मुंबई दृष्टिकोन (महाराष्ट्र) - बॉम्बे हे नाव मुंबई ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम् अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे.
मुंबई दृष्टिकोन (महाराष्ट्र)
बॉम्बे हे नाव ‘मुंबई’ ह्या मूळ नावाच्या पोर्तुगीजानी केलेल्या बॉम्बैम् अशा भ्रष्ट रूपावरून आले आहे. जुन्या पोर्तुगीज दप्तरात ह्या बंदराच उल्लेख ‘मौम्बैम्’ व बॉम्बेम्’ अशा दोन्ही नांवानी केलेला आढळतो. ‘मुंबई’ हा शब्द ह्या बेटांच्या आद्य रहिवाश्यांच्या - कोळी जमातीच्या ‘मुम्बाआई’ ह्या कुलदेवतेच्या नावावरून आलेला आहे. हल्ली ज्या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस आहे त्याच्या जवळपास ह्या देवीचे मूळ देवालय होते. गुजरातच्या सुलतान मुबारकने इ.स. १३२० च्या सुमारास ह्या बेटांवर जेव्हा स्वारी केली तेव्हा बहुधा हे देवालय नष्ट केले गेले असावे. ते पुन्हा बांधले गेल्यानंतर इ.स. १७३७ पर्यंत तिथे होते. त्यानंतर मुंबई सरकारने जुन्या शहराची तटबंदी विस्तृत करण्यास सुरवात केली तेव्हा ते भुलेश्वर जवळ सध्याच्या जागी पुन्हा नव्याने उभारले गेले.
इतिहासपूर्व काळी मुंबई ही हिंदुस्थान देशाचा एक भाग असावी. पण कालांतराने भूकंपाच्या उद्रेकामुळे ती लहान लहान बेटांत विभागली जाऊन अलग झाली व ती अपरान्ताचा (उत्तर कोकणचा) भाग म्हणून मानली गेली. दक्षिणेकडच्या रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून भंडारी (ताडी काढणारे ) इकडे आले.
इसवी सनापूर्वी आठव्या शतकात आर्यांनी दक्षिणेवर स्वारी केली. वसईजवळ शूर्पारक (सोपारा) येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखावरून व अवशेषावरून असे दिसते की इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात हे राज्य बौद्ध सम्राट अशोक ह्याच्या आधिपत्याखाली होते. नंतर मौर्य, सातवाहन, क्षत्रप आणि त्यानंतर राष्ट्रकूट व चालुक्य इथे आले. चालुक्य राजा मंगलराज ह्याने मुंबई बंदरातील एलिफण्टा बेटातील पुरी येथे आपली राजधानी बसवली होती. त्यानंतरच्या शिलाहारांच्या कारकीर्दीत, लंकेला जाताना राम जिथे काही काळ राहिला होता त्या वाळेकश्वरी एकमंदिर बांधले गेले होते. त्या मंदिराच्या कीर्तीमुळे, तसेच तिथल्या जवळपासच्या समुद्रात असलेल्या श्री गुंडीच्या (पवित्र गुहेच्या) अपूर्व महात्म्यामुळे मलबार आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांतून भाविक लोक सतत दर्शनास येत असत. त्यावरून त्या जागेला ‘मलबार पॉइन्ट’ व भोवतालच्या टेकडीला ‘मलबार हिल’ अशी नावे पडली. हे वाळकेश्वर मंदिर सुलतान मुबारकने किंवा पोर्तुगीजानी नष्ट केले. श्रीगुंडीचे काही अवशेष गव्हर्नमेण्ट हाऊसजवळच्या किनाऱ्यावर अद्याप दिसू शकतात. ह्याच सुमारास (इ.स. १०६०) शिलाहारांनी बांधलेले आणखी एक मंदिर ठाणे जिल्हयातील अंबरनाथ येथे आहे आणि आजही ते सुस्थितीत असून त्या काळच्या मंदिर शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून प्रेक्षणीय आहे. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव इथे आले. असे सांगतात की यादव वंशाचा कुलदीपक राजा बिंब उर्फ भीमदेव ह्याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती व त्याने आपल्यासमवेत काही लोक आणून तिथे वसाहत उभारलि, नारळाची झाडे लावली आणि घरे व मंदिरे बांधली. त्याच्या आश्रितांपैकी प्रभु पळशीकर, ब्राह्मण आणि पांचकळशी त्याचाबरोबर इथे आले व माहिमच्या आसमंतात त्यानि वस्ती केली. आपली कुलदेवता प्रभादेवी हिचे भीमदेवाने त्यावेळी बांधलेले देऊळ नंतरच्या मुसलमांनाच्या स्वारीत नष्ट केले गेले. जवळपासच्या विहिरीत त्यावेळी दडवलेली देवीची मूर्ती कालांतराने वर काढण्यात आली व इ, स. १७१४ मध्ये प्रभु ज्ञातीने हल्लीच्या जागी प्रभादेवी येथे एक नवे मंदिर बांधून देवीची स्थापना केली.पोर्तुगीजांनी निरनिराळ्या ख्रिस्ती धर्मपंथीयानाही जमिनी दिल्या होत्या. फ्रान्सिस्कन व जेझुइट पंथीयांनी इथे कित्येक प्रार्थनामंदिरे (चर्च) बांधली. त्यापैकी उल्लेखनीय असलेले नोसा सेन्होरा डा एस्परान्का हे चर्च एस्प्लनेडवर होते. इ,स. १७६० साली सरकारी आज्ञेने ते पाडण्यात आले व १८३० च्या सुमारास भुलेश्वर येथे पुन्हा उभारण्यात आले. त्याच्या पूर्वास्तित्वाची खूण म्हणजे क्रॉस मैदान नावाने आज परिचित असलेल्या मैदानात अस्तित्वात असलेला भव्य क्रॉस, उत्तर माहिम भागात अंदाजे सन १५४० मध्ये बांधलेले सांमिगेल चर्च, दादरचे पोर्तुगीज चर्च नावाने ओळखले जाणारे इ.स. १५९६ मध्ये बांधलेले नोसा सेन्होरा डा साल्वासाव चर्च, माझगावाच्या चर्च स्ट्रीट मधील क्रॉसच्या जागी पूर्वी असलेली नोसा सेन्होरा डा ग्लोरिया आणि सध्याच्या परळच्या हाफकीन इन्स्टिट्यूटच्या जागी होते ते नोसा सेन्होरा डा बॉम कॉस्टेलो चॅपेल हीही सर्व त्याकाळची महत्त्वाची चर्चेस् होती.
