मुंबई प्रभाव (महाराष्ट्र) - शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात [Mumbai Prabhav, Maharashtra].
शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात
मुंबई प्रभाव (महाराष्ट्र)
(Mumbai Prabhav Maharashtra) शहरे माणसांसारखी असतात. पहिल्या भेटीतच ती तुमच्यावर अनुकूल अगर प्रतिकूल छाप टाकतात आणि ती छाप कायम रहाते. मुंबईच्या परिचय बहुसंख्य लोकांना बोरीबंदरपासून होतो. मुद्दामच विमानतळ नव्हे तर रेल्वे स्थानक निवडले आहे. कारण नोकरीच्या, घराच्या, सुरक्षितच्या, नव्या आयुष्याच्या शोधात शहराचे नवीन रहिवासी भारताच्या अंतरंगातून रेल्वेगाड्याच मुंबईला आणि असतात..
मुंबईशी होणाऱ्या या प्रथम भेटीबद्दल मी अनेकदा विचार केला आहे. आपल्या मूळ गावाहून राज्य परिवहन मंडळाच्या बसने वाराणशिला येऊन तिथून काशी एक्सप्रेसने सर्व देश व पश्चिम घाट पार करून मुंबईला आलेल नवीन प्रवासी, थोडा बधिर झालेला, बराच गोंधळलेला असतो. ढकलाढकलीत, रेटारेटीत, कुडत्याच्या खिशातील एकूण सर्व भांडवलावर एक रक्षक हात ठेवून दुसऱ्या हाताने पत्र्याची ट्रंक व मोहरीच्या तेलाचा वास येणारे कपड्यांचे गाठोडे सावरीत व्हिक्टोरिया टर्मिनसमधून , तो गावी अनेकदा सिनेमात पाहिलेल्या या गोंधळ नगरीत अवतरतो. त्याला अचानक गाण्याचा कंठ फुटत नाही, एकाएकी वास्तवाचा आकस्मित टोला बसतो.
रस्त्यापलीकडे मुंबई महापालिकेची उत्तुंग इमारत, चौकाऱ्या पलीकडील जुनं कॅपिटॉल सिनेमागृह, दूर अंतरात विरत जाणारा दुतर्फी दादाभाई नवरोजी मार्ग ही सारी दृश्ये गेल्या अर्धशतकात मुंबईला येऊन स्थानिक झालेल्या अनेक लोकांना प्रथम आगमनाच्या दिवसापासून आठवतील.
संभाव्य रहिवाशाला शहराचा परिचय करून देण्याचा हा कदाचित सर्वोत्तम मार्ग नसेल पण तो एकमेव मार्ग आहे. नंतरच्या महिन्यांत, वर्षात तो शहर अधिक ओळखायला लागेल, त्यात रहायला, त्याबरोबर वाढायला, त्याची निंदा नालस्ती करायला शिकेल. सुटीमध्ये, कधीतरी गावी गेल्यावर त्याला शहराचा विरह जाणवेल.
[next]बाहेर गेल्यावर मला मुंबईचा नेहमीच विरह झाला आहे. चांगल्या गोष्टींचा व इतक्या चांगल्या नसलेल्या गोष्टींचाही. भल्या पहाटे रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या टपऱ्यांमध्ये आरे दुधाच्या बाटल्यांचे किणकिणते आवाज, भायखळा व माहिमला बेकऱ्यात भाजल्या जाणाऱ्या ताज्या पावांचा खरपूस वास, दाराखाली, नेहमीप्रमाणे उशीरा, सरकवली जाणरी वृत्तपत्रे, निष्काळजीपणे रस्ते झाडणारे महापालिकेचे झाडूवाले, भिका बेहराम बावडीवरून पाण्याची पिंपे फोर्टमधील जुन्या कचेऱ्यात वाहून नेणाऱ्या पाणक्यांच्या पायांची सौम्य थपथप, आनंदी आवाजांच्या गोंधळात मधूनच थांबणाऱ्या व सुरू होणाऱ्या शाळांच्या बसगाड्या. शहर जागे होत असल्याचे आवाज.
