महाराष्ट्रातील अलंकारांचा इतिहास - महाराष्ट्रीयांच्या पोशाखात-विशेषतः गेल्या पिढीतील पारंपारिक सौंदर्यदृष्टीलाच प्राधान्य देण्यात आलेले दिसते.
महाराष्ट्रीयांच्या पोशाखात-विशेषतः गेल्या पिढीतील पारंपारिक सौंदर्यदृष्टीलाच प्राधान्य देण्यात आलेले दिसते
महाराष्ट्रातील अलंकारांचा इतिहास (महाराष्ट्र)
(Alankar - Maharashtra) महाराष्ट्रीयांच्या पोशाखात-विशेषतः गेल्या पिढीतील पारंपारिक सौंदर्यदृष्टीलाच प्राधान्य देण्यात आलेले दिसते. दागिन्यांच्या जडणघडणीत व कलाकुसरीत सर्वत्र पारंपारिक नमुने आढळतात आणि या नमुन्यांची परंपरा दोन हजारांवर वर्षांहून पुरातन असेल्या शिल्पांपासून व चित्रांपासून चालत आलेली दिसते. हल्ली घडवण्यात येणाऱ्या दागिन्यांतून ही परंपरा हळूहळू नाहीशी दिसते. तरीही या दागिन्यांत पितळखोऱ्याच्या शिल्पातील, वा अजिंठ्याच्या चित्रातील तसेच गुप्तकालीन मध्ययुगीन महाराष्ट्राय शिल्पातील रंगीबेरंगी दागिने या सर्वांचे प्रतिबिंब दिसते. नथीसारखे काही दागिने त्यातल्या त्यात अलीकडच्या काळातील असून अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील लघुचित्र परंपरेतील अनेक चित्रात पहायला मिळतात.
(छायाचित्र: सोन्याचे दागिने वज्रटीक, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, जोंधळीपोत, चंद्रहार, गुलाबफूल, वाकी, बांगडीजोड, पिचोडया, बांगड्या, तोडे)
दागिन्यात मोती, जवाहिर व सोने यांचा उपयोग अधिक आहे. महाराष्ट्रभर लोक दागिने घडवायला सोनेच वापरणे पसंत करतांत; परंतु गोरगरिबात सोन्याऐवजी चांदी वापरतात.
सर्वसाधारपणे सोनाराच्या मुशीत सोन्याचा पत्रा ठोकून त्याला द्यायचा व उजव्या बाजूच्या पोकळीत लाख ओतून दागिना पुरा करायचा हीच पद्धत दागिने बनवताना वापरतात. त्यामुळे सोने कमी लागते. तसेचदागिन्याचे वजनही बेताचे होते. लाख वापरल्याने सोन्याला तेज चढते अशीही समजूत आहे. तेर येथे इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातल्या मुशी वा छाप सापडले आहेत. कोळी, भंडारी, सामवेदी यांची कर्णफुले, अग्रफुलासारखी केसातली फुले, कोल्हापुरी साज, मोहनमाळ असे दागिने या लाख भरण्याच्या पद्धतीने बनवण्यात येतात.
आणखी एक तंत्र म्हणजे सोन्याच्या नाजुक तारा निरनिराळ्या नक्षीने विणणे अथवा गुंफणे. अशा पद्धतीने चटईच्या विणीच्या वाक्या तसेच किंवा जरा जाड्या तारेने विणलेले गोफ, सरी, तोडे इत्यादि दागिने बनवतात. नुसतीच सरल पट्टी वाकवून पाटल्या वा कमरपट्टा बनवतात; तर गोठ सरी, कडी अशा दागिन्यात सोन्याच्या नळ्या वापरतात. या कारागिरीत जोड फार कमी असतात आणि म्हणून सोन्यात भेसळ करणे शक्य नसते. या दागिन्यात सोन्याचे वजन कुसरीपेक्षा महत्त्वाचे असून तंत्रात सरधोपटपणा दिसतो आणि कलाकुसरीला फारसा वाव नसतो. साजसजावटीखेरीज हे दागिने भपका, बचत अशांचे द्योतक असतात. तर सोन्याच्या पत्र्याचि मुशीतले दागिने याहून स्वस्त पण सुरेख असतात, आणि त्यांचा मुख्य हेतू शोभेचा असतो.