पोर्तगीज मिशनऱ्यांनी स्थानिक ख्रिस्ती रहिवाशाच्या गरजांचा विचार न करता ह्या धार्मिक बांधकामासाठी पैशाची खूप उधळपट्टी केली. जनतेच्या अज्ञानाचा गरिबीचा त्यानी गैर फायदा उठवला. धर्मान्तर करून ख्रिस्ती होणाऱ्या लोकांना त्यांनी सर्व तऱ्हेच्या सवलती व देणग्या दिल्या. ज्यानी धर्मान्तर करण्यास विरोध दर्शविला त्यांची मानहानी केली. त्याना मोलमजुरी करण्याची सक्ती केली आणि कामगारांना गुलामासारखे छळाले ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी स्थानिक मंदिरे व मूर्ती यांचा सूड बुद्धीने विध्वंसही केला.
ग्रेट ब्रिटनचा राजा दुसरा चार्लस व पोर्तुगीज राजकन्या कॅथेरिन ब्रॅगन्झा ह्यांच्या विवाह करारान्वये मुंबई बंदर व बेटे ग्रेट ब्रिटनच्या राजाला देण्यात आली व १६६५ मध्ये त्याच्या ताब्यात आली.
त्या काळी मुंबईचा महसूल फार अल्प होता आणि तो एस्प्लनेड व मलबार हिलच्या मधल्या जागेत माहिम येथे असलेल्या ताडमाडांपासून व सखल जमिनीवरच्या भातशेतीपासून प्राप्त होत असे. बेटांचा इतर सर्व भाग दलदलीचा, नापीक व पडित होता. लोकसंख्या जेमतेम दहा हजार होती. काही थोडे कोळी, शेतकरी व प्रभु, ब्राह्मण आणि मुसलमान सोडले तर इतर बहुसंख्याक लोक जातीहीन, भटके व उडाणटप्पू होते. इ,स. १६६८ साली राजसत्तेच्या सनदेनुसार वार्षिक दहा पौंड भाड्याने मुंबई बेटे ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आली. बंदर म्हणून मुंबईचा विकास करणे व बाहेरच्या लोकांना इथे वस्ती करण्यासाठी आवाहन करणे ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रथम लक्ष देण्याचा विचार करण्यात आला.
मुबंई हे व्यापाराचे प्रमुख केंद्र व्हावयाचे असेल तर तिचे उद्योग व्यवसाय स्थापन होणे इष्ट आहे. तसेच व्यापारी वस्तुही तिथे निर्माण झाल्या पाहिजेत हे जाणून ऑजिअरने कसबी कारागीर, कामगार व व्यापारवर्ग ह्याना बेटात वस्ती करण्यासाठी उत्तेजन दिले. त्याच्या सहिष्णू कारभारामुळे निरनिराळ्या जातीजमातीत विश्वास उत्पन्न झाला आणि गुजरातेतील पारशी व बनिया लोकाना इथे आपल्या बुद्धिकौशल्याला वाव मिळू शकले अशी खात्री पटून तेही मुंबईकडे वळले. इ.स. १६७३ मध्ये ऑजिअरने पारशी धर्मायांच्या शवसंस्कार आवश्यक असे स्मशान ( टॉवर ऑफ सायलेन्स ) बांधण्यासाठी मलबार हिलवर जागा दिली व त्यांचे वास्तव्य आणि धर्मसंस्कार सुकर होण्यासाठी असलेली मोठी अडचण दूर केली. तसेच नीमा पारेख ह्या बनियालाही सर्व धार्मिक सोयीसवलती देऊ करून आप्तेष्टांसहित मुंबईत वास्तव्यासाठी येण्याचे आवाहन केले. हे सर्व ऑजिअरच्या दूरदृष्टीस साजेल असेच होते. कारण मुंबीचे रूप कालांतराने पार बदलून टाकण्यासाठी ह्याच पारशी व बनियांची व्यापार व उद्योगव्यवसायातील अक्कल हुशारी कारणीभूत झाली. जून १६७७ मध्ये सुरत येथे ऑंजिअरचे निधन झाले. त्याने मुंबईत उभारलेले कांहीही आज अस्तिवात नसले तरी मुंबईला विकासासाठी त्याने केलेल्या योजना मात्र अद्याप बहुतांशी टिकून राहिल्या आहेत.