सकाळ ही मुंबईच सर्वोत्तम वेळ आहे. उपनगरी गाड्या, शहराच्या परीघभर विखुरलेले आपले प्रवासी मेंढपाळच्या कुत्र्याप्रमाणे गोळा करतात आणि चर्चगेट स्थानकावर बाहेर ओततात. अलीकडे शहरातल्या घाईगर्दीत सापडल्यामुळे मला मुंबईत मिळणारी तांबडे फुटतानाची साधी सुखे उपभोगायला वेळ मिळाला नाही; पण मला त्यांची जाणीव आहे. कमरेला घराच्या किल्ल्यांचे मोठे जुडगे वाजवीत मरीन ड्राईव्हला चालताना गुजराती गृहिणी. समुद्राशी बातचीत करताना निस्सीम इझीकेल. धावण्याचा व्यायाम करणारे, धापा टाकीत असलेले. रशियन आणि इतर पूर्व युरोपीय देशातले अधिकारी आणि तंत्रज्ञ यांची लांबलचक मरीनावर रमतगमत फिरणारी बायका, मुले. डोळे अर्धवट मिटून कानाला लावलेल्या ट्रॉन्झिस्टरमधून आकाशवाणीचि भजने ऐकणारा, आयुष्यातलं काम संपवून निवृत्त झालेला म्हातारा, इतरत्र शहराच्या दुसऱ्या भागात सकाळचा व्यायाम करणारे इतर लोक. मलबार हिलवर प्रकृतीकरता नियमित चालणारा वकील. आपापल्या आयांबरोबर बागेत आलेली मुले (मलबार हिलवरच्या बागेसन्निध मोठे होण्यातले सुख). आणखी धावणारे दर सकाळी वरळीच्या बांधावर बसून चर्चा करणारा एक गट, जगाचे प्रश्न सोडवण्याची खटपट करणाऱ्या निवृत्त लोकांची वायफळ चर्चा.
मुंबईत नवा दिवस उगवला आहे. मागील वर्षातल्या हजारो लाखो दिवसांप्रमाणेच. गेले अर्धशतक, एखाद्या आतिथ्यशील घराप्रमाणे आणखी-आणखी लोकांचे स्वागत करून मुंबई वाढताना, भरत जाताना मी पहातो आहे. आपली टंकलेखन यंत्रे व कांजीवरम साड्या यासकट आलेले दाक्षिणात्य मी पाहिले. महायुद्ध व त्यानंतरच्या फाळणीनंतर सिंधी आले. पायजमे घालणाऱ्य बायका - काय हे विचित्र लोक-असे माझे त्यांच्याबद्दल मत झाले. पंजाबी नेमके केव्हा आले ते मला माहित नाही. ते काहीसे गुपचूप आत शिरले असावेत. एक दिवस, अचानक, तंदूरी चिकन आणि समोसे (मुंबईला पूर्वी माहित असलेले समोसे नव्हते) विकणारी कितीतरी वातानुकूलित उपहारगृहे दिसू लागली.
[next]मुंबईचा भाग बनून राहिलेले इतरही अनेक आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या परिषदेतल्याप्रमाणे पांढऱ्य गाद्यांवर, काळाबादेवीतल्या पेढ्यांमध्ये आडवारलेले गुजराती. मोठी धोरणी जमात, त्यांच्याकडे कुणाहीपेक्षा अधिक पैसा आहे. आणि इतर कुणहीपेक्षा त्याचे त एकमी प्रदर्शन करतात. आणि पारशी- डॉक्टर, वकील, इंजिनियर - आणि दक्षिन मुंबईच्या उठून दिसणाऱ्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेले ते संगमरवरी पुतळे.