[next]राजघराण्यातील दागिने
राजेरजवाड्यांसाठी बनवण्यात आलेल्या दागिन्यात खूपच जवाहिर वापरलेले असते. कारण हिरे, माणके वगैरे अप्रूप, दुर्लभ व म्हणून मौल्यवान खडे वापरणे हा केवळ राजांचा हक्क समजत. परंतु पुढेपुढे अशा तऱ्हेच्या जडजवाहिराच्या दागिन्यांची निरनिराळ्या राजघराण्यातून प्रथाच पडली. बहुतेक राजांच्या खाजगी रत्नशाळा व सोनार असत. या रत्नशाळांत सर्व राजकुटुंबियांच्या दागिन्यांची जंत्रीही कैक वेळ ठेवत. पहिल्या माधवरावांची पत्नी रमाबाई हिने १७७२ मध्ये सती जाण्यापूर्वी आपले सर्व दागिने वाटून टाकले. त्यांची यादी कुटुंबाच्या कागदोपत्री सापडते. तिच्यावरून सर्व दागिन्यत हिरे-माणके-पाचू यांचा भरपूर वापर केला होता असे दिसते. मोत्याचे दागिनेही पुष्कळ होते. पैंजण सोडून निव्वळ सोन्याचे दागिने फारच थोडे होते. दागिन्यात हिरे-मोती व इतर खडे वापरण्याची परंपरा जुनी असली तरी सतराव्या शतकापासून कोंदणि मोगल धर्तीचीच आढळतात. ‘जेड’चे दागिने वापरात आले तेही या मोगल प्रभावामुळेच.
[next]शहरी लोकांचे दागिने
शहरामध्ये राहणाऱ्या निरनिराळ्या जाती-जमातींच्या लोकात आपापल्या परंपरांची मुक्त देवाणघेवान चालू असल्यामुळे ठराविक पारंपारिक शैलीतहि नक्षी, जडणघडण, कुसरीचे तंत्र याबाबतीत शहरांमध्ये घडवलेल्या दागिन्यात अधिक वैविध्य व वैचित्र्य आढळते. अशा शहरीकरणामुळेच कोळी व इतर काही जमातींचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने सोडले तर महाराष्ट्रभर दागिन्यांची एकच सरसकट शैली प्रचलित आहे व तिच्यात जाती-जमातीनुसार थोडेसेच फेरफार दिसून येतात असे म्हणावे लागेल. उदाहरणार्थ, पाठारे प्रभू जमातीत मुशीतून ठोकलेल्या व लाखेने भरलेल्या दागिन्यांपेक्षा संपूर्ण सोन्याच्याच दागिन्यांकडे अधिक कल आहे. त्यांच्या रोजच्या वापरातील दागिन्यात मोत्याची किंवा हिऱ्याचीकुडीम गळ्यात सोन्याची सरी, आणो जातात बांगड्या असतात.
विशेष प्रसंगी गळ्यात सरी, गाठले आणि मोहनमाळ किंवा चंद्रहार घालतात. मनगटांपासून कोपरापर्यंत तोडे, जाळीच्या बांगड्या, पाटल्य आणि पिछोडी असे दागिने असतात तर दंडावर खेळण आणि वेल. कानात बुगड्या आणि कापबाळ्या, केसात, फूल, नाकात हिऱ्याची किंवा मोत्यांची नथ (चमकी) घातली की सर्व पारंपारिक दागिन्यांचा साज चढला. राजघराण्यातील स्त्रिया सोडून इतर स्त्रियांचे पैजण चांदीचेच असतात. दागिन्यांपैकी नथ, तोडे, खेळण आणि गळ्यातल्या साखळ्या असे काही आईबापांकडून मुलीला लग्नात देण्यात येतात तर सरी, पाटल्या, बुगड्या असे इतर काही दागिने तिला सासरहून मिळतात. याच जातीत जावयाला जाडा सोन्याचा गोफ हुंडा म्हणून देण्याची पद्धत आहे. असे सोफ गोफ पाठारे पुरुष अजूनही काही विशेष प्रसंगी, धार्मिक विधींच्या वेळी वगैरे घालतात- कधीकधी तर तोड्यासह देखील.