इ.स. १७३६ मध्ये सुरतेचा पारशी कंत्राटदार लवजी नसरवानजी वाडिया ह्याच्या देखरेखीखाली डॉकयार्डचा विस्तार करण्यात आला. १७७० च्य सुमारास नगरविस्तारासही प्रारंभ झाला. त्यासाठी प्रथम जुनी, काळोखी व आरोग्यविघातक घरे पाडण्यात आली आणि एस्पलनेडचे मैदान सारखे व विस्तृत करण्यात आले. किल्ल्याबाहेर घरे बांधण्यासाठी नागरिकाना सर्व सोयीसवलती देण्यात आल्या, ईस्ट इंडिय कंपनीने साष्टी आणि बंदरातील इतर बेटीचा ताबा मिळवला. त्या काळिई मुंबईचा बहुतेक व्यापार जलमार्गेच होत असे. मुंबईच बेटांच्या सभोवती एकूण ४५ बंदरे आणि धक्के त्यासाठी उपलब्ध होते. त्या बंदरात छोटीमोठी गलबते व पडाव निरनिराळ्या प्रकारच्या मालाची नेआण करीत असत. मात्र मालउतारचे मुख्य बंदर ओल्ड् कस्टमस् हाऊस जवळ होते. पोर्तुगीजांनी आपल्या सैनिकांसाठी तिथे वराकी बांधल्या होत्या. त्यापैकी काही माल ठेवण्यासाठी व काही ईस्ट इंडिय कंपनीच्य ‘रायटर्सना’ (कारकून) राहाण्यासाठि वापरण्यात आल्या. ह्या ओल्ड् कस्टम् हाउसच्या इमारतीचा दर्शनी भाग गव्हर्नर ऐन्स्लाबीच्या कारकीर्दीत १७१४ मध्ये बांधण्यात आला असावा. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस असलेल्या लेखशिलेवर ईस्ट इंडिय कंपनीने कुलमानद्योतक चिन्ह, गव्हर्नरचे नाव आणि वर्ष १७१४ ही कोरलेली आहेत. ही लेखशिला प्रवेशद्वाराबाहेर बऱ्याच वर्षांनी बांधलेल्या पोर्चमुळे झाकली गेली आहे. ह्यावरून ह्या इमारतीचे वय समजू शकते. १८०२ नंतरच ह्या इमारतीचा कस्टम्स् हाऊससाठी उपयोग होऊ लागला आणि १८९५ मध्ये ह्या इमारतीची डागडुजी करण्यात येऊन तिच्यावर एक मजलाही चढविण्यात आला.
किल्ल्याच्या पश्चिमेकडच्या दरवाजाला चर्चगेट असे नाव पडएल. ते त्याच्या आसमंतात ह्या बेटावरच्या पहिल्या अॅम्लिकन चर्च-सेन्ट थॉमस कॅथीड्रलवरून हे चर्च १७१५ मध्ये बांधण्यास घेतले व १७१८ मध्ये ते पूर्ण झाले. १७१८ सालच्या नाताळच्या दिवशी त्याचे उद्घाटन झाले. रेव्हरंड रिचर्ड कॉबच्या असीम प्रयत्नामुळेह्च अहे चर्च उभारले गेले. त्यासाठी लोकांकडून त्याने वर्गणी गोळा करून फंड जमविला होता. ही इमारत साढी पण विस्तृत होती व तिच्या मनोऱ्याचा वरचा भाग कंदिलासारखा होता. मनोऱ्याच्या मध्यावर घंटालय होते. त्यातील घंटा गव्हर्नर बूनने देणगीदाखल दिली होती. ही भव्य घंटा मुंबईतच घडविलेली होती. १८५३ साली सेन्ट थॉमस चर्चला कॅथीड्रलचा दर्जा देण्यात आला. ह्या घटनेचा स्मृतीप्रीत्यर्थ चर्चच्या मनोऱ्याची उंची वाढवून तो मोठा करण्यात आला. पूर्वीच्या घंटालयाच्या ठिकाणी आज असलेला मनोरा उभारण्यात येऊन वरच्या मनोऱ्याच्या तळाशी तांब्याच्या तबकड्या व जोड काटे असलेले चौमुखी भव्य घड्याळ बसविण्यात आएल. ह्या कॅथीड्रलमध्ये ऐतिहासिक महत्वाची अनेक स्मारके चतुर्स्त्र भिंतीवर प्रदर्शित केली असून दक्षिणोत्तर मधल्या भागातील संगमरवरी स्मृतीचिन्हांच्या कलापूर्ण शिल्पाकृती अत्यंत आकर्षक आहेत. चर्चच्या पश्चिमेला प्रवेडद्वारानजिक एक शोभिवंत कारंजे असून ती सर कावसजी जहांगीर रेडीमनी ह्यांची भेट आहे.
बॉम्बे कॅसलच्या उत्तरेस टाकसाळ होती. मोदी बे रेक्लेमेशन योजनेद्वारे समुद्र हटवून प्राप्त केलेल्या जमिनीवर ही इमारत १८२९ मध्ये बांधण्यात आली. तिची रचना ग्रीक वास्तुशिल्प पद्धतीची आहे. सुरवातीस तीन वाफेच्या इंजिनावर टाकसाळीचे कम चालू करण्यात आले होते. नाणी पाडण्यासाठी ऐरणी व हातोडे वापरण्यात आले होते. १६७२ साली पहिले रुपयाचे नाणे पाडण्यात आले. त्यावर ईस्ट इंडिय कंपनीचे कुलमानद्योतक चिन्ह होते.
