कादंबरीकार बाबा कदम यांचे निधन
प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम (मूळनाव - वीरसेन आनंद कदम) यांचे मंगळवारी येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना सरस्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (बुधवारी) सकाळी आठ वाजता येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे मुलगा उमेश आणि सून कुमादिनी असा परिवार आहे. मुलगा आणि सून दक्षिण आफ्रिकेत असतात. चार मे १९२९ रोजी कदम यांचा जन्म झाला. सुरवातीला ते सरकारी वकील होते. त्यानंतर १९६५ पासून ते पूर्णत: लेखनाकडे वळले. प्रलय ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गुन्ह्यांचे निरीक्षण करून, काही काल्पनिकतेच्या साह्याने त्यांनी अनेक कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांच्या या कादंबऱ्या विशेष गाजल्या. न्याय, बालंट, एक होती बेगम, एक होता युवराज, रिवॉर्ड, झिंदाबाद, इन्साफ, नजराणा, प्रतिक्षा, दगा, अजिंक्य, बलिदान, श्वेतगिरी, राही अखेरचे स्टेशन, राजधानी या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या प्रसिद्ध झाल्या. तसेच, १२ मराठी चित्रपटांना पटकथा दिल्या.