[next]देशावरचेलोक सोन्याची एक पट्टी गळ्याभोवती घालतात (चिंचपेटीसारखी) तिला चितक म्हणतात. आता कोल्हाउरी साज आणि पुतळी माळ महाराष्ट्रात सर्वत्र घातली जात असली तरी पूर्वी हे फक्त मराठ्यातच आढळत असत. ब्राह्मणांच्य बायका- विशेषतः देशावरच्या जास्ती करून चिंचपेट्याच घालीत. तसेच त्यांच्या हातातले दागिनेही पाठारे प्रभूंपेक्षा वेगळे अस्त. त्या मगनटाजवळ प्रथम शिंदेशाही तोडे, नंतर बांगड्या, गोठ व पाटल्या अशा क्रमाने दागिने कोपरापर्यंत घालीत. मोत्याच्या बांगड्यांच्या बाबतीत हा क्रम मनगटाकडून गजरा, बांगड्या आणि रविफूल असा असे.
कोकणात दागिन्यांची विशेष परंपरा नाही याचे कारण बहुधा तेथील गरिबी. इथे जे काही दागिने सापडतात ते देशावरल्या व इतर जमातींच्या दागिन्यांचे अनुकरण करून घडवतात. सर्व बायकांकडे हमखास असणारा कोकणी दागिना म्हणजे फक्त नथच. घाटावर बायकांचे दागिने जवळजवळ असेच असतात पण अनेक वेळा सोन्याएवजी घडणीत चांदी वापरलेली असते. तसेच त्यांच्या वाक्या एका विशेष नागमोडी धर्तीच्या असतात.
[next]सर्वसाधारण शहरी पद्धतीचे दागिने पुढील प्रमाणे:
गळ्यातील दागिने
सरी:
सोनेरी वर्तुळाकृती नळी किंवा दोन तारा विणून केलेली साखळी. टोकाला मळसूत्री नागमोड व आकडा. सरी चांगली ताठ असून मळ्यालगतच घालतात.
मोहनमाळ:
मुशीत घडवलेल्या मण्यांची माळ, मोहनमाळेच्य जुन्या नमुन्यात अनेक प्रकारच्या नक्षीचे मणि सापडतात. (१९ वे शतक, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
गाठले आणि पुतळीमाळ:
सोन्याच्या नाण्यांची माळ. गाठल्यातल्या नाण्यांवर मोहोर किंवा लिखाण असते तर पुतळीमाळेतल्या पुतळ्या थोड्या जड असून त्यांच्यावर स्त्रीची आकृती असते.
चंद्रहार:
एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. अलीकडच्या फॅशनचा चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो आणि त्यात एकात एक अडकवलेल्या चपट्या वळ्यांचे अनेक सर असतात. हे हार बेंबीपर्यंत लांब असू शकतात. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत.
कोल्हापुरी साज:
हा गळ्याभोवतीचपण जरा सैलसर बसतो आणि यात चंद्र, कमळ, मासा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार, आणि एक सोडून एकमणी ओवलेले असतात. पूर्वी हा फक्त सवाष्ण बायकाच घालीत पण आता सरसकट वापरात आढळतो.
गोफ:
सुरेख विणीचाम सोन्याच्या नाजूक तारांचा दोर. गोकुळाष्टमीला अथवा गौरीपूजेच्या वेळी मुले-मुली एक खेळत खेळतात त्यालाहि गोफ असे नाव आहे. वरून टांगलेल्या रंगीबेरंगी रेशमी धाग्यांचे एकेक टोक पकडून सर्वजण तालात, गाणे म्हनत एकमेकांभोवती अशा तऱ्हेने फिरतात की सर्व धाग्यांची वेणी अथवा गोफ पडत जातो.
रोजच्या वापरातले गळ्यातले दागिने म्हणजे बोरमाळ, हिराकंठी, जोंधळी पोत आणि एकदाणी.
[next]मोत्याच्या माळा
चिंचपेटी:
मखमलीच्या पट्ट्यांवर शिवलेले मोती आणि खडे.
तन्मणी:
मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खड्यांचे आणिकच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते.