लॉर्ड एल्फिस्टनच्या कारकीर्दीत १८६१ मध्ये विहार जल प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे १८२४ च्या तीन जल दुष्काळानंतर प्रथमच मुंबईकरांना भरपूर स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ लागले. तसेच समुद्र हटवून भूसंपादन करण्याच्या एल्फिन्स्टन रेक्लेमेशन योजनेमुळे मुंबई बेटाचा विस्तार होण्यास मदत झाली.
सर बार्टल् फक्त एवढ्यावरच संतुष्ट नव्हते. विध्वंसापेक्षा निर्मितीत त्याना अधिक रस होता. एक नवीन आकर्षक व रचनाबद्ध शहर उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. लॉर्ड एल्फिन्स्टननी खाली ठेवलेली लगाम त्यानी उचलली आणि सुधारणेच रथ इतक्या वेगात पिटाळला की हिंदुस्थान सरकारचे त्यामुळे धाबे दणाणले व चीडही आली. पण सार्वजनिक हिताच्या त्यांच्या योजना इतक्या बिनतोड व अपरिहार्य होत्या की अखेर सरकारला त्या सर्व मुकाटपणे मान्य कराव्या लागल्या व त्यामुळे शहराचे रूप संपूर्ण पालटून गेले. ह्या प्रमुख सुधारणा समुद्र हटवून भूभाग संपादने, दळणवळण सुलभ करणे आणि आकर्षक सरकारी इमारती उभारणे ह्या बाबतीत विशेषत्वाने होत्या. नैऋत्येकडील अपोलो बंदर ते कुलाबा. पूर्व व ईशान्येकडील कस्टम्स हाऊस ते शिवडी आणि पश्चिमेकडील कुलाबा ते मलबार हिल हे सागरी विभाग हटवून त्यानी बेटाचा विस्तार चहूबाजूनी केला. ह्यामुळे पुष्कळ जमीन तर उपल्ब्ध झालीच पण शिवाय शहराच्य आरोग्यातही सुधारणा होऊन जनतेचे जीवन सुलभ आणि सुखदायक झाले. दळणवळण सुधारण्यासाठी बार्टल फ्रिअरनी ३५ रस्ते बांधले व सुधारले. त्यांचे पदपथ विस्तृत करून टोकाशी हारीने वृक्ष लावण्यात आले. तसेच योग्य ठिकाणी बागा व उपवने तयार करण्याचे व शोभिवंत कुंपणे घालण्याचे आदेशही त्यानी दिले. ह्यापैकी उल्लेखनीय बागा म्हणजे व्हिक्टोरिआ गार्डन्स, युनिव्हर्सिटी गार्डन्स, एल्फिन्स्टन सर्कल गार्डन व नॉर्थब्रूक गार्डन ह्या होत. किल्ल्याची तटबंदी पाडल्यानंतर एस्प्लनेडवर एक नवीन नगर उभारण्याची व तिथे आकर्षक व प्रमाणबद्ध सरकारी इमारती बांधण्याची त्यांची योजना होती. ह्या कामासाठी त्यानी अनेक आंतरराष्ट्रीय विख्यात वास्तुशिल्पकाराना पाचारण केले होते. त्यांच्य कारकीर्दीत ह्या सर्व इमारती जरी पूर्ण होऊ शकल्या नसल्या तरी प्रत्येक इमारतीच्या रचनेचा नकाशा, बांधकामासाठी लागणारे दगड व संगमरवर, तसेच कमानीचे स्वरूप व आकार, घुमट, मनोरे आणि कोरीव नक्षीकाम इत्यादिकांचे बार्टल् फ्रिअरनी तपशीलवार विवेचन करून मगच त्यानी मान्यता दिली होती. यथाकाल फोर्ट विभागाच्या पश्चिमेकडे ह्या भव्य इमारती साकार झाल्या. अशा तऱ्हेची समतोल आकर्षक रचना पूर्व बाजूस करणे शक्य नव्हते. कारण तो भाग अगोदरच व्यापला गेला होता. उत्तरेकडचा बझार गेट विभाग दाटीवाटीने वसलेला होता. नवीन बांधकामाला तिथे मुळीच वाव नव्हता. पण अमोदी बे कडील भराव घालून संपादन केलेला भूभाग मोकळा होता. तिथे व्यापार गृहाना व सागरी आयात निर्यात करणाऱ्या बोटकंपन्याना जागा देण्यात आल्या. पण एवढ्या सुधारणा व परिवर्तन करूनही फोर्ट विभाग हे पूर्वीप्रमाणेच व्यापाराचे मध्यवर्ती केंद्रस्थानच राहिले. बेटाचा विस्तार होताच इंग्रज अधिकारी वर्ग, मुलकी अधिकारी आणि व्यापार-व्यवसाय कंपन्यांचे अधिकारी व मालक ह्यानी उत्तरेकडच्या आरोग्य विघातक देशी वस्तीपासून दूर अशा ठिआणी कुलाब्याला खुल्या वातावरणात आपली निवासस्थाने हलवली.
