॥ माझी कवीता ॥
कवितेन किती काळ रहायच
चंद्राच्या, वेलीच्या आणि फुलांच्या संगतीत
किती वेळा थबकायच तिन
आळसावलेल्या प्रियेच्या खळीत
तोच विठोबा, तोच ज्ञानेश आणि तीच भक्ती
तीच हुरहुर तेच लाघव आणि तीच मुक्ती
म्हणा, `रुप पाहता लोचनी सुख झाले ही साजणी,
किती काळ कंठायचा काव्यान चातुर्वर्ण्याच्या चौकटीत
आमचे पुर्वज अस्से शुर ! हेच ओतायच त्याच त्या मुशीत
इतिहासाच पाननपान रक्ताच्या थेंबागत झालय लाल
तरीही साली ! दचकत नाही खचकत नाही संस्कृतीची ही बेढव साल
म्हणोत बापडें `सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा'
कविता नको लवलवणारी, ठुमकणारी आणि नटमोगरी
खुदकन हसणे, रुसुन बसणे अन उभीच काया थरथरणारी
खुश्शाल गां `संख्या चला बागामंदी रंग खेळू चला'
कविता असावी उसळणारी, आक्रंदणारी आणि संतापणारी
उरस्फोट करीत धावणाऱ्या कामगारांची आणि
खिंकाळणाऱ्या सावकारांची
कविता नस्वी श्लोकाची, शोकाची अथवा खोट्याक्रांतीची
आणि नसावी भाकरीलाही उपमा लावणाऱ्या चंद्राची
कविता असावी पवारांची, बागुलाची आणि ढसाळांची
खर खर सांगा ` स्वांतत्र्य कोणत्या गाढवीच नाव आहे'
काय म्हणता ? -- आम्ही -- आम्ही देशद्रोही ?
छान ! कापा आमची मान ना कंठरवाने गा !
`गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार !'
|