बांगड्या
तोडे:
हे दोन प्रकारचे; एक शिंदेशाहि आणि दुसरे गुजराती. शिंदेशाहि थोडे लवचीक, कुठेही वाकणारे व सोन्याच्या तारा गुंफून केलेले असतात तर गुजराती तोडे सोन्याच्या पट्टीवर तारा गुंफून करतात. या पट्टीच्या किनारीवरही गुंफलेल्या तारांची नक्षी असते आणि हे तोडे वाकत नाहीत. हे जास्तीकरून पाठाऱ्यांच्यात आढळतात आणि ही जमात जेव्हा कैअक शतकापूर्वी गुजरातेतून इथे आली तेव्हा त्यांनी ते आपल्याबरोबर आणले असणार.
जाळीच्या बांगड्या:
कोरीव अथवा जाळिचे काम असलेल्या बांगड्या.
पाटल्या:
सोन्याची वर्तुळाकार दिलेली नळी.
पिछोड्या:
रूंद बांगड्या. यांच्या वरच्या किनारीस नक्षी असते आणि या सर्वात वर-कोपराच्या सर्वात जवळ घालतात.
दंडावरचे दागिने
वेल, वाक्या, तुळबंदी, खेळण, दोन्ही दंडांवर घालायचे दागिने, तारांच्या गोफाचे अथवा नागमोडी अथवा नुसतेच चपटे, वर्तुळाकृती. मधोमध पुष्कळदा मोठा खडा किंवा इतर काही पुतळी आकृती. कधी कधी खालच्या बाजूस छोट्या छोट्या साखळ्या लावलेल्या असून त्यांची दंडावर सुरेख वलये दिसतात.
[next]कांनातले दागिने
झुंबरे, तोंगल, भोकरं, छोट्या-छोट्या झुंबरांसारखेच सोन्याचे, मोत्याची झालर लावलेले डूल.
काप:
अर्धवर्तुळाकृती लाल किंवा हिरवे खडे आणि त्यांच्याभोवती मोत्यांची किनार. केसांपर्यंत सबंधकानाची बाहेरची बाजू झाकणाऱ्या दागिन्याला कापबाळ्या म्हणतात.
बुगडी:
कानाच्या वरच्या कोपऱ्यात घालतात.
बाळी:
एका भोकात बुगडी असली तर शेजारे दुसऱ्या भोकात बाळी घालतात.
इतर दागिने
नथ:
महाराष्ट्रीय स्त्रीचे विशेष अभिमानाचे आभूषण. बहुधा नथमोत्याची असते. क्वचित हिऱ्याची किंवा इतर खड्यांची, हिचे दोन प्रकार. एक संपूर्ण गोल असते तर दुसरी लंबवर्तुळाकृती असून नाकाच्या एका बाजूस बसते.
कमरपट्टा:
हा फक्त श्रीमंताच्याच बायका, आणि त्याही काही नैमित्तिक प्रसंगीच घालतात. कमरपट्ट्यांच्या मधोमध असलेला खडा (किंवा आकृती) वाकीतल्या मध्याशी असलेल्या खड्याशी (आकृतीशी) मिळतीजुळती असते.
निरनिरळ्या प्रकाराची फुले सर्वचजातीच्या बायका घालतात. आणि ती डोक्यात कशी घालायची याबद्दल नियम आढळतात. वेणीतले पहिले फूल हे अग्रफूल आणि वेणी घालता घालता गुंफतात ती मूद. ही फुले खऱ्या फुलांसारखी -गुलाब किंवा सूर्यफूल- बनवलेली असतात. ही आतून पोकळ, लाखेने भरलेली असतात. पाठाऱ्यात मुशीतील फुले न वापरता चपटी, पानांच किंवा मोरांचा किंव कळीचा आकार दिलेली सोन्याच्या पत्र्याची फुले वापरतात. पूर्वी भांगाच्या दोन बाजूस चंद्र-सूर्याकृती फुले घालण्याची पद्धत होती.