मुंबईची सात बेटे म्हणजे कुबट दलदलीने एकमेकापासून अलग झालेला एक पाणथळ भूभाग होता. समुद्राच्या सततच्या आक्रमणामुळे ही बेटे नेहमीच विभक्त राहून दळणवळण अशक्य होत असे, जागोजागी भराव घालून बेटे एकमेकाशी जोडून एकसंघ करून त्यांचा एकच प्रदेश करणे हा ह्या अडचणीवर मुख्य उपाय होता. अशा रीतीचा हाती घ्यावयाचा एक भव्य प्रकल्प म्हणजे महालक्ष्मी व वरळि ह्या बेटाना जोडण्यासाठी घालावयाचा भव्य बांध हा होता. ह्य प्रकल्पाचे महत्त्व गव्हर्नर हॉर्न्बीने जाणून ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांच्या विरोधाला न जुमानता त्याने तो सिद्धीस नेला. ह्या संपादित भूभागाला ‘हॉर्न्बीने वेलार्ड’ हे नाव दिले गेले व ते उचितच झाले. पैपैचा हिशेब करणाऱ्य श्रेष्ठींना न जुमानणाऱ्या एका धैर्यशील व द्रष्ट्या अधिकाऱ्याचा तो एक संस्मरणीय वारसा आहे. ह्या बांधामुळे बेटाचे पूर्वपश्चिम तट जोडले जाऊन खाडीच्या भरतीओहोटीमुळे नेहमीच दलदलीत असणारा भायखळ्यापर्यंतचा केवढा तरी मोठा भूखंड वस्तीस उपलब्ध होऊन दळणवळणही सुलभ झाले.
अशा रीतीने समुद्राचे आक्रमण बंद झाल्यावर पूर्वीची खोलगट जमीन भराव घालून लागवडीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी सारखी सपाट करण्याचे काम हाती घेण्यात आले. पूर्वी बांध घालून केलेल्या कच्च्या पायवाटांच्या जागी पक्के रस्ते करण्याच्या योजनेमुळे हे काम सुसाध्य झाले. सुरतेच्या दुष्काळामुळे १७९३ साली मुंबईकडे वळलेल्या गरीब लोकांच्या श्रमदानाने व सार्वजनिक वर्गणीने खर्चासाठी निधी जमवून तयार केलेला पहिला पक्क रस्ता बेलासिस रोड हा होता. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी खुल्या जागी ग्रॅंट रोड बांधला गेला. हा १८३९ मध्ये रहदारीस खुला केला गेला. भायखळ्याच्या सखल भागावर १८६० च्या दशकात क्लार्क रोड व हेन्स रोड हे रस्ते बांधले गेले. १८८० च्या दशकात रिपन रोड तयार झाला. फोरास रोड हा रस्ता तिथल्या विशिष्ट शेतजमिनींच्या वहिवाटदारानी बांधल हे त्या रस्त्याच्या नावावरूनच प्रतीत होते. ह्या अंतर्गत रस्त्यांशिवाय आवश्यक त्या ठिकाणी सांडवेही (कॉजवे) बांधण्यात आले. गव्हर्नर डंकनने १८०५ साली शीवल कॉजवे बांधला. त्यामुळे मुंबई व तुर्भे बेटामधली अरुंद खाडी अडवली गेली व गाळ सुकल्यावर भूभाग जोडले गेले. ह्या सांडव्यला डंकन कॉजवे म्हणतात. माहिम व वांद्रे याना जोडणारा लेडी जमशेटजी कॉजवे १८४५ मध्ये बांधण्यात आला. कुलाब कॉजवे बांधण्यास १८३५ मध्ये सुरवात होऊन १८३८ साली तो पूर्ण झाला.
सन १८२९ मध्ये गव्हर्नरांचे निवासस्थान परळला हलविण्यात आले. त्यानंतर भायखळ्यापासून परळपर्यंत व चिंचपोकळी भागांकडे सधन लोकांनी दृष्टी वळली आणि तिथे त्यानी राहण्यासाठी भव्य प्रासाद व आकर्षक बंगले बांधले. गेल्या तीस वर्षात ह्यातल्या बहुतेक इमारती पडल्या वा पाडल्या गेल्या. त्यातल्या काही राहिलेल्यांपैकी आतां भायखळ्यांचे मसीन हॉस्पिटल असलेला सासून कुटुंबाचा ‘सां सूसी’ हा सुंदर महाल अजून दिमाखात उभे आएह. उद्योगधंद्यांची जसजशी वाढ होऊ लागली तसतसे मुंबई शहर भरू लागले व झाडे झुडपे कमी होत गेली. रस्ते आखण्यात आले आणि धूलीमय पायवाट सुधारून चिरेबंदी दगडाच्या गल्ल्याही तयार झाल्या व डांबरी रस्तेही निर्माण झाले.
१८७२ मध्ये मुंबई नगरपालिका कायदा पास झाला आणि जुलै १८७३ मध्ये पहिली निवडणूक होऊन ६४ सदस्यांच्या नगरपालिकेकडे नागरी व्यवस्थेची सूत्रे आली. त्यानंतर आरोग्यव्यवस्था आणि दळणवळण ह्याबाबतीत झपाट्याने सुधारणा झाल्या. १८६१ मध्ये मुंबई शहराला विहार तलावातून पाणीपुरवठा होण्यास सुरवात झाली होती त्यात नंतर तुळशी तलावाची भर पडली. मुंबईच्या पाणी पुरवठ्याचे मुख्य उगमस्थान असणारा तानसा तलाव १८९२ मध्ये उपलब्ध झाला. सांडपाण्याची व्यवस्था लवकरच शास्त्रीय पद्धतीने व्यवहारात आणली गेली. १८६२ मध्ये बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली आणि १८८६ मध्ये एस्प्लनेड, चर्चगेट व भेंडीबाजारच्या हमरस्त्यांवर गॅसचे दिवे लागले. तत्पूर्वी रस्त्यावर घासलेटचे कंदील जागोजागी लावलेले असत. १९०८ मध्ये रस्त्यांवरच्या दिव्यासाठी विजेचा वापर सुरू झाला. त्यानंतर जवळजवळ दोन दशकांनी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी वीज उपलब्ध होऊ लागली.