मुंबई हे अर्थात महाराष्ट्रीय शहर आहे. महाराष्ट्राची राजधानी होण्याआधीपासूनच , ते महाराष्ट्रीय शहर आहे. रस्त्याची, बस व टॅक्सी वाहकांची भाषा एका प्रकारची मुंबई हिंदी असली तरी नागरिकांचे अफाट समुदाय पूर्वीपासून नेहमीच मराठी भाषिक आहेत. शहरात वाढलेले मुंबई महानगरपालिकेचे सभासद आणि जिल्ह्यातून आलेले( त्याला ब्रिटिश लोक ‘मोफ्यूसिल’ म्हणजे ‘ग्रामीण’ म्हणत पण आपण तसे म्हणत नाही ) बहुसंख्य राज्य विधानसभेचे सभासद यांचे बोलणे ऐकले की भाषेतला फरक स्पष्ट होतो.
आणि मूळ नागरिक असे ज्यांना कधीतरी संबोधले जाते त्या मासेमारांची, कोळ्यांची सुद्धा ही मुंबई नगरी आहे, ही जमात बहुधा विसरली जाते - मासे घ्यायचे असले किंवा प्रजासत्ताक दिनाकरता सजवलेला गाडीवरील लोकनृत्याची तयारी करायची असली तर त्या वेळा सोडून.
जगातील इतर अनेक मोठ्या शहरांप्रमाणेच निरनिराळ्य जमातींकरता मुंबईत निरनिराळे भाग आहेत. कोळी स्वाभाविकच आपल्या मच्छिमारी होड्या-पडावांसमवेत किनाऱ्याजवळ स्थायिक झाले आहेत. वसईचा समुद्र किनारा (जी मुंबई आहे अशी चुकीची समजूत होऊन पोर्तुगीजानी तिथे किल्ला बांधला) मढ बेट, वरसोव्याचा किनारा, माहिमची खाडी, आणि जे खरोखरीच मच्छिमारी बंदर आहे ते ससून डॉक, आणि मुंबईची बेटे मच्छिमारी खेडी होती त्या दिवसांपासून तो आता मुंबई भारतातले सर्वात संपन्न शहर होईपर्यंत. घरबांधणी करून मुंबईची वाढ करणाऱ्यांच्या दबावालान जुमानता हे कोळी आपापल्या जमिनींवर राहिले आहेत. त्यांची नारळाची झाडं, वाळूवर दुरुस्त होत असलेली मच्छिमारी जाळी, कालच्या धुण्याप्रमाणे उन्हात वाळत घातलेल्या माशांच्या रांगा, खारट-तुरट वास या सकट या वसाहती म्हणजे जुन्या मुंबईच्या शेवटल्या खुणा आहेत.
[next]कोळी नेहमी मुंबईतच होते पण बाहेरून पहिल्यांदा पारशी आले. धोबीतलावला त्यानी आपली अग्निमंदिरे बांधली व सर्व मानवी वसाहतीची अभिजात रीत पाळून त्या मंदिरांभोवती ते रहायला लागले. प्रथम प्रार्थनेची जागा, मग सभोवार भक्तांची घरे, मग दुकानं, कचेऱ्या व शाळा. पहिले पारशी आले तेव्हापासून हा आराखडा फारसा बदलेला नाही. उदवाड्याबाहेर, पारशांची दोन मखमली टोप्या आणि सपाता मिळतात आणि समांरभी पांढरी डगली शिवण्यात इथले शिंपी तरबेज असतात. शिवाय इथे एक प्रसिद्ध पारशी शाळा आहे. पारसी डेअरी फॉर्म आहे आणि शहरातली दोन सर्वात जुनी इराणी उपहागृहे आहेत.