पुरुषांनी दागिने घालायची पद्धत आता जवळजवळ नष्ट झालेली आहे. तसेच मुलांनाही आता दागिने घालीत नाहीत. तरी दहावीस वर्षांमागे लहान मुलांना डूल घालण्याची पद्धत होती. अजूनही लहान मुलांना वाकदा ताईत किंवा दोऱ्याच्या साखळीत गुंतवलेले व्याघ्रनख घातलेले दिसते. पुरुषांच्या कानात फक्त भिकबाळी हा एकच दागिना दिसून येई. मुलांना दृष्ट लागू नये म्हणून नातेवाईकांनी व ओळखी-पाळखीच्यांनी "भीक" घालून दिलेल्या पैशातून ही बाळी बनवत असल्यामुळे तिला हे नाव पडले.
काही काही जातीत अजून त्यांचे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिने आढळतात. यांच्यापैकी कोखी, भंडारी, सामवादीम वडवल आणि त्यांचेच ख्रिस्ती भाई ‘ईस्ट इंडियन’ हे होत. अलीकडे यांच्याहि दागिन्यांच्या धर्ती बदलत आहेत तरी काही आडगावातून अजून त्यांचे पारंपारिक दागिने जसेच्या तसे सापडतात आणि तसे दागिने घातलेली स्त्री बघताच कुठल्या जमातीची ते आपल्या ध्यानात येते.
[next]कोळी दागिने
मासेमारीच धंदा करणारे व किनारपट्टीत राहणारे हे लोक अनेक वर्षांपासूनची आपली दागिन्यांची परंपरा टिकवून आहेत. कानाच्या पाळ्यांन मोठमोठी भोके पाडून त्यात मोठी कर्णभूषणि घालण्याची अति जुनी पद्धत त्यांच्यात अजून आढळते. त्यांच्या कानाच्या पाळ्या खांद्याच्या निम्म्यापर्यंत (जुन्या शिल्पांसारख्या) आलेल्या दिसतात. अर्थात या भोकात घालायचे दागिने आतून पोकळ असल्याने त्यांन फारसे वजन नसते. घट्ट कासोट्याचे लुगडे नेसलेली, डोक्यावर मोठा हार घेतलेली, कानातले गठे झुलवत, गळ्यातल्या कंठीला वक्षावर मिरवत जाणारी कोळीण बघणे हे मोठेच नेत्रसुख! ख्रिस्ती कोळणी कानात असेच गठे घालत असल्या तरी गळ्यात बोरमालआणि पुतळीमाळ घालतात ( इतर कोळणीही कधी कधी या माळा घालतात ). भंडाऱ्यांच्यात हेच दागिने असतात पण त्यांच्या कानाच्या वरच्या पाळीत बुगडीची असते.
गठे:
सोन्याची जाळी, गोल वाळी, हिच्यावर उभ्या रेखा किंवा ठिपके किंवा क्वचित मलसुत्री नक्षी असते. या बाळीला मधे बिजागरी असून दोन टोके मळसूत्रानेच बंद केलेली असतात. कधीकधी मुख्य बाळीत एक छोटीशी दुसरी बाळीही खाली बसवलेली असते. गंमत म्हणजे या दुसऱ्या बाळीला बिजागरी वा मळसूत्र नसतानाही कधीकधी नुसती नक्षी म्हणून कोरून दाखवलेली आढळतात. कदाचित पूर्वीच्या काळी ही बाळीही बिजागरी मळसुत्रानेच वरच्या बाळीत अडकवत असून तिचे मगर, सूर्य, चंद्र, असे काही वेगळे आकार बनवीत असतील. या बाळ्या मुशीतून ठोकलेल्या पत्र्याच्याच बनवलेल्या असतात.
कंठी:
पाच किंवा सात सोन्याच्या सरांची माळ. दोन खांद्याजवळ हिला दोन चपटी खोडे असतात. माळीतल्या प्रत्येक एक सोडून एका सराची वीन वेगळी असते. कंठीचे वैशिष्ट्य म्हणजे इतर माळांप्रमाणे खोड मधोमध नसते आणि प्रत्येक सर आधीच्या सराहून थोडा लांब असतो. त्यामुळे स्त्रीच्या वक्षावर त्यांचे सुरेख अर्धवर्तुळ तयार होते.
नथ:
ही फक्त सवाष्णीच घालतात. नथ म्हणजे सोन्याचे वर्तुळ व त्यात पोवळे बसवलेले असते. कधी कधी त्यात मुकुट आणि मणी आढळतो.
कडे:
जाडी, सोन्याची बांगडी.