स्सन १८८१ मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी नावाच्या खाजगी संस्थेकडे मुंबईत टेलिफोनसेवा सिद्ध करण्याचे कम देण्यात आले. पण तिल आवश्यक ते बांडवल जमवित न आल्यामुळे बॉम्बे टेलिफोन कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला. जून १८८८३ मध्ये ह्या कंपनीने मुंबई शहरात १४४ केंद्रे सुरू करून बहुतेक सरकारी कार्यालये एकमेकांस जोडली. १९०६ मध्ये कोटमधील होम स्ट्रीटवर आपल्या मध्यवर्ति यांर्तिक कार्यालयासाथी कंपनीने इमारत बांधली, ह्या काळपर्यंत भूमिगत टेलिफोन तारा टाकण्याचे कम सुरू झाले होते. १९२९ साली कंपनीने हस्तचलित टेलिफोन पद्धती बदलून स्वयंचलित पद्धती सुरू केली.
प्रारंभी टपालसेवा हा सरकरी उपक्रम नव्हता. १७८७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरानी एक पोस्टमास्टर नेमला व मद्रासच्या फोर्ट सेंट जॉर्जबरोबर संपर्क राखण्यसाठी नियमित टपालसेवेची योजना तयार करण्यास त्यास सांगितले. नंतर १७९४ साली सबंध इलाख्यासाठी जनरल पोस्ट ऑफिस मुंबईत स्थापन करण्यात आले. शहरात सर्वत्र पत्रे पोचवण्यसाठी सेवक नेमण्यात आले. युरोपातून आलेल्य पत्राबद्दल चार आणे बटवडा आकार गोळ करण्यास त्याना सांगितले होते. पण इलाख्यातल्या दुय्यम ठिकाणाहून आलेल्या पत्रांबद्दल मात्र टपाल हंशील आकारण्यात येत नसे. १८५४ पर्यंत पोस्टाचे तिकीट व्यवहारांत आले नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास मेरवानदरू नवरोजी (ज्याचे पोस्टवाला हे नाव लोकप्रिय होते)खाजगीरीत्या पत्राला एक पैसा ह्या दराने लोकांच्य पत्राची नेआण करीत असे. ज्यांन लिहिता येत नसे आशांच्या सोयीसाठी त्याने कारकून नेमले होते. सबंध इलाख्यात तो टपाल वाटत असे.
जहाजबांधणी व्यवसाय हा मुंबईतल्या पहिल्या व्यवसायांपैकी एक होता. इ.स. १७०० मध्ये ईस्ट इंडिय कंपनीने सुरतेस तापी नदीवर गोदी बांधली. पारशी लोकांवर व विशेषतः लवजी नसरवानजी वाडियावर तिची देखभाल सोपवलेली होती. पस्तीस वर्षे कंपनीच्या सेवेत असणाऱ्या लवजीला कंपनीने मुंबईत बोद्या बांधण्यासाठीअ बोलावले. त्याने १८५४ साली पहिली, १७६२ मध्ये दुसरी व १७६५ मध्ये तिसरी गोदी बांधली. नंतरच्या चाळिस वर्षात वाडिया पुत्रपौत्रांनी ह्या गोद्यांची देखभाल व आवश्यकतेनुसार विस्तार करण्याचे काम केले. ह्या कुटुंबापैकी जमशेटजी बमनजी वाडिया ह्याने इंग्रजी आरमारासाठी युद्धनौका व लढाऊ बोटी आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापाई नौकाही बांधल्या. मुंबई आरमारासाठी वाडिया कुटुंबाने १७३५ साली पहिली व १८८१ साली शेवटची नौका बांधली.
मुंबई खरी भाग्यवान की तिला उत्त्म प्रशासकांची परंपरा लाभली. पण ह्या शहराला जी महत्ता आणि मान्यता प्राप्त झाली तिचे सारे श्रेय फक्त राज्यकर्त्यांनाच देऊन चालणार नाही. या शहरावर ज्यांचे निस्सीम प्रेम होते असा स्थानिक लोकांनीही तिला आकर्षक व प्रगत बनविण्यासाठी तनमनधन वेचले होते हे विसरून चालणार नाही.
सर जमशेटजीचे समकालीन व ब्रम्हदेश आणि चीनबरोबर भारतीय मालाच्य व्यापारात भरभराटीस आलेले व चाळीस आगबोटींचे मालक फ्रामजी कावसजी हेही त्याकाळचे एक नामवंत गृहस्थ होते. ते ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन ’ चे सदस्य होते. स्थानिक जनतेत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यानी खूप प्रयत्न केले. धोबीतलाव हा पूर्वी नावाप्रमाणे कपडे धुण्यसाठी वापरात असलेला धोब्यांचा मोठा तलाव होता. १८२२ च्या प्रखर-जल दुर्भिक्षावेळी फ्रामजीनी जवळपास दोन विहीरी खोदल्या व पाणी लागल्यावर पंचवीस हजार रुपये खर्च करून तेथे मोठे तळे बांधले.