धोबीतलावला, गोवा टाईम्स छापखान, मडोनाची चित्रे आणि वासाचे गोव्याचे चिरूट नी खारवलेली सॉसेजीस विकणारी दुकान या बरोबर मोठ्या संख्येने गोवेकर जमात आहे. डुक्कर गल्ली असं यथायोग्य नाव दिलेल्या गल्लीच्या तोंडाशी. लाल चर्च या नावाने ओळखले जाणारे, रविवार सकाळच्या प्रार्थनसभा आसपासच्या रस्त्यवर ओसंडणारे, चर्च आहे. गोवेकरांची वस्ती, चिराबझार, दाबूल आणि त्याहिपलीकडे असून प्रत्येक विभागाला आपापले छोटे चर्च व स्वतःचा स्वतंत्र फुटबॉल संघ असण्याइतके व्यक्तित्व आहे.
पहिले महाराष्ट्रीय गिरगांवात रहायला आले. त्यानी वाड्या उभ्या केल्या आणि त्यात लाकडी व्हरांटे असलेली बह्रे बांधली तिथून ते कामाल फोर्टमध्ये चालत जात. चार किंवा पाच पिढ्यांत त्यांची जीवनपद्धत फारशी बदलली नाही. ते त्याच घरात रहातत. पूजेकरता सकाळी तीच फुले विकत घेतात, त्याच वाण्यांकडे जातात आणि फोर्टमध्ये कामाला चालत जातात; फक्त बाहेरचे शहर कुठे संपते आणि फोर्ट कुठे सुरू होते हे सांगणे कठीण झाले आहे. इतर महाराष्ट्रीय शिवाजी पार्कला स्थायिक झाले आणि त्यानंतरच्या गटांना आपापल्या वाड्या बांधायला जागा व उरल्याने ते सरकारी घर वसाहतीत गेले. दुर्दैवाने प्रत्येकालाच हे शहर अवाढव्य झाल आहे.
पूर्वी ससून डॉकपासून म्युझियमला जाणाऱ्या शून्य नंबरच्या ट्रॅमने घाईला सुरवात व्हायची. आम्ही नेहमी ट्रॅमने प्रवास करीत असू, त्या नेहमी मिळत, सोयिस्कर आणि स्वस्त. ताडदेवआणि गवालिया टॅन्कला बदली करुन ट्रॅमने किंग सर्कलपर्यंत एक आण्यात जाता येत असे.
[next]म्युझियमाला आम्ही ट्रॅम बदलू शकत असू. तो जणू काय एक मोठा ट्रॅम बाजार होता. तिथून जवळजवळ संपूर्ण रिकाम्या फ्लोराफाऊंटनहून पुढे जातान मुंबईत किती ही गर्दी झाली आहे अशी आमची तक्रार असे. हॉरन्बी रोडच्या (आताच्या दादाभाई नवरोजी मार्गाच्या ) पदपथावर विक्रेते नव्हते. कारण परदेशी वस्तू आर्मी आणि नेव्ही स्टोअर्समध्ये मिळत. व्हाईटचे आणि लेडलॉ (आताचे खादी एम्पोरियम) इथे पायमोजे घातलेल्या अॅंग्लो-इंडियन विक्रेत्या मुली सोला टोप्या आणि उन्हाळी लिननसूट विकीत असत. खरेदी झाल्यानंतर तिथल्या उपहारगृहात तुम्ही चहा आणि काकडी घातलेलं सॅन्डविचेस घेऊ शकत होता.
रीगल हे देशातील पहिले वातानुकूलित सिनेगृह, बहुतेक या आकाराची देशातली ही पहिली वातानुकूलित इमारत असावी. मोटारी उभ्या करायला भुयारी तळ केलेले ते पहिले सिनेगृह होते आणि तसा स्पष्ट उल्लेख असलेली जाहिरात ते करीत असे. हिंदी चित्रपटात चालू चित्रपटाच्या गाण्यांची पुस्तिका विकत मिळत असे. अंधाऱ्या प्रेक्षागृहात लोक ती घेऊन जात आणि विजेऱ्या पेटवून पडद्यावर गाणी गायली जात असताना गाण्याचे शब्द वाचीत असत. राज कपूर हा तरूण नट होता. तरूण आणि ऐटदार!
एके काळी बेश्ट बसेसना मरीन ड्राईव्हवर परवानगी द्यावी काय यावर मोठा वादविवाद झाला आणि शेवटी जेव्हा सार्वजनिक वाहनांची खाजगी मोटरमालकांवर सरशी झाली तेव्हा मरीन ड्राईव्हवर ‘सी’ रूटच्या बसेस फिरू लागल्य, तेव्हा त्यातून लोक आनंदभ्रमण करायला जात. सुरैय ही सिनेमानटी मरीन ड्राईव्हवर एका इमारतीत रहात असे आणि तिच्या घराखालचा तो बस थांबा ‘सुरैया स्टॉप’ म्हणून ओळखला जाऊ लागला. व्हिक्टोरिया जिकडेतिकडे अस्त. घोडागाडीवाल्यांची चलती होती आणि जेव्हा आम्हाला लग्नाला अगर सामानासकट रेल्वे स्टेशनला जायचे असेल तेव्हा आम्ही शून्य नंबरची ट्रॅम सोडून व्हिक्टोरिया पकडीत असू.
लोक (अनेकदा पांढरे कोट आणि काळ्य टोप्या घातलेले त्यांचे नोकर) आपले कुत्रे कफ परेड व नरिमन पॉईण्टवर फिरायला आणीत. रहेजा आणि मेकर यांची स्वप्नं अजून अरबी समुद्रात होती. समुद्रातून ब्रेबॉर्न स्टेडियम नुकतंच उगवत होतं आणि श्री डिमेलो व श्री तल्याखान तिथल्या दगडविटावर उभे राहून थोड्याच वर्षात भारतीय क्रिकेटचा केन्द्र बिन्दू होणार असणाऱ्या मैदानाची पाहणी करीत होते.
[next]साम्राज्याचे अवशेष, असे काही इंग्रज ब्रिटीश बॅन्कात तरूण व्यवस्थापक म्हणून अजून आसपास उरले होते. शाळकरी लहान मुला प्रमाणे ते पांढरे शर्ट्स व पांढऱ्या पॅन्टस् घालीत, निळ्या टाईज असत. तरूण इंग्रज अधिकाऱ्यांच्या पेहरावाची तरुण भारतीय अधिकारी नक्कल करीत. पी. अॅण्ड ओ, कंपनीच्या बोटी दर गुरवारी सकाळी (की बुधवारी सकाळी?) बॅलार्ड पियरच्या धक्क्यावर पुढल्या पल्ल्याचे फिकट त्वचेचे प्रवासी उतरवून टाकीत. शहरात एक जलद फेरी टाकून आपण पूर्वेकडील गूढ देशाना भेटा दिल्याच्या समाधानात हे प्रवासी परतत. आणि मुंबई हा भारताचा दरवाजा असल्याने हे काही अगदीच चूक नव्हते.
ट्रॅम संपत त्या किंग सर्कलला मुंबईची सीमा होती. त्या पलीकडे मिठागरे होती.
त्यानंतर शहर खूप वाढले आणि समुद्रापलीकडे, पारसिक डोंगरापलीकडे आणि त्याही पलीकडे पसरले. गेल्या पन्नास वर्षात माझ्याभोवती शहर एखाद्या मुले, नातवंडे, पतवंडे असलेल्या कुटुंबाप्रमाणे पसरले. आणि शहर आखणी करणारे, परिसरवादी, काहीही म्हणोत, माझ्य मते ही वाढ चांगली आहे.
दररोज इतक्या जादा लोकान जिथे रहावेसे, काम करावेसे वाटते, आपले कुटुंब वाढवावेसे वाटते, त्या शहरात काहीतरी तसेच असणार. कुणालाच तिथे रहावे असे वाटेनासे झाले आणि ते आक्रसू लागले म्हणजे मुंबईचे प्रश्न सुरू झाले. या क्षणी तरी ते एक चैतन्यपूर्ण, सतत वाढणारे, उतूं जाणारे शहर आहे. आणि ते असेच असणे मला आवडते.
अभिप्राय