२१
एक बाप आपल्या मुलाला म्हणाला, "गुंड्या! तो आकाशातून पक्ष्यांचा थवा उडत चाललाय तो पाहिलास ना? त्यातल्या त्या पांढऱ्या पक्ष्यावर मी बंदुकीतून गोळी झाडली."
यावर गुंड्या म्हणाला, "बाबा! तरीच तो पांढरा पक्षी सर्वांच्या पुढे निर्धास्तपणे व ऐटीत उडत चालला आहे."
२२.
वर्गशिक्षिकेनं विचारलं, "पिलू! शहामृगाची मान लांब का असते?"
पिलूनं उत्तर दिलं, "बाई! शहामृगाचं शरीर व मस्तक यांत फार अंतर असल्याने त्या दोघांना जोडण्यासाठी देवाने त्याची मान लांब केली आहे."
२३.
एक शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर बसून, कशाची तरी वाट बघत होता. जवळच्या पायवाटेनं जाणाऱ्या एका शहरी माणसानं त्याला विचारलं, "काय शेतकरीदादा? कसला विचार चालला आहे? एखाद्या अडचणीत आहात का तुम्ही?"
यावर किंचित् हसून तो शेतकरी म्हणाला, "छे छे! उलट देवदयेनं माझ्या अडचणी आपोआप एकामागून एक सुटत असल्याने मी समाधानी आहे. गेल्याच आठवड्यात मला या माझ्या शेताच्या आसपासची झाडं कोळसा बनविण्यासाठी तोडायची होती. पण त्याच वेळी एकाएकी भलं मोठं वादळ आलं आणि ती सगळी झाडं मुळापासून उन्मळून पडली ! ती झाडं तोडण्याचे माझे श्रम अनायासे वाचले.
शहरी माणूस - अरे वाः! मोठे नशीबवान दिसता तुम्ही. मग त्या झाडांचे कोळसे केलेत का?
शेतकरी - तेही श्रम मला घ्यावे लागले नाहीत. परवा नेमकी त्याच झाडांवर वीज कोसळली आणि त्या सर्व झाडांचे परस्पर झक्कास कोळसे बनून गेले!
शहरी माणूस - मग मात्र कमालच झाली म्हणायची ! बरं आता तुम्ही कशाची वाट बघत बसला आहात?
शेतकरी - वादळ व वीज यांनी जशी माझी दोन मोठी कामं केली, तसाच जर आता जोरदार धरणीकंप झाला, तर माझ्या शेतजमिनीत तयार झालेले बटाटे, त्या जमिनीला भेगा पडून तिच्यातून आपसूक बाहेर पडतील व माझे जमीन खणण्याचे श्रम वाचतील तेव्हा आता मी अशा धरणीकंपाची वाट बघत बसलो आहे.
२४.
दिनू - माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही.
मनू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत?
दिनू - नाही रे! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?
२५.
गुरुजी म्हणाले, " बरं,का छब्या, तू जरी निबंधात अगणित चुका केल्या असल्यास, तरी त्याबद्दल तुला फटके मारताना मला वाईट वाटणार आहे."
छब्या म्हणाला, "गुरुजी तुम्हाला जसे मला फटके देताना वाईट वाटणार आहे, त्याचप्रमाणे ते फटके खाताना मलाही वाईट वाटणार आहे. मग दोघांनाही जर ती गोष्ट दुःख देणारी आहे. तर निबंधातील चुकांबद्दल मला फटके द्यायचा विचाअ तुम्ही सोडूनच द्या कसा!"