मुंबईचे आणखी एक महापुरुष म्हणजे जगन्नाथ शंकरशेट. लोक त्यान प्रेमानए नाना म्हणत असत. अंगी दुर्लभ राजकीय चातुर्य असलेले हे मुस्तद्दी पुरूष विधायक मनोवृत्तीचे सच्चे समाजसुधारक होते. १८६३ मध्ये गव्हर्नर सर बार्टल फ्रिअरची बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर बिनसरकारी सदस्य म्हणून त्यांची नियुकित केली. असा गौर्व प्राप्त झालेले ते पहिलेच हिंदु गृहस्थ होते. तत्कालीन सर्व महत्त्वाच्या उपक्रमांशी आणि संस्थाशी त्यांचा संबंध आलेला होता. जमशेटजी जीजीभॉय व फ्रामजी कावसजी ह्यांच्या सहकार्याने त्यानी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केला. सनातन मतवादी लोकांच्या विरोधाला न जुमानता स्कॉटिश धर्मोपदेशक डॉक्टर विल्सननी सुरू केलेल्या कन्याशाळेला त्यानी आपल्या वाड्यात जागा दिली. स्टुडण्ट्स लिटररी अॅन्डा सायंटिफिक सोसायटीच्या शैक्षणिक कार्याची सर्व जबाबदारी नानांनी अंगिकारली होती. ह्या संस्थेने मराठी व गुजराती मुलींसाठी सात शाळा स्थापन केल्या. त्यापैकी एक त्यांच्या वाड्याच्या पिछाडीला असलेल्या घरात भरत असे. ह्या शाळेल त्यानी विनामूल्य जाग दिली होती एव्हढेच नव्हे तर शाळेला येणाऱ्या तोट्याचीही ते भरपाई करीत असत. ह्या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले होते व अजूनही ही शाळा त्याच वास्तूत चालू आहे. ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेस नाना कारणीभूत होते व मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे श्रेय त्यानाच जाते. त्याचप्रमाणे कायद्याचे शिक्षण मराठीतून सुरू करण्याची योजनाही त्यांचीच होती. नानांचे देऊळ, नाना चौक आणि अत्यावश्यक असलेले सोनापूर ही ह्या महापुरुषांची खरी स्मारके होत.
आपल्या देशात पोलाद उद्योगाचा नवीन उपक्रम जमशेदजी टाटा ह्यानी प्रथमसुरू केला. १८८७ मध्ये त्यानी स्थापन केलेल्या ‘टाटा सन्स’ ची पुढे पुष्कळ प्रगती होऊन विविध उद्योगव्यवसाय हाती घेतलेल्या ‘हाऊस ऑफ टाटाज्’ मध्ये तिचे परिवर्तन झाले. आजही व्यावसायिक संस्था भारतात उच्च दर्जाची व सामर्थ्यवान गणली जाते. मुंबईच्या विकासाच्या कार्यात जमशेदजींनी पुष्कळ कळकळ दाखवली. आधुनिक घरबांधणीची योजना त्यांनीच प्रथम आचरणात आणली. साष्टी बेटातील हिवताप निर्माण करणारी दलदल बुजवून वांद्रे, माहीम व जुहूतारा येथे टुमदार बंगले बांधू देण्यास त्यानी नगरपालिकेचे मन वळविले. मुंबईत ताजमहाल हे पहिले विलासी हॉटेल बांधण्याचे, तसेच बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही पहिली भारतीय वैज्ञानिक संस्था स्थापना करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. ताजमहाल हॉटेलचे उद्घाटन १९०३ मध्ये झाले व आजही ते एक प्रतिष्ठेचे हॉटेल समजले जाते.
भारतीय उद्योगव्यवसायाच्या प्रगतीसाठी केलेल्या तीन हितकारक गोष्टींमुळे जमशेदजींची मूर्ती चितरंजन राहील. जमशेदपूर येथे लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया त्यानी घातला लोणावळे येथील हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प हा त्यांच्या द्रष्टपणामुळेच सुफलित झाला. तसेच बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सस, टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च ह्या नंतर स्थापन झालेल्या तीन संस्थाही जमशेदजींच्या उज्वल कीर्तीत भर टाकणाऱ्या आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर भारतीय बुद्धिमंतानी राजकारणात भाग घेण्यास सुरवात केली. त्यापैकी काही जणांनी दादाभाई नौरोजी ह्यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. ह्या संस्थेचे पहिले अध्यक्ष सर जमशेदजी जीजीभॉय आणि कार्यवाह नवरोजी फरदुनजी व डॉ. भाऊ दाजी हे होते. ह्या संस्थेचा वारसा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी १८८५ मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनकडे आला. दादाभाई नौरोजी, सर फिरोजशहा मेहता व सर दिनशा वाच्छा ह्या तीन पारशी गृहस्थांचा राष्ट्रीय चळवळीशी निकट संबंध होता. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या १९०६ साली भरलेल्या अधिवेशनाचे दादाभाई अध्यक्ष होते. त्या अधिवेशनात त्यानी स्वराज्याची प्रथम मागणी केली. मुंबईच्या म्युनिसिपल कौन्सिलवर ते निवडून आले होते आणि त्यानी तत्संबंधी केलेल्या लेखनामुळे अनेक सामाजिक व नागरी सुधारणांकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. दादाभाईच्या प्रखर राष्ट्रभक्तीमुळे फिरोजशहा मेहता प्रभावित झाले होते. मुंबईच्या टाऊन कौन्सिलवर, तसेच मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनवर ते निवडले गेले होते. १९११ मध्ये लॉर्ड विलिंग्डननी त्यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. आपल्या कारकीर्दीत त्यानी सेनेटमध्ये कारभार विषयक अनेक सुधारणा सुचविल्या व विद्यापीठांनी स्वतः ज्ञानदान करावे अशी मागणीही केली. १९१३ साली फिरोज शहानी ‘बॉम्बे क्रॉनिकल’ वृत्तपत्र सुरू केले.
मुंबईच्या जडणघडणीसाठी आणखी अनेकांनी उल्लेखनीय हातभार लावला. बेने इस्त्रायल धार्मिक समाजाची इथे छोटीशीच वसाहत होती. त्यापैकी बगदादहून आलेले डेव्हिड सासून ह्यानी मुंबईत व्यापारात पुष्कळ पैसा मिळवला. आपल्या धर्मबांधवासाठी त्यानी एक उपासनामंदिर बांधले व जनतेत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून विद्यालयेही स्थापना केली. बाल गुन्हेगारासाठी माटुंग्याला एक शाळाही काढली व तांत्रिक शिक्षणाचा प्रसारासाठी सासून मेकॅनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली.
डॉ. गार्सिया द ओर्टानंतर आणखी दोन भिषस्वरांनी औषधी वनस्पतींच्य अभ्यासात विशेष लक्ष घालून त्यांच्य गुणकारितेबद्दल अनेक प्रयोअ आणि संशोधन केले त्यांची नावे डॉ. भाऊ दाजी लाड व डॉ. सखाराम अर्जुन राऊत अशी होती. डॉ. सखाराम अर्जुन यांनी सर्वसामान्य व दुर्मिळ औषधी, त्यांची परिचित व शास्त्रोक्त नावे, उपयोग व उपलब्ध असण्याची स्थाने ह्यांची माहिती देणारा ह्या प्रकारचा पहिल ग्रंथ लिहिला होता. डॉ. भाऊ दाजी हे व्यवसायाने डॉक्टर खरे. पण त्यांच अनेक समाजिक व शैक्षणिक उपक्रमांशी निकट संबंध होता. ते बॉम्बे असोसिएशनचे पहिले कार्यवाह होते. पदार्थसंग्रहालय हे शिक्षणप्रसाराचे महत्त्वाचे साधन आहे हे जाणून त्यानी व्हिक्टोरिया गार्डन्स् व तेथील अल्बर्ट म्युझियम स्थापन करण्याचा हिरीरीने पुरस्कार केला. व्हिक्टोरिया गार्डन ही केवळ करमणुकीचे स्थान न होता जगातील विविध वनस्पती व वृक्षवेलीचा अभ्यास करणाऱ्यासाठी ती एक प्रयोगशाळा व्हावी ह्या हेतूने त्यानी ही योजन सिद्ध केली होती. तसेच कुष्ठरोगावर उपयुक्त अशा वनस्पतींचे संशोधन करून अनेक रूग्णांवर त्यानी यशस्वी उपचार केले होते. दुर्दैवाने ह्या संशोधन तपशील आज उपलब्ध नाही.
मुंबई ही वयाने आणि आकाराने वाढली असली तरी तिने आपले व्यक्तिमत्व व विशिष्ट संस्कृती गमावलेली नाही. मुंबई हे विसंगतीचे विचित्र मिश्रण आहे. जे काही नवे आणि चांगले आहे ते तिने आत्मसात् केले आहे पण त्याबरोबरच जे जुने आणि चिरकालिक आहे तिने सोडले नाही. सहार विमानतळावर राडार आहे. ट्रॉम्बेमध्ये अप्सरा आहे. वरळीला टेलिव्हिजनाचा मनोरा आहे आणि गोदींमध्ये पॅकेजिंगची अभिनव यंत्रणाही आहे आणि असे असूनसुद्धा कुलाब्याच्य दीपगृहात घासलेटची दिवळी पेटवण्यात येते. रस्त्यांवर व्हिक्टोरिया फिरत असतात. टोपलीत मासे भरून कोळीण तुमच्या घरी येते आणि उत्तररात्री कुलफीवाला घसा खरडीत गल्लोगल्ली फिरत असतो. ब्रिटिश सार्वभौम राजा जेव्हा भारतभेटीला आला त्यावेळी भव्य गेटवे ऑफ इंडिया उभारून मुंबई नगरीने त्याचे उत्कट स्वागत केले होते. त्याच मुंबईनगरीने कालांतराने ‘चले जाव’ चे रणशिंग फुंकून त्याच सत्तेला परत जाण्यास भाग पाडले. मुंबई ही अगम्य आहे पण तरीही ती स्थिर आणि दुराग्रही आहे. भावी काळात मुंबईचे स्वरूप कदाचित् बदलेल पण तरीसुद्धा जगातील संस्मरणीय नगरात तिचे स्थान अबाधितच राहील.
- पुरुषोत्तम जोशी आणि शां. शं. रेगे
अभिप्राय