सामवादी आणि वडवळ दागिने
ख्रिस्ती आणि हिंदू सामवादी आणि साष्टीचे वडवळ यांचे दागिनेही फार सुरेख असतात आणि ते इतर कुणाच्यात आढळत नाहीत.मुलीचे लग्न ठरताच तिच्या कानाच्या वरच्या बाजूस पाच भोके पाडतात. लग्नाच्या आदल्या रात्री य पाचापैकी खालच्या दोन भोकात गुढाच्या बाळ्या घालतात आणि वरच्या तिनांत साध्या बाळ्या. खेरीज डाव्या कानाच्यावर धरण्या नावाचे एक आभूषण- सोन्यात बसवलेले पोवळे- सोन्याच्य साखळीने तिच्या केसांना बांधतात.
त्यांच्या पारंपारिक दागिन्यात गळ्यातल्या पाच प्रकारच्या माळा असतात. पैकी दोन शिरण आणि एक मंगलसूत्र मुलीला लग्नात मिळतात. याखेरीज या स्त्रिया केसात तऱ्हेतऱ्हेची फुले, कानात कलपोती, सोन्याच्या बांगड्या आणि पायात चांदीच्या झांजिऱ्या घालतात.
वडवळ आणि साष्टीचे ख्रिस्ती (हे मूळ हिंदूच होते) असेच पण जरा लहान व कमी दागिने घालतात.
दुलेदिया:
सोन्याच्या छोट्या छोट्या मण्यांच्या (भिनूंच्या) सहा सरांची माळ. सोन्याची दोन डाळिबें किंवा सोन्याचे दोन मोठे मणी सर एकत्र गोफवण्यासाठी असतात.
पेरोज:
मोठाल्या भिनूंचे तीन सर दोन सोनेरी डाळिंब्यांनी बांधलेले.
शिरण:
(मोठे) आठ मोठी पोवळी आणि आठ सोन्याचे मोठे मणी एक सोडून एक गुंफलेले. किंवा (लहान) पाच मोठी पोवळी आणि पाच सोन्याचे मोठे मणी एक गुंफलेले.
दोले:
१४ पोवळी आणि ७ सोन्याचे मणी वरील प्रमाणेच गुंफलेले.
वज्रटीक:
सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसविलेली कापडी पट्टी.
पोत:
लाल खडे, पोवळी आणि सोन्याचे मणी एकत्र गुंफलेले.
कापोती/काप:
शिंपल्याच्या आकाराचा कानातला दागिना. वजन कानावर पडू नये म्हणून याला लावलेली सोन्याची साखळी केसात खोवतात.
करब:
कानाच्या मध्येच घालावयाची बाळी.
बुगड्या:
कानाच्या वरच्या बाजूस घालावयाची छोटी कुडी किंवा फूल.
गुलाबफूल, केतक, धापण्या, कुलूक- केसातील फुले, खेरीज, सोन्याच्या बांगड्या आणि दोन चांदीच्या झांजऱ्या.
लग्नात वधूला माहेरून तसेच सासरहून दागिने मिळतात. हे किती, कसले वगैरी ज्याच्या त्याच्या ऐपतीवर अवलंबून असते. दिलेच पाहिजे- कुठलीही का जात, जमात, वर्ण वर्ग असो- असे एक मंगळसूत्र. हे काळ्य मण्यांचे एक वा अधिक सर दोऱ्यात किंवा सोन्यात गुंफलेले आणि मधोमध सोन्याचे दोन मणी असे असते. कधी कधी पोवळेही असते. महाराष्ट्रातील स्त्रियांना ग्रामीण वा शहरी - प्रत्येक दागिना त्याच्या विशिष्ट नांवाने ठाऊक असतो. आणि त्या नांवातच पुष्कळदा त्या दागिन्याची घडण, नग, वापर या सर्वांचा निर्देश असतो. दागिन्यांची ही परंपरा लवकरच नष्ट होणार अशी भीती बाळगण्याजोगी परिस्थिती सध्या निर्माण झालेली असली तरी बदलत्या फॅशन, पैशांची चणचण या सर्वांना तोंड देऊन आजपर्यंत हा उज्ज्वल वारसा चालत आलेला आहे. यांत शंका नाही.
अभिप्राय