयाकरिता व्यर्थ शोध करून आधी जिथे होते तिथेच परत येऊन माझा उपहास करीत बसले आहे. ‘सातवाहन वंशीय राजांची जहाजे दाखवणारी नाणी सापडली आहेत. तसली जहाजे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच वावरत होती असे समजणे चुकीचे होईल. त्या काळी पश्चिम समुद्रपट्टीवर मोठी मोठी बंदरे आणि व्यापार केंद्रे होते हे विसरता कामा नये. राजा हालसातवाहनाकडून महाराष्ट्री प्राकृत भाषेत हा सप्तशती गाथासंग्रय संपादित होणे ही घटना कदाचित तत्कालीना अनुकूल परिस्थितीमुळे घडून आली असेल. परंतु त्या संग्रहाच्या अप्रतिम गुणवत्तेमुळे त्याला अल्पावधीतच अखिल भारतात मान्यता मिळाली आणि आधुनिक काळात जगातल्या सर्वोकृष्ट संग्रहवाङ्मयात त्याची गणना होऊ लागली. सर्वश्रेष्ठ अभिजात वाङ्मयकृतींना प्रादेशिक अथवा राष्ट्रीय सीमा राहात नाहीत. भारतीय संस्कृतीत विविधतेतही एकता निबद्ध आहे. सकृद्दर्शनी भिन्नभिन्न, परंतु वस्तुतः अविभाज्य, अशा भारतीय संस्कृतीमुळे दक्षिण भारतातल्या हालसातवाहनाच्या ह्या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाथासप्तशतीने, संपूर्ण भारतीय वाङ्मयाचा अलंकार होऊन, सर्व जगांतल्या अविनाशी, श्रेष्ठ संग्रहवाङ्मयात अमोल भर घातली आहे.
- श्री. वा. सोहोनी
अभिप